आजच्या आपल्या सण आणि उत्सव यांना आलेले आवाजी आणि बाजारी स्वरूप सर्वांनाच हतबल करणारे आहे. गणेशोत्सव असो, नवरात्रोत्सव असो की, दहीहंडी असो, त्यांचे आजचे रस्त्यावरचे स्वरूप या सणांच्या पावित्र्यालाच नाही, तर मूळ उद्देशालाही हरताळ फासणारे आहे. त्यांच्या आगमनापासून विसर्जनापर्यंतच्या मिरवणुकांमधील हिडीस नाच आणि फेविकॉलपासून मुन्नी बदनामसारखी त्यामध्ये वाजवण्यात येणारी गाणी पाहून हे सण देवांचे आहेत कि दानवांचे, असा प्रश्न पडला आहे !! यांमध्ये नवीन सणांची भर पडत आहे. आता गुढीपाडवाही ढोल-ताशांनी त्यामध्ये समाविष्ट झाला आहे. या सगळ्या प्रकारांना सगळ्याच राजकीय पक्षांचा असलेला पाठिंबा आश्चर्यापेक्षा चीड आणणारा आहे. आजच्या आपल्या देवळांची भयानक परिस्थिती, गंगेपासून सर्वच पवित्र नद्यांचे आपण केलेले प्रदूषण आणि महाकुंभापासून अर्धकुंभामधील गोंधळ, अस्वच्छता आणि चेंगराचेंगरी, धर्ममार्तंडांच्या दिवाळखोरीविना दुसरे काय दाखवतात ?
(संदर्भ : संपादकीय, त्रैमासिक सद्धर्म, एप्रिल २०१५)