अनुक्रमणिका
- परात्पर गुरु पांडे महाराज यांनी अनुभवलेली
श्रीकृष्णवेशातील पू. भार्गवराम यांची आनंददायी श्रीकृष्णलीला !
- १. पू. भार्गवराम यांना पाहून ‘प्रत्यक्ष श्रीकृष्णच अवतरला आहे’, असे मला वाटले !
- २. अखिल ब्रह्मांडाच्या दिग्दर्शकाने (परात्पर गुरु डॉ. आठवले यांंनी) पू. भार्गवराम यांना जनलोकातून पृथ्वीवर आणून श्रीकृष्णाची बाललीला दाखवली आहे !
- ३. बाळकृष्णाच्या वेशातील पू. भार्गवराम यांचे परात्पर गुरु पांडे महाराज यांनी केलेले भावपूर्ण वर्णन
- ४. ध्वनी-चित्रचकतीतील पू. भार्गवराम यांच्या हालचालींवरून त्यांचे लक्षात आलेले गुण
- ५. पू. भार्गवराम यांचे बोलणे, चालणे, वागणे आणि सगळेच असामान्य असल्याचे दिसत होते.
- ६. ही ध्वनी-चित्रचकती पुढच्या सर्वच पिढ्यांसाठी आदर्शवत् असेल !
- ७. सध्याच्या पिढीला वाटतेे, ‘आमच्या भरवशावरच हिंदु राष्ट्र येणार आहे’; ‘परंतु हे कार्य कुणावाचून अडणारे नाही’, हे भगवंत दाखवत आहे’, हे यावरून दिसून येते.
- ८. ‘उच्च लोकांतील जिवांनी पृथ्वीवर जन्म घेऊन हिंदु राष्ट्रासाठी कार्य करणे’, ही अखिल ब्रह्मांडाच्या दिग्दर्शकाची, म्हणजेच परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अवतारी लीला आहे !
- ९. चैतन्याची महानता
- १०. ९१ व्या वर्षीही ३ घंटे सलग बसून कार्यक्रम पाहिल्यावरही मला कोणताही त्रास झाला नाही !
- ११. कृतज्ञता
- चि. भार्गवरामकडे पशू-पक्षी आकर्षित होणे
- चि. भार्गवरामच्या जन्मानंतर कुटुंबियांमध्ये झालेले पालट
- चि. भार्गवरामविषयी संतांनी काढलेले उद्गार
परात्पर गुरु पांडे महाराज यांनी अनुभवलेली
श्रीकृष्णवेशातील पू. भार्गवराम यांची आनंददायी श्रीकृष्णलीला !
४.११.२०१८ या दिवशी मंगळूरू (कर्नाटक) सेवाकेंद्रात जनलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेल्या पू. भार्गवराम प्रभु (वय १ वर्ष ५ मास) यांना जन्मतःच पहिले संत असल्याचे घोषित करण्यात आले. कार्यक्रमाच्या आरंभी त्यांच्या बाललीलांची बाळकृष्णलीला स्वरूपातील ध्वनी-चित्रचकती दाखवण्यात आली. ही ध्वनी-चित्रचकती पहातांना सर्वांना प्रत्यक्ष बाळकृष्णाची लीलाच पहात असल्याचा अद्वितीय आनंद अनुभवायला मिळाला.
या विषयाला अनुसरून ६.११.२०१८ या नरकचतुर्दशीच्या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले आणि परात्पर गुरु पांडे महाराज यांचा दूरभाषवरून संपर्क झाला. त्या वेळी परात्पर गुरु पांडे महाराज यांनी पू. भार्गवराम प्रभु यांच्याविषयी काढलेले गौरवोद्गार, त्यांच्या बाललीलांचे केलेले वर्णन, त्यांचे लक्षात आलेले गुण आणि त्यांच्या रूपाने चैतन्याचा महान ठेवा पृथ्वीवर आणणार्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता पुढे दिली आहे.
१. पू. भार्गवराम यांना पाहून ‘प्रत्यक्ष श्रीकृष्णच अवतरला आहे’, असे मला वाटले !
‘पू. भार्गवराम यांना पाहून मला वाटले, ‘प्रत्यक्ष श्रीकृष्णच अवतरला आहे.’ पू. भार्गवराम यांची ध्वनी-चित्रचकती पहातांना ‘बाळकृष्णाच्या लीला चालू आहेत’, असे मला वाटले. ‘या बाळकृष्णाला पहातच रहावेे. त्याला उचलून घ्यावे’, असेे मला वाटत होते.
२. अखिल ब्रह्मांडाच्या दिग्दर्शकाने (परात्पर गुरु डॉ. आठवले यांंनी)
पू. भार्गवराम यांना जनलोकातून पृथ्वीवर आणून श्रीकृष्णाची बाललीला दाखवली आहे !
एखाद्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाला त्याच्या चित्रपटात श्रीकृष्णाची भूमिका करण्यासाठी शोधूनही असे पात्र मिळणार नाही आणि त्या पात्राला श्रीकृष्णाची प्रत्यक्ष भूमिका पू. भार्गवराम यांच्याप्रमाणे जन्मापासून आज एक वर्ष ५ मासांपर्यंत इतक्या उत्तम प्रकारे साकारता येणार नाही. या जगताच्या दिग्दर्शकाने (परात्पर गुरु डॉ. आठवले यांंनी) अशा श्रीकृष्णाला (पू. भार्गवराम प्रभु यांना) जनलोकातून पृथ्वीवर आणून श्रीकृष्णाची बाललीला दाखवली आहे. अशा प्रकारे ‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे अखिल ब्रह्मांडाचे खरे दिग्दर्शक आहेत’, हे दिसून येते.
(‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे अखिल ब्रह्मांडाचे दिग्दर्शक आहेत’, असा परात्पर गुरु पांडे महाराज यांचा वैयक्तिक भाव आहे. – संकलक)
३. बाळकृष्णाच्या वेशातील पू. भार्गवराम यांचे
परात्पर गुरु पांडे महाराज यांनी केलेले भावपूर्ण वर्णन
प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या वेळी पू. भार्गवराम बाळकृष्णाच्या वेशात कार्यक्रमात सहभागी झाले होते. डोक्यावर बांधलेल्या केसांचा जुडा, त्यात खोचलेले मोरपीस, मानेपर्यंत आलेले जावळाचे कुरळे केस, कपाळावर लाल रंगातील इंग्रजी ‘यू’ आकारातील नाम, त्याच्या खाली भ्रूमध्यावर लावलेला कुंकवाचा टिळा (या टिळ्यांमध्ये ‘ॐ’कार आले असल्याचे मला स्पष्ट दिसले.), गोबरे गाल, दोन्ही गालांच्या वरच्या बाजूला अष्टगंधाचे लावलेले टिळे, टपोरे विलोभनीय डोळे, कोरीव लाल ओठ, रेखीव नाक, उघड्या बाळसेदार अंगावर गळ्यातील मोत्यांची माळ अन् अन्य अलंकार यांनी विभूषित झालेले आणि केवळ रेशमी पितांबर नेसलेले पू. भार्गवराम यांना पाहून प्रत्यक्ष बाळकृष्णच पहात असल्याचा आभास मला झाला अन् ‘त्यांचा मुका घ्यावा’, असे वाटले.
४. ध्वनी-चित्रचकतीतील पू. भार्गवराम
यांच्या हालचालींवरून त्यांचे लक्षात आलेले गुण
साधारण दीड फूट उंचीच्या व्यासपिठावर चढण्यासाठी पू. भार्गवराम स्वतः प्रयत्न करत होते. दीड वर्षाचे (१ वर्ष ५ महिने) हे बालक स्वतः व्यासपिठावर चढत होते, तसेच व्यासपिठावरून शेजारी एक फूट अंतरावर ठेवलेल्या श्रीकृष्णाच्या चित्राजवळील फुले हिंमतीने काढत होते. ‘फुले काढतांना मी व्यासपिठावरून पडेन’, असे त्याला भय वाटत नव्हते. हे दृश्य फारच सुंदर होते.
कार्यक्रमाच्या वेळी पू. भार्गवराम यांच्या मुखावर आरंभीपासून शेवटपर्यंत हास्यभाव होता. त्यांच्या मुखावर कधी रडण्याचा किंवा नकारात्मक भाव नव्हता. ही अगम्य लीला आहे.
संपूर्ण कार्यक्रमात पू. भार्गवराम स्वयंसिद्धपणे आणि मुक्तपणे वावरत होते. त्यांची आई किंवा तेथील कुणी साधक त्यांच्या हालचालींवर पायबंद घालतांना दिसत नव्हते. ‘पू. भार्गवराम यांना कुणाच्या साहाय्याची आवश्यकता नाही’, हे यावरून दिसून येते.
या दृश्यावरून त्यांच्यातील स्वयंसिद्धता, धैर्य, सामर्थ्य आणि त्यात पुन्हा मिष्किल हास्यभाव (चारुहास्य), हे वैशिष्ट्यपूर्ण गुण दिसून येतात.
५. पू. भार्गवराम यांचे बोलणे, चालणे, वागणे
आणि सगळेच असामान्य असल्याचे दिसत होते.
६. ही ध्वनी-चित्रचकती पुढच्या सर्वच पिढ्यांसाठी आदर्शवत् असेल !
ही ध्वनी-चित्रचकती पुढच्या पिढीला पहाण्यासारखी असेल. पुढच्या सर्वच पिढ्यांसाठी ती आदर्शवत् असेल. आतापर्यंत भगवंताच्या बाललीलांचे अशा प्रकारचे दृश्य पहायला मिळाले नाही.
७. सध्याच्या पिढीला वाटतेे, ‘आमच्या भरवशावरच हिंदु राष्ट्र येणार आहे’;
‘परंतु हे कार्य कुणावाचून अडणारे नाही’, हे भगवंत दाखवत आहे’, हे यावरून दिसून येते.
८. ‘उच्च लोकांतील जिवांनी पृथ्वीवर जन्म घेऊन हिंदु राष्ट्रासाठी कार्य करणे’,
ही अखिल ब्रह्मांडाच्या दिग्दर्शकाची, म्हणजेच परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अवतारी लीला आहे !
जेव्हा उच्च लोकांतील जीव पृथ्वीवर जन्माला आल्यावर कार्य करायला लागतील, त्या वेळी अगम्य लीला दिसू लागेल. ‘वर्ष २०२३ मध्ये हिंदु राष्ट्र येणार असून या कार्यासाठी उच्च लोकांतील ११ सहस्र जीव पृथ्वीवर येणार आहेत’, असे अखिल ब्रह्मांडाच्या दिग्दर्शकाने (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) आधीच सांगितले आहे. याचाच अर्थ ‘त्यांनीच अशी व्यवस्था करून ठेवली असून या महान दिग्दर्शकाचीच ही अवतारी लीला आहे’, असे दिसून येते.
९. चैतन्याची महानता
अ. ही सर्व चैतन्याच्या महानतेची लीला आहे. ‘हे सर्व आपल्याला पहायला मिळत आहे’, हे आपले महद्भाग्य आहे. चैतन्याच्या महानतेविषयी अथर्ववेदात म्हटले आहे,
यो अन्धो यः पुनःसरो भगो वृक्षेष्वाहितः ।
तेन मा भगिनं कृण्वप द्रान्त्वरातयः ॥
– अथर्ववेद, कांड ६, सूक्त १२९, मंत्र ३
अर्थ : चैतन्य हे ऐश्वर्य, बळ, यश आणि जीवन यांना नित्य धारण करणारे आहे. ‘वृक्ष पुनःपुन्हा छाटला असतांनाही त्याला नवीन पालवी येणे’, हे त्याच्यातील चैतन्यामुळेच घडते. हे ईश्वरा, या चैतन्याने मला ऐश्वर्यवान बनव आणि माझे शत्रू अन् संकटे दूर कर. (संदर्भ : ‘अथर्ववेद-संहिता, भाषा-भाष्य, द्वितीय खंड, पंडित जयदेव शर्मा’ यातील हिंदी अर्थाचे मराठी भाषांतर)
आ. श्रीकृष्ण पूर्णावतार होता. त्याच्या चैतन्याच्या महानतेची वर्णने भागवतात वर्णिली आहेत. त्याच्या चैतन्याच्या प्रभावामुळे गोप-गोपी, समस्त जीव, पशू-पक्षी इत्यादी त्याच्याकडे आकर्षिले जात होते. ‘पू. भार्गवराम यांच्यातील महान चैतन्यही अशाच प्रकारे सर्वांना आकर्षित करत आहे’, असे दिसते.
१०. ९१ व्या वर्षीही ३ घंटे सलग बसून
कार्यक्रम पाहिल्यावरही मला कोणताही त्रास झाला नाही !
पू. भार्गवराम यांचा कार्यक्रम मी देवद आश्रमातील माझ्या खोलीत बसून दुपारी २.३० ते सायं. ५.३० या कालावधीत पाहिला. ते सर्व पहातांना मी अगदी रंगून गेलो होतो. ‘इतका वेळ बसूनही वयाच्या ९१ व्या वर्षी मला काहीच त्रास झाला नाही’, याचे मला आश्चर्य वाटले.
११. कृतज्ञता
‘पू. भार्गवराम यांच्या आई-वडिलांनी त्याच्या जन्मापासून त्या-त्या वेळी त्याच्या बाललीलांचे ध्वनी-चित्रीकरण करून ठेवल्यामुळे आज आम्हाला या बाललीला पहाण्याचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला. यासाठी त्यांचे माता-पिता आणि कुटुंबीय यांच्याविषयी मी कृतज्ञता व्यक्त करतो.
भगवंताने मनुष्यजन्म आत्मचैतन्य वाढवून आनंद घेण्यासाठी आणि ईश्वरप्राप्ती करून घेण्यासाठी दिला आहे. हे केवळ साधनेद्वारेच शक्य आहे. कलियुगातील भयावह सद्यःस्थितीत पालट होण्यासाठी प्रत्येकाने साधना करणे किती महत्त्वाचे आहे ! आज सनातन संस्थेद्वारे परात्पर गुरु डॉ. आठवले हेच जगाला सांगत आहेत.
पू. भार्गवराम यांच्या रूपातून चैतन्याचा महान ठेवा या पृथ्वीवर आणणार्या महान परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी समस्त सनातन परिवाराच्या वतीने कोटी कोटी कृतज्ञता !’
– (परात्पर गुरु) पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (६.११.२०१८)
चि. भार्गवरामकडे पशू-पक्षी आकर्षित होणे
१. घरी गाय आणि पक्षी येणे
चि. भार्गवराम पाळण्यात आडवे पडून बोबडे बोलायचा. तेव्हा पक्षी खिडकीजवळ येऊन बसत. आम्ही भार्गवरामला अंघोळ घातल्यानंतर त्याला देवघरात न्यायचो. तेव्हा दारात एक गाय आणि एक पक्षी यायचा.’ – श्री. प्रभाकर पडियार (आजोबा, आईचे वडील), मंगळूरू सेवाकेंद्र, कर्नाटक. (२२.४.२०१८)
२. चि. भार्गवरामला पाहिल्यावर मोर पंख पसरून नाचू लागणे
एकदा मंगळूरू सेवाकेंद्रात एक मोर आला होता. भार्गवरामने दाराजवळ जाऊन मोराला पाहिले आणि मोर आपले पंख पसरून नाचू लागला. ‘मोर जणू भार्गवरामला भेटण्यासाठीच आला होता’, असे मला वाटले आणि त्या वेळी श्रीकृष्णाचे अस्तित्व जाणवले.
प.पू. गुरुदेवांनी आम्हाला असा सात्त्विक, मोहक आणि दैवी बालक दिला, याविषयी गुुुरुदेवांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता !’
– प्रभु आणि पडियार कुटुंबीय
चि. भार्गवरामच्या जन्मानंतर कुटुंबियांमध्ये झालेले पालट
पू. (श्रीमती) राधा प्रभु (पणजी – वडिलांची आजी)
बाळाच्या जन्मामुळे अनेक प्रलंबित कामे मार्गी लागणे
बाळाच्या जन्मामुळे अनेक प्रलंबित कामे पूर्ण होऊ लागली. अनेक मासांपासून सेवाकेंद्राच्या प्रवेशद्वाराला एक अंगचे कुलुप (इंटरलॉक) बसवण्याचा आमचा विचार होता, तो पूर्ण झाला. कूपनलिकेचे (बोअरवेलचे) काम झाले. इतरही सर्व लहान-मोठी कामे बाळाच्या जन्मानंतर ३ – ४ दिवसांतच पूर्ण झाली. त्या वेळी ‘बाळामुळेच ही सगळी कामे मार्गी लागली’, असे आम्हाला वाटले.’ (२२.४.२०१८)
सौ. शशिकला पडियार (आजी – आईची आई)
बाळाच्या जन्मामुळे घरात उत्साह निर्माण होऊन घर सात्त्विक बनणे आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये पुष्कळ पालट होणे
‘जन्मानंतर २ र्या दिवशी बाळाला तीर्थहळ्ळी येथील आमच्या घरी आणल्यावर घरातील वातावरण आनंदी झाले. बाळाच्या जन्मापूर्वी माझे सासरे तोल जाऊन पडल्यामुळे त्यांच्या माकडहाडाचे शस्त्रकर्म झाले होते. त्यांची सेवा करून मी बाळाजवळ जायचे. तेव्हा माझा नामजप आपोआप चालू होऊन माझ्यावर उपाय व्हायचे आणि माझा थकवा दूर व्हायचा.
बाळाच्या जन्मानंतर सासर्यांच्या वागण्यात पुष्कळ पालट झाला. बाळ जोपर्यंत तीर्थहळ्ळी येथे होते, तोपर्यंत ते शांत होते. तेव्हा त्यांनी वैखरीतून नामजप करण्यास आरंभ केला.
बाळाच्या जन्मामुळे घरात उत्साह निर्माण झाला आणि घरातील वातावरण सात्त्विक बनले. कुटुंबातील सदस्यांमध्येही पुष्कळ पालट झाले.’
चि. भार्गवरामविषयी संतांनी काढलेले उद्गार
सद्गुरु (डॉ.) पिंगळेकाका यांनी बाळाच्या नामकरणाच्या वेळची छायाचित्रे
पाहून ‘बाळाचे कार्य निर्गुणातून चालू आहे’, असे सांगणे – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे
‘१२ दिवसांनंतर बाळाचा नामकरण विधी झाला. सद्गुरु (डॉ.) पिंगळेकाकांनी नामकरणाच्या वेळची छायाचित्रे पाहून सांगितले, ‘‘छायाचित्रात तो ज्या मुद्रेत आहे, त्यातून तेजतत्त्व प्रक्षेपित होत आहे. त्याची सूर्यनाडी कार्यरत आहे, म्हणजे त्याचे कार्य निर्गुणातून चालू आहे. त्याचे कार्य सूक्ष्म स्तरावर चालू आहे. त्याच्या सहस्रार चक्रातून शक्ती प्रक्षेपित होत असून त्या माध्यमातून त्याचे निर्गुण कार्य चालू आहे.’’ दुसर्या एका छायाचित्रात भार्गवरामच्या हातात बासरी होती. ते पाहून सद्गुरु काका म्हणाले, ‘‘त्या बासरीतून नाद ऐकू येतो आणि तो निर्गुण कार्याचा संकेत आहे.’’ – सौ. भवानी प्रभु (आई)
पू. (श्रीमती) राधा प्रभु
‘एकदा पू. राधा प्रभु मला म्हणाल्या, ‘‘हा लवकरच संत बनेल.’’ – श्री. भरत प्रभु (वडील)
पू. (सौ.) योया वाले, एस्.एस्.आर्.एफ्., युरोप.
बालसाधकाच्या छायाचित्राकडे पाहून भावजागृती होणे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या डोळ्यांप्रमाणे त्याचे डोळे शांत आणि स्थिर असल्याचे जाणवणे
बालसाधकाच्या छायाचित्राकडे पहाताक्षणी ते दैवी बालक असल्याचे जाणवले. त्याच्याकडून पुष्कळ प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होऊन माझ्यावर आध्यात्मिक उपाय होत होते. बालसाधकातील सात्त्विकतेमुळे मला त्रास देणार्या वाईट शक्तीला ‘मी त्याच्या छायाचित्राकडे पहात आहे’, हे आवडले नाही. त्या वाईट शक्तीला बालसाधकातील चैतन्यही सहन होत नव्हते आणि त्यामुळे ‘छायाचित्रापासून दूर जावे’, असे तिला वाटत होते. माझ्या छातीवर दाब जाणवून माझे डोके दुखू लागले. मला एकदम थकल्याप्रमाणे वाटत होते. मला होणार्या त्रासावर मात करून मी त्या छायाचित्राकडे पहात राहिले. त्या वेळी मला त्या बालकात पुष्कळ भाव असल्याचे जाणवले. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे डोळे जसे शांत आणि स्थिर असतात, तसेच मला बालसाधकाचे डोळे शांत आणि स्थिर असल्याचे जाणवले. छायाचित्राकडे पाहून माझी भावजागृती होत होती आणि ‘त्याच्याकडे पहातच रहावे’, असे मला वाटत होते.’
टीप : यातील काही लिखाणातील प्रसंग चि. भार्गवराम संत घोषित होण्यापूवीॅचे असल्याने त्यांना पू. भार्गवराम असे न संबोधिता चि. भार्गवराम असे संबोधले आहे.