एका शिवभक्ताला केदारनाथ यात्रेत आलेले कटू अनुभव !

मुसलमानांना मक्केला जाण्यासाठी सर्वपक्षीय सरकारे ठिकठिकाणी हज हाऊस बांधतात आणि त्यांच्या विमानप्रवासाची सोय करतात; पण हिंदूंना तीर्थयात्रा सोयीची व्हावी, यासाठी एकही कृती करत नाहीत. याचे एक उदाहरण पुढे दिले आहे.

kedarnath_temple

केदारनाथ म्हणजे हिंदूंचे श्रद्धास्थान ! हे चारधाम यात्रेतील महत्त्वपूर्ण ठिकाण आहे. आम्ही काही भाविक तीर्थयात्रेला जाण्याविषयी चर्चा करत असतांना सर्वांनीच केदारनाथला जायची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे एवढ्या जणांना तेथे नेण्याआधी वर्ष २०१३ च्या आपत्काळानंतर तेथील परिस्थिती कशी आहे ?, हे पहाण्यासाठी मी आणि आमचे काही स्नेही यांनी ही यात्रा करायचे ठरवले. तेथे गेलो असता मोठ्या श्रद्धेने केदारनाथाच्या दर्शनासाठी आलेल्या यात्रेकरूंना यात्रेच्या काळात कसा त्रास सहन करावा लागतो ?, याचे कटू अनुभव आम्हाला आले. हिंदूंंच्या प्रसिद्ध तीर्थक्षेत्राची झालेली अशी अवस्था खरोखरच उद्विग्नता निर्माण करते. ही स्थिती पालटण्यासाठी प्रत्येक हिंदु भाविकाने प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठीच केदारनाथ यात्रेचे हे अनुभव आपल्यासमोर मांडत आहे.

केदारनाथला जाण्यासाठी आम्ही दोन गट बनवले. एका गटाने मार्गावरून चालत जायचे. दुसर्‍या गटाने पुण्याचे स्नेही श्री. जोशी यांच्यासह हेलीकॉप्टरने जाण्याचे ठरवले. आम्ही नवीन पर्यटक असल्याप्रमाणे वागायचे ठरवले.

 

१. यात्रेच्या काळात वाहनाचे अवाजवी भाडे आकारणे

आम्ही नेहमीच्या परिचयाच्या असलेल्या वाहनांतून न जाता अन्य अनोळखी वाहनांच्या उपलब्धतेची चौकशी केली. त्या वेळी वाहनचालकाला समांतर आसनव्यवस्था असलेल्या वाहनांची मागणी अधिक असल्याचे समजले. मार्ग घाटाचा असल्याने आडवी आसनव्यवस्था असलेल्या वाहनाने प्रवास केल्याने प्रवाशांना मळमळणे, उलटी होणे असे त्रास अधिक होतात. त्यामुळे इनोव्हासारख्या वाहनांना मागणी अधिक असल्याचे लक्षात आले. गाडी आरक्षित करतांना शासनाच्या नियमानुसार ज्या वाहनाचे भाडे ८ ते १० सहस्र रुपये असायला हवे, त्याचे यात्रेच्या काळात २५ सहस्र इतके भाडे आकारण्यात येत होते. इतके भाडे देऊन वाहने ठरल्याप्रमाणे मिळणार, हे ऐकल्यावर यात्रेकरू निश्‍चिंत होतात.

 

२. वाहनचालकांचा मनमानी कारभार !

 अ. नवीन यात्रेकरूंना धाकात ठेवणे

यात्रेच्या काळात वाहने आणि त्यांचे चालक अनेकदा दुसर्‍या राज्यांतून येतात. त्यांना प्रत्येक यात्रेचा अनुभव असल्याने नवीन यात्रेकरूंना ते पहिल्यापासून धाकात ठेवण्याचा प्रयत्न करतात. दुपारी २ वाजल्यानंतर हवामानात पालट होऊन पाऊस किंवा वादळ येण्याची शक्यता असल्याने हिमालयातील प्रवासाला पहाटे आरंभ करणे चांगले असते. या ठिकाणी रात्री गाडी चालवण्यास बंदी असते.

आ. वाहनचालकाच्या ओळखीच्या
हॉटेलमध्येच निवास आणि जेवण घेण्याचा आग्रह धरणे

या यात्रेच्या काळात अनेक चालक उत्तर प्रदेश, देहली, हरियाणा येथून येतात. त्यांची येथे मनमानी चालते. प्रवासी नवीन असल्यावर हे चालक त्यांच्या ओळखीच्या हॉटेलपाशी वाहन थांबवतात. प्रवाशांनी त्यांच्या पसंतीच्या एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये न्यायला सांगितल्यावर उशीर होईल. तेथे जेवण चांगले नाही, अशी कारणे वाहनचालक सांगतात. अनेक जणांना नाइलाजास्तव चालकाने दाखवलेल्या हॉटेलमध्ये जेवण घ्यावे लागते. तसे न केल्यास चालक स्वतःचे जेवण आटोपून घेतो आणि प्रवाशांना त्यांच्या सोयीच्या दुसर्‍या हॉटेलमध्ये पुन्हा थांबवले जाते. त्यामुळे प्रवासातला बराच वेळ व्यर्थ जात असल्याचे लक्षात आले, तसेच रात्री निवासासाठी चालकाच्या ओळखीच्या हॉटेलमध्येच नेण्यास चालकाचे प्राधान्य असते. यात्रेकरूंनी सुचवलेल्या हॉटेलच्या ठिकाणचेे लोक चांगले नाहीत. तेथे निवासाची व्यवस्था चांगली नाही, असे सांगून प्रवाशांची दिशाभूल केल्याच्या घटना घडतात. चालकाच्या सांगण्यानुसार न वागल्यास त्याची आरडाओरड, चिडचिड होते.

इ. भ्रमणभाष बंद ठेवून प्रवाशांशी संपर्क टाळणे

काही वेळा यात्रेकरूंना हॉटेलवर सोडल्यावर दुसर्‍या दिवशी सकाळपर्यंत चालक प्रवाशांशी संपर्क टाळत असल्याचे अनुभवायला मिळाले. चालक कुठे असणार आणि झोपणार ?, हेही सांगितले जात नाही. बर्‍याचदा चालकाने भ्रमणभाष बंद करून ठेवलेला असल्याने दुसर्‍या दिवशी त्याच्या लहरीनुसारच पुढचा प्रवास चालू करता येतो. गाडी लॉक केली असल्याने गाडीतील काही सामान हवे असल्यास प्रवाशांची असुविधा होते. केदारनाथला सामान घेऊन जाण्याची आवश्यकता नसल्याने सामान गाडीत ठेवू शकतो. यात्रेकरूंनी हे सर्व लक्षात घेऊनच यात्रेचे आयोजन करायला हवे.

ई. स्थानिक चालकाला (गढवाली) प्राधान्य देणे श्रेयस्कर !

स्थानिक चालक मिळाला, तर चांगले असते. येथील मार्ग अरूंद असल्यामुळे उत्तर प्रदेश, देहली, हरियाणा येथून आलेल्या चालकांना घाटाच्या मार्गाचा तितकासा अनुभव नसतो. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढते. गढवाली चालक असेल, तर तो तेथील परिस्थिती आणि दुसर्‍या चालकाचा विचार करून गाडी चालवतो. त्यासाठी तेथील स्थानिक (गढवाली) चालकाला प्राधान्य द्यायला हवे.

उ. प्रवासात आलेला वाहनचालकाचा अनुभव

वाहनचालकाने गाडी ठरलेल्या वेळेपेक्षा ३.३० घंटे विलंबाने आणल्याने नंतर अडचणी येणे : प्रवासाच्या दिवशी आमचे पहाटे ४ वाजता निघण्याचे ठरले होते; परंतु वाहन ५ वाजेपर्यंत न आल्याने आम्ही त्या गाडीच्या मालकाला संपर्क केला. त्याने गाडी तुमच्या दाराबाहेर आली असेल, असे सांगितले आणि पुन्हा १ घंट्याने इनोव्हाऐवजी दुसरे वाहन पाठवू का ?, असे विचारले. वाहन शेवटी सकाळी ७.३० वाजता आले. वाहनचालकाने दुसर्‍या गावाहून रात्री १.३० वाजता आल्यामुळे उशीर झाल्याचे सांगितले. चालक आरंभापासूनच अरेरावीने बोलत होता.

चालक उशिरा आल्याने आम्ही दुपारी २.३० ते ३ वाजेपर्यंत पोचण्याऐवजी सायंकाळी ६ वाजता पोचलो. त्यामुळे रात्री निवासाची आणि दुसर्‍या दिवशीची सिद्धता करणे, वैद्यकीय सक्षमता प्रमाणपत्र मिळवणे, घोड्यांची व्यवस्था आदी कामे करणे कठीण झाले. आम्हाला शेवटी ओळखीचा वापर करावाच लागला. आमच्या परिचयाच्या व्यक्तीने डोंगरात ३ कि.मी. चिखलातून चालत जाऊन ८ घोड्यांचे आरक्षण केले आणि वैद्यकीय सक्षमता प्रमाणपत्रही मिळवले. हे काम पूर्ण करण्यासाठी त्याला थंडी-पावसात चालत जावे लागले.

 

३. वैद्यकीय तपासणी

आधुनिक वैद्यांनी द्यावयाचे प्रमाणपत्र फार्मसीची पदवी घेतलेली व्यक्ती देत असणे आणि सरकारने त्यांनी कशी तपासणी करणे अपेक्षित आहे ?, हे सांगितलेले नसणे : ज्येष्ठ नागरिकांसाठी वैद्यकीय तपासणी बंधनकारक आहे. त्यासाठीची वेळ संपल्यावर आम्ही तेथे पोचल्याने आमची असुविधा झाली. हिमालयात बहुतांश ठिकाणी फार्मसीची पदवी घेतलेली व्यक्ती आधुनिक वैद्य म्हणून काम करते. त्यांतील एकाने आम्हाला सांगितले, सरकारने आम्ही काय करणे अपेक्षित आहे ?, ते आम्हाला सांगितलेच नाही. आम्ही जर वैद्यकीय प्रमाणपत्र दिले नाही, तर येथे येणार्‍या वृद्ध यात्रेकरूंची संख्या वाढून त्यांची निवासाची आणि अन्य व्यवस्था कशी करायची ?, हा प्रश्‍न निर्माण होतो. त्यांच्यासमवेत असलेली अन्य माणसे पुढे जातात. मग या माणसांची काळजी घेण्याची इथे काहीही व्यवस्था नाही. या ठिकाणी आम्ही अनेक मंडळींना अडवल्यास प्रसिद्धीमाध्यमे या संदर्भात काय वृत्त देतील ?, हे सांगता येणार नाही. त्यामुळे ज्यांची मनाची सिद्धता आहे, त्या सर्वांना पोलिसांना दाखवण्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र दिले जाते. आता आम्ही ३ घंट्यांत ३६० जणांना फिटनेस प्रमाणपत्र दिले, म्हणजे आम्ही काय तपासणी केली असेल ?, याचा तुम्हीच विचार करा. एकंदरच या प्रक्रियेत गोंधळ असल्याचे लक्षात आले.

 

४. गुप्तकाशी ते सोनप्रद येथील तीन दिवसांच्या
अरूंद मार्गावरून प्रवासाच्या कालावधीत आलेला कटू अनुभव

अ. यात्रेकरूंच्या गाड्या उभ्या करण्यासाठी ठरवलेल्या जागेत अतीवृष्टी झाल्यास गाड्या वाहून जातील, याचा विचार सरकारने केलेला नसणे : गेल्या वर्षी आम्ही गौरीकुंडापर्यंतचा मार्ग बघितला होता. गौरीकुंड ते केदारनाथपर्यंत गाडी जाऊ शकत नाही. या वर्षी मार्ग आणखी अरूंद असल्याचे जाणवले. गाडी वळवण्यासाठी किंवा थांबवण्यासाठी बाजूला जागा सोडतात, तशी व्यवस्था तिथे नव्हती. त्यामुळे एखादी गाडी बंद पडल्यास वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. मार्गाच्या कडेला झाडे लावण्याचे प्रमाण न्यून असल्यामुळे, तसेच खराब हवामानामुळे मार्ग खचण्याच्याही घटना सतत घडतात. स्थानिक काँग्रेस सरकारने गाजावाजा करत लोकांना यात्रेला येण्याचे आवाहन केले. सरकारने नदीपात्रातील भूमी सपाट करून यात्रेकरूंच्या गाड्या उभ्या करण्याची व्यवस्था केली होती. सरकारने खराब हवामानामुळे अतीवृष्टी झाल्यास गाड्या वाहून जातील, याचा विचार करायला हवा होता, असे यात्रेकरूंना वाटत होते. सरकारने मात्र तत्परतेने जागोजागी फलक लावून सर्वच प्रवाशांनी हेलिकॉप्टरने जावे, या विचारावर भर दिल्याचे जाणवले. सोनप्रयाग येथे यात्रेकरूंच्या सर्व गाड्या उभ्या केल्या जातात आणि तेथून गौरीकुंडापर्यंतचा प्रवास शासनाने दिलेल्या गाडीतूनच करावा लागतो.

आ. यात्रेकरूंच्या संख्येनुसार घोडे उपलब्ध नसणे : घोड्यांची संख्या अल्प आणि प्रवासी अधिक असल्यामुळे घोडे मिळण्यासाठी कसरत करणे, गौरीकुंड ते केदारनाथपर्यंत चालत जाणे, घोड्यावरून जाणे, डंडी (म्हणजे चार जणांनी पालखीसारखे उचलून नेणे) आणि कंडी (म्हणजे एकटा माणूस पाठीवरच्या टोपलीत बसवून आपल्याला उचलून वर घेऊन जातो.) अशा प्रकारेच जावे लागते. आम्ही सकाळी केदारनाथ येथे जाऊन संध्याकाळी परत येण्याचे ठरवले असल्यामुळे आठही जणांसाठी घोड्यांचे आरक्षण केले होते. आम्ही ठरवलेल्या ८ घोड्यांपैकी ४ घोडे अधिक पैसे देऊन अन्य व्यक्ती घेऊन गेल्या. आमचे नशीब चांगले असल्यामुळे ४ घोडे तरी मिळाले. तेथे ९०० घोडे होते आणि यात्रेकरू ८ ते १० सहस्र इतक्या मोठ्या संख्येने आले होते. ज्यांना घोडे मिळाले नाहीत, त्यांना किती त्रास झाला असेल !

४ इ. नवीन मार्ग झाल्याने पूर्वीपेक्षा अधिक अंतराचा प्रवास करावा लागणे आणि हॉटेलच्या दरांवर कोणाचेही नियंत्रण नसल्याने यात्रेसाठीचा व्यय वाढणे : आम्हाला मिळालेल्या ४ घोड्यांवर मुलांना बसवून आम्ही चौघेही चालू लागलो. तेव्हा आमच्या लक्षात आले, पूर्वी गौरीकुंड ते केदारनाथ हे अंतर १४ कि.मी. होते आणि अगदी शेवटचा टप्पा चालायला सुखकर होता. आता नवीन मार्ग झाल्याने हे अंतर १८ कि.मी. एवढे आहे आणि शेवटचा टप्पा कठीण झाला आहे. केदारनाथहून खाली येण्यासाठी घोडे केदारनाथ येथेच आरक्षित करावे लागतात. मुलांना त्रास होऊ नये; म्हणून त्याच घोडेवाल्यांना वर गेल्या-गेल्या दर्शन न घेताच घोडे आरक्षित करण्याचे सांगून ठेवले होते, नाहीतर दर्शन घेऊन येईपर्यंत हे घोडे इतरांनी आरक्षित केले असते. दर्शन न घेताच परतणार्‍या प्रवाशांची संख्या बेसुमार होती. एका घोड्याचा सरकारी दर १ सहस्र ८०० रुपये असतो. घोड्यावरील व्यय, केदारनाथला जाण्याच्या आधी खाली गौरीकुंड येथे एक दिवस रहाण्याचा हॉटेलचा व्यय, केदारनाथहून खाली आल्यावर गौरीकुंड किंवा सोनप्रयाग येथे एक दिवस रहाण्याचा व्यय, तसेच जेवण आणि खाणे मिळून प्रत्येकी ६ सहस्र रुपये सहज व्यय होतात. हॉटेलच्या दरांवर कोणतेही नियंत्रण नाही. त्यामुळे मनात विचार आला, गुप्तकाशीहून हेलिकॉप्टरने गेलो असतो, तर ६ सहस्र रुपयांत परतीचा प्रवास होऊन प्रवासाचे कष्टही वाचले असते !

४ ई. यात्रेकरूंसाठी अन्नसामुग्रीही पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसणे : आम्ही खाली उतरत असतांना आम्हाला वाटेत भूक लागल्याने एके ठिकाणी थांबून आम्ही एकेक पराठा खाल्ला. आमचे खाऊन झाल्यावर तेथे जेवण संपले असा फलक लावला. आमच्यानंतर आलेल्या सहस्रो प्रवाशांना बहुतेक उपाशीच रहावे लागले असावे.

४ उ. सरकारने यात्रेकरूंना कोणत्याही अत्यावश्यक सूचना न देणेे : वाटेत २ ठिकाणी पोलिसांच्या तंबूशेजारीच प्रवाशांच्या सोयीसाठी तंबू उभारले आहेत; पण तेथे किती यात्रेकरू राहू शकतात ?, तेथील अंथरूण-पांघरूणाची सोय याविषयीची माहिती ऋषिकेशहून या प्रवासाला निघतांना मिळत नाही. सरकारने केदारनाथ येथेही प्रवाशांच्या निवासाची सोय केली आहे. केदारनाथला जायला संध्याकाळी निघाल्यावर तेथे पोचायला रात्र होते. पाऊस आणि वारा यांचे प्रमाण वाढते. तरी संध्याकाळी निघू नये, अशी कोणतीही सूचना प्रवाशांना देण्यात येत नाही.

४ ऊ. हेलिकॉप्टरच्या प्रवासासाठी वाढीव दर आकारणे, लवकर दर्शन होण्यासाठी वेगळा दर आकारणे आणि यामुळे गरीब यात्रेकरूंना अधिक त्रास भोगावा लागणे : गुप्तकाशीहून आल्यावर पुण्याचे मित्र श्री. जोशी यांच्याकडून समजले, काही खाजगी कंपन्यांनी हेलिपॅड बांधतांना सरकारची अनुमती घेतली नव्हती, तरीही ते हॅलिकॉप्टरने प्रवाशांची ने-आण करत होते. त्यामुळे त्यांचे परवाने रहित करण्यात आले. ज्यांनी या प्रवासासाठी आरक्षण केले असेल, त्यांना किती त्रास झाला असेल ! ज्या कंपन्या हेलिकॉप्टर सेवा देत होत्या, त्यांनी गर्दी वाढल्यामुळे अकस्मात् ६ सहस्र रुपयांऐवजी ११ सहस्र रुपये भाडे आकारून त्या प्रवाशांना आधी केदारनाथ येथे नेले आणि ज्यांनी आधी आरक्षण केले होते, त्यांना बसवून ठेवले. हेलिकॉप्टर सेवेसाठी आरक्षण केल्यावर तेथील कर्मचारी शेजारी असलेल्या मंदिर समितीच्या खिडकीत प्रत्येकी १ सहस्र १०० रुपयांची पावती फाडा, म्हणजे लवकर दर्शन होईल आणि तुम्ही लवकर परत येऊ शकाल, असे सांगायचे. यावरून हेलिकॉप्टर सेवा, काँग्रेस प्रशासित राज्य सरकार आणि मंदिर समिती या तिघांचे साटेलोटे असल्याचे लक्षात येते. यामुळे गरीब यात्रेकरूंची वाताहत होत आहे, असे प्रकर्षाने जाणवले. रेल्वेचे आरक्षण ४ मास (महिने) आणि हेलिकॉप्टरचे आरक्षण २ मास (महिने) आधी होते. यात्रेकरूंनी रेल्वेचे आरक्षण करून त्यांना पुढे हेलिकॉप्टरचे आरक्षण मिळाले नाही, तर किती असुविधा (गैरसोय) होईल ?, याची कल्पनाच न केलेली बरी.

४ ए. यात्रेकरूंविषयी कुणालाच आस्था नसल्याने अत्याधुनिक संपर्क यंत्रणा उपलब्ध असतांनाही त्यांची सर्वच ठिकाणी परवड होणे : यात्रेकरूंच्या संख्येेनुसार घोडे उपलब्ध करून देणे, भूस्खलन झाल्यास मोठ्या शहरातून यात्रेकरू निघण्याच्या आधीच ते वाटेत अडकू नयेत, यासाठी त्यांना वेळेत सूचना देणे, हे सध्याच्या काळात अत्याधुनिक संपर्क यंत्रणा उपलब्ध असतांना प्रशासनाला फार कठीण नाही; परंतु यात्रेकरूंविषयी कुणालाच आस्था नसल्याने त्यांची परवड होत आहे. रस्त्यांची पडझड चालू झाल्यावर योग्य वेळी सर्व ठिकाणी माहिती न पोचवल्याने काही वेळा यात्रेकरू ज्या ठिकाणी असतील, त्या गावांतच बस अडवल्या जातात आणि यात्रेकरूंना बसमध्येच रात्र काढणे अपरिहार्य ठरते. एकंदरितच सरकारने केदारनाथ यात्रेसाठी केलेल्या व्यवस्थेचा कटू अनुभव आला. तेथून आम्ही हरिद्वारला परतल्यावर अनेक ठिकाणी भूस्खलन झाले आणि यात्रेकरू अडकून पडले. एकदा तर बद्रीनाथ मार्ग ३२ ठिकाणी तुटला होता. या घटनेमुळे शासनाच्या कारभाराचे एकूणच तीन तेरा वाजल्याचे लक्षात आले.

 

५. आशेचा किरण

हा लेख लिहून होईपर्यंत एक चांगले वृत्त आले आहे. अनेक वेळा विनंती करून आणि आवश्यक निधी उपलब्ध करून देऊनही राज्य सरकारने मार्गांची योग्य उभारणी न केल्याने केंद्र सरकारने या वर्षात या मार्गांचे रूंदीकरण करून हा भाग अपघाती क्षेत्र रहाणार नाही, अशा प्रकारचे मार्ग करण्याचे दायित्व घेतल्याचे घोषित केले आहे. खरेतर हे पूर्वी BRD (Border Road Organisation) कडे असे; परंतु वर्ष २०१३ च्या आपत्काळात राज्य सरकारने त्यांच्याकडून ते काम काढून स्वतः करण्यासाठी घेतले होते. तेव्हापासून आतापर्यंत मार्ग दुरुस्तीसाठी सामानाची केवळ खरेदी झाली. प्रत्यक्ष काम काही चालू झाले नाही. किंबहुना या खरेदीच्या प्रक्रियेतून केवळ अर्थपूर्ण देवाण-घेवाण पूर्ण झाली, असेच लक्षात आले.

– एक शिवभक्त

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात