साधना करणे चालू केल्यावर साधकाला टप्प्याटप्प्याने सूक्ष्म ते सूक्ष्मतम स्पंदने कळू लागतात. एखाद्यामध्ये जिज्ञासा असल्यास किंवा त्याने सूक्ष्मातील (पंचज्ञानेंद्रिये मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील) जाणण्याचा सराव केल्यास पुढच्या पातळीची सूक्ष्म स्पंदने कळू लागतात. वाचकांची सूक्ष्मातील कळण्याची क्षमता विकसित करणे, हा ‘आध्यात्मिक सोपी कोडी’ या सदराचा उद्देश आहे.
या सदरात प्राथमिक स्तरावरील सोपी कोडी दिली असल्यामुळे सर्व वाचकांना ती सोडवता येतील. या प्रकारे चांगले, अधिक चांगले आणि वाईट यांच्यातील भेद कळू लागला की, जीवनातील प्रत्येक गोष्टीतच ‘अधिक चांगले (सात्त्विक) काय आहे’, ते वापरण्याकडे वाचकांचा कल राहील. उदा. ‘स्वत:साठी काळ्या रंगाचे कपडे वापरण्याऐवजी फिकट पिवळ्या अथवा निळ्या रंगाचे कपडे वापरणे अधिक चांगले आहे’, हे कळेल. असे प्रत्येक गोष्टीत होऊन एकूणच जीवनाकडे पहाण्याचा एक वेगळा दृष्टीकोन मिळेल आणि जीवन आनंदी होण्यास साहाय्य होईल.
देवाला प्रार्थना करून आणि मन एकाग्र करून प्रयोग केल्यास योग्य उत्तर येण्याचे प्रमाण वाढेल.
मागील रविवारी केलेल्या प्रयोगात डावीकडून उजवीकडे लहान होत गेलेल्या ॐ कडे पाहून अधिकाधिक चांगले वाटते, हे आपण अनुभवले. या संदर्भातील पुढील प्रयोग आज आपण पाहू.
प्रयोग
१. प्रयोग : आकृती १ – वरून खाली दृष्टी फिरवीत प्रत्येक ॐ कडे पाहून काय वाटते, ते अनुभवा ! असे २ – ३ वेळा करा.
२. प्रयोग : आकृती २ – खालून वर दृष्टी फिरवीत प्रत्येक ॐ कडे पाहून काय वाटते, ते अनुभवा ! असे २ – ३ वेळा करा.
मन एकाग्र करण्यासाठी एका आकृतीतील ॐ कडे पहातांना दुसर्या आकृतीतील ॐ कोर्या कागदाने झाकून ठेवा.
प्रयोगाचे उत्तर
आकृती १ च्या प्रयोगाचे उत्तर : वरून खाली लहान होत गेेलेल्या ॐ कडे पहातांना चांगले वाटते.
आकृती २ च्या प्रयोगाचे उत्तर : खालून वर लहान होत गेेलेल्या ॐ कडे पहातांना त्रासदायक वाटते.
प्रयोगांचे सामायिक विश्लेषण
वरून खाली जाणे, हे शून्यत्वाकडे म्हणजे सूक्ष्माकडे होत असलेली वाटचाल दर्शवते. आकृती १ मध्ये ॐ चा आकार लहान होत जाणे आणि शून्याकडे जाणे, हे एकमेकांना पूरक असल्यामुळे खालच्या दिशेला जातांना चांगले वाटते.
खालून वर जाण्याची क्रिया ही आकाशत्वाच्या म्हणजे व्यापकत्वाच्या दिशेने होत असलेली वाटचाल दर्शवते. आकृती २ च्या प्रयोगात खालून वर जातांना व्यापकत्व येणे अपेक्षित असतांना ॐ चा आकार मोठा होण्याऐवजी लहान होत असल्याने व्यापकत्व आणि ॐ चा आकार यांत विरोधाभास निर्माण होतो. म्हणून आकृती २ कडे पहातांना त्रासदायक वाटते.
मागील रविवारच्या आणि आजच्या प्रयोगांवरून आकारमान आणि दिशा यांचा संबंध आहे, हे लक्षात येते.