मुलाला संन्यासापासून दूर राखण्याकरता शास्त्राचा आधार घेणार्या वडिलांना आद्य शंकराचार्यांनी दिलेले उत्तर

धर्मशास्त्रांचा आधार स्वत:च्या स्वार्थासाठी घेणारा समाज !

(आद्य) शंकराचार्यांनी एका ३० वर्षांच्या युवकास संन्यासाची दीक्षा दिली. त्याचे वडील ७५ वर्षांचे होते. त्यांना ही गोष्ट रुचली नाही. ते त्यांच्याकडे आले आणि तक्रार करू लागले.
 
युवकाचे वडील : तुम्ही हे काय केले ? हा कसला संन्यास ? त्याचा गृहस्थाश्रम राहिला आहे. मग वानप्रस्थाश्रम ? ७० वर्षांनंतर संन्यास. धर्मशास्त्रच तसे सांगते. आपण शास्त्रास विरोधी असे वर्तन करता. शास्त्राज्ञा तुडवता. आमचा वैदिक धर्म आपण मातीत मिळवता आहात.
 
शंकराचार्य शांतपणे त्यांचे बोलणे ऐकून घेतात आणि म्हणतात, ठीक आहे. मी सौदा करायला सिद्ध आहे. 
 
वडील (तोंडवळ्यावर प्रश्‍नचिन्हासारखा हावभाव करून) : याचा अर्थ काय ?
 
शंकराचार्य : म्हणजे तुमच्या मुलाला मी संन्यासमुक्त करतो. आपण संन्यास घ्यावा. ७५ वर्षे आपण ओलांडली आहेत. संन्यास घ्या. मी जाऊ देणार नाही तुम्हाला ! शास्त्रांचा अपमान करता ? शास्त्राज्ञा पायी तुडवता ?
 
वडील (घाबरलेल्या अवस्थेत) : आता संन्यास कसा घेता येईल ? सहस्रो कामे खोळांबली आहेत. ती पार पाडायची आहेत.
 
शंकराचार्य : मृत्यू येईल. यमराज काही विचारणार नाही, किती कामे शेष राहिली आहेत ? मृत्यू काही विचारणार नाही, थांबणार नाही. सर्व कामे तशीच रहाणार आणि मृत्यू उचलून नेईल. मुलाला संन्यासापासून दूर राखण्याकरता शास्त्राचे प्रमाण देत होता ना ! शास्त्राचा आधार घेत होता ! स्वतःच्या संन्यासाकरता शास्त्राचा आधार का घेत नाही ? शास्त्र सांगते, तसे का वागत नाही ? संन्यास का टाळता ? शास्त्रमर्यादा का मोडता ? शास्त्रे ज्या वेळी स्वतःच्या स्वार्थाकरता, स्वतःचा मूर्खपणा विस्तारण्याकरता उपयोगी पडतील, तेव्हा त्यांचा निर्देश करायचा. शास्त्रापासून लोक स्वत:चा स्वार्थ, स्वत:चे हेतूच सिद्ध करू पहातात. सैतानाला बायबलचा आधार याप्रमाणे आहे.
 
संदर्भ : मासिक, घनगर्जित, सप्टेंबर २०१४