संमोहन म्हटले की, सामान्य माणसाच्या समोर काहीतरी गूढ अशी प्रतिमा उभी रहाते; परंतु संमोहन हा विषय समजून घेतला असता हा अपसमज दूर होऊन संमोहन हे इतर शास्त्रांसारखेच एक शास्त्र आहे, असे लक्षात येईल.
विकार-निर्मूलनासाठी स्वसंमोहन उपचार या उपमालिकेत विकाराच्या कारणानुसार नव्हे, तर लक्षणांनुसार तो विकार शारीरिक कि मानसिक आहे ?, याचा विचार केला आहे, उदा. बहुतेक लैंगिक समस्या मानसिक कारणांमुळे निर्माण होत असल्या, तरी त्या विकारांत शारीरिक लक्षणे आढळून येत असल्यामुळे ते विकार शारीरिक विकारांच्या गटात घेतले आहेत.
विकार प्रारंभिक टप्प्याचा असला, तर रुग्णाला स्वतःच स्वतःवर उपचार करता येतात. विकार पुढच्या टप्प्याचा असला, तर रुग्ण स्वतःच स्वतःवर उपचार करू शकत नाही. अशा वेळी अभ्यासू आणि तळमळ असलेली व्यक्ती संमोहन उपचारशास्त्राचा अभ्यास करून रुग्णावर उपचार करू शकते. उपचार करणे सुलभ जावे, यासाठी या ग्रंथमालिकेत विविध मानसिक आणि शारीरिक विकारांवर उपचार केल्याची उदाहरणे सविस्तर दिली आहेत. ती वाचून प्रत्यक्ष उपचार करण्यासंदर्भात दिशा मिळण्यास साहाय्य होईल.
विकार-निर्मूलनासाठी स्वसंमोहन उपचार हा विषय समजून घेण्यापूर्वी संमोहनावस्था म्हणजे काय, विकार बरे होण्यासाठी आवश्यक असणार्या स्वयंसूचनांची अभ्याससत्रे कशी करायची आणि स्वसंमोहन-उपचाराच्या विविध पद्धती कोणत्या आहेत, हे समजून घेणे आवश्यक ठरते. यासाठी लेखाच्या पूर्वार्धात या सूत्रांविषयी थोडक्यात विवेचन केले आहे. (या सूत्रांविषयी सविस्तर विवेचन सनातनच्या संमोहनशास्त्र आणि संमोहन-उपचार आणि सुखी जीवनासाठी संमोहन-उपचार या २ ग्रंथांत केले आहे. वाचकांनी ते ग्रंथही अभ्यासल्यास अधिक चांगले ठरेल.) लेखाच्या उत्तरार्धात शारीरिक आणि मानसिक विकार-निर्मूलनासाठी स्वसंमोहन उपचार कसे उपयोगी असतात ?, याची थोडक्यात ओळख करून दिली आहे.
स्वसंमोहनाचे उपचार करून जास्तीतजास्त रुग्ण लवकरात लवकर विकारमुक्त होवोत, ही श्री गुरुचरणी आणि विश्वपालक श्री नारायणाच्या चरणी प्रार्थना !
१. मनाचे दोन भाग
सर्वसाधारणपणे मनाचे दोन भाग पाडले जातात. जाणणारा मनाचा भाग म्हणजे बाह्यमन आणि दुसरा भाग जो अप्रकट असतो ते अंतर्मन.
मन म्हणून आपण नेहमी ज्याचा उल्लेख करतो, ते बाह्यमन होय. नेहमीचे विचार आणि भावना यांचा या बाह्यमनाशी संबंध येतो. याउलट अंतर्मन म्हणजे सर्व भावभावनांचे, विचारविकारांचे एक गोदामच असते म्हणा ना ! या गोदामात सर्व प्रकारचे अनुभव, भावना, विचार, इच्छाआकांक्षा इत्यादी सर्वकाही साठवलेले असते.
२. संमोहनावस्था म्हणजे काय ?
संमोहनावस्था म्हणजे शरीर आणि मनाची शिथिलता अन् त्याबरोबर दिल्या जाणार्या सूचना ग्रहण करण्याची मनाची वाढलेली क्षमता. जेव्हा व्यक्ती एकाच विचारावर लक्ष केंद्रित करते, तेव्हा त्याचा प्रभाव लवकर होतो आणि दीर्घकाळ रहातो.
३. संमोहनसूचनांचा परिणाम शीघ्रतेने होणारा आणि जास्त काळ टिकणारा का असतो ?
३ अ. संमोहनाच्या संदर्भात सूचना म्हणजे काय ?
सूचना या शब्दाचा अर्थ म्हणजे दुसर्याने सुचवलेली एखादी कल्पना असा करता येईल. संमोहनाच्या संदर्भात या शब्दाचा अर्थ म्हणजे – संमोहनावस्थेत गेलेल्या व्यक्तीने दुसर्याकडून दिला गेलेला विचार स्वीकारणे किंवा स्वतःचाच विचार ग्रहण करणे.
३ आ. संमोहनसूचना अंतर्मनाकडून नीटपणे स्वीकारल्या जाण्याची आवश्यकता
सूचना सहजपणे स्वीकारू शकणे, याचे प्रमाण अल्प-अधिक असू शकते. सूचना सहजपणे ग्रहण होणे, हे दोन गोष्टींवर अवलंबून असते. एक म्हणजे ती सूचना अंतर्मनापर्यंत पोचणे आणि दुसरी म्हणजे अंतर्मनाने ती स्वीकारणे. अंतर्मनाची विश्लेषण करण्याची क्षमता ही जिवंत रहाण्याच्या उद्देशापुरती मर्यादित असते. व्यक्तीच्या दृष्टीने एखादी हानीकारक सूचना संमोहकाकडून दिली गेली की, तिच्यापासून रक्षण करण्याचे काम अंतर्मनाच्या या चिकित्सक विचारक्षमतेमुळेच होत असते. सर्वसाधारणपणे जेव्हा जीविताचा प्रश्न येत नाही, तेव्हा अंतर्मनाकडून सूचना स्वीकारल्या जातात. म्हणूनच अंतर्मनाकडून नीटपणे स्वीकारल्या जातील अशा सूचना संमोहन-उपचारपद्धतीत मुद्दाम तयार केल्या जातात. एकदा अंतर्मनाकडून सूचनांचे ग्रहण नीटपणे केले गेले की, त्या सूचनांचे परिणाम अधिक काळपर्यंत टिकून रहातात, असे दिसून येते.
३ इ. संमोहनसूचनांचा परिणाम शीघ्र आणि दीर्घकाळ टिकणारा असण्यामागील कारण
संमोहनावस्थेत एकदा व्यक्ती गेली की, बाह्यमन आणि अंतर्मन यांमध्ये असलेला प्रतिबंध कमी होतो अन् मग त्यामुळे सूचना अंतर्मनापर्यंत पोचून त्यांचा परिणाम अंतर्मनावर जास्त काळ टिकून राहतो. एकंदरीत सर्व मनाचा जर विचार केला, तर अंतर्मन हे सर्व मनाच्या ९/१० असून बाह्यमन केवळ १/१० इतकेच आहे. म्हणजे याचा अर्थ असा होतो की, अंतर्मन ९/१० असल्यामुळे दिलेल्या सूचनांचा परिणाम मनाच्या ९/१० भागावर होतो आणि होणारा परिणाम शीघ्र होतो आणि जास्त काळही रहातो. परस्पर तुलनात्मकदृष्ट्या विचार केला, तर बाह्यमनावर होणारा परिणाम ते १/१० च असल्याने अल्प काळच टिकतो.
४. स्वसंमोहन अभ्याससत्रे
४ अ. संमोहनाची अभ्याससत्रे मुखोद्गत करणे आणि तत्पूर्वी आवश्यक तेथे बदल करणे
संमोहनाच्या प्रथमावस्थेत कसे जायचे किंवा न्यायचे, हे पुढे दिले आहे. स्वसंमोहन किंवा परसंमोहन शिकण्यासाठी पुढे दिलेली अभ्याससत्रे मुखोद्गत करणे आवश्यक असते. पुढे दिलेल्या अभ्याससत्रांतील वाक्यरचनेत थोडा बदल करू शकतो. असा बदल करतांना त्या वाक्यांमागचा मूळ हेतू काय आहे, हे लक्षात ठेवावे. अभ्याससत्रातील वाक्यरचनेमध्ये बदल करायचा असल्यास तो आधी करावा आणि नंतर हे बदललेले अभ्याससत्र मुखोद्गत (आत्मसात्) करावे. संमोहन करतांना नवशिक्या माणसाने जर परत परत वाक्ये बदलली, तर त्याचा बोलण्याचा प्रवाह खंडित होईल आणि स्वतःला किंवा इतरांना संमोहनावस्थेत नेण्याची त्याची क्षमता कमी होईल. तसेच जी वाक्ये बोलली जातात, त्याच्याशी मनाची जी स्थिती निगडित असते, त्या संबंधात बाधा येईल, उदा. अभ्याससत्र १ च्या शेवटी १……२……३ जे म्हटले जाते, त्यापेक्षा एखाद्या संमोहकाने एका प्रसंगी अ……आ……इ म्हटले आणि दुसर्या वेळी ळ……क्ष……ज्ञ म्हटले, तर एका विशिष्ट सूचनेशी संबंध प्रस्थापित न झाल्यामुळे संमोहनावस्थेत जायला त्याला पुष्कळ वेळ लागेल.
४ आ. अभ्याससत्र १ : शारीरिक आणि मानसिक शिथिलता – संमोहनाची प्रथमावस्था
४ आ १. टप्प्याटप्प्याने शिथिलता साधण्याची पद्धत
४ आ १ अ. संमोहनावस्थेची निर्मिती
ज्या खोलीत आपण स्वसंमोहनासाठी बसणार आहोत, तेथील एका भिंतीवर उठून दिसेल, अशा पद्धतीने शाईचा एक ठिपका काढावा. स्वसंमोहनासाठी आपण आसंदीत (खुर्चीत) बसल्यानंतर डोळ्याच्या पातळीपेक्षा थोड्या वरच्या पातळीवर हा ठिपका असावा. त्या ठिपक्याकडे पहात पुढीलप्रमाणे म्हणत जावे.
मी ठिपक्याकडे बघत आहे आणि मी माझ्या विचारांत मग्न आहे. मी ठिपक्याकडे बघत असतांना आणि विचार करत असतांना माझे सर्व शरीर शिथिल होईल आणि त्याचा परिणाम म्हणून माझे मनही शिथिल होईल आणि त्यामुळे मला प्रसन्न वाटेल.
श्वास सावकाशपणे आत घ्या ….. थोडा वेळ रोखून ठेवा ….. तो सावकाशपणे बाहेर सोडा. (अशा प्रकारची श्वसनक्रिया तीन वेळा करा.)
ठिपक्याकडे मी टक लावून बघत असतांना, माझे मन माझ्या पायांमधील संवेदनेवर केंद्रित करत आहे. माझे पाय शिथिल होत आहेत. आता ही संवेदना हळूहळू वर पसरत आहे.
आता माझ्या पायाचे घोटे शिथिल होत आहेत.
आता माझ्या गुडघ्याचे स्नायू शिथिल होत आहेत.
आता माझ्या मांड्यांचे स्नायू शिथिल होत आहेत.
आता ही शिथिलता माझ्या सर्व शरीरभर पसरत आहे.
आता माझे पोट शिथिल होत आहे.
आता माझी पाठ शिथिल होत आहे.
माझ्या छातीचे स्नायू शिथिल होत आहेत.
आता हात खांद्यापासून बोटांपर्यंत शिथिल होत आहेत.
आता माझी मान शिथिल होत आहे.
आता माझे डोके शिथिल होत आहे.
माझे डोळे थकलेले आहेत. आता मी १, २ आणि ३ म्हणेन. ३ या आकड्याला माझे डोळे बंद करीन आणि सर्व शरिराचा ताण कमी होईल. मी स्वतःला सूचना देऊ शकेन आणि आवश्यकता असेल तेव्हा स्वेच्छेने जागृत होऊ शकेन. १……२……३ (डोळे मिटावे.)
४ आ १ आ. उपचाराच्या सूचना
व्यक्तीला ज्या कारणासाठी किंवा जे लक्ष्य साधण्यासाठी संमोहन करावयाचे असेल, त्या कारणावर किंवा त्या लक्ष्यावर सूचना अवलंबून रहातील.
४ आ १ इ. संमोहनातून बाहेर येणे
आता मी १……२……३ असे अंक मोजीन. तीन अंक म्हटल्याबरोबर माझे डोळे उघडतील. माझी काळजी दूर झालेली असेल आणि मला प्रसन्न वाटत असेल. (जर तुम्ही अतिशय काळजीत असाल किंवा फार निराश झालेले असाल, तर मी प्रसन्न होईन असे म्हणण्यापेक्षा माझी काळजी सौम्य झालेली असेल, माझी निराशा थोडी कमी झालेली असेल, असे म्हणावे.) मी सर्वकाही आठवू शकेन आणि माझ्या सूचना मी प्रत्यक्षात अमलात आणू शकेन. पुढील वेळी मी संमोहनाच्या आणखी पुढच्या गाढ अवस्थेत जाईन आणि त्यामुळे मला अधिक शिथिलता लाभेल. १……२……३ (डोळे उघडावे.)
४ इ. अभ्याससत्र २ : संमोहनाची मध्यमावस्था – आरंभीचा टप्पा
४ इ १. संमोहनावस्थेची निर्मिती
प्रथम अभ्याससत्र १ करा आणि ३ या अंकाबरोबर डोळे मिटा.
४ इ २. संमोहनाची खोली मध्यमावस्थेच्या आरंभीच्या टप्प्यापर्यंत वाढवणे – हाताचा तणाव वाढवण्याची पद्धत
आता मी माझा उजवा हात (रुग्ण डावखुरा असल्यास डावा हात) वर करत आहे …… मी आता माझी मूठ घट्ट आवळत आहे …… आणखी घट्ट …… आणखी घट्ट आवळत आहे. आता या घट्ट आवळलेल्या हाताचा ताण आणि माझ्या शरिरावरील इतर स्नायूंवरील ताण यांची मी तुलना करत आहे आणि माझ्या शरिराच्या इतर भागाला आलेली शिथिलता मला जाणवत आहे. आता मी ४ आणि ५ हे अंक म्हणणार आहे. ५ हा अंक म्हणताच मी आवळलेली मूठ हळूहळू सैल करीन. नंतर सावकाशपणे माझा हात खाली आणून माझ्या मांडीवर किंवा आसंदीच्या (खुर्चीच्या) हातावर पूर्ववत् ठेवीन. आता मी शिथिलतेच्या आणखी पुढच्या अवस्थेत गेलेलो असेन. ४ …… ५ (हात खाली आणावेत.)
४ इ ३. उपचाराच्या सूचना
अभ्याससत्र १ प्रमाणे
४ इ ४. संमोहनातून बाहेर येणे
अभ्याससत्र १ प्रमाणे
४ ई. अभ्याससत्र ३ : संमोहनाची मध्यमावस्था – पुढील टप्पा
४ ई १. संमोहनावस्थेची निर्मिती आणि तिची खोली वाढवणेे
डोळे मिटेपर्यंतच्या सर्व क्रिया अभ्याससत्र १ प्रमाणे करा. नंतर दुसरे अभ्याससत्र करतांना ५ हा अंक मोजताच हात हळूहळू खाली आणून मांडीवर किंवा आसंदीवर विसावू द्या.
४ ई २. संमोहनाची खोली संमोहनाच्या मध्यम अवस्थेतील पुढील टप्प्यापर्यंत वाढवणे – हात गोलाकार फिरवण्याची पद्धत
आता पुन्हा एकदा मी माझा उजवा हात वर करत आहे. मी आता उजवा हात गोल गोल (आरती ओवाळल्यासारखा) फिरवत आहे. हाताच्या प्रत्येक फेर्याबरोबर मी शिथिलतेच्या आणखी पुढील अवस्थेत जात आहे आणि मला ते जास्त आनंददायी आणि लाभदायी ठरत आहे. आता मी ६ आणि ७ हे अंक उच्चारणार आहे. ७ अंक उच्चारताच मी माझा हात फिरवण्याचे थांबवून हात सावकाश खाली घेणार आहे. जेव्हा माझा हात मांडीवर किंवा आसंदीच्या हातावर विसावेल, तेव्हा मी शिथिलतेच्या आणखी गाढ अवस्थेत गेलेलो असेन ६……७ (हात खाली आणावेत)
अभ्याससत्रे १, २, ३ याप्रमाणे संमोहनावस्था निर्माण करून हळूहळू तिची खोली वाढवणे, याला प्रगतीशील शिथिलता असे संबोधतात.
४ ई ३. उपचाराच्या सूचना
अभ्याससत्र १ प्रमाणे
४ ई ४. संमोहनातून बाहेर येणे
अभ्याससत्र १ प्रमाणे
५. स्वसंमोहन-उपचाराच्या पद्धती
५ अ. स्वतःच्या स्वभावदोषांमुळे निर्माण होणारे ताण दूर करण्याच्या पद्धती
५ अ १. अयोग्य कृतीची जाणीव आणि तीवर नियंत्रण (psychofeedback) पद्धत
तत्त्व : या पद्धतीत दिलेल्या पुढील सूचनेच्या वाक्यरचनेमुळे अयोग्य विचार, भावना आणि कृती यांची व्यक्तीला जाणीव होते अन् त्यांच्यावर नियंत्रण मिळवणे व्यक्तीला शक्य होते – स्वभावातील दोषांमुळे जेव्हा माझ्या मनात चुकीचे विचार किंवा भावना येतील किंवा माझ्या हातून चुकीची कृती घडत असेल, तेव्हा मला त्याची जाणीव होऊन ती थांबवता येईल.
ही पद्धत वापरून विचार, भावना किंवा वागणे या संदर्भात पुढील स्वभावदोषांमुळे होणारी अयोग्य कृती व्यक्तीला थांबवता येते – एकाग्रता नसणे, मनोराज्यात रमणे, उतावळेपणा, धांदरटपणा, आळशीपणा, अव्यवस्थितपणा, वक्तशीरपणा नसणे, अतीचिकित्सकपणा, इतरांचे लक्ष वेधून घेणे, स्वार्थीपणा, निर्णय घेता न येणे, रूढीप्रियता, भ्रष्ट, नीतीने न वागणे, विश्वासार्ह नसणे, गर्विष्ठपणा, घमेंडखोर, अतीमहत्त्वाकांक्षी, अतीव्यवस्थित, संशयी इत्यादी. सिगारेट ओढणे, दारू पिणे इत्यादी व्यसने, नखे कुरतडण्यासारख्या सवयी, तोतरे बोलणे, ८ वर्षे वयानंतरही अंथरुणात लघवी करणे इत्यादी सर्व अयोग्य क्रिया होत.
या पद्धतीचा वापर करून स्वतःला सूचना कशा द्यायच्या, याची काही उदाहरणे –
अ. मनोराज्यात रमणे
जेव्हा मी मनोराज्यात रमलेला असेन, तेव्हा मला त्याची जाणीव होईल आणि मी वस्तुस्थितीत येईन.
आ. उतावळेपणा
जेव्हा मी उतावळेपणाने वागत असेन (उदा. रस्ता उतावळेपणाने ओलांडून जात असेन), तेव्हा मला त्याची जाणीव होऊन मी आरामात ते काम करीन.
५ अ २. योग्य प्रतिक्रिया (response substitution) पद्धत
तत्त्व : प्रत्येक प्रसंगात व्यक्तीची काहीतरी प्रतिक्रिया होते. ती प्रतिक्रिया अयोग्य असेल किंवा योग्य असेल. अयोग्य प्रतिक्रिया स्वभावातील दोषांमुळे होते, तर योग्य प्रतिक्रिया स्वभावातील गुणांमुळे होते. सतत काही महिने सूचना दिल्यामुळे अयोग्य प्रतिक्रियेच्या ऐवजी योग्य प्रतिक्रिया होत राहिली, तर स्वभावातील दोषाच्या जागी गुण निर्माण होतो.
एक-दोन मिनिटांपेक्षा कमी वेळ टिकणार्या प्रसंगात अयोग्य प्रतिक्रिया होऊ न देता योग्य प्रतिक्रिया व्हावी, यासाठी ही पद्धत वापरतात. अयोग्य प्रतिक्रियेचा अवधी महत्त्वाचा नसतो, उदा. जेव्हा एखाद्या मुलाचे वडील त्याला सांगतात, आता खेळ पुरे झाला; अभ्यास कर बघू आणि त्यामुळे मुलाला वाईट वाटते, तेव्हा मुलाला वडिलांनी सांगण्याचा तो प्रसंग काही सेकंदांतच संपतो. म्हणजेच हा कमी वेळ टिकणारा आणि मुलात अयोग्य प्रतिक्रिया निर्माण करणारा प्रसंग झाला. या प्रसंगातील मुलाची अयोग्य प्रतिक्रिया म्हणजे वाईट वाटणे. हे १ घंटा (तासभर) चालू राहिले, तरी त्या प्रतिक्रियेचा अवधी या उपचारपद्धतीच्या वापरात महत्त्वाचा नसतो. या उदाहरणातील मुलगा अयोग्य प्रतिक्रियेच्या ऐवजी योग्य प्रतिक्रिया निर्माण व्हावी म्हणून स्वतःला पुढील सूचना देऊ शकेल – जेव्हा माझे वडील आता खेळ पुरे झाला; अभ्यास कर बघू असे सांगतील, तेव्हा ते तसे का सांगत आहेत, हे माझ्या लक्षात येईल आणि मी अभ्यास करायला आरंभ करीन.
स्वभावातील पुढील दोष नाहीसे करण्यासाठी या पद्धतीचा वापर केला जातो – दुसर्यावर टीका करणे, चिडचिडेपणा, रागीटपणा, भांडखोरपणा, पश्चात्ताप न होणे, हट्टीपणा, संशयी वृत्ती इत्यादी.
५ अ ३. संमोहनावस्थेत प्रसंगाचा सराव करणे (hypnotic desensitisation) पद्धत
तत्त्व : या पद्धतीत आपण कठीण प्रसंगाला यशस्वीरीत्या तोंड देत आहोत, असे व्यक्ती नामजप करून कल्पिते. यामुळे मनात त्या प्रसंगाला तोंड द्यायचा एक प्रकारे सराव होत असल्याने व्यक्तीच्या मनावर प्रत्यक्ष प्रसंगाच्या वेळी ताण येत नाही.
एक-दोन मिनिटांपेक्षा जास्त वेळ टिकणार्या प्रसंगातील अयोग्य प्रतिक्रिया टाळण्यासाठी ही पद्धत वापरतात, उदा. बसमधून प्रवास करणे, परीक्षेची काळजी, समारंभाला जाणे यांसारख्या प्रसंगात मनावर ताण येणे.
स्वभावातील पुढील दोष नाहीसे करण्यासाठी या पद्धतीचा वापर केला जातो – चिकाटी नसणे, पुढाकार न घेणे, गप्प बसणे, आत्मविश्वासाचा अभाव, पडते घेणे, न्यूनगंड असणे इत्यादी.
५ आ. परिस्थितीमुळे, उदा. इतरांचे स्वभावदोष, इतरांची वाईट परिस्थिती इत्यादींमुळे निर्माण होणारे ताण दूर करण्याच्या पद्धती
५ आ १. इतरांचे स्वभावदोष दूर करून किंवा त्यांची वाईट परिस्थिती बदलून आपला ताण कमी करणे शक्य असणे.
