१५ जानेवारी ते १७ जानेवारी २०१५ या कालावधीत पिंपरी येथे
होणार असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने…
व्यक्ती, कुटुंब, समाज आणि राष्ट्र यांच्या अवनतीला
कारणीभूत होणारी साहित्यनिर्मिती करण्यापेक्षा
समाजाचा सर्वांगीण विकास होईल, अशी साहित्यनिर्मिती करा !
आजचे संपूर्ण साहित्य स्त्रैण झाले आहे. यौनसंबंधाने विलक्षण प्रभावित झालेले आहे. हे सगळे यौनसंबंधाचे कामुक स्त्रैण साहित्य (काव्य, नाट्य, कादंबरी, ललित लेखन आणि अन्य समस्त साहित्य) व्यक्ती, समाज, राष्ट्र असे सर्वांना तेजोहीन, दयनीय दीन बनवणारे आहे. मानवाला आचारहीन, संस्कृतीशून्य आणि मूर्ख बनवते. अशा रुग्ण साहित्याने संस्कृती नष्ट होतेच होते आणि त्याबरोबर व्यक्ती, कुटुंब, समाज आणि राष्ट्रदेखिल.
या सगळ्याचे पातक त्या स्त्रैण कामुक साहित्यिकांच्या डोक्यावर येणार आहे, ते राष्ट्रघातकी आहेत. व्यक्ती, समाज आणि राष्ट्र यांना विफलतेच्या, आत्मघाताच्या गर्तेत लोटण्याचे पाप त्यांच्या डोक्यावर येणार आहे. व्यक्तीव्यक्तीने, समाजाने, शासनाने सावधपणे अशा दीन बनवणार्या वैफल्यग्रस्त कामुक साहित्यांचा आणि त्या साहित्यिकांचा जाहीर निषेध केला पाहिजे. त्यांच्यावर बंदी आणली पाहिजे.
पश्चिमेचे वळण गिरवणारे आमचे भारतीय साहित्य, विशेषतः मराठी ललित साहित्य, काय आहेत्यात ? रटाळवाणे कामिनी आणि मद्यार्क यांच्याभोवती घिरट्या घालणारे, विदेशी उंची मद्ये, ती गर्भारपणे, कुणाला कुणापासून दिवस आहेत, याची चटकदार वर्णने, त्या रंगीत धुंद रात्री, गर्भपात, आत्महत्येचे प्रयत्न बस ! अशाच कथा ! या पलीकडे अन्य काहीच नाही. आमच्या तरुण पिढीला दुसर्याच्या शयनकक्षामध्ये डोकावून पहाणारा बनविणारी ही घाण ! त्या घाणीलाच ‘स्वर्ग‘ म्हणायचे ?
ज्या साहित्याला धर्म आणि अध्यात्म यांचा गंध नाही, उच्चतम मूल्याकरता हवे ते दिव्य पत्करण्याची तयारी नाही, त्याकरिता वाटेल तो त्याग करण्याची प्रसंगी प्राणांचा होम करण्याची अभिप्सा नाही, ते अत्यंत उथळ साहित्य व्यक्ती आणि समाजाला नरकात लोळवणार नाही, तर अन्य काय करणार ?
– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (घनगर्जित, नोव्हेंबर २००८)
संदर्भ : दैनिक ‘सनातन प्रभात’