१. अस्तित्वाने कार्य होणे आणि
सनातन धर्म राज्यासाठी देवतांचा आशीर्वाद मिळवणे ‘
सद्गुरु (सौ.) अंजली यांच्याविषयी सांगायचे म्हणजे त्यांच्या अस्तित्वाने कार्य होत आहे. त्यांना महर्षि दैवी प्रवास करायला सांगतात. सनातन धर्म राज्यासाठी त्यांच्याद्वारे देवतांचा आशीर्वाद मिळवून घेतात. त्यांच्यामुळे सनातन संस्थेला सर्व आशीर्वाद मिळतात आणि आपले कार्य आणखीन सुलभ होते. असे त्यांच्या अस्तित्वाने आपोआपच कार्य होत आहे; म्हणून महर्षींनी त्यांना निवडले. ‘त्यांची तेवढी योग्यता आहे’, असे मला वाटते.
२. पुष्कळ उन्हाळा आणि अतिशय अल्प तापमान
दोन्ही स्थितीमध्ये राहूनही चैतन्यामुळे पालट न होणे अन् तेज वाढत असल्याचे लक्षात येणे
आतापर्यंत त्यांनी पुष्कळ प्रवास केला. तमिळनाडूमध्ये पुष्कळ उन्हाळा असतो. तिथे जवळजवळ दीड वर्ष त्या फिरल्या. त्यानंतर उत्तर भारतात गेल्या. लेह-लडाख, सिमला, कुलु-मनाली यांसारख्या ठिकाणी त्या गेल्या. तिथे अतिशय अल्प, म्हणजे कधी शून्याखालीही तापमान असते. अशा दोन्ही प्रतिकूल स्थितीमध्ये राहूनही त्यांच्यावर काही परिणाम झाला नाही. त्यांच्यातून प्रकट होणारे चैतन्य अल्प झाले नाही किंवा त्यांचा तोंडवळा काळवंडला, असे काही झाले नाही. त्यांच्यातील तेज आणखीन वाढत गेले आहे. यातून लक्षात येते, ‘त्यांच्यातील चैतन्यामुळे सगळे होत आहे.’
३. कौतुक करूनही अहं न वाढणे आणि ‘आपल्यामुळे काही होत आहे’,
अशी जाणीव नसून गुरुकृपेने सर्व होत असल्याची जाणीव असणे
त्यांचा अहं अल्प आहे. महर्षि त्यांचे एवढे कौतुक करतात. ते सारखे म्हणतात, ‘तू आमची कार्तिकपुत्री आहेस. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी तुला आमच्याकडे पाठवले आहे. तुझ्याकडून एकही चूक होत नाही.’ सातत्याने एवढे कौतुक करूनही त्यांच्यामध्ये अहं वाढलेला नाही. एवढे कौतुक होऊनही त्यांना ‘आपण काही विशेष करत आहोत’, असे वाटत नाही. त्यांच्याकडून सगळे सहजतेने होत आहे. ‘आपल्यामुळे काही होत आहे किंवा आपण काही करत आहोत’, याची त्यांना जाणीव नसते. ‘सगळे काही गुरुकृपेने होत आहे’, असे त्यांना वाटते.
४. शारीरिक त्रास होत असतांना १० घंटे प्रवास करून मंदिरात
जाऊन दर्शन घेणे आणि महर्षींनी कठीण परीक्षा घेऊनही मनःस्थिती विचलीत न होणे
खडतर, म्हणजे कधी कधी १० घंटे प्रवास करणे, तिकडे गेल्यावर काही कि.मी. चालत जाऊन मंदिरात दर्शन घेणे, असे त्या करतात. त्या वेळी शारीरिक त्रासही होत असतात. असे सगळे करूनही त्या आनंदावस्थेत असतात. महर्षीही त्यांची कठीण परीक्षा घेतात, तरीही त्यांची मनःस्थिती विचलीत होत नाही. आहे त्या स्थितीत त्या सतत भावावस्थेत असतात. स्वतः आनंदावस्थेत असतात आणि इतरांनाही आनंद देतात. ही त्यांची आनंदावस्था प्रकर्षाने जाणवते. ‘त्या आधीपासून आनंदी असायच्या. आता त्यात अजून वाढ झाली आहे’, असे वाटते.
– (पू.) डॉ. मुकुल गाडगीळ