मुले, आपल्या हाताखाली काम करणारे आदींच्या संदर्भात त्यांचे स्वभावदोष बदलणे शक्य असते. त्यांचे स्वभावदोष दूर करण्यासाठी अशा व्यक्तींना स्वभावदोषांविषयी परत परत सांगणे, परत परत शिक्षा देणे इत्यादी मार्ग होत.
५ आ २. इतरांचे स्वभावदोष दूर करणे (उदा. वरिष्ठांचे) किंवा वाईट परिस्थिती बदलणे (उदा. भयानक दारिद्य्र, अतीवेदनादायक किंवा असाध्य आजार, अपघात, भूकमारी यांसारखी संकटे) अशक्य असणे.
अशासारख्या ताण निर्माण करणार्या प्रसंगात जेव्हा आपण काहीएक करू शकत नाही, तेव्हा तत्त्वज्ञानाच्या भूमिकेतून त्या प्रश्नांकडे पहाणे, हा एकच उपाय शक्य असतो. हे साध्य होण्यासाठी पुढील गोष्टी कराव्यात.
अ. दुसर्याकडून कोणतीही अपेक्षा न करणे, तसेच स्वतःच्या प्रयत्नांना फळ मिळावे याचीही अपेक्षा न करणे. अपेक्षा नसली की, अपेक्षाभंगाचे दुःख होत नाही, उदा. वरिष्ठांनी कसे वागावे, यासंबंधी कोणत्याही प्रकारची अपेक्षा नसली की, वरिष्ठ आपल्याला अप्रिय असे वागले, तरी अपेक्षाभंग होत नाही आणि म्हणून मनावर ताण येत नाही.
आ. कर्मफलन्यायानुसार व्यक्तीच्या कर्मानुसार त्याला सुख किंवा दुःख मिळते. हे सूत्र लक्षात राहिले की, दारिद्य्र, अपघात, दुष्काळ इत्यादी प्रसंगांत दुःखी व्यक्तीकडे पाहूून आपल्याला दुःख होत नाही.
तत्त्वज्ञानाची भूमिका निर्माण करणार्या सूचना ताण निर्माण करणार्या प्रसंगाच्या अवधीनुसार पद्धत अ २ किंवा अ ३ याप्रमाणे देण्यात येतात.
टीपा –
१. वरील माहिती ही सर्वसाधारणपणे एखाद्या विशिष्ट तणावाच्या वेळी कुठली पद्धत वापरायची, याची मार्गदर्शक आहे. हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की, वेगवेगळ्या पद्धतींचा वापर कसा करायचा, याविषयी ताठरता नाही. म्हणूनच वेगवेगळ्या पद्धतींचा एकत्र वापर करून आपली सूचना आपण तयार करू शकतो. वेगवेगळ्या स्वभावदोषांचा एकत्र परिणाम म्हणून जेव्हा एखादी चुकीची क्रिया किंवा प्रतिक्रिया घडते, अशा वेळीसुद्धा वेगवेगळ्या पद्धतींचा एकत्र वापर करू शकतो.
२. एखाद्याच्या चुकीच्या वागण्याने त्याच्यावर जर कुणी ओरडले आणि त्यामुळे त्याला जर राग आला, तर असा राग येऊ नये म्हणून तो स्वतःला पुढील सूचना योग्य प्रतिक्रिया (अ २) ही पद्धत वापरून देऊ शकतो – बरे झाले तो माझ्यावर रागावला. त्यामुळे मला माझ्या चुकीची जाणीव झाली; परंतु केवळ ही सूचना देऊन न थांबता त्याने अयोग्य कृतीची जाणीव आणि तीवर नियंत्रण (अ १) ही पद्धत वापरून पुढील सूचनाही द्यायला पाहिजे. जेणेकरून अयोग्य प्रतिक्रिया परत परत घडण्यापासून तो स्वतःला परावृत्त करू शकतो : जेव्हा जेव्हा मी अशी चूक करायला प्रवृत्त होत असेन, तेव्हा मला त्याची जाणीव होऊन मी योग्य तेच करीन.
