इंग्रजाळलेली मराठी अर्थात् अद्याप दास्यवृत्ती !

१५ जानेवारी ते १८ जानेवारी २०१६
या कालावधीत पिंपरी, पुणे येथे होत असलेल्या
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने…

१. इंग्रजी शिक्षणाच्या भ्रामक कल्पनेमुळे
पालकांनी मुलांना सांस्कृतिक मूल्यांपासून दूर करणे

     वर्ष १९४७ मध्ये भारत इंग्रजांच्या जोखडातून स्वतंत्र झाला, तरी आम्ही खोट्या प्रतिष्ठेच्या कल्पनेतून आणि त्यांच्या इंग्रजीच्या दास्यत्वातून अद्याप मोकळे झालेलो नाही. राजकारणाच्या सोयीसाठी आमचे राजकीय नेते आमच्यातील मराठी अस्मिता चेतवू पहात असले, तरी अभिजात आळसामुळे आणि प्रतिष्ठेच्या खोट्या कल्पनांमुळे मायबोलीच्या शुद्धतेविषयी जागरूक रहाण्याची निकड आम्हाला उमजत नाही. जगाची खिडकी मानल्या गेलेल्या इंग्रजी भाषेतून शिकलो, तरच आमच्या मुलांचा भाग्योदय होईल, या भ्रामक कल्पनेत जगणारे आमचे पालक सांस्कृतिक मुळे तोडून आपल्या मुलांना ना अरत्र, ना परत्र, असे अधांतरी सोडत आहेत. त्यांना अमेरिकी व्हिसाकडे डोळे लावायला बसवून संस्कृतीपासून तोडत आहेत. याचाही त्यांना विवेक रहात नाही.

२. प्रसारमाध्यमांमुळे समाजावर होणारा विपरित परिणाम !

     विवेकशून्यतेची ही घसरण किती खालपर्यंत व्हावी ? दूरचित्रवाहिनीवर झकपक दिसणारी काशी ऊर्फ कॅश ऊठसूट मी वॉश घेऊन फ्रेश होऊन येते, असे म्हणतांना पाहिल्यावर आमची कामवालीही उद्या मला कामावर टायमावर यायला जमणार नाय. माझ्या नातीचा उद्या हॅपी बर्थडे करायचाय बाई, असे आम्हाला ठणकावून सांगते. तिनेही तिच्या नातीला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातलेले असते ना ! मग त्या बिचार्‍या नातीला स्वतःच्या वर्गमित्रांच्या स्टँडर्डप्रमाणे वागायला नको ?

३. मातृभाषेत शिक्षण आवश्यक
असल्याचे जगभरातील शिक्षण तज्ञांचे निरीक्षण !

     खरेतर या देशाचे स्वातंत्र्य उंबरठ्यावर येऊन ठेपले, तेव्हा गांधी यांनी इशारा दिला होता, शाळांतून इंग्रजी माध्यम चालू ठेवल्याने भारतील भाषांचा विकास खुंटेल. वर्ष १९६६ मध्ये अहवाल प्रकाशित केलेल्या कोठारी आयोगानेही बजावले होते, मुलांना बालवयापासून माध्यमिक शालेय स्तरापर्यंतचे शिक्षण त्यांच्या मातृभाषेतच दिल्याने ग्रहण-आकलन-स्वयंअध्ययन या त्यांच्या क्षमतांचा पुरेपूर विकास होतो. बालवयातील त्यांची तेजस्वी सहजप्रज्ञा सुलभ मातृभाषेमुळे परिपूर्ण विकसित झाल्यामुळे उच्च माध्यमिक स्तरापासून अन्य कुठलीही विदेशी भाषा अन् प्रगत विषय सहजपणे आत्मसात करू शकतात. स्वतंत्रपणे विचार आणि संशोधन करण्यास ही मुले पूर्णपणे पात्र ठरतात, असे जगभराच्या शिक्षण तज्ञांचे निरीक्षण आहे. त्यामुळेच सारासार विचार करता विद्वान आणि सर्वसामान्य यांतील दरी बुजवायची असेल, तर मातृभाषेतून शिक्षण देणे, हाच मार्ग आहे.

४. भारंभार विद्यापिठे असूनही
विद्वज्जनांच्या डोळेझाकपणामुळे मातृभाषेची अवनती !

     या देशाचे शैक्षणिक धोरण आखणार्‍या आमच्या विद्वानांनी या सार्‍या मौलिक इशार्‍यांकडे डोळेझाक केली. अणुस्फोटानंतर राखेतून उठून विकासात अमेरिकेपुढे गेलेला जपान, हिब्रू भाषेची कास धरून शून्यातून माळरानावर हरितक्रांती करणारा इस्रायल यांची उदाहरणे समोर असतांनाही स्वदेशी भाषा माध्यमाचे महत्त्व जगभर मान्य झाले आहे, हे आपल्याकडे दुर्लक्षिले गेले, तरीही इंग्रजी माध्यमाचा प्रयोग करायचा होता, तर (आता चालू केला आहे त्याप्रमाणे !) एकाच वेळी पहिलीपासून दोन्ही माध्यमांतून शिक्षण देण्याची व्यवस्था करणेच विज्ञाननिष्ठ ठरले असते; पण तसे न केल्याने परकीय भाषा माध्यमाची निरुपयोगिता सिद्ध झाली आहे. सध्या भारंभार शाळा, महाविद्यालये आणि विद्यापिठे निघत आहेत; पण तरीही नुकत्याच झालेल्या एका जागतिक पाहणीनुसार जगभरातील अव्वल दर्जाच्या दोनशे विद्यापिठांच्या सूचीत भारतातील एकाही विद्यापिठाचा क्रमांक लागू शकला नाही. हा खेदकारक निष्कर्ष जगापुढे आला आहे. हिंदुस्थानच्या नालंदा आणि तक्षशिला विद्यापिठांत उच्च शिक्षण घ्यायला जगभरातून विद्वान मध्ययुगापर्यंत येत असत, असे इतिहास सांगतो. त्या आमच्या भारताची स्वातंत्र्यानंतर अशी अवनती आपल्या विद्वज्जनांनी करून ठेवली आहे.

५. इंग्रजी ही तीन सहस्रांहून अधिक
भाषा-बोलीभाषा संपवणारी एक सांस्कृतिक त्सुनामी !

     दूरसंचार आणि संगणक क्रांतीने तर लिखित शब्दांचे अस्तित्वच धोक्यात आणले. त्यासमवेतच संगणकासाठी इंग्रजी भाषेची अनिवार्यता निर्माण करून जगभरातल्या जवळपास दोन-तीन सहस्राहून अधिक भाषा-बोलीभाषा संपवणारी एक सांस्कृतिक त्सुनामीच आणली ! खाउजा (खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण) धोरणामुळे दिवसेंदिवस अधिकाधिक धनाढ्य होत चाललेला श्रीमंत आणि अधिकाधिक दरिद्री होत चाललेला गरीब, हे दोनच वर्ग आपल्या समाजात आता शेष राहिले आहेत. आपली मातृभाषा, जात, धर्म आणि संस्कृती यांविषयी मुळातूनच संवेदनशील असलेला कामगारवर्ग आणि मध्यमवर्ग आज जवळजवळ नामशेषच झाले आहेत. आपल्या सांस्कृतिक जीवनावरही त्याचे व्यापक परिणाम झालेले दिसतात.

६. मराठी भाषेच्या दुर्दशेला
पालकांसमवेत प्रसारमाध्यमे उत्तरदायी !

     मराठीच्या आजच्या इंग्रजाळलेल्या दुर्दशेला आमच्या अदूरदर्शी पालकांइतकीच किंबहुना कांकणभर अधिकच आमची प्रसारमाध्यमेच उत्तरदायी आहेत, अशी माझी तक्रार आहे. खरेतर अर्वाचीन मराठीच्या जडणघडणीत दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर, निबंधमालाकार चिपळूणकर पिता-पुत्रादी पत्रकारांचा सिंहाचा वाटा होता. त्यांनी इंग्रजी शब्दांना पर्यायी शब्द घडवत मराठी भाषा समृद्ध केली. दुर्दैवाने त्यांचे वंशज म्हणणारे आजच्या पिढीतील पत्रकार मात्र इंग्रजी (शब्द अडला, तर उचित मराठी शब्द शोधण्याचा आळस म्हणून) शब्द तसाच ठेवतात आणि वर इंग्रजी माध्यमात शिकणार्‍या आमच्या मुलाला अन् त्याच्या मित्र-मैत्रिणींना हीच भाषा कळते, असे सांगून त्या प्रमादाचे समर्थन करण्यात गर्क दिसतात.

     ठाण्याच्या गतवर्षीच्या साहित्य संमेलनात या विषयावरील परिसंवादात बोलतांना दहा शब्दांच्या वाक्यात सहा इंग्रजी शब्द पेरलेली एका मोठ्या वर्तमानपत्रातील वाक्ये मी वाचून दाखवली, त्या वेळी भरलेल्या सभामंडपाने टाळ्यांचा कडकडाट करून माझ्या प्रतिपादनाला दुजोराच दर्शवला होता.

