१. श्री. राजाभाऊ उपाध्ये हे आनंद संप्रदायाचे
अनुयायी असून ‘या संप्रदायाचे मूळ पुरुष श्री सदानंंद महाराज
यांच्याशी आपले जन्मजन्मांतरीचे शिष्यत्वाचे नाते आहे’, अशी त्यांची श्रद्धा असणे
‘श्री. राजाभाऊ उपाध्ये (प.पू. आबा) हे आनंद संप्रदायाचे यात्री आहेत. अतिप्राचीन काळापासून असलेल्या चार संप्रदायांपैकी, म्हणजे चैतन्य, स्वरूप, नाथ आणि आनंद संप्रदायांतील ‘आनंद’ या संप्रदायाचे ते अनुयायी आहेत. प.पू. आबांची ‘या संप्रदायाचे मूळ पुरुष श्री सदानंंद महाराज हे आपले गुरु असून त्यांच्याशी आपले जन्मजन्मांतरीचे शिष्यत्वाचे नाते आहे’, अशी श्रद्धा आहे. सद्गुरूंच्या भेटीसाठी प.पू. आबांनी पुष्कळ शोध घेण्याचा प्रयत्न केला. १९७७ सालापासून अनेक वेळा हरिद्वार आणि अन्य तीर्थक्षेत्रे फिरून झाली; परंतु ‘ते तुला यथावकाश आपोआप कळेल’, असे उत्तर त्यांना सद्गुरूंकडून मिळत असे. श्री सद्गुरु सदानंद स्वामी मठ संस्थान, बसवकल्याण, जिल्हा बिदर, कर्नाटक या गुरुदेवांच्या स्थानाचे प्रत्यक्ष दर्शन घेण्याचा त्यांना योग आला.
२. श्री. राजाभाऊ उपाध्ये यांच्या पत्नी सौ. मंगलाताई यांनी गुरुमुखातून आलेले
शब्द लिहून काढल्याने ते ‘अमृतवाणी’ पुस्तकाच्या रूपाने असंख्य भक्तांपर्यंत पोचणे
‘आपल्या जीवनाला सात्त्विक वळण लावणारे जे विचार समजतील, ते आपण जिज्ञासूंना सांगावेत’, अशी सद्गुरूंची शिकवण आहे; म्हणून श्री. राजाभाऊ उपाध्ये यांच्या पत्नी सौ. मंगलाताई गुरुमुखातून, म्हणजे राजाभाऊ यांच्या मुखातून आलेले शब्द लिहून काढत. वेळोवेळी मांडले जाणारे विलक्षण तत्त्वज्ञान ‘अमृतवाणी’ पुस्तकाच्या रूपात असंख्य भक्तांपर्यंत पोचले आहेत.
३. श्री. राजाभाऊ उपाध्ये यांनी श्री. सुधीर फडके (बाबूजी) यांच्या गाण्यांचे
सादरीकरण केल्यावर , ‘पुन्हा चाली द्यायला सांगितल्यास राजाभाऊंनी बसवलेल्या
संगीताचे काही तुकडे घ्यायला मला आवडेल’, असे म्हणून बाबूजींनी कौतुक करणे
१९७६ ते १९७८ सतत २ वर्षे राजाभाऊंनी श्री. सुधीर फडके यांच्या गाण्यांचा सादरीकरणाच्या दृष्टीने अभ्यास केला. ‘कोणती गाणी वगळायची ?’ या यक्ष प्रश्नाला उत्तर शोधत अंतिम चाळणीत ७० गाणी उरली. ‘विविधता हवी’, यासाठी अभंग, लावणी, प्रणयगीते, विरहगीते आणि लोकसंगीत असे वर्गीकरण केले. त्यांनी शिष्य वर्गाकडून गाणी बसवून घेतली. २६.२.१९७८ या दिवशी ‘सुधीर फडके गीतरजनी’ हा पहिला कार्यक्रम झाला. तो प्रत्यक्ष श्री. सुधीर फडके यांच्या उपस्थितीत आणि त्यांच्या आशीर्वादाने झाला. राजाभाऊंनी दाखवले नाही, तरी त्यांना त्या वेळी मनातून ताण आला होता. चित्रपटगीतांचा कालावधी अगदी मिनिट-सेकंदात बसवलेला असतो. गाण्यांना मोठ्या वाद्यवृंदाची साथ असते. रंगमंचावर ते गीत सादर करतांना थोडे फेरफार करावे लागतात. ही एका अर्थी घुसखोरीच असते. ‘बाबूजींची (श्री. सुधीर फडके यांची) यावर प्रतिक्रिया काय होईल ?’, हा एक विचार राजाभाऊंच्या मनात होता. शिवाय काही विघ्नसंतोषी लोकांनी, ‘पहा, तुमच्या नावाचा उपयोग राजाभाऊ कसा करत आहेत ?’, असे बाबूजींच्या मनात भरवायचा प्रयत्न केला होता; पण कार्यक्रम ऐकून बाबूजींना आनंद झाला. ‘‘या गाण्यांना पुन्हा चाली द्यायला मला सांगितले, तर राजाभाऊंचे काही तुकडे मला त्यात घ्यायला आवडतील’’, अशी भरघोस शाबासकी त्यांनी राजाभाऊंना दिली.
