१. महाकवी गंग यांनी बादशहाच्या प्रशंसेपेक्षा नेहमी
ईश्वरभक्तीच्या कविता दरबारात ऐकवणे अन् ही गोष्ट राजाला खटकणे
अकबर बादशहाच्या दरबारी गंग नावाचे महाकवी होते. दरबारातील इतर कवी अकबराला त्याच्या प्रशंसेच्याच कविता ऐकवत असत; परंतु महाकवी गंग प्रभुभक्त आणि निर्भीड कवी होते. त्यांच्या कविता ईश्वरभक्तीने परिपूर्ण असायच्या. त्यांनी कधीही बादशहाला त्याच्या प्रशंसेची एकही कविता ऐकवली नाही आणि ही गोष्ट अकबराला खटकत असे.
२. अकबराने स्वतःची स्तुती करणारी कविता
करण्यास कवी गंग यांना उपहासात्मक सांगणे अन्
गंग यांच्याशी ईर्ष्या करणार्यांना मनोमन प्रसन्न वाटणे
एके दिवशी अकबर बादशहाने भर दरबारात कवी गंग यांना उपहासाने म्हटले, कविराज ! तुम्ही वेळोवेळी उत्कृष्ट आध्यात्मिक कविता ऐकवून आमचे मन प्रसन्न केले आहे; पण कधी माझे गुणगान असेल, मी आश्रयदाता आहे, असा उल्लेख असेल, अशी कविता ऐकवली नाही. मी मनात आणले, तर कोणालाही मालामाल करू शकतो अथवा धुळीसही मिळवू शकतो. तुम्ही अशी कविता लिहा, जिचे शेवटचे पद सब मिल आस करें अकबरकी । असे असेल. या ओळीचा आशय स्पष्ट होता की, कविता शहेनशहाच्या स्तुतीची असली पाहिजे. त्या वेळी कवी गंग यांच्याशी ईर्ष्या करणारे लोक मनोमन प्रसन्न झाले.
३. स्वतः भगवंताचा दास असल्याने अकबराला न घाबरता त्याच्यापेक्षा भगवंताचीच स्तुती करतो, असे कवी गंग यांनी कवितेद्वारे सांगणे
कवी गंग यांनी लगेच एक लहानशी कविता बनवली आणि भर दरबारात ऐकवली.
एक को छोड दुजे को रटे, रसना जो कटे उस लब्बर की ।
आज की दुनिया गनिया को रटे, सिर बाँधत पोट अकब्बर की ॥
कवि गंग तो एक गोविंद भजे, वह संक न माने जब्बर की ।
जिनको न भरोसा हो उनका, वो सब मिल आस करें अकब्बर की ॥
अर्थ : जो आपल्या इष्टदेवतेला सोडून कोणा दुसर्याची स्तुती करतो, त्या धूर्ताची जीभच तुटावी. आजचे जग शासकाचे नाव पाठ करते; म्हणून अकबराच्या नावाचे गाठोडे डोक्यावर घेऊन फिरते. कवी गंग तर एकमेव गोविंदाचा दास आहे; म्हणून कसाही बादशहा असो, त्याला तो घाबरत नाही. ज्याचा गोंविदावर (भगवंतावर) विश्वास नाही, त्या सर्वांनी अकबराची अपेक्षा करावी.
४. कवी गंग यांच्या कवितेमुळे अकबर क्रोधित होणे
अन् त्याने गंग यांना हत्तीच्या पायी देण्याचा आदेश देणे
बादशहा ही कविता ऐकून अत्यंत क्रोधित झाला. तो म्हणाला, तुम्हाला या उद्धटपणाचा परिणाम भोगावा लागेल. तेव्हा महाकवी गंग यांनी निर्भयतेने उत्तर दिले,
एक हाथ घोडा और एक हाथ खर ।
कहना था सो कह दिया, अब करना हो सो कर ॥
अर्थ : गोविंद (भगवंत) घोडा आणि तुम्ही गाढव आहेत. मला जे बोलायचे होते, ते मी बोललो, आता तुम्हाला जे करायचे असेल, ते करा.
हांजी हांजी करणार्या (खुशामतखोरांनी) संधीसाधूंनी बादशहाला आणखी भडकवले. बादशहाने आदेश दिला, कवी गंगला हत्तीच्या पायांखाली तुडवून मारून टाका.
५. कवी गंग यांना हत्तीच्या पायी दिल्यावरही अकबराचा राग
शांत न होणे अन् त्याने गंग यांच्या कुटुंबालाही हत्तीच्या पायी देणे
कवींना हत्तीसमोर नेण्यात आले. ते हसत-हसत हत्तीकडे जातांना म्हणू लागले,
कभी न रांड्या रण चढ्या, कभी न बाजी बंध ।
सकल सभा को आशीष है, विदा होत कवि गंग ॥
अर्थ : धूर्त कधीही वीरांसारखे मैदानात उतरत नाहीत आणि कधी विजयीही होत नाहीत. जे निर्भय आणि साहसी असतात, तेच रणांगणात उतरू शकतात. सर्व सभासदांना माझा आशीर्वाद आहे, आता मी निरोप घेतो.
त्यांना हत्तीच्या पायांखाली तुडवण्यात आले. भगवंताचा नामजप करत-करत त्यांनी प्राण सोडले. यानंतरही अकबराचा राग शांत झाला नाही. त्याने महाकवी गंगच्या संपूर्ण कुटुंबाला हत्तीच्या पायांखाली तुडवण्याची आज्ञा दिली.
६. कित्येक वर्षांनी गंग यांची एक कविता अकबराच्या वाचनात येणे
अन् ईश्वरभक्त कवीची हत्या केल्याविषयी त्याला खेद वाटणे
कित्येक वर्षांनंतर अकबराला कवी गंग यांच्याद्वारे रचित एक कविता मिळाली, जिच्या शेवटच्या ओळी होत्या,
गूढ़ की बात में मूढ़ कहा जाने, भैस कहा जाने खेत सगे का ।
गंग कहे सुन शाह अकबर, गधा कहा जाने नीर गंगा का ॥
अर्थ : गूढ अर्थ मूर्खाला कसा समजणार, ज्या प्रकारे म्हशीला हे शेत कोणाचे आहे (आपल्याच मालकाचे कि त्याच्या नातेवाईकाचे आहे), हे कळत नाही. गंग कवी बादशाह अकबराला सांगतात, हे सज्जन, माझी गोष्ट ऐक, गाढवाला (मूर्ख माणसाला) गंगाजलाचे महत्त्व काय समजणार ?
हे वाचून अकबराला खेद वाटला की, त्याने एका ईश्वरभक्त कवीची हत्या करवली आहे.
(ऋषीप्रसाद, सप्टेंबर २००८, पृष्ठ क्र. १८ व १९)
संदर्भ : दैनिक ‘सनातन प्रभात’