
संत एकनाथ महाराजांनी सर्व भारताचे धर्मपीठ असणार्या काशीक्षेत्री आपल्या भागवत ग्रंथाची (आणि आजही लोकप्रिय असणार्या रुक्मिणीस्वयंवराचीही !) रचना केली. एकनाथांचा भागवत ग्रंथ काशीतील सर्वभाषिक विद्वानांना आणि पंडितांना प्रचंड आवडला आणि त्यांनी त्याची पालखीतून मिरवणूक काढली. प्रश्न असा आहे की, नाना भाषा बोलणार्या या लोकांना मराठी ग्रंथ कळला कसा ? त्याचा श्रेष्ठ दर्जा कळला कसा ? याचे उत्तर अर्थातच प्राकृत नाव धारण करून असणारे मराठी भाषेचे पूर्वरूप हे भारतभर मध्ययुगात संपर्क-भाषा म्हणून वावरत होते, हेच आहे.
मराठी हस्तलिखितांचे संग्रह अजूनही सुरक्षित !
मराठी पोथ्या संपूर्ण भारतभर मिळतात. याचे अक्षरबद्ध उदाहरण म्हणजे मद्रासची हस्तलिखिते, त्रिवेंद्रमची हस्तलिखिते, हैदराबादची हस्तलिखिते, कर्नाटकातील मराठी हस्तलिखिते इत्यादी कॅटलॉग राज्य मराठी विकास संस्थेने केलेले आहेत. अशा मराठी हस्तलिखितांचे संग्रहच्या संग्रह उत्तर हिंदुस्थानात अनेक ठिकाणी अजूनही सुरक्षित आहेत. यासंबंधीची माहिती बिब्लिऑग्राफिकल सर्व्हेे ऑफ इंडियन मॅन्युस्क्रिप्ट्स कॅटलॉग (संपादक : सुभाष बिस्वास, इस्टर्न बुक लिंकर्स प्रकाशन, दिल्ली, १९९८) या ग्रंथात मिळू शकते. याशिवाय ज्यांचे कॅटलॉग झालेलेच नाहीत असे कितीतरी मराठी हस्तलिखित संग्रह उत्तर हिंदुस्थानातील मठ आणि मंदिरांमध्ये, तसेच राजे, संस्थानिक आणि सरदार यांच्या घराण्यांत अजूनही पडून आहेत.
– डॉ. द.दि. पुंडे, मराठीचे अभ्यासक
(संदर्भ : १ मार्च २०१५, लोकसत्ता, लोकरंग पुरवणी)