४. श्री. राजाभाऊ उपाध्ये यांनी अवघड कार्यक्रम उत्तम बसवून घेणे आणि
त्यांनी केलेले प्रत्येक गाणे यशस्वी होऊनही ते स्वतः कधी प्रकाशझोतात न येणे
गेल्या २० वर्षांत या कार्यक्रमाचे २५० प्रयोग झाले. सर्वत्र भरभरून दाद मिळाली. ‘जगाच्या पाठीवर’, ‘मुंबईचा जावई’, ‘ते माझे घर’, ‘सुवासिनी’, यातील चिरप्रिय गाणी ऐकून श्रोतृवृंद संतुष्ट झाला होता. जुन्या पिढीला पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला. ‘अवघड कार्यक्रम उत्तम बसवून घेणारे हे राजाभाऊ कोण ?’, असा प्रश्न अनेकांना पडला. त्यांची सांगितीक कारकीर्द लोकांसमोर म्हणावी, तशी आली नाही. आजवर त्यांनी केलेले प्रत्येक गाणे, संगीत नाटकातील बसवून घेतलेली गाणी, ‘आता त्याचा भुंगा’ (‘संस्कार’ चित्रपटातील गीत), दक्षिण महाराष्ट्रात चांगलाच यशस्वी झाला; पण ते कधी प्रकाशझोतात आले नाहीत.
५. संगीतापासून ताटातूट झाल्यामुळे राजाभाऊंना दुखणे आल्याचे
वैद्यांनी सांगणे आणि त्यानंतर संगीताची आराधना चालू झाल्यावर प्रकृती
सुधारू लागणे अन् आकाशवाणीचे प्रथम श्रेणीचे कलाकार म्हणून त्यांना मान्यता मिळणे
लहान वयात लग्न झाल्यामुळे मॅट्रिकनंतर लगेच नोकरी, बिर्हाड या घडामोडीत संगीत-साधनेला वेळ मिळेना. त्यांची पुष्कळ दगदग होत होती. काही न काही दुखणे मागे लागले. वैद्य पालटूनही गुण येईना. तेव्हा सगळेच काळजीत पडले; परंतु योगायोगाने एका वैद्यांनी राजाभाऊंच्या एकूण कारकीर्दीची माहिती विचारून निदान केले की, त्यांची संगीतापासून ताटातूट झाल्यामुळे त्यांना दुखणे झाले आहे. एकदा कारण निश्चिती झाल्यावर ‘गाणे’ पुन्हा चालू करायचे ठरले. नाशिकहून बेळगावकरबुवा कल्याणला येत. राजाभाऊ कार्यालयातून अंबरनाथला घरी जातांना कल्याणला थांबत. तिथे संगीताची आराधना होई. या आनंदापुढे कधीही ही दगदग वाटली नाही. प्रकृती सुधारू लागली. असे २ वर्षे चालले. कुर्ल्याला जागा मिळाली नाही; म्हणून त्यांनी श्री. भरते गुरुजींकडे शिक्षण चालू केले. त्यानंतर गोरेगावला बिर्हाड आले नि स्थिर झाले. गायनाचा शिकवणी वर्ग राजाभाऊ स्वतःच घेऊ लागले. उदयकुमार, विद्यावती, संध्या, राजश्री, तेजश्री आणि मानसकन्या मंगला या मुलाबाळांत प्रपंच बहरत होता. यथावकाश आकाशवाणीचे प्रथम श्रेणीचे कलाकार म्हणून त्यांना मान्यता मिळाली.
– श्री. कांचन सातपुते (संदर्भ : संस्कार भक्तिधारा, पंचमहाभूत समृद्धी विशेषांक)