काल आपण मराठी भाषेचे महत्त्व जाणून घेतले. आज मराठीच्या सौंदर्याविषयी जाणून घेऊया.
काही शब्दांची व्युत्पत्ती व अर्थ
१. वाक्य
वाक् म्हणजे बोलणे, लिहिणे, उच्चार करणे. हे क्रियापद असून त्याला य लावला असता वाक्य असं नाम होते.
२. वाग्यज्ञ
व्युत्पत्ती : वाक् + यज्ञ
अर्थ
अ. वाक् म्हणजे शब्द, नाद, लेखन किंवा भाषण. वाक्यज्ञ (वाग्यज्ञ) म्हणजे शब्द-यज्ञ किंवा भाष्य-यज्ञ. वाग्यज्ञे म्हणजे शब्दयज्ञाने किंवा भाष्ययज्ञाने.
आ. वाग्य म्हणजे सत्य बोलणे, सत्वचन. ज्ञ म्हणजे ज्ञान किंवा जाण. वाग्यज्ञ म्हणजे सत्य वचन जाणणारा. वाग्यज्ञे म्हणजे सत्य बोलणे जाणून.
आतां विश्वात्मकें देवें । येणें वाग्यज्ञें तोषावें ।
तोषोनि मज द्यावें । पसायदान हें ॥ – संत ज्ञानेश्वर (ज्ञानेश्वरी १८.९३)
अर्थ : आता हे विश्वात्मक देवा (ब्रह्मांडनायका), माझ्या सत्यवचनरूपी यज्ञाने (सत्य वचन जाणून) संतुष्ट व्हावे आणि मला हा (आशीर्वादपर) प्रसाद द्यावा.
काही शब्दांचे अर्थ
१. आई
आ म्हणजे आदि आणि ई म्हणजे ईश्वर, म्हणजे आदि ईश्वर म्हणूनच मातृदेवो भव ।, असे प्रथम म्हणतात. – सौ. मनीषा चार्य, मुंबई.
२. शून्य म्हणजेच ब्रह्म, म्हणूनच मराठी भाषेने आम्हाला शून्याला पूज्य म्हणावयास शिकवणे
शून्य म्हणजेच ब्रह्म, म्हणूनच मराठी भाषेने आम्हाला शून्याला पूज्य म्हणावयास शिकवले. पाढे म्हणतांना आम्हाला शाळेत एकावर शून्य दहा पेक्षा एकावर पूज्य दहा, असे म्हणायला शिकवले. – पू. (सौ.) अंजली गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
संतांनी मराठी भाषा समृद्ध आणि वैभवशाली करणे
१. मराठी भाषेचे महत्त्व सांगणारी संतवचने
अ. माझा मराठाचि बोलु कौतुकें । परि अमृतातेंहि पैजासीं जिंके ॥
ऐसीं अक्षरें रसिकें । मेळवीन ॥ – संत ज्ञानेश्वर (ज्ञानेश्वरी, ६.१४)
(पाश्चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण करणारा आजचा समाज ही अमृताची चव चाखायला कोठेतरी उणा पडत आहे. – संकलक)
आ. माझी मराठी भाषा चोखडी ।
परब्रह्मी फळली गाढी । – संत एकनाथ महाराज
इ. संस्कृतभाषा देवे केली ।
मराठी काय चोरापासून झाली ? – संत एकनाथ
२. संतांनी मराठी भाषा सुंदर ठेवणे
संत ज्ञानेश्वरांपासून ते शिवकालीन संत जगद्गुरु श्री तुकाराम महाराज, श्रीसमर्थ रामदासस्वामी, श्रीदासोपंत इत्यादी अगदी श्रीगोंदेकर, शेख महम्मदबाबांसह सगळ्या संतांनी आपली ही मराठी भाषा सुंदर ठेवली आणि साजरीगोजरी बनवली. भजनदिंड्या आणि कीर्तने यांतून मराठी भाषा अधिक फुलली. संत एकनाथ, संत नामदेव, संत तुकोबांचे अभंग, गवळणी, भारूड-बतावणी आणि ओव्या-उखाणे, जोत्यावरच्या झोपाळ्यावर आणि माजघरातील जात्यावर गायिल्या जात. – शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे
संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘तामसिक इंग्रजीच्या तुलनेत सात्त्विक मराठी भाषा श्रेष्ठ !’