७. इलेक्ट्रॉनिक मिडीयावरील
भाषेतील चुकांचा परिणाम आबालवृद्धांवर होणे

     घरोघरी पोचलेला आणि आबालवृद्धांवर अहोरात्र मालिका अन् विज्ञापने यांचा मारा करणारा इलेक्ट्रॉनिक मिडीया तर या संदर्भातील मोठाच गुन्हेगार आहे. आपल्या मराठीत एक जण, दोघे जण, तिघे-चौघे, तसेच दुप्पट अन् तिप्पट, असे शब्द पिढ्यान्पिढ्या उपयोगात आणले जात आहेत; पण दूरचित्रवाणीवरील वृत्तात दोघे जण, तिघे-चौघे, तसेच दुप्पट अन् तिप्पट, हे शब्द आता इंग्रजी टू वनजा, थ्री वनजा धर्तीवर वापरतांना दिसतात. माझा तुझ्यावर विश्‍वास आहे, असे आपण म्हणत आलो; पण मालिकांतील पात्रे मला तुझ्यावर विश्‍वास आहे, असे चुकीचे मराठी बोलतांना दिसतात. जाऊ दे, कोळसा उगाळावा तितका काळाच !

८. ऊठसूट मराठीचा पोकळ जयजयकार
करण्यापेक्षा ती टिकवून ठेवण्यासाठी स्वतः प्रयत्न करा !

     मग या बधीर गारठलेपणावर काहीच उपाय नाही का ? आहे ना ! ऊठसूट मराठीचा पोकळ जयजयकार करण्यापेक्षा तुम्ही-आम्ही मिळून आमच्या मुला-बाळांप्रमाणे नातवंडा-पतवंडांनाही कायद्याने मराठी साहित्य वाचनाची गोडी लावून त्यांना मराठी माध्यमाच्या शाळांतच घालूया. आपण सारे आपल्या घरावर आपल्या नावाची पाटी मराठीतच लावूया. आपली सही मराठीतूनच करूया. मुंबईतल्या परप्रांतीय घुसखोरांविषयी तक्रारींचे नुसते सूर लावण्यापेक्षा त्यांच्याशी मराठीतूनच बोलत राहूया. मराठीचा खराखुरा अभिमान बाळगल्यास आमची पुढील पिढी ज्ञानेश्‍वर माऊलींच्या या सोनियाच्या ताटी इंग्रजी शब्दांची नरोटी ठेवण्याच्या मोहापासून दूर राहील. जय मराठी !
– नीला उपाध्ये (संदर्भ : मासिक विवेक, १३.१.२०१३)

मराठी Expression ला English चा टेकू !

चिपळूण येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात
इंग्रजाळलेल्या मराठी भाषेविषयी साहित्यिकांनी मांडलेले विचार

मराठी भाषिकाने माझी भाषा टिकवण्याचे
दायित्व माझेही आहे, याचे भान ठेवायला हवे !

१. काळाच्या प्रवाहात माणसांसमवेतच भाषेवरही परिणाम होणे

भाषा हे दोन माणसांमधील संवादाचे आणि भावनांच्या अभिव्यक्तीचे प्रगत माध्यम समजले जाते. संस्कृतीच्या प्रगल्भतेची खूण, बोलणार्‍या माणसाच्या व्यक्तीमत्त्वाची ती महत्त्वाची ओळख असते. काळाच्या प्रवाहात माणसे अंतर्बाह्य पालटतात. विचार, आचार, पोषाख आणि राहणीमान इत्यादींमध्ये पालट घडतो. या सगळ्याचा परिणाम त्यांच्या भाषेवर होणे, ही एक नैसर्गिक क्रिया आहे.

२. मराठी भाषेला आज इंग्रजीच्या आक्रमणाची धास्ती !

वेगवेगळ्या शब्दांमधील शब्दांचा सहज स्वीकार करणार्‍या आमच्या मराठी भाषेला आज इंग्रजीच्या आक्रमणाची, खरेतर अतिक्रमणाची धास्ती वाटत आहे. अशाने आपली शुद्ध भाषा एक दिवस मरून जाईल, अशी भीती भाषाप्रेमींना सतावत आहे. जिथे पर्याय नाही, तिथे इंग्रजी शब्दांचा वापर आपल्या बोलीभाषेत करावा; पण तिचे अतिक्रमण होऊ नये, याची काळजी घ्यावी, असा या सर्वांच्या मताचा सारांश एका वाक्यात सांगता येईल.

३. मराठी भाषा टिकवण्याचे दायित्व प्रत्येकाचे !

आपल्या भाषेत होणारी भेसळ एका ठराविक मर्यादेच्या बाहेर जाऊ नये, असे वाटत असेल, तर सर्वांना, उदा. नाटककार, मालिका आणि चित्रपट यांसाठी संवादलेखन करणारे, विज्ञापने सिद्ध करणारे इत्यादींवर त्याचे दायित्व सोपवून इतरांना नामानिराळे रहाता येणार नाही. अन्य भाषेतील काही शब्द स्वीकारण्याची वृत्ती हवी आणि त्याच वेळी माझी भाषा टिकवण्याचे दायित्व माझेही आहे, याचे भानही हवे. – अश्‍विनी मयेकर (संदर्भ : मासिक विवेक, १३.१.२०१३)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात