श्री गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi 2024)

श्री गणेश चतुर्थीला, तसेच श्री गणेशोत्सवाच्या दिवसांत गणेशतत्त्व नेहमीच्या तुलनेत पृथ्वीवर १ सहस्र पटीने कार्यरत असते. या काळात केलेल्या श्री गणेशाच्या उपासनेने गणेशतत्त्वाचा अधिक लाभ होतो. श्री गणेशचतुर्थी हा हिंदूंचा मोठा सण आहे. गणेशोत्सव आदर्शरित्या कसा साजरा करा, गणेशमूर्ती अन् निर्माल्य वहात्या पाण्यात विसर्जित का करावे, याविषयीची माहिती पुढील लेखांतून समजून घेऊया.

गणेशोत्सवाचा इतिहास

देशाच्या बहुतांश भागांत गणेशोत्सव हा जवळजवळ राष्ट्रीय महोत्सव म्हणूनच साजरा केला जातो. त्यात महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, गोवा, गुजरात, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश आणि तमिळनाडू या राज्यांचा समावेश आहे. हा गणेशोत्सव चालू होण्यास लोकमान्यांची प्रेरणा कारणीभूत आहे, हे स्पष्ट आहे. तसेच गणपतीला सार्वजनिक गणेशाचे जे रूप मिळाले, त्याला ग्वाल्हेरचा गणपतिही कारणीभूत आहे.

मंत्र, त्याचे अर्थ आणि ऑडिओ सहित

श्री गणेश चतुर्थी या दिवशी करायचा पूजाविधि

सुखकर्ता, विघ्नहर्ता आणि अष्टदिशांचा अधिपती असलेल्या श्री गणेशाची पूजा भावपूर्ण होऊन त्याचा कृपाशीर्वाद मिळावा, असाच सर्व गणेशभक्तांचा प्रयत्न असतो. गणेशभक्तांना ही पूजा भावपूर्ण करता यावी, या उद्देशाने गणेशमूर्तीची पूजा शास्त्रोक्त पद्धतीने करण्यासाठी आणि त्यातून गणेश पूजनाचा लाभ करून घेण्यासाठी पुढील लेख उपयुक्त आहे.

गणेश चतुर्थी विषयी तुम्हाला हे माहित आहे का ?

कुटुंबात गणेश मूर्ती कोणी बसवावी ?

श्री गणेश चतुर्थी व्रत हे ‘सिद्धीविनायक व्रत’ या नावाने ओळखले जाते. वास्तविक हे व्रत सर्व कुटुंबांत होणे क्रमप्राप्त आहे. सर्व भाऊ एकत्र रहात असतील म्हणजेच त्यांचा द्रव्यकोश (खजिना) आणि पाकनिष्पत्ती (चूल) एकत्र असेल, तर सर्वांत मिळून एक मूर्ती पुजली तरी चालते; पण ज्या वेळी द्रव्यकोश आणि पाकनिष्पत्ती कोणत्याही कारणास्तव विभक्त असतील, तर त्यांनी आपापल्या घरी स्वतंत्र गणेशमूर्ती पुजावी. ज्या कुटुंबात एकच गणपति बसवण्याची दृढ परंपरा आहे, त्या कुटुंबात ज्या भावामध्ये देवाविषयी अधिक भाव आहे, त्याच्याच घरी गणपति बसवावा.

गणेश चतुर्थी काळात नवीन मूर्तीचे प्रयोजन का ?

पूजेत गणपति असला, तरी गणपतीची नवीन मूर्ती आणण्याचा उद्देश याप्रमाणे आहे – श्री गणेश चतुर्थीच्या वेळी गणेशलहरी पृथ्वीवर खूप जास्त प्रमाणात येतात. त्यांचे आवाहन नेहमीच्या पूजेतील मूर्तीत केल्यास तिच्यात खूप जास्त शक्ती येईल. जास्त शक्ती असलेल्या मूर्तीची साग्रसंगीत पूजाअर्चा वर्षभर नीटपणे करणे कठीण जाते; कारण त्यासाठी कर्मकांडातील बंधने पाळावी लागतात. म्हणून गणेशलहरींचे आवाहन करण्यासाठी नवीन मूर्ती वापरतात आणि ती मूर्ती नंतर विसर्जित करतात.

​श्री गणेश चतुर्थीला पुजावयाची मूर्ती कशी असावी ?

चिकणमाती किंवा शाडूची माती यांपासून मूर्ती बनवावी, असा शास्त्रविधी आहे. अन्य वस्तूंपासून (उदा. प्लास्टर ऑफ पॅरिस, कागदाचा लगदा) मूर्ती बनवणे, हे धर्मशास्त्रविरोधी, तसेच पर्यावरणाला घातक आहे !

मूर्तीची उंची अधिकाधिक एक फूट ते दीड फूट असावी ! मूर्ती शास्त्रानुसार बनवलेली, पाटावर बसलेली, डाव्या सोंडेची अन् नैसर्गिक रंगांनी रंगवलेली असावी !

बाजारातील आकर्षक मूर्तींच्या मोहात न अडकता अथर्वशीर्षात केलेल्या वर्णनानुसारच गणेशमूर्ती घ्या !

​श्री गणेश चतुर्थीसाठी पुजावयाची मूर्ती घरी कशी आणावी ?

शक्यतो गणेशमूर्ती आदल्या दिवशीच आणून ठेवावी.

मूर्ती घरी आणण्यासाठी घरातील कर्त्या पुरुषाने इतरांसह जावे.
मूर्ती हातात घेणार्‍याने हिंदू वेशभूषा करावी, म्हणजे अंगरखा (सदरा)-धोतर किंवा अंगरखा-पायजमा. त्याने डोक्यावर टोपीही घालावी.
मूर्ती आणतांना तिच्यावर रेशमी, सुती किंवा खादीचे स्वच्छ वस्त्र घालावे. मूर्ती घरी आणतांना मूर्तीचे मुख आणणार्‍याकडे आणि पाठ समोरच्या दिशेस असावी.
श्री गणेशाचा जयजयकार आणि भावपूर्ण नामजप करत मूर्ती घरी आणावी.
घराच्या उंबरठ्याबाहेर उभे राहिल्यावर घरातील सुवासिनीने मूर्ती आणणार्‍याच्या पायांवर दूध आणि नंतर पाणी घालावे.
घरात प्रवेश करण्यापूर्वी मूर्तीचे मुख समोरील दिशेस करावे. यानंतर मूर्तीचे औक्षण करून ती घरात आणावी.

सजवलेल्या मखरात पाटावर किंवा चौरंगावर थोड्या अक्षता घालून त्यावर मूर्ती ठेवावी. सजावट पूर्ण व्हायची असल्यास मूर्ती अन्य सुरक्षित जागी ठेवून सजावट लवकरात लवकर पूर्ण करावी. मूर्तीला मखरात बसवल्यानंतर मूर्ती हलणार नाही किंवा मूर्तीस काही अपाय होणार नाही, याची काळजी घ्यावी. मूर्तीवर एखादे वस्त्र किंवा रूमाल घालून ती झाकून ठेवावी.

भाद्रपद शुद्ध चतुर्थीस मातीचा गणपति करतात. तो डाव्या हातावर ठेवून तेथेच त्याची सिद्धीविनायक या नावाने प्राणप्रतिष्ठा आणि पूजा करून लगेच विसर्जन करावे, असा शास्त्रविधी आहे; पण मनुष्य हा उत्सवप्रिय असल्याने एवढ्याने त्याचे समाधान होईना; म्हणून दीड, पाच, सात किंवा दहा दिवस श्री गणपति ठेवून त्याचा उत्सव करू लागला. बरेच जण (ज्येष्ठा) गौरीबरोबर गणपतीचे विसर्जन करतात. एखाद्याच्या कुलाचारात गणपति पाच दिवस असेल आणि तो त्याला दीड किंवा सात दिवसांचा करावयाचा असला, तर तो तसे करू शकतो. यासाठी अधिकारी व्यक्तीस विचारण्याची जरूरी नाही. रूढीप्रमाणे पहिल्या, दुसर्‍या, तिसर्‍या, सहाव्या, सातव्या किंवा दहाव्या दिवशी श्री गणेशविसर्जन करावे.

​मूर्तीची आसनावर स्थापना करण्यापूर्वी तेथे थोडे तांदूळ का ठेवा‍वे ?

पूजेपूर्वी ज्या पाटावर मूर्तीची स्थापना करायची असते, त्यावर तांदूळ (धान्य) ठेवून त्यावर मूर्ती ठेवतात. आपापल्या प्रथेप्रमाणे थोडे तांदूळ किंवा तांदुळाचा लहानसा ढीग करतात. तांदुळावर मूर्ती ठेवण्याचा फायदा पुढीलप्रमाणे होतो.

मूर्तीत गणपतीचे आवाहन करून तिची पूजा केल्याने मूर्तीत शक्ती निर्माण होते. त्या शक्तीमुळे तांदूळ भारित होतात. सारख्या कंपनसंख्येच्या दोन तंबोर्‍यांच्या दोन तारा असल्या, तर एकीतून नाद काढल्यास तसा नाद दुसर्‍या तारेतूनही येतो. त्याचप्रमाणे मूर्तीखालील तांदुळात शक्तीमुळे स्पंदने निर्माण झाली की, घरातील तांदुळाच्या साठ्यातही शक्तीची स्पंदने निर्माण होतात. अशा तर्‍हेने शक्तीने भारित झालेले तांदूळ वर्षभर प्रसाद म्हणून खाता येतात.

मूर्तीचे मुख पश्‍चिम दिशेला असेल अशा पद्धतीने ठेवावी. पूजकाने पूजा करतांना स्वतःचे तोंड दक्षिण किंवा पश्‍चिम दिशेला येणार नाही, अशा पद्धतीने बसावे. पूजा करतांना आपले मुख पूर्व किंवा उत्तर दिशेलाच राहील याची दक्षता घ्यावी यासाठी पुढील पर्याय आहेत –

१. मूर्तीचे मुख पश्चिमेला किंवा दक्षिणेला असल्यास पूजकाचे मुख आपसूकच अनुक्रमे पूर्व आणि उत्तर दिशेला होईल. पण

२. मूर्तीचे मुख पूर्वेला असल्यास पूजकाने पश्चिमेला मुख करून पूजा न करता मूर्तीच्या उजव्या हाताला उत्तरेकडे तोंड करून बसावे.

३. मूर्तीचे मुख उत्तरेला असल्यास पूजकाने दक्षिणेकडे मुख करून पूजा न करता मूर्तीच्या डाव्या हाताला पूर्वेकडे तोंड करून बसावे.

दक्षिण दिशेला मूर्तीचे तोंड असू नये. दक्षिणेकडे तोंड साधारणपणे उग्र देवतांचे असते, उदा. काली, हनुमान, नरसिंह इत्यादी. गणपतीची जी मूर्ती आपण आणतो, ती उग्र नसून प्रसन्न किंवा शांत असते; म्हणूनच शक्यतो तिला दक्षिणमुखी ठेवू नये.

गणपति घरी असेपर्यंत प्रतिदिन सकाळी आणि संध्याकाळी प्राणप्रतिष्ठा सोडून गणपतीची नेहमी पूजा करतो तशी पूजा करावी आणि शेवटी आरत्या आणि मंत्रपुष्प म्हणावे.

​गणेश मूर्ती प्रतिष्ठापना नंतर प्रतिदिन करायची पंचोपचार पूजा

अ. संध्याकाळी म्हणजे सात-साडेसात वाजता देवावरील वाहिलेली फुले काढून गंध, फुले, दुर्वा, धूप, दीप आणि नैवेद्य दाखवावा. पद्धतीप्रमाणे आरती करावी. यास पंचोपचार पूजा म्हणतात. रात्री झोपतेवेळी गजाननाची प्रार्थना करावी आणि त्यानेच आजच्या दिवसाची सेवा चांगली करून घेतल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी अन् शांत चित्ताने निद्राधीन व्हावे.

आ. प्रतिदिन षोडशोपचार पूजा जमली नाही, तरी वर सांगितल्याप्रमाणे पंचोपचार पूजा तरी करावी.

इ. पूजा झाल्यावर वेळ मिळाल्यास गणेशस्तोत्र, गणपति अथर्वशीर्ष, गणेश सहस्रनामावली म्हणावी. मुलांनाही स्तोत्रे शिकवावीत. दुर्वा निवडण्यास शिकवावे. फुले आणि पत्री यांची माहिती द्यावी. मुलींनी मोदक बनवण्यास शिकावे. (मुलांनीही शिकण्यास हरकत नाही.)

ई. गणेशमूर्तीसमोरचा भाग नेहमी स्वच्छ ठेवावा. फळे आणि नैवेद्य वेळोवेळी काढून घ्यावा आणि झाकून ठेवावा, नाहीतर थोड्या वेळाने वास येऊ लागतो अन् खाण्यासारखे रहात नाही. फळांची आणि पेढे इत्यादींची योग्य व्यवस्था करावी.

याप्रमाणे प्रतिदिन सकाळी आणि संध्याकाळी पंचोपचार पूजा करावी.

मूर्ती देवतेच्या मूळ रूपाशी जितकी साम्य असणारी असेल, तितकी ती उपासकाला लाभकारक असते. ऋषीमुनी आणि संत यांनी शास्त्रे लिहिली आहेत. त्यांना देवतांचा जसा साक्षात्कार झाला, तशी त्यांनी देवतांची वर्णने शास्त्रांत केली आहेत; म्हणून शास्त्रांत सांगितल्याप्रमाणे मूर्ती बनवावी.

श्री गणेश उपासनेतील काही कृती !

श्री गणेशाला गंध, हळद-कुंकू वहाण्याची पद्धत !

पूजा करतांना श्री गणेशाला उजव्या हाताच्या करंगळीजवळच्या बोटाने, म्हणजेच अनामिकेने गंध लावावे.

श्री गणेशाला हळद-कुंकू वहातांना आधी हळद अन् नंतर कुंकू उजव्या हाताचा अंगठा आणि अनामिका यांच्या चिमटीत घेऊन चरणांवर वहावे. अंगठा आणि अनामिका जोडून निर्माण होणार्‍या मुद्रेमुळे पूजकाच्या देहातील अनाहतचक्र जागृत होते. त्यामुळे भक्‍तीभाव निर्माण होण्यास साहाय्य होते.

श्री गणेशाला लाल फुले वहा‍वीत !

श्री गणेशाला तांबड्या जास्वंदाची फुले वहावीत. जास्वंद वा अन्य लाल फूल वाहतांना ‘देठ श्री गणेशाच्या चरणांकडे व तुरा आपल्याकडे येईल’, असे वाहावे.
फुले वहातांना ती ८ किंवा ८ च्या पटीत आणि शंकरपाळ्याच्या आकारात वहावीत. शंकरपाळ्याच्या आकारात फुले वहातांना ‘दोन लहान कोन एका सरळ रेषेत देवतेच्या समोर येतील आणि मोठे दोन कोन दोन बाजूंना दोन रहातील’, अशा पद्धतीने फुले वहावीत.

श्री गणेशाला दूर्वा वहा‍व्यात !

दूर्वांमध्ये गणेश तत्त्व आकृष्ट करण्याची क्षमता अत्याधिक आहे. श्री गणेशाला कोवळ्या दूर्वा विषम संख्येने (न्यूनतम ३ किंवा ५, ७, २१ इ.) वाहाव्यात. दूर्वांना विषम संख्येच्या पात्या असाव्यात.
दूर्वा एकत्रित बांधून ‍वाहिल्याने त्यांचा गंध बराच काळ टिकतो. या गंधामुळे गणेश तत्त्व मूर्तीकडे अधिक प्रमाणात आकृष्ट होते आणि टिकूनही रहाते. दूर्वा अधिक वेळ टवटवीत रहाण्यासाठी त्या पाण्यात भिजवून वहाव्यात. दूर्वा वहातांना पात्यांचा भाग आपल्याकडे आणि देठ श्री गणेश मूर्तीकडे असावे.

पत्री वहाणे

शमीची आणि मंदारची पत्री वहा‍वी. शमीमध्ये अग्नीचा वास आहे. आपली शस्त्रे तेजस्वी रहावीत म्हणून पांडवांनी ती शमीवृक्षाच्या ढोलीत ठेवली होती. मंदार हे वानस्पत्य रसायन आहे.

प्रदक्षिणा घालणे

श्री गणेशाला न्यूनतम ८ प्रदक्षिणा घालाव्यात. प्रत्येक प्रदक्षिणेनंतर देवाला नमस्कार करून मगच पुढची प्रदक्षिणा घालावी. प्रदक्षिणा जास्त घालायच्या असल्यास ८ च्या पटीत घालाव्यात.

​उत्तरपूजा
(उत्तर आवाहन)

अ. विधी
गणपती विसर्जनापूर्वी ही पूजा करायची असते. विशिष्ट मंत्र म्हणून पुढे दिल्याप्रमाणे पूजा करावी – १. आचमन, २. संकल्प, ३. चंदनार्पण, ४. अक्षतार्पण, ५. पुष्पार्पण, ६. हरिद्रा (हळद)-कुंकूमार्पण, ७. दूर्वार्पण, ८. धूप-दीप दर्शन आणि ९. नैवेद्य. (पाठभेद : चंदनाच्याच वेळी हळद आणि कुंकू वाहतात.)
यानंतर आरती करून मंत्रपुष्पांजली समर्पावी. सर्वांनी गणपतीच्या हातावर अक्षता द्याव्या आणि मूर्ती उजव्या हाताने हालवावी.

आ. महत्त्व
पूजेमुळे पूजा करणारा गणेशलहरींनी संपृक्त व्हावा, हा पूजेचा उद्देश असतो. संपृक्तता वाढवण्यातला शेवटचा टप्पा म्हणजे उत्तरपूजा. उत्तरपूजेच्या वेळी मूर्तीत असलेली सर्व पवित्रके एकदम बाहेर पडतात. उत्तरपूजा झाल्यावर मूर्ती स्थानापासून थोडी हालवतात. त्यामुळे उरलीसुरली पवित्रके मूर्तीपासून दूर जातात, म्हणून ती पूजा करणार्‍याला मिळू शकतात. येथे उत्तरपूजेला विशेष महत्त्व आहे. ‘गणपतीला परत बोलावले आहे’, त्या अर्थी त्याला सन्मानाने परत पाठवणे (विसर्जन करणे) महत्त्वाचे ठरते.’

गणेशमूर्तीचे विसर्जन वहात्या पाण्यात करा !

उत्तरपूजेनंतर मूर्तीचे जलाशयात विसर्जन करतात. विसर्जनाला जातांना गणपतीबरोबर दही, पोहे, नारळ, मोदक वगैरे शिदोरी द्यावी. जलाशयाजवळ पुन्हा आरती करावी आणि मूर्ती शिदोरीसह पाण्यात सोडून द्यावी.

उपासनाविधींमुळे गणपतीच्या पवित्रकांनी समृद्ध झालेल्या मूर्तीचे विसर्जन केल्यामुळे जलस्रोत पवित्र बनतो. वहात्या पाण्यामुळे पवित्रके सर्वदूर पोहोचतात आणि अनेकांना त्यांचा लाभ मिळतो. वातावरणही सात्त्विक होण्यास साहाय्य होते.

​श्री गणेश चतुर्थी निमित्त होणारे गैरप्रकार राेखून श्री गणेशाची कृपा संपादन करा !

सुखकर्ता, विघ्नहर्ता अन् अष्टदिशांचा अधिपती म्हणजे श्रीगणपति ! वेदांच्या माध्यमातून धर्मशास्त्र सांगणारी ही देवता जशी विद्यापती आहे, तशीच ती असुरांचा नाश करणारीही आहे. म्हणूनच गणेश चतुर्थीच्या निमित्ताने धर्माचरण शिकणे, तसेच गणेशोत्सवातील अपप्रकारांचे उच्चाटन करून धर्मरक्षणाचा संकल्प करणे, ही श्री गणेशाची खरी उपासना ठरेल !

  • गणेशमूर्तींच्या विसर्जनाने प्रदूषण होते, अशी ओरड करणार्‍यांनो, सांडपाण्याद्वारे होणार्‍या भीषण जलप्रदूषणाचा विचार करा !
  • गणेशमूर्ती दान करण्यास सांगणार्‍या तथाकथित सुधारकांना घनकचरा, सांडपाणी, उद्योग, ई-कचरा यांमुळे होणार्‍या प्रदूषणाविषयी खडसवा !
  • श्री गणेशमूर्ती विसर्जनाला विरोध करणार्‍या भोंदू सुधारकांच्या टोळीची पशूवधगृहे आणि सांडपाणी यांमुळे होणार्‍या जलप्रदूषणाकडे डोळेझाक !

हिंदूंनाे, श्री गणेशाचे विडंबन रोखून धर्महानी टाळा !

वेगवेगळ्या रूपांतील आणि वेशभूषांतील मूर्तींमुळे लोकांच्या मनातील त्या देवतेविषयीच्या श्रद्धेवर आणि भावावर परिणाम होतो, तसेच देवतेला चित्रविचित्र रूपांत दर्शवल्याने तो देवतेचा अवमानच ठरतो.

प्लास्टिकच्या वस्तूंंपासून, लोखंडी सांगाड्यात दगड घालून, भाज्यांपासून, शीतपेयांच्या बाटल्यांपासून बनवलेले गणपति, लांब सोंड असलेला अयोग्य रूपातील गणपति, राजकारण्यांसमवेत चहा पित असलेले गणपति अशा विविध प्रकारे गणपति बनवण्यात येतात.

अशा मूर्तींमुळे श्री गणेशाचे विडंबन होते. विडंबन राेखण्याच्या धर्मकार्यार्थ…

श्री गणेश चतुर्थी व्रताविषयी काही शंका आणि त्यांची उत्तरे

खालील प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी त्या-त्या प्रश्नावर क्लिक करा !

‘मूषकावर आरूढ असलेल्या श्री गणेशाच्या रूपाला पाहून चंद्र हसला. म्हणून श्री गणेशाने त्याला शाप दिला की, श्री गणेशचतुर्थीच्या दिवशी तुला कोणी पहाणार नाही’, अशी कथा पुराणात सांगितलेली आहे. त्यामुळे ‘श्री गणेशचतुर्थीला चंद्रदर्शन करू नये’, असे सांगितले जाते. अनेकांना याविषयी प्रश्‍न पडतो की, ‘असे का ?’ अध्यात्मशास्त्रदृष्ट्या त्याचे कारण म्हणजे चंद्र हा मनाचा कारक आहे, म्हणजे मनाला कार्य करण्यास प्रवृत्त करणारा आहे. श्रीगणेश हा ॐकारस्वरूप आहे. ‘ॐ’ हा ध्वनी ब्रह्मवाचक आहे. म्हणजेच गणेश-उपासना ही ब्रह्मोपासनाच ठरते. त्यासाठी मन नाश पावणे, म्हणजे मनाचा लय होणे आवश्यक असते. गणेशभक्ताला किंवा साधकाला तर मनोलयच करायचा असतो. सोप्या भाषेत ‘मनोलय करणे’, म्हणजे मनाची चंचलता घालविणे. चंद्राचा आकार तिथीनुसार लहान-मोठा होतो. त्यामुळे ग्रहमालेत जसा चंद्र चंचल आहे, तसे शरिरात मन चंचल आहे. चंद्रदर्शनाने मनाची चंचलता एक लक्षांश इतकी वाढते. यासाठी श्री गणेशचतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन करू नये.

‘श्री गणेश चतुर्थीला ‘कलंकित चतुर्थी’ असेही म्हणतात. या चतुर्थीला चंद्र पहाणे वर्जित आहे. चुकूनही चतुर्थीचा चंद्र दिसल्यास ‘श्रीमद्भागवता’च्या १० व्या स्कंधाच्या ५६-५७ व्या अध्यायात दिलेली ‘स्यमंतक मण्याची चोरी’ ही कथा आदराने वाचली किंवा ऐकली पाहिजे. भाद्रपद शुक्ल तृतीयेचा किंवा पंचमीचा चंद्र पहावा. यामुळे चतुर्थीला चंद्रदर्शन झाल्यास त्याचा अधिक धोका रहात नाही.

चुकून चंद्रदर्शन झाल्यास पुढील मंत्राने अभिमंत्रित केलेले पवित्र जल प्राशन करावे. या मंत्राचा २१, ५४ किंवा १०८ वेळा जप करावा.

सिंहः प्रसेनमवधीत् सिंहो जाम्बवता हतः ।
सुकुमारक मा रोदीस्तव ह्येष स्यमन्तकः ।। – ब्रह्मवैवर्त पुराण, अध्याय ७८

अर्थ : हे सुंदर सुकुमार ! या मण्यासाठी सिंहाने प्रसेनला मारले आहे आणि जांबुवंताने त्या सिंहाचा संहार केला आहे; म्हणून तू रडू नकोस. आता या स्यमंतक मण्यावर तुझाच अधिकार आहे.’

– ‘ऋषीप्रसादऑगस्ट २०११

द्रव्यकोश आणि पाकनिष्पत्ती विभक्त असेल, तर प्रत्येकाने स्वतंत्रपणे गणपति बसवणे योग्य आहे, असे शास्त्रात सांगितले आहे; मात्र काही कुटुंबांत कुलाचाराप्रमाणे किंवा पूर्वापार चालत आलेल्या पद्धतीप्रमाणे एकच गणपति बसवण्याची दृढ परंपरा आहे. अशा ठिकाणी गणपति प्रतिवर्षी वेगवेगळ्या भावाच्या घरी बसवतात, असे आढळते. हे योग्य कि अयोग्य ?

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी दिलेले उ‌त्तर : कुलाचाराप्रमाणे किंवा पूर्वापार चालत आलेली एकच गणपति बसवण्याची दृढ परंपरा मोडायची नसेल, तर ज्या भावामध्ये गणपतीविषयी अधिक भक्तीभाव असेल, त्याच्याच घरी गणपति बसवणे योग्य आहे.

काही ठिकाणी गावात कुणी नवीन वास्तू बांधल्यास किंवा कुणाच्या घरी श्री गणपति बसवला जात नसल्यास अशांच्या बंद दारासमोर त्यांच्या नकळत अन्य अज्ञात लोक श्री गणेशचतुर्थीच्या आदल्या रात्री श्री गणेशमूर्ती आणून ठेवतात. अशा वेळी त्या घरातील व्यक्तींनी काय करावे ?

उत्तर : या गणेशमूर्तीचे पूजन करावेसे वाटले, तर करावे, नाहीतर त्या मूर्तीचे विसर्जन करावे.

श्री गणेशचतुर्थीच्या काळात काही ठिकाणी २१ दिवसांचा गणपति बसवतात. अशा वेळी पितृपक्षाच्या कालावधीत घरात श्री गणपति असतांना श्राद्ध करावे का ?

उत्तर : ‘शास्त्रात ज्या कृतींसाठी जो काळ नेमून दिलेला आहे, त्या त्या काळात त्या कृती करणे आवश्यक आणि महत्त्वाचे ठरते. त्यामुळे पितृपक्षातच महालय श्राद्ध करावे.

अ. श्री गणेशचतुर्थीच्या दिवशी एखाद्याचे सांवत्सरिक श्राद्ध असल्यास ते त्याच दिवशी करावे. श्राद्धाच्या स्वयंपाकातीलच नैवेद्य श्री गणपतीला दाखवावा.

आ. सर्वसाधारणपणे सूर्य वृश्‍चिक राशीत असेपर्यंत महालय श्राद्धाचा काळ सांगितला आहे. पितृपक्षात महालय श्राद्ध करण्याविषयी निरनिराळे पक्ष सांगितले आहेत. सांप्रत मृत व्यक्तीच्या (मृत्यू झालेल्या) तिथीलाच पितृपक्षात एक दिवस महालय श्राद्ध केले जाते. ज्यांच्या घरी २१ दिवसांचा गणपति पूजला जातो, त्यांच्या घरी श्री गणपति असेपर्यंत जर श्राद्ध तिथी येत असेल, तरीही त्यांनी त्याच तिथीला महालय श्राद्ध करावे. जननाशौच किंवा मरणाशौच (सुवेर-सूतक) किंवा अन्य काही अपरिहार्य कारणामुळे एखाद्याला त्या तिथीला महालय श्राद्ध करणे शक्य न झाल्यास ते सर्वपित्री अमावास्येला करावे. अन्यथा सोयीनुसार कृष्ण पक्षातील अष्टमी, द्वादशी, अमावास्या आणि व्यतीपात योग या दिवशीही महालय श्राद्ध करता येते.

इ. श्राद्धाच्या दिवशी इतर विधी, उदा. श्री गणेशयाग, लघुरुद्र इत्यादी अनुष्ठाने करू नयेत.

श्री गणेश उपासनेशी संबंधित काही उत्पादने

1. ‘श्री गणपति’ मोठा ग्रंथ

2. ‘श्री गणेश अथर्वशीर्ष व संकष्टनाशनस्तोत्र (अर्थासह)’ लघुग्रंथ

3. ‘श्री गणेश पूजाविधी (काही मंत्रांच्या अर्थासह)’ लघुग्रंथ

4. वास्तूशुद्धी आणि वाहनशुद्धी यांसाठी देवतांच्या नामपट्ट्यांचा संच

5. १०८ मण्यांची जपमाळ

6. श्री गणपती (Laminated Photo) आणि लॉकेट

श्री गणेश उपासनेचे लाभ दर्शवणारी चित्रे

​गणेश उपासनेसंबंधी व्हिडीओ पहा !

१. आपत्कालीन परिस्थितीच्या अनुषंगाने हिंदु धर्मशास्त्रात सांगितलेला पर्याय अर्थात् ‘आपद्धर्म’ !

सध्या जगभरात कोरोना महामारीमुळे सर्वत्रच लोकांच्या दळणवळणावर अनेक बंधने आली आहेत. भारतातही विविध राज्यांमध्ये दळणवळण बंदी (लॉकडाऊन) आहे. काही ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव अल्प असला, तरी तेथे लोकांच्या घराबाहेर पडण्यावर अनेक बंधने आहेतच. यामुळे हिंदूंचे विविध सण, उत्सव, व्रते नेहमीप्रमाणे सामूहिकरित्या करण्यावर बंधने आली आहेत. कोरोनासारख्या आपत्काळाच्या पार्श्‍वभूमीवर हिंदु धर्माने धर्माचरणात काही पर्याय सांगितले आहेत. यास ‘आपद्धर्म’ असे म्हणतात.

आपद्धर्म म्हणजे ‘आपदि कर्तव्यो धर्मः ।’ म्हणजे ‘आपत्काळात धर्मशास्त्राला मान्य असलेली कृती.’

२. गणेशचतुर्थी व्रत कशा प्रकारे करावे ?

गणेशोत्सव हा हिंदूंचा मोठा सण आहे. श्री गणेश चतुर्थीला, तसेच श्री गणेशोत्सवाच्या दिवसांत गणेशतत्त्व नेहमीच्या तुलनेत पृथ्वीवर १ सहस्र पटींनी कार्यरत असते. सध्या कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे काही ठिकाणी घरातून बाहेर पडण्यावर निर्बंध आहेत. या अनुषंगाने आपद्धर्म आणि धर्मशास्त्र यांची सांगड घालून देखावे, रोषणाई आदी न करता साध्या पद्धतीने हे पार्थिव सिद्धिविनायकाचे व्रत पुढील पद्धतीने करता येईल.

२ अ. सध्या कोरोना महामारी असल्याने गणेश चतुर्थीच्या ऐवजी माघी गणेश जयंतीला मूर्ती प्रतिष्ठापना करावी का ?

श्रीगणेश मूर्तीची प्रतिष्ठापना आणि पूजन हे भाद्रपद महिन्यात करावे, असे धर्मशास्त्र सांगते. चातुर्मासाच्या काळात म्हणजे आषाढ पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा या १२० दिवसांत विनाशकारक आणि तमप्रधान यमलहरी पृथ्वीवर अधिक प्रमाणात येतात. या काळात त्यांची तीव्रता अधिक असते; म्हणूनच या काळात आपले हिंदूंचे अनेक सण-उत्सव येतात. जेणेकरून सण-उत्सव-व्रते यांच्या माध्यमातून व्यक्ती ईश्‍वराच्या अनुसंधानात राहील. भाद्रपद शु. चतुर्थीच्या दिवशी गणेशलहरी पृथ्वीवर अधिक प्रमाणात येत असल्याने यमलहरींचीही तीव्रता अल्प व्हायला साहाय्य होते. त्यामुळे या काळात केलेल्या श्री गणेशाच्या उपासनेने गणेशतत्त्वाचा अधिक लाभ होतो.

२ आ. बाजारात शाडूची मूर्ती मिळणे कठीण आहे. अशा वेळी काय करावे ?

सध्या ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या गणेशमूर्ती बाजारात मिळतात. ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’ची मूर्ती धर्मशास्त्रसंमत नाही. ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’मध्ये रज-तमप्रधान असल्याने त्यापासून बनवली मूर्तीमध्ये गणेशाची पवित्रके आकृष्ट होत नाही.

श्री गणेशमूर्ती चिकणमाती किंवा शाडू माती यांपासून बनवावी, असा शास्त्रविधी आहे. त्यामुळे या व्यतिरिक्त अन्य पदार्थांनी गणेशमूर्ती बनवणे योग्य नाही; मग अशा स्थितीत पर्याय आपल्याकडे पर्याय काय आहेत, हे आता पाहूया.

१. आपण घरीच चिकणमातीची ६-७ इंचाची गणेशमूर्ती बनवू शकतो.

२. मूर्ती बनवता येत नसेल किंवा कोरोनाच्या संसर्गामुळे आजूबाजूचा परिसर अथवा इमारत प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित झाले असेल, तेथील लोक गणेशतत्त्वाचा लाभ व्हावा, यासाठी आपल्या घरातील गणेशाची मूर्ती अथवा गणेशाच्या चित्राचे षोडशोपचार पूजन करू शकतात. हे पूजन करत असतांना पूजेतील ‘प्राणप्रतिष्ठा’ हा विधी करू नये. ‘प्राणप्रतिष्ठा’ केलेली मूर्ती नंतर विसर्जित करावी लागते. यासाठी ही दक्षता घ्यावी.

२ इ. शाडूची मूर्ती बनवतांना त्यात बी ठेवावे आणि नंतर मूर्ती कुंडीत विसर्जित करावी हे शास्त्रसंमत आहे का ?

असे करणे धर्मशास्त्रसंमत नाही. खरे तर हा धर्म न मानणार्‍या पर्यावरणवाद्यांचा हा प्रचार आहे. तुम्हाला वृक्षारोपण करायचे असेल, तर वर्षातील ३६५ दिवस तुम्ही कधीही करू शकता. पर्यावरणप्रेमासाठी धर्माचरणात परिवर्तन करायची काहीही आवश्यकता नाही.

२ ई. बाजारातून आणलेली मूर्ती सॅनिटाईझ करावी का ?

बाजारातून मूर्ती आणतांना आदल्या दिवशीच घरी आणावी आणि १२ घंटे घरातील सात्त्विक ठिकाणी अलगीकरण करून ठेवावी. ती कोरोनामुक्त होईल. मूर्ती सॅनिटाईझ करू नये. सॅनिटायझर्स मधील रासायनिक द्रव्यांमुळे मूर्तीचा रंगभेद होण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे अध्यात्मशास्त्राच्या नियमानुसार शब्द, रूप, रस, गंध आणि शक्ती एकत्रित असतात. या नियमानुसार जरी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली नसेल, तरी तिच्यात ते देवतेचे तत्त्व असते. मूर्तीमध्ये रंगभेद झाल्याने त्यातील देवतेच्या तत्त्वाची हानी होऊ शकते.

२ उ. कोरोना महामारीमुळे गुरुजींना घरी बोलवण्यास मर्यादा आहेत. अशा स्थितीत काही ठिकाणी गुरुजी ‘ऑनलाईन’ माध्यमातून पूजा सांगणार आहेत. अशी ‘ऑनलाईन’ पूजा योग्य कि अयोग्य आहे ?

सध्याच्या संकटकाळात एकमेकांकडे जाता येत नसल्याने ‘ऑनलाईन’ पूजा हा एक चांगला पर्याय आहे. कर्मकांडामध्ये मंत्रांच्या उच्चाराला आणि पूजकाच्या ईश्‍वराप्रतीच्या भावाला महत्त्व असते.

गुरुजींच्या अनुपस्थितीत गणेशपूजन शास्त्रोक्त पद्धतीने करता यावे, यासाठी सनातन संस्थेने ‘श्री गणेशपूजा आणि आरती’ हे मोबाईल अ‍ॅप विकसित केले आहे. त्यामध्ये श्री गणेशाची विधिवत् पूजा सांगण्यात आली आहे. ते ‘अ‍ॅप डाऊनलोड’ करून आपणही घरच्या घरी श्री गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता.

२ ऊ. दीड दिवसच गणपति बसवा, असा सल्ला दिला जात आहे. असे करावे का ?

सिद्धिविनायक व्रतानुसार भाद्रपद शुद्ध चतुर्थीला मातीचा गणपति करतात. तो डाव्या हातावर ठेवून तेथेच त्याची ‘सिद्धविनायक’ या नावाने प्राणप्रतिष्ठा आणि पूजा करून लगेच विसर्जन करावे, असा शास्त्रविधी आहे; पण मनुष्य उत्सवप्रिय असल्याने तेवढ्याने त्याचे समाधान होईना; म्हणून दीड, पाच, सात किंवा दहा दिवस गणपती बसवून त्याचा उत्सव करू लागले. एखाद्याच्या कुलाचारात गणपति ५ दिवस असेल आणि त्याला तो दीड किंवा ७ दिवसांचा करायचा असेल, तर तो तसे करू शकतो. त्यासाठी अधिकारी व्यक्तीला विचारण्याची आवश्यकता नाही. पहिल्या, दुसर्‍या, तिसर्‍या, पाचव्या, सहाव्या, सातव्या, दहाव्या, अकराव्या दिवशी किंवा घरातील रूढीप्रमाणे श्री गणेशमूर्ती विसर्जन करावे.

३. कोरोना महामारीच्या काळातील मूर्ती विसर्जनाची बंधने लक्षात घेऊन काय करावे ?

मूर्तीविसर्जनाच्या वेळी जलस्रोतांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. सध्या कोरोना महामारीमुळे सोशल डिस्टासिंगचे सरकारी नियम पाळणे आवश्यक आहे. यासाठी गणेशमूर्ती आणतांना तसेच विसर्जन करतांना घरातील मोजक्याच व्यक्तींनी जावे. मूर्ती विसर्जन करतांना आपल्या घराजवळील तलाव, विहीर यांमध्ये विसर्जन करावे. या काळात गर्दी होण्याचा धोका अधिक असल्याने शासनाने कोरोना संदर्भात सांगितलेल्या मार्गदर्शक सूत्रांचे तंतोतंत पालन करणे, हे आपल्या सर्वांचेच कर्तव्य आहे.

ज्या ठिकाणी कोरोना संसर्गामुळे अडचण निर्माण झाली असून गर्दीच्या ठिकाणी जाऊन मूर्तीविसर्जित करणे शक्य नाही. अशा वेळी काय करावे, असा आपल्या मनात प्रश्‍न निर्माण होऊ शकतो.

घरात ६-७ इंचाची लघु गणेशमूर्ती पूजन केली असल्यास दुष्काळ किंवा आपत्कालीन परिस्थितीत उत्तरपूजेनंतर गणेशमूर्ती घराबाहेर न्यावी. तुळशी वृंदावनाच्या जवळ किंवा अंगणात मोठ्या भांड्यात पाणी घेऊन त्यामध्ये मूर्ती विसर्जित करावी. शहरात रहाणार्‍यांना तुळशी वृंदावन किंवा अंगण उपलब्ध नसल्यास त्यांनी घरातच मोठ्या भांड्यात पाणी घेऊन त्यामध्ये मूर्तीचे विसर्जन करावे. मूर्ती पाण्यात पूर्ण विरघळल्यानंतर ते पाणी आणि माती पायदळी येणार नाही, अशा रीतीने शमी, रुई, औदुंबर, आपटा, वड, पिंपळ यांसारख्या सात्त्विक वृक्षांना घालावी.

मोठी गणेशमूर्ती पूजन केली असल्यास ती देवघराजवळ किंवा अन्य सात्त्विक ठिकाणी ठेवावी. या मूर्तीची पूजा करण्याची आवश्यकता नाही. धूळ बसू नये; म्हणून ती खोक्यात किंवा आच्छादनाने झाकून ठेवावी. पुढे श्राद्धपक्ष पूर्ण झाल्यानंतर गर्दी नसतांना ती मूर्ती वहात्या पाण्यात विसर्जित करावी.

संकटकाळाच्या दृष्टीने आम्ही गणेशभक्तांना सूचना करू इच्छितो की, या संकटकाळात शक्यतो छोटी गणेशमूर्तीच पुजावी. शक्यतो मोठी गणेशमूर्ती टाळावी.

३ अ. या वर्षी कोरोना महामारी असल्याने गणेशमूर्ती पुढील वर्षी विसर्जित करावी का ?

गणेशमूर्तीची उत्तरपूजा झाल्यानंतर तिच्यातील गणेशतत्त्व निघून जाते, असे शास्त्र आहे त्यामुळे कोरोना महामारीचे संकट अल्प झाल्यावर ती मूर्ती विसर्जित करावी. तोपर्यंत ती मूर्ती आपल्या घरी वस्त्राने झाकून ठेवावी. येथे महत्त्वाचे सूत्र म्हणजे गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यासाठी पुढच्या वर्षीपर्यंत थांबण्याची आवश्यकता नाही

३ आ. धातूची मूर्ती प्रतिष्ठापना केल्यास विसर्जनाचे शास्त्र काय ?

सिद्धिविनायकाचे व्रत म्हणून सोने-रूपे या धातूंची मूर्ती प्रतिष्ठापना केल्यानंतर ती मातीच्या मूर्तीप्रमाणे विसर्जित करावी. जे नियम मातीच्या मूर्तीला आहेत, तेच नियम धातूच्या मूर्तीला आहेत.

३ इ. काही आध्यात्मिक संस्था निर्माल्य गोळा करतात आणि ते खाणीत टाकतात. असे शास्त्रसंमत आहे का ?

असे करणे शास्त्रसंमत नाही. आपल्या क्षेत्रात आध्यात्मिक संस्था अशा प्रकारची धर्मविरोधी कृती करत असतील, तर त्यांना थांबवायला हवे.
एरव्ही श्री गणेशमूर्तीच्या समवेत निर्माल्याचेही विसर्जन करायचे असते. निर्माल्यातील चैतन्य पाण्यात विसर्जित झाल्यामुळे पाण्याद्वारे त्या चैतन्याचा समष्टी स्तरावर लाभ होतो. परंतु सध्याच्या आपत्कालात बाहेर जाता येत नसल्याने वैयक्तिक स्तरावर तरी निर्माल्यातील चैतन्याचा लाभ मिळावा यासाठी निर्माल्य पाण्यात बुडवून काढावे आणि नंतर त्या पाण्याचा वापर स्नानासाठी करावा किंवा ते पाणी अंगणातील फुलझाडांना घालावे. नंतर त्या निर्माल्याचा वापर खत-निर्मितीसाठी करावा.

४. मुंबईच्या प्रसिद्ध ‘लालबागचा राजा’ या गणेशोत्सव मंडळाने यंदा गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा न करता आरोग्योत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय योग्य कि अयोग्य आहे ?

लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाचा आरोग्याविषयक उपक्रम राबवण्याचा निर्णय चांगला आहे. गणेशोत्सव मंडळे या सामाजिक कार्य करणार्‍या संघटना आहेत. गणपति देवता हे या कार्याचे ईश्‍वरीय अधिष्ठान आहे. कुठलेही कार्य सफल होण्यासाठी ईश्‍वरीय अधिष्ठानाची आवश्यकता असते. त्यामुळे श्रीगणेशपूजन रहित करणे, हे एक प्रकारे ईश्‍वरीय अधिष्ठान नाकारल्यासारखे होईल. मंडळात श्री गणेशाच्या छोट्या मूर्तीची पूजा करणे आणि आरोग्यविषयक उपक्रम राबवणे, या दोन्हीही गोष्टी करता येणे गणेशमंडळाला शक्य आहे. गर्दी होऊ नये; म्हणून ‘सोशल डिस्टन्सिंग’ राखले जाईल, अशा पद्धतीने व्यवस्था करणे किंवा ‘ऑनलाईन दर्शना’ची सोय करणे, अशा काही व्यवस्थाही करता येण्यासारखे आहेत.

– श्री. दामोदर वझे, संचालक, सनातन पुरोहित पाठशाळा, सनातन आश्रम, रामनाथी गोवा. (१३.७.२०२०)