ईश्‍वरप्राप्तीचा राजमार्ग – शरणागती ! – के.वि. बेलसरे

gondavlekar_c

 

१. शरणागतीचे महत्त्व

‘माणसाचा अहंकार आणि कर्तेपणाचा अभिमान हे त्याच्या आनंदाच्या आड येतात. तो अडथळा दूर करण्याचे सामर्थ्य माणसाच्या अंगी नाही; म्हणून ‘ईश्‍वराला शरण जाणे’ हा एकच अनुभवसिद्ध उपाय आहे. शरणागतीमध्ये जीव ईश्‍वरचरणी लीन होतो. शरणागत माणसाला ईश्‍वर त्याच्या दोषांसह स्वीकारतो.

 

२. शरणागती कशी साध्य करता येते ?

ज्ञान, धर्म किंवा अन्य मोठे साधन काहीही नको; पण श्रद्धा असल्यास शरणागतीचे दार उघडते. जो सर्वप्रकारे हतबल होतो आणि कोणत्याही निमित्ताने ईश्‍वरचरणी लीन होतोे, त्याला शरणागती पटकन साधते. ईश्‍वरामध्येे स्वतःचे कर्तेपण बुडवणे, हे शरणागतीचे मर्म आहे.

 

३. टप्पे

३ अ. पहिला टप्पा

ईश्‍वराकडे कर्तेपण देऊन नामाचा अभ्यास करू लागणे, म्हणजे शरणागतीची पहिली पायरी चढणे होय.

३ आ. दुसरा टप्पा

ईश्‍वर बाहेर नसून तो आपल्या हृदयात आहे, याचे भान राहून त्याच्या सहवासाची प्रचीती घेणे

३ इ. अंतिम टप्पा

जीवनात कोणतेही प्रसंग आले, तरी त्याच्या श्रद्धेला यत्किंचितही धक्का लागत नाही. सर्व शुभाशुभ घटनांमध्ये त्याला ईश्‍वराची असीम कृपाच दिसू लागते.

 

४. लाभ

अ. ईश्‍वराला शरण जाणार्‍या जिवाचे सर्व दोष संपतात. तो ईश्‍वरासारखा निर्दोष होतो.

आ. देहात गुप्त असलेला ईश्‍वर शरणागतीने प्रकट होतो.

‘हे भगवंता, प्रत्येक साधकाला शरणागती साध्य होऊन लवकरात लवकर तुझी प्राप्ती होऊ दे, हीच तुझ्या चरणी प्रार्थना !’ – के.वि. बेलसरे

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात