देवद आश्रमात पू. भाऊकाकांसारखी संतरत्ने, म्हणजे अनेक गुणांचा समुच्चय असणारी खाण आहे. त्यांच्या समवेत सेवा करणार्या साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये देत आहोत.
१. शिस्त
‘पू. भाऊकाकांचे संपूर्ण दिवसाचे नियोजन ठरलेले असते. ते नियमित पहाटे लवकर उठून अर्धा घंटा चालून नंतर अर्धा घंटा योगासने करतात. त्यांच्या या नियोजनात कधीही खंड पडत नाही. त्यांच्या प्रत्येक कृतीत सातत्य असते. प.पू. पांडे महाराजांनी सांगितलेली प्रार्थनेची वेळ ते कधीही विसरत नाहीत. प्रार्थना करायच्या वेळेच्या आधी अर्धा मिनीट येऊन ते उभे रहातात.’
– कु. शशिकला आचार्य, कु. श्वेता पट्टणशेट्टी, कु. नलिनी राऊत आणि सौ. राधा साळोखे
२. व्यवस्थितपणा
‘पू. भाऊकाका एकदा घरी जात असतांना माझ्याकडे त्यांना जेवणाचा डबा भरून देण्याची सेवा होती. तेव्हा पू. भाऊकाकांनी त्यांच्या पिशवीत डबा, थर्मास, ग्लास एवढे व्यवस्थित ठेवले होते. त्यामुळे मला त्या सेवेत काही करावे लागले नाही. इतर वेळीही काकांची प्रत्येक वस्तू पुष्कळ व्यवस्थित ठेवलेली असते.
३. तत्परता
पू. काका कोणत्याही साधकाची चूक लक्षात आल्यास तत्परतेने सांगून त्यांना साहाय्य करतात. एकदा मी प.पू. पांडे महाराजांनी सांगितलेली प्रार्थना सहसाधकांना सांगतांना जलद गतीने सांगितली. तसेच एकदा प्रार्थनेनंतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे स्मरण करण्यासाठी मी साधकांना अल्प वेळ दिला. दोन्ही वेळा पू. काकांनी त्या चुका माझ्या लगेच लक्षात आणून दिल्या. कधी ग्रंथांच्या सेवेत चूक झाली असेल, तर काका ‘कोणाची चूक आहे’ हे शोधण्यास सांगून त्या साधकाला त्याची चूक सांगण्यास सांगतात.’
– सौ. राधा साळोखे
४. इतरांना साहाय्य करणे
अ. ‘पू. भाऊकाकांकडे केव्हाही साहाय्य मागितले, तर ते लगेच साहाय्य करतात. एकदा सहसाधक आले नव्हते आणि ऐन वेळी मला तातडीची सेवा आली. ‘त्या वेळी आता कसे होईल’, हा विचार मनात आला. मी पू. भाऊकाकांकडे गेल्यावर ते मला म्हणाले, ‘‘तू कधीच एकटी समजू नकोस. आवश्यकता असल्यास मला साहाय्यासाठी बोलव.’’ हे ऐकून माझी भावजागृती होऊन मला कृतज्ञता वाटली आणि कर्तेपणाचीही जाणीव झाली. मला ‘पू. भाऊकाकांच्या मुखातून प.पू. गुरुदेवच बोलत आहेत’, असे वाटले.
आ. एकदा मला एक तातडीची सेवा होती आणि पू. भाऊकाकांनाही त्याच वेळी तातडीची सेवा होती. पू. काकांची सेवा संपल्यावर त्यांनी माझ्याकडे येऊन ‘किती सेवा झाली ? कुणी साहाय्याला आले का ?’, असे विचारले. मला त्यांचा नेहमी आधार वाटतो.’
– सौ. अंजली झरकर
५. साधकांना आपलेसे करणे
अ. ‘पू. भाऊकाका निर्मळ हास्य आणि प्रेमळ बोलणे यांमुळे प्रथम भेटीतच सर्वांना आपलेसे करतात. त्यांच्या सहवासातच मला अखंड सेवा मिळते. ते मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रमाणेच वाटतात.’
– श्री. विलास महाडिक
आ. ‘मी आश्रमात आल्यापासून पू. भाऊकाकांचे बोलणे आणि त्यांचे आश्रमात वावरणे यांतून मला पुष्कळ चैतन्य मिळते. मला त्यांच्या समवेत सेवा करण्याची संधी मिळाल्याने दुधात साखर मिसळावी असे झाले.’
– सौ. अनिता मोगडपल्ली
६. घरी आलेल्या साधकांचे ‘अतिथी देवो भव’ या भावाने आदरातिथ्य करणे
‘एकदा मला आणि खोतकाकांना पू. भाऊकाकांच्या घरी रहाण्याची संधी मिळाली. त्यांचे घर म्हणजे आश्रम आणि त्यांची खोली म्हणजे ध्यानमंदिरच वाटले. पू. काकांचे घरातील आचरण आश्रमातील आचरणाप्रमाणेच आहे. त्यांनी मला आणि खोतकाकांना सकाळी ६ वाजता उठवले. नंतर ते आमच्यासाठी चहा घेऊन आले. त्यांनी स्वत: आमच्यासाठी पडवीतून स्नानगृहात अंंघोळीसाठी उष्ण पाणी आणून ठेवले. ते आमच्यासाठी अल्पाहार घेऊन आले. घरी पू. काकांची पत्नी, मुलगा आणि सून आहेत. पू. काका घरीही आश्रमासारखेच रहातात. त्यांनी आमच्यापुढे स्वावलंबी जीवनाचा आदर्श ठेवला. अंतर्बाह्य एकच असे काका मला भावले. आमच्याकडून संतसेवेत चुका होतात; पण काकांनी ‘अतिथी देवो भव’ या भावाने आमची सेवा केली.
त्यांच्या घरून निघतांना त्यांचे चारचाकी वाहन घेऊन ते आम्हाला सोडायला आले. स्थानकावर आल्यावर मी चप्पल त्यांच्या घरीच विसरल्याचे लक्षात आले. त्यांच्या मुलाने एक स्लीपर मला आणून दिली. नंतर पू. भाऊकाका घरून आश्रमात येतांना माझी चप्पल घेऊन आले.
७. सेवाभाव
७ अ. सेवेची पूर्वसिद्धता करणे
सेवा करतांना वेळ व्यर्थ जाऊ नये, यासाठी ते आदल्या दिवशीच सेवेसाठी आवश्यक साहित्य जमा करून ठेवतात. यामागे ‘सेवेची फलनिष्पती कशी वाढेल’, ही त्यांची तळमळ असते, तसेच ‘नवीनच सेवेला आलेल्या साधकांचा अमूल्य वेळ वाया जाऊ नये’, हाही उद्देश असतो.
७ आ. देहभान विसरून सेवा करणे
पू. भाऊकाका सेवेसाठी येण्याची वेळ तंतोतंत पाळतात. ते अखंड अनुसंधानात राहून सेवा करतात. इतरांना त्यांना महाप्रसाद घेण्याची आठवण करून द्यावी लागते.
७ इ. ‘दिसेल ते कर्तव्य’, या भावाने सेवा करणे
काका समोर दिसेल, ती सेवा करतात. दिवसभरात कोणती सेवा पूर्ण झाली ? आणि कोणती करायची शेष आहे ? हे ते चिठ्ठीवर लिहून ठेवतात. त्यामुळे दुसर्या दिवशी कुणीही ती सेवा पूर्ण करू शकतो.
७ ई. कार्यपद्धतीचे पालन करणे
सेवा करतांना कार्यपद्धतीचे पालन झालेच पाहिजे, यावर त्यांचा कटाक्ष असतो. पू. काकांना सेवेत गृहीत धरणे, आळस आणि चालढकलपणा केलेला आवडत नाही. ते प्रत्येक कृती साधकाला विचारून करतात. त्यांना सेवेतील सर्व बारकावे ठाऊक आहेत; पण साधकांवर तो संस्कार होण्याच्या दृष्टीने ते साधकाकडे तत्त्व म्हणून बघतात.’
– श्री. विलास महाडिक
७ उ. नवीन साधकासमवेत सेवा करतांना त्याच्या अडचणींकडे लक्ष देणे
‘पू. काकांसमवेत सेवेला नवीन साधक असल्यास ते त्याला पुष्कळ सांभाळून घेतात. त्याला ते सेवेची व्याप्ती व्यवस्थितपणे सांगून ‘काही अडचण नाही ना ?’, असे मधेमधे विचारतात. त्यामुळे पू. काकांसमवेत सेवा करतांना ते संत असूनही ताण न वाटता त्यांचा आधार वाटतो.’
– कु. शशिकला आचार्य, कु. श्वेता पट्टणशेट्टी, कु. नलिनी राऊत आणि सौ. राधा साळोखे
७ ऊ. गुरुकार्य सर्वांपर्यंत पोचावे, याची तळमळ
एकदा मी पू. भाऊकाकांना म्हणाले, ‘‘ग्रंथांची सेवेची व्याप्ती पुष्कळ आहे. सेवेला पुष्कळ वेळ द्यावा लागतो.’’ त्यावर पू. भाऊकाका म्हणाले, ‘‘गुरुदेवांचे एवढे ग्रंथ समाजापर्यंत पोचत आहेत. तू काळजी करू नको. मी साहाय्य करतो.’’ त्यांच्या बोलण्यातून ‘प्रत्येक घरात गुरुदेवांचा ग्रंथ जावा’, ही तळमळ जाणवत होती.
७ ए. परिपूर्ण सेवा करणे
‘पू. भाऊकाकांना काही कारणास्तव २ दिवस रुग्णालयात भरती व्हायचे होते. तेव्हा ते त्यांच्याकडील सेवा पूर्ण होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत होते. त्यांना वाटत होते, ‘ते रुग्णालयात गेल्यावर अन्य साधकांना सेवा पूर्ण करण्यासाठी वेळ द्यावा लागू नये.’ त्यांनी ती सेवा पूर्ण करून त्याचा सर्व तपशील बारकाव्यासह साधकांना समजावून सांगितला.’
८. साधकांना घडवणे
८ अ. कृतीतून शिकवणे
एकदा मला पू. भाऊकाकांची सेवा करण्याची संधी मिळाली. पहिल्याच दिवशी मी ते विसरून गेले. तिसर्या दिवशी मी ती सेवा करतांना लक्षात आले, ‘२ दिवस पू. काकांनीच ती सेवा केली होती.’ हे कळल्यावर मला वाईट वाटले आणि मी पू. काकांची क्षमा मागितली. त्या वेळी ते म्हणाले, ‘‘तुला किती दिवसांनंतर हे लक्षात येते ? तू ही सेवा कशी विसरलीस ?’, हे पहाण्यासाठी मी सांगितले नाही.’’
– सौ. अंजली झरकर
८ आ. ऐकणे, स्वीकारणे, शिकणे आणि कृती करणे, हे टप्पे मनावर बिंबवत असणे
‘पू. काका साधकांच्या मनावर ऐकणे, स्वीकारणे, शिकणे आणि कृती करणे, हे टप्पे बिंबवतात. एकदा मला एका साधकाने सेवा सांगितली. तेव्हा मी ‘हो’ म्हणालो; पण मला त्याचे महत्त्व ठाऊक नसल्याने मी ते मनापासून स्वीकारले नव्हते. पू. काकांनी मी केलेली सेवा पडताळल्यावर त्यात त्यांना काही त्रुटी आढळल्या. ते मला म्हणाले, ‘‘सांगितलेले तू स्वीकारले नाहीस; म्हणून असे झाले.’’ तेव्हापासून मी पू. काका सांगतील ते स्वीकारू लागलो. त्यामुळे माझ्याकडून होत असलेल्या चुकाही अल्प झाल्या.’
– श्री. विलास महाडिक
९. साधकांचे कौतुक करून त्यांना शिकण्यासाठी प्रोत्साहन देणे
पू. काका साधकांना नवीन गोष्टी शिकण्यासाठी प्रोत्साहन देतात. एकदा महाडीककाकांचा दैनिक सनातन प्रभातमध्ये लेख आला होता. तेव्हा पू. काकांनी त्यांचे कौतुक करून सर्व साधकांना खाऊ दिला.’
– कु. शशिकला आचार्य, कु. श्वेता पट्टणशेट्टी, कु. नलिनी राऊत आणि सौ. राधा साळोखे
१०. अल्प अहं
‘पू. काकांकडून एखादे वेळी चूक झाल्यास ते सर्वांसमोर क्षमा मागतात.
११. प्रीती
अ. कुणी साधक घरी जात असेल, तर पू. काका त्यांना ‘घरी पोचल्यावर भ्रमणभाष कर’, असे सांगतात. आम्ही त्यांना भ्रमणभाष करायच्या आधीच त्यांचा भ्रमणभाष येतो. मी घरी जात असतांना ते माझ्या नातीसाठी आठवणीने खाऊ देतात. साधक घरून आल्यावरही पू. काका त्यांची विचारपूस करतात. ते प्रतिदिन साधकांना खाऊ देतात. त्याला प्रसादाची चव असते.’
– श्री. विलास महाडिक
आ. ‘पू. काका साधकांना खाऊ म्हणून सफरचंदाची फोड देतात. ते इतके प्रेमाने बोलतात की, ती फोड गोड लागते. सेवा पूर्ण होईपर्यंत त्या सफरचंदाचा गोडवा जिभेवर रहातो आणि चैतन्य मिळते’
– सौ. अनिता मोगडपल्ली
१२. गुरुमाऊलीने घडवलेली संतरत्नाची मूर्ती ।
प्रीतीचा अखंड झरा वाहे ज्यांच्या हृदयी ।
मायेच्या ओलाव्याने सर्व साधकांना जवळ करी ॥ १ ॥
सदा आनंद निवास करी ज्यांच्या ठायी ।
भावभक्तीच्या सत्संगाने साधका ईश्वराजवळ नेई ॥ २ ॥
लाघवी आणि निर्मळ वाणी असे ज्यांची ।
गुरुमाऊलीने (टीप १) घडवली अशी संतरत्नाची मूर्ती ॥ ३ ॥
आम्हा बालकांना (टीप २) न्या गुरुचरणी ।
करतो प्रार्थना आम्ही पू. भाऊकाकांच्या चरणी ॥ ४ ॥
टीप १ : प.पू. डॉक्टर
टीप २ : साधकांना
– सौ. अनघा जोशी
१३. भाव
‘पू. काकांसमवेत सेवा करतांना त्यांच्यातील भावामुळे बर्याचदा आपलीही भावावस्था टिकून रहाते. पू. काकांनी सांगितलेल्या प्रार्थनेमुळे भावजागृती होते. पू. काका प्रार्थना करतांना प्रत्यक्ष प.पू. गुुरुमाऊली समोर असल्याची अनुभूती येते. पू. काका स्वतः संत असूनही पू. नकातेकाका आणि पू. होनपकाका यांना पुष्कळ आदराने हाक मारतात, यावरून ते स्वतः संत असूनही त्यांचा संतांप्रती किती भाव आहे, हे लक्षात येते.’
– कु. शशिकला आचार्य, कु. श्वेता पट्टणशेट्टी, कु. नलिनी राऊत आणि सौ. राधा साळोखे
पू. भाऊकाका (पू. सदाशिव परब) अनेक गुणांची खाण तुम्ही ।
त्यागाचे मूर्तीमंत उदाहरण तुम्ही ।
इतरांचा विचार करून सदैव साहाय्यरत असता तुम्ही ॥
हसतमुख, तत्पर, प्रेमळ आदी गुणांनी संपन्न तुम्ही ।
म्हणूनच पू. भाऊकाका अनेक गुणांची खाण तुम्ही ॥ १ ॥
सनातनचे आदर्श संत तुम्ही ।
तुमच्यासम निर्मळ नि कृतज्ञ होवो आम्ही ॥
सनातनचे व्यापक रूप मिळते संतांमधून पहावयासी ।
तेच आम्हा सर्व साधकांना घडवताती ॥ २ ॥
निष्काम प्रेम, परिपूर्ण नि भावपूर्ण सेवा करण्यास ।
आम्हा नर्मदेतील गोट्यांना शिकवले तुम्ही ॥
घार हिंडते आकाशी परि तिचे लक्ष पिलापाशी ।
तसे लक्ष ठेवून गोट्यांना पैलू पाडता तुम्ही ॥ ३ ॥
प्रेमासाठी अश्रू ढाळले क्षणोक्षणी ।
जीवन कंठिले इतुके, परि प्रेम न मिळाले तीळभरी ॥
देवद आश्रमी प्रेम मिळाले आल्यावर भरभरूनी ।
अशीच रहावी देवाची अखंड कृपा क्षणोक्षणी ॥ ४ ॥
देवा, तुझ्याच कृपेने हे अनुभवते ।
कृतज्ञता असू दे सदैव तवचरणी ॥
कृष्णकृपेने आलेली शब्दसुमने ।
अर्पण करते श्रीकृष्णचरणी ॥ ५ ॥
– श्रीकृष्णाची मीरा,
श्रीमती वासंती लावंधरे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१२.२.२०१६)