पुणे – सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या जीवनावर आधारित ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथाचे पुणे येथील ज्येष्ठ समर्थभक्त पू. सुनील चिंचोलकर यांच्या शुभहस्ते प्रकाशन करण्यात आले. १६ नोव्हेंबरला पू. चिंचोलकर यांच्या निवासस्थानी हा सोहळा पार पडला. या वेळी सनातन संस्थेचे साधक श्री. महेश पाठक आणि श्री. सम्राट देशपांडे उपस्थित होते. ‘हा ग्रंथ म्हणजे मुद्रणकलेचा उच्च बिंदू आहे’, अशी भावना व्यक्त करत ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चित्रमय जीवनचरित्राद्वारे त्यांच्या अवतारी कार्याची निश्चिती होते’, असे उद्गार पू. चिंचोलकर यांनी काढले.
समर्थभक्त पू. सुनील चिंचोलकर यांनी व्यक्त केलेले मनोगत
‘‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ, त्यातील छायाचित्रे, तसेच त्याची छपाई हे सगळे पाहिल्यानंतर असे सांगावेसे वाटते की, मुद्रणकलेमध्ये एक नवीन ‘लॅण्डमार्क’ या ग्रंथाने प्रस्थापित केला आहे. मी गेल्या ४५ वर्षांत जवळपास १०० पुस्तके प्रकाशित केली आहेत; परंतु आतापर्यंतच्या माझ्या प्रकाशन व्यवसायातील अनुभवामध्ये इतके सुंदर छपाई झालेले पुस्तक मी आतापर्यंत पाहिले नाही. मुद्रण व्यवसायाने सुंदर क्रांती केली आहे. हे काही केवळ व्यावसायिक छापखान्याने छापलेले नाही. (‘सनातनचे साधक त्यात सहभागी होते.’ – संकलक)सनातनच्या साधकांनी आपल्या सद्गुरूंचे चरित्र चित्ररूप स्वरूपात सादर केले आहे. सनातनचे साधक केवळ भोळेभाबडे नसून तंत्रज्ञानामध्येही किती प्रगत आहेत, याचा वस्तूपाठ या ग्रंथाने जगासमोर ठेवला आहे. साधकाचे काम कुठल्याही गुणी कलावंतापेक्षा, व्यावसायिकापेक्षा अधिक शुद्ध, गुणवान आणि पवित्र असते. परिपूर्णतेच्या गप्पा वैज्ञानिकांनी आणि अंनिसवाल्यांनी माराव्यात; पण खरी परिपूर्णता साधकाच्या सेवेमध्ये असते. साधक जेव्हा त्याची सेवा प्रेमाने आणि तन्मयतेने ईश्वरार्पण करतो, तेव्हा ती सेवा सर्वांत समर्पक अन् परिपूर्ण असते. याचा मूर्तीमंत पुरावा म्हणजे हा ग्रंथ आहे. या ग्रंथांत आपल्या गुरूंचे लहानपणापासून आतापर्यंतच्या कार्याचे जे रेखाटन चित्राद्वारे केले आहे, तसेच त्यांच्या उन्नतीचा जो आलेख दाखवला आहे, त्यावरून निश्चिती होते की, परात्पर गुरु डॉ. आठवले हे भगवंताचे अवतार असून धर्मसंस्थापनेच्या कार्यासाठी त्यांचे अवतरण झाले आहे.
‘हिंदु राष्ट्र नक्कीच येणार’, याची साक्ष हा ग्रंथ आपल्याला देत राहील. जय जय रघुवीर समर्थ !’’
क्षणचित्रे
१. ग्रंथाच्या मुखपृष्ठावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र आहे. ‘किती सुंदर छायाचित्र आहे हे !’, असे सांगत पू. चिंचोलकर यांनी ग्रंथ पहायला प्रारंभ केला. ग्रंथ पाहिल्यानंतर त्याच्या निर्मितीचे त्यांनी पुष्कळ कौतुक केले.
२. ग्रंथ प्रकाशन सोहळ्यानंतर पू. चिंचोलकर यांनी हा ग्रंथ भावपूर्णपणे त्यांच्या देवघरात ठेवला. ‘गुरुदेवांची जेव्हा आठवण येईल, तेव्हा मी हा ग्रंथ पाहीन’, अशा शब्दांत त्यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी असलेला भाव व्यक्त केला.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दैवी रूपाची
प्रचीती देणारा ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ ग्रंथ !
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा जीवनपट उलगडून दाखवणारा ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ अद्भुत आहे. ‘एक छायाचित्र सहस्र शब्दांपेक्षा अधिक बोलके असते’, असे म्हणतात. सनातनचे साधक या ग्रंथाची अनेक दिवस प्रतीक्षा करत होते. हा ग्रंथ पाहिल्यानंतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दैवी कार्याची ओळख तर होतेच; पण संतांचे जीवनकार्य पहातांना त्यात व्यक्ती शब्दशः हरवून जाते. ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्याच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात’, असा आध्यात्मिक सिद्धांत आहे. या ग्रंथांच्या निमित्ताने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दैवी रूपाची प्रचीती येते. ‘या ग्रंथाच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे होणारे दर्शन वाचकांना साधनापथावर, तसेच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या प्रयत्नांसाठी मार्गदर्शन करत राहो’, अशी त्यांच्याच चरणी प्रार्थना !’ – प्रा. शलाका सहस्रबुद्धे, पुणे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात