आर्य चाणक्यांनी सांगितलेली राजाची कर्तव्ये !

काँग्रेसचे तत्कालीन भ्रष्टाचारी आणि नेभळट शासन
अन् आर्य चाणक्यांनी सांगितलेली राजाची कर्तव्ये !

वर्ष २००९ ते २०१४ या पाच वर्षांत एका बाजूने भ्रष्टाचार चौखूर उधळला, तर नेमक्या याच काळात ज्या शासनाने या भ्रष्टाचारावर प्रभावी उपाययोजना करायची, ते शासनच नेभळट आणि दिवाळखोर ठरले. याची तीन उदाहरणे सहजपणे देता येतील.

१. या पाच वर्षांत शासन षठीषण्मसी (शासनाचे अस्तित्व अपघातानेच) अनुभवण्यास मिळाले, तर संविधानिक संस्था दुय्यम आणि आनुषंगिक बनल्या.

२. शासनात तूट आणि भ्रष्टाचारात वैपुल्य यांमुळे या काळात आपली अतोनात हानी झाली.

३. पंतप्रधानांच्या कार्यालयाने आपल्या डोक्यावरील सर्व दायित्वे निःसंकोचपणे इतरांच्या खांद्यावर टाकली. एका बाजूने सोनियांकडून आलेल्या आज्ञांचे पालन केले, तर दुसर्‍या बाजूने मंत्रीमंडळातील मंत्र्यांना वरचढ होऊ देण्यात आले.

हे सर्व उणे कि काय; म्हणून भ्रष्ट्राचार हाच शिष्टाचार झाला. सगळ्यांचेच पाय चिखलात रूतलेले ! यांपैकी कुणी कारावासातून जात मुचलका (जामीन) मिळवून बाहेर आला, तर कुणा महाभागाने कारागृहाच्या द्वारावर पुष्पहार घेऊन लोचट भाट उपस्थित व्हावेत, अशी पूर्वयोजनाही केल्याचे तुम्हा-आम्हास कळले. पुन्हा खासदारपद मिळावे; म्हणून हे महाशय गुडघ्यास बाशिंग बांधून सिद्ध झाले. खासगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण या त्रिसूत्रांचा गजर करणार्‍या गेल्या २३ वर्षांच्या या खाऊजा काळात भ्रष्टाचाराच्या रूपात स्वच्छंदता, विषमता आणि दारिद्य्रही वाढले.

 

राजा कसा असावा ? 

प्राचीन भारतात राजेशाही होती; पण ती लोकाभिमुख आणि लोककल्याणात रमणारी होती. आर्य चाणक्यांनी अनेक सूत्रांमधून हेच सूत्र प्रभावीपणे विशद केले आहे. त्यांनी सांगितलेले ५३७ व्या क्रमांकाचे सूत्र असे आहे, संकटांना तोंड देण्यासाठी पैसा साठवावा, या सूत्रावर भाष्य करतांना चाणक्य सांगतात, राजाने लोकांकडून कर रूपाने जमवलेल्या धनाचा डोळ्यांत तेल घालून काटकसरीने उपयोग करावा आणि संकटकाळीच या धनाचा व्यय करावा. लोकांचा रोष ओढवेल, अशा प्रकारे धनाचा विनियोग कधीही करू नये.

सूत्र क्रमांक ५५२ वरचे भाष्यही वाचनीय आहे, समाजातील पावित्र्याचे रक्षण करणे, हे राज्यव्यवस्थेचे काम आहे. राज्यशासन जर अपराध्यांना धडाडीने शोधून काढत नसेल, त्यांना शिक्षा देत नसेल, तर अशा शासकांना तातडीने पदभ्रष्ट केले पाहिजे.

पृष्ठ ४२७ वरील सूत्र क्रमांक ५५९ नुसार, प्रजा न्यायी राजाला मातेसमान मानते. म्हणजे राजाने प्रजाजनांना माता-पित्याचे प्रेम द्यावे ही शिकवण या सूत्रात अध्याहृत आहे. सूत्र क्रमांक १४ तर अन्यायी आणि अत्याचारी राजाच्या विरोधात लोकांनी बंड करून उठावे, असा उपदेश करते. अपात्र माणसाला राजा बनवण्यापेक्षा अराजक परवडले.

राजाने अप्रत्यक्ष चोरांनाही वठणीवर आणावे, नष्ट करावे, हा आशय ५६० क्रमांकाच्या सूत्रात आहे आणि अप्रत्यक्ष चोर याचा अर्थ, अशिलांना लुबाडणारे विधिज्ञ, रुग्णांना लुटणारे वैद्यराज, विद्यार्थीवर्गाला कुमार्गाला लावणारे शिक्षक अशा कित्येक जणांचा समावेश असणारे समाजघटक !

चाणक्यऋषींनी चंद्रगुप्ताला राजसिंहासनावर बसवून आणि भारतवर्ष एकात्म अखंड करून आणि सिकंदराच्या आक्रमणाचे सारे अवशेष संपुष्टात आणून अलौकिक कार्य पूर्णत्वास नेले आणि स्वतः मोठ्या कृतार्थ अंतःकरणाने दैनंदिन राजकारणापासून अंग काढून घेतले. आपल्या दरिद्री ब्राह्मणी जीवनालाच आपले सौभाग्य मानले. त्यांच्या तोंडी जो श्‍लोक होता तो आजही केवढा लोभसवाणा वाटतो. अमात्य राक्षसाला उद्देशून चाणक्य म्हणतात, आता मी मौर्याला तर सम्राट बनवून आणि तुझ्याकडे मुख्यमंत्रीपदाचा भार सोपवून सरस्वती पूजा करण्यासाठी वनात जात आहे. तुम्हाला माझा आशीर्वाद आहे. सम्राट चंद्रगुप्त तुझ्यासारखा बृहस्पती कुशल मंत्री समवेत असल्यामुळे इंद्राप्रमाणे पृथ्वीचे पालन करील !

 

धाडसी ओबामा आणि नेभळट मनमोहन सिंह !

ओबामाच्या आज्ञेवरून अमेरिकी नौसैनिक पाकिस्तानची सीमा ओलांडून सरळ अबोटाबादमध्ये घुसले. तेथे लपून बसलेल्या ओसामा बिन लादेनला त्यांनी रक्ताच्या थारोळ्यात निजवले आणि त्याचे धूड अरबी समुद्रात बुडवूनच ते परतले. त्यानंतर ओबामाने जगाला गर्जून सांगितले, आम्ही ओसामा बिन लादेनला ठार मारून अरबी समद्रात गाडले आहे आणि पाकिस्तानने पुन्हा कुणा आतंकवाद्याला आश्रय दिला, तर या इतिहासाची पुनरावृत्ती करण्यास आम्ही कचरणार नाही. भारताने मात्र मनमोहन सिंहांच्या मुखातून पाकिस्तानी कर्णधारांना असे भाबडे आश्‍वासन दिले, पाकिस्तानला संत्रस्त करणार्‍या कारवाया भारतात होत असतील, तर तपास करून अशा कारवाईखोरांना शिक्षा दिली जाईल.

– डॉ. अशोक मोडक (संदर्भ : मासिक धर्मभास्कर, जून २०१४)