म्हैसूर येथील हिंदुद्रोही लेखक अरविंद मलगट्टी यांनी श्रीमद्भगवद्गीतेवर केलेले तथ्यहीन आरोप आणि त्या आरोपांचे केलेले खंडण !

कु. मधुरा भोसले
गीता हा हिंदूंचा धर्मग्रंथ आहे. साधनेच्या विविध मार्गांचा उहापोह यात केला आहे. व्यष्टी आणि समष्टी स्तरावर साधना करून जीवाने स्वतःचा उत्कर्ष कसा साधून घ्यावा, याविषयी माहिती यात आहे; मात्र याच धर्मग्रंथावर काही लोक वारंवार टीका करतांना दिसतात. अरविंद मलगट्टी यांनीही गीतेवर अशाच प्रकारे टीका केली आहे. त्याचे खंडण येथे दिले आहे.

 

१. आरोप : गीतेत स्त्रियांना गौण स्थान दिले आहे

१ अ. खंडण

१ अ १. गीता हा धर्मग्रंथ आहे !

मुख्य सूत्र हे की, गीता हा ईश्‍वरप्राप्ती कशी करायची ?, हे शिकवणारा धर्मग्रंथ आहे. त्यात स्त्री आणि पुरूष असा भेद नसतो.

१ अ २. भगवान श्रीकृष्णाने कधीच कोणत्याही स्त्रीला न्यून लेखलेले नसणे

समाजातील बहुसंख्य पुरुष अहंकारी असल्याने त्यांना स्त्रीचे, विशेषतः पतीला पत्नीचे साहाय्य घेणे न्यूनतेचे वाटते. अहंकारी पुरुष माता, भगिनी, पत्नी, कन्या, शिक्षक, सहपाठी किंवा सहकारी स्त्रीला न्यून लेखतात. कोणताही सारासार विचार न करता मलगट्टी यांनी श्रीकृष्णाला स्वतःप्रमाणे अहंकारी पुरुष समजून हे बेताल वक्तव्य केले असावे. वास्तविक भगवान श्रीकृष्णाने कधीच कोणत्याही स्त्रीला न्यून लेखले नाही कि कुणाचा अपमानही केला नाही; कारण तो सामान्य नर नसून अहंकारशून्य परम ज्ञानी, परम गुणी, परम प्रतापी असा परिपूर्ण पुरुषोत्तम होता.

१ अ ३. श्रीकृष्णाचे स्त्रीदाक्षिण्य दर्शवणारे आचरण
१ अ ३ अ. राणी सत्यभामेला स्वतःसमवेत युद्धात नेणे

नरकासुराशी युद्ध करण्यासाठी गरुडावर स्वार होत असतांना श्रीकृष्णाने राणी सत्यभामेला समवेत घेतले. तिने श्रीकृष्णाला युद्धात साहाय्यही केले. यावरून भगवान श्रीकृष्णाला युद्धात स्वतःच्या पत्नीचे, म्हणजेच एका महिलेचे साहाय्य घेण्यात कसलीही न्यूनता वाटली नाही; कारण त्याच्यात पुरुषत्वाचा लेशमात्र अहंकार नव्हता.

१ अ ३ आ. श्रीकृष्णाने मुरा आणि नरकासुर यांच्याशी घनघोर युद्ध करून त्यांचा वध करणे अन् बंदीवान केलेल्या १६ सहस्र राजकन्यांना मुक्त करून त्यांना धर्मपत्नी म्हणून स्वीकारणे

प्राग्ज्योतिषपूरवर चढाई करून श्रीकृष्णाने मुरा आणि नरकासुर यांच्याशी घनघोर युद्ध करून त्यांचा वध केला. नरकासुराने बंदीवान केलेले अनेक राजे आणि १६ सहस्र राजकन्या यांना श्रीकृष्णाने मुक्त केले. नरकासुराने पळवलेल्या राजकन्यांचा स्वीकार त्यांचे पिता आणि पती करण्यास सिद्ध नसल्याने त्यांचे जीवन उद्ध्वस्त झाले असते; परंतु भगवान श्रीकृष्णाने १६ सहस्र राजकन्यांना धर्मपत्नी म्हणून स्वीकारले आणि त्यांना पुनरुज्जीवन दिले.

१ अ ३ इ. वस्त्रहरणाच्या बिकट प्रसंगी द्रौपदीला अक्षय्य वस्त्र पुरवून तिचे शीलहरण होऊ न देणारा पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण !

दुर्योधनाच्या सांगण्यावरून दुःशासनाने कृष्णभक्त द्रौपदीचे केस धरून तिला फरफटत कौरवांच्या द्युतसभेत आणले. तो नराधम द्रौपदीची विटंबना करण्यासाठी तिचे वस्त्रहरण करू लागला. तेव्हा कौरवांच्या सभेत उपस्थित असणारे महाराज धृतराष्ट्र, पितामह भीष्म, गुरु द्रोणाचार्य, कुलगुरु कृपाचार्य, विदुर, पांडव आणि मोठमोठे योद्धे उपस्थित होते. द्रौपदीने सर्वांना परखड शब्दांत त्यांच्या धर्मकर्तव्याची जाणीव करून दिली आणि तिला साहाय्य करण्याची दीनतेने विनंती केली. दुर्योधनाचा अनुज विकर्ण याने दुःशासनाच्या दुष्कृत्याचा विरोध करून सभात्याग केला; परंतु एकही पुरुष द्रौपदीच्या रक्षणाकरिता पुढे आला नाही. अशा बिकट प्रसंगात द्रौपदी भगवान श्रीकृष्णाला मनोमन पूर्णतः शरण गेली आणि जिवाच्या आकांताने त्याचा धावा करू लागली. भक्तवत्सल भगवान श्रीकृष्ण द्रौपदीच्या साहाय्याला धावून आला आणि त्याने तिला अक्षय्य वस्त्र पुरवले. त्यामुळे द्रौपदीने नेसलेली वस्त्रे अक्षय्य झाली आणि दुःशासन वस्त्रहरण करून थकला; परंतु त्याला द्रौपदीचे शील हरण करता आले नाही. हा चमत्कार भर सभेत घडला. केवळ श्रीकृष्णाच्याच कृपेने कुलवधू द्रौपदीचे रक्षण झाले. त्यामुळे समस्त महापुरुषांच्या सभेत केवळ श्रीकृष्णच एकमात्र परम पुरुष होता. त्यामुळे त्यांना पुरुषोत्तम असे संबोधले जाते.

१ अ ३ ई. अस्वलकन्या जांबुवंतीचा धर्मपत्नी म्हणून सहर्ष स्वीकार करणे आणि प्रमुख अष्टराण्यांमध्ये तिचा समावेश करून तिला गौरवाचे पदही देणे

ऋक्षराज (अस्वल) भक्त जांबुवंत याने श्रीकृष्णाला त्याच्याजवळील स्यमंतक मणी देतांना त्याच्या कन्येचे पाणीग्रहण करण्याची विनंती केली. श्रीकृष्ण राजघरण्यातील थोर यदुवंशकुळी परम वीर, द्वारकाधीश आणि साक्षात् भगवंत होता. तो जंगलात रहाणार्‍या अस्वल जांबुवंताच्या मुलीचे स्थळ सहज नाकारू शकला असता; परंतु त्याने तसे केले नाही. भक्त जांबुवंताने केलेल्या प्रार्थनेचा मान राखून त्यांनी जांबुवंतीला धर्मपत्नी म्हणून सहर्ष स्वीकारले. रुक्मिणी आणि सत्यभामा यांच्याप्रमाणे जांबुवंती श्रीकृष्णाच्या अष्ट प्रमुख राण्यांपैकी एक होती. श्रीकृष्णाने अस्वल भक्ताच्या कन्येला केवळ धर्मपत्नीचेच स्थान दिले नाही, तर प्रमुख अष्टराण्यांमध्ये समावेश करून तिला गौरवाचे पदही दिले. श्रीकृष्णाने जांबुवंतीलाही राण्यांचा दर्जा दिला. या प्रसंगातून भगवान श्रीकृष्णाच्या मनात समस्त स्त्रियांप्रती असणारा निस्सीम आदरभाव प्रगट होतो.

 

२. आरोप : गीतेत दलितांना (शूद्रांना) गौण स्थान दिले आहे

२ अ. खंडण

ईशावासोपनिषदात सांगितले आहे, जन्मतः प्रत्येक व्यक्ती क्षुद्र असते. व्यक्तीचे गुण आणि कर्म यांनुसार तिचा वर्ण ठरतो, जन्मानुसार नव्हे.

२ अ १. वर्णानुसार साधना सांगणारी श्रीमद्भगवद्गीता !

श्रीकृष्णाने श्रीमद्भगवद्गीतेत वर्णानुसार साधनेविषयी सुरेख मार्गदर्शन केलेले आहे. चातुर्वर्णांची निर्मिती ही व्यक्तीच्या जन्मावर नव्हे, तर त्याच्या गुण आणि कर्म यांवर अवलंबून आहे, असे भगवान श्रीकृष्णाने स्पष्टपणे गीतेत सांगितले आहे, उदा. कलाकाराने कला आणि मन; श्रमिकाने शरीर आणि मन; धनिकाने धन, शरीर आणि मन; शूरविराने शरीर, मन अन् प्राण, तर बुद्धीवंताने स्वतःची बुद्धी किंवा विद्या, शरीर आणि मन यांना भगवंताच्या सेवेत अर्पण करावे.

प्रत्येकाने त्याच्या गुणकर्मानुसार (क्षमतेनुसार) कर्म किंवा साधना केली, तर त्याला समाधान मिळते आणि समाजव्यवस्थाही सुरळीत चालते. गुणकर्माच्या विपरित कर्म किंवा साधना केली, तर व्यक्तीच्या क्षमतेपेक्षा अधिक किंवा कठीण कर्म मिळाल्याने तिला ताण येतो, तसेच व्यक्तीच्या क्षमतेपेक्षा न्यून किंवा सोपे कर्म मिळाले, तर व्यक्ती असंतुष्ट रहाते, तसेच समाजव्यवस्थेची घडी विस्कटून भ्रष्टाचार, हिंसाचार, गुन्हेगारी इत्यादी बोकाळून समाजाचे स्वास्थ्य बिघडते. (भारतात पूर्वापार चालत आलेली वर्णाश्रमव्यवस्था मोडकळीस आल्यामुळेच आज भारताची केविलवाणी स्थिती झालेली आहे.)

२ अ २. जातीवर आधारित भेदभावाला प्रोत्साहन न देता श्रीकृष्णाने व्यक्तीच्या मनातील भाव ओळखून त्याप्रमाणे आचरण करणारा श्रीकृष्ण !
२ अ २ अ. पांडवांचा शांतीदूत बनून हस्तिनापुराला गेलेल्या श्रीकृष्णाने दुर्योधनाचे आदरातिथ्य नाकारणे आणि विदुराच्या घरी जाऊन विदुरपत्नीने पानात वाढलेली साधी भाजी-भाकरी आनंदाने ग्रहण करणे

महाभारत युद्धाचा आरंभ होण्यापूर्वी युद्ध टाळण्याचा शेवटचा प्रयत्न करण्यासाठी श्रीकृष्ण पांडवांचे शांतीदूत बनून हस्तिनापुराला गेला. जातीने क्षत्रिय (परंतु गुण आणि कर्म यांनी पशूहून नीच) असणार्‍या युवराज दुर्योधनाने भगवान श्रीकृष्णाच्या भोजनाचा प्रबंध स्वतःच्या भवनात केला होता; परंतु श्रीकृष्णाने पंचपक्वान्नांच्या सुग्रास भोजनाचे आमंत्रण नाकारून दुर्योधनाच्या घरी पाणीही घेतले नाही. धृतराष्ट्राचे कनिष्ठ बंधू दासीपुत्र विदुर हे जातीने शुद्र (पण गुण-कर्माने सात्त्विक अन् ज्ञानी, म्हणजे वर्णानुसार ब्राह्मण) आणि श्रीकृष्णाचे परम भक्त होते. श्रीकृष्णाने दुर्योधनाचे आदरातिथ्य नाकारले आणि तो थेट विदुराच्या घरी गेला. श्रीकृष्णाला पाहून विदुराला आश्‍चर्य आणि आनंद दोन्ही झाले. श्रीकृष्णाने विदुराच्या शेजारी बसून विदुरपत्नीने पानात वाढलेली साधी भाजी-भाकरी आनंदाने ग्रहण केली. श्रीकृष्ण जर जातीभेद मानत असता, तर तो स्वेच्छेने कधीच विदुराकडे गेला नसता आणि त्याच्या घरचे अन्न-पाणीही घेतले नसते. त्याऐवजी त्याने दुर्योधनाच्या ऐश्‍वर्यसंपन्न भवनात जाऊन पंचपक्वान्ने खाऊन स्वर्गीय सुखाचा उपभोग घेतला असता; परंतु श्रीकृष्ण जातीभेद मानतच नव्हता, तर गुण आणि कर्म यांवर आधारित असणारा वर्ण मानत होता. त्यामुळे तो दुर्योधनाला सोडून विदुराघरी गेला. या प्रसंगातून भगवान श्रीकृष्णाच्या मनात दुरात्मा दुर्योधनाविषयी वाटणारा तिटकारा आणि महात्मा विदुराप्रती वाटणारे अलोट प्रेम यांचे दर्शन घडते.

२ अ २ आ. श्रीकृष्णाने अर्जुनाला कर्णवधाचा आदेश देण्यामागील कार्यकारणभाव

स्वत:च्या जन्मावर कुणाचाही अधिकार नसतो, त्यामुळे श्रीकृष्णाने कर्णाला कधीच सूतपुत्र म्हणून हिणवले नाही कि त्याचा अपमान केला नाही. कर्ण परम वीर, परम दानी आणि महारथी होता. केवळ शत्रू आहे; म्हणून त्याला तुच्छ लेखणे योग्य नसून शत्रूच्या गुणांचाही आदर करायला हवा, याची जाणीव श्रीकृष्ण सतत पांडवांना करून द्यायचा. श्रीकृष्णाने कर्णाविषयी वाटणार्‍या कोणत्याही द्वेषापोटी अर्जुनाला कर्णवधाचा आदेश दिला नव्हता. पांडव धर्मशील, सत्यवचनी आणि प्रामाणिक आहेत, हे ठाऊक असूनही कर्णाने कधीच धर्माची बाजू घेतली नाही. धर्म-अधर्माचे ज्ञान असूनही त्याने नेहमीच अधर्माचीच पाठराखण केली. कोणत्याही परिस्थितीत अन्याय आणि अधर्म यांना साथ न देता धर्मरक्षण करणे, हेच श्रेष्ठ कर्तव्यपालन अन् धर्म आहे, अशी शिकवण गुरु परशुरामाने कर्णाला दिली होती; परंतु कर्णाने स्वार्थी मित्रप्रेमापोटी लाक्षाग्रहदहन, द्युतक्रीडा, द्रौपदीचे वस्त्रहरण, अभिमन्यूचा वध या दुष्कृत्यांत दुर्योधनालाच साथ दिली. त्यामुळे गुणसंपन्न आणि दानवीर असूनही कर्ण अहंकारी अन् अधर्मी होता. धर्माच्या विजयासाठी अधर्माच्या प्रत्येक खांबाचा पाडाव करणे अनिवार्य असल्याने श्रीकृष्ण भगवंताने भीष्म, द्रोण, जयद्रथ, दुर्योधन आणि दुःशासन यांच्याप्रमाणेच कर्णवधाला संमती दिली.

२ अ २ इ. सुभद्रापुत्र अभिमन्यूप्रमाणेच श्रीकृष्णाला राक्षसमाता हिडिंबेचा पुत्र घटोत्कचही प्रिय असणे

भीमपुत्र घटोत्कच राक्षस कुळातील होता; परंतु श्रीकृष्णाला अभिमन्यूप्रमाणेच घटोत्कचही तितकाच प्रिय होता. अभिमन्यूची माता सुभद्रा हिच्याप्रमाणेच घटोत्कचाची राक्षसमाता हिडिंबा ही समस्त पांडव आणि श्रीकृष्ण यांना आदरणीय होती. वीर अभिमन्यूच्या वधानंतर घटोत्कचालाही पांडव सैन्यातील महत्त्वाचे स्थान देऊन रणांगणात स्वतःचा पराक्रम दाखवण्याची पूर्ण संधी श्रीकृष्णाने दिली होती. अर्जुन आणि पांडव यांच्या रक्षणाकरिता घटोत्कचाने स्वतःच्या प्राणांचे अनमोल बलिदान दिले होते. त्यामुळे घटोत्कचाचे नावही अभिमन्यूप्रमाणे परम धर्मवीर म्हणून सुवर्णाक्षरांनी इतिहासात कोरले जाईल, असे श्रीकृष्णाने पांडवांचे सांत्वन करतांना सांगितले.

हे श्रीकृष्णा, आम्हा सर्वांवर तुझी कृपादृष्टी अखंड असू दे. हिंदु धर्म, देवता, संत, ऋषीमुनी आणि राष्ट्रपुरुष यांविषयी धर्मद्रोह्यांनी समाजात पसरवलेले असत्य विचार निष्प्रभ होऊ देत. अशी तुझ्या चरणी विनम्र प्रार्थना आहे.

– कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.२.२०१५)