आजच्या शिक्षणपद्धतीत धर्मशिक्षणाचा अंतर्भाव करणे आवश्यक !

१. निराशाजनक शिक्षण देणारी आजची शिक्षणपद्धत
रहित करून स्वावलंबनाने खंबीरपणे 
उभे रहाण्याचे धैर्य
आजच्या तरुण पिढीत निर्माण होईल, असे शिक्षण देणे आवश्यक असणे

आजच्या शिक्षणासंबंधी विचार करतांना स्वामी विवेकानंदांनी काढलेले उद्गार चिंतनीय वाटतात. स्वामीजी म्हणतात, मुलाला शाळेत घातले जाते. त्याला पहिला पाठ दिला जातो, तुझे वडील मूर्ख आहेत. दुसरा पाठ शिकवला जातो, तुझे आजोबा मूर्ख होते. तिसरा पाठ तो शिकतो, पाठ देणारे गुरुजन ढोंगी आहेत आणि चौथा पाठ तो शिकतो, सगळे धर्मग्रंथ म्हणजे केवळ पोकळ बडबड आहे. अशा प्रकारे शिकून तो स्नातक बाहेर पडतो, त्या वेळी तो निराशेचा मूर्तीमंत पुतळा बनलेला असतो. त्यामुळे तो कतृत्वहीन, दिशाहीन आणि संस्कारहीन बनतो. अशा सांप्रताच्या शिक्षणामुळेच आजच्या पिढीत धर्मासंबंधी संपूर्ण अनादर आणि अज्ञान निर्माण झाले आहे. ब्रिटिशांना जाऊन ६० वर्षे होऊन गेली, तरी शिक्षणपद्धतीत पालट झालेला नाही. नैराश्याने भरलेल्या सुशिक्षितांची भर विद्यापिठे कायमच घालत असतात. स्वावलंबनाने खंबीरपणे उभे रहाण्याचे धैर्य आजच्या तरुण पिढीत निर्माण होईल, असे शिक्षण दिले पाहिजे.

 

२. धर्मच मानवाला सुख, समाधान आणि शांती देऊ शकत असणे 

अन्न, वस्त्र, विश्रांतीस्थान, शिक्षण आणि रक्षण या मानवाच्या मूलभूत आवश्यकता आहेत. त्यांची पूर्ती होणे आवश्यक आहे, तरी मानवाचे समाधान होईलच, असे नाही. विज्ञानामुळे मानवाची पावले चंद्रावर उमटली, तरी मानवी मनाची मशागत न झाल्याने मानवाचा विकास होऊ शकलेला नाही. याचा परिणाम म्हणजे तो अशांत आहे. कोणतीही शासनसंस्था मानवाला पूर्णतः सुखी करू शकत नाही. हे सुख, समाधान आणि शांती मानवाला धर्मच देऊ शकतो. त्याचीच आज आवश्यकता आहे.

 

३. धर्मभाव नष्ट झाल्यानेच देशावर धार्मिक आक्रमणे होणे 

संपूर्ण देश जवळजवळ सहस्रो वर्षे गुलाम राहिला. धर्मभाव नष्ट झाल्यानेच ही आक्रमणे झाली. परकीय आक्रमणात सहस्रो ज्ञानदाते मारले गेले, सहस्रो ग्रंथ जाळले गेले, सहस्रो मंदिरे आणि विद्यास्थाने भुईसपाट झाली. प्रचंड प्रमाणात बाटवाबाटवी झाली आणि खर्‍या धर्मतत्त्वाचा लोप झाला.

– श्री. शं.बा. मठ (संदर्भ : सद्धर्म, त्रैमासिक, जानेवारी २०१०)

संदर्भ : दैनिक ‘सनातन प्रभात’