५ इ. उपचाराच्या महत्त्वाच्या काही इतर पद्धती
५ इ १. नामजपाची जाणीव निर्माण करणे
नामजप सतत चालू असला की, नकारात्मक विचार किंवा भावना मनात येत नाहीत. नामजप सतत होण्यासाठी स्वतःला पुढीलप्रमाणे सूचना द्यावी : मी कोणाशी संभाषण करत नसेन किंवा माझ्या मनात उपयुक्त विचार नसतील, तेव्हा माझा नामजप चालू होईल. आपल्या कुलदेवाचा किंवा कुलदेवीचा किंवा संतांनी दिलेला नामजप म्हणावा. या पद्धतीमुळे नको असलेले विचार आणि भावना मनात निर्माण होत नाहीत. अशा प्रकारे मानसिक शक्ती राखून ठेवली जाते आणि तणाव सहन करण्याची क्षमता वाढते; म्हणून या पद्धतीचा सर्व प्रकारच्या मानसिक आजारांत उपयोग होतो.
५ इ २. स्वभावदोषात सुधारणा होत नसल्यास स्वतःला शिक्षा करणे (aversion)
उपचाराच्या वरील पद्धतींचा (सूत्र ५ अमधील अ १ आणि अ २ या पद्धतींचा) दोन-तीन आठवडे वापर करूनही अयोग्य क्रिया किंवा प्रतिक्रिया होत असल्यास या पद्धतीचा वापर करावा आणि स्वतःला जोराने चिमटा घ्यावा. स्वतःला चिमटा घेणे शक्य व्हावे, यासाठी कशा प्रकारे सूचना द्यायच्या, हे पुढील उदाहरणावरून समजून येईल – जेव्हा मी मनोराज्यात रमलेला असेन, तेव्हा मला त्याची जाणीव होईल आणि मी स्वतःला जोरात चिमटा घेईन. चिमटा घेणे परिणामकारक न ठरल्यास पॅन्टचा पट्टा घट्ट आवळणे किंवा पायाला घट्ट दोरी बांधणे या पद्धतीने वेदना निर्माण करून जास्त वेळ शिक्षा द्यावी.
(प्रस्तुत लेखाच्या उत्तरार्धात शारीरिक आणि मानसिक विकारांवर स्वसंमोहन उपचार कसे करू शकतो ?, हे समजण्यासाठी प्रत्येकी एका विकाराचे विवेचन केले आहे.)
(सविस्तर विवेचनासाठी वाचा : सनातनचे ग्रंथ संमोहनशास्त्र आणि संमोहन-उपचार आणि सुखी जीवनासाठी संमोहन-उपचार)
उत्तरार्ध
लेखाच्या या भागात दमा या शारीरिक विकारावर आणि न्यूनगंड या मानसिक विकारावर स्वसंमोहन उपचार कसे करू शकतो ? याचे विवेचन केले आहे.
६. दमा
माणसाला अतिशय त्रस्त करणारा रोग कोणता ?, असे कोणी विचारले, तर बहुतेक वैद्य त्याचे उत्तर दमा असेच देतील. पाण्याबाहेर काढलेला मासा तडफडतो, त्याप्रमाणे सभोवार हवा असूनही वातावरणातील प्राणवायू शरिरात जाऊ शकत नसल्याने दम्याचा विकार झालेला रुग्ण अक्षरशः माशासारखा तडफडत असतो.
दम्याच्या विकारात श्वासनलिकांचे आकुंचन होऊन श्वासोच्छ्वासाला अडथळा निर्माण होतो. आपण येथे श्वासनलिकांचे आकुंचन झाल्यामुळे दमा लागणे, या विकाराचा विचार करणार आहोत. सर्वसाधारण व्यक्ती ज्या वेळी दमा असा उल्लेख करते, त्या वेळी तिच्या मनात हाच विकार असतो. इतर कारणांमुळे दम लागत असल्यास त्याला दमा असे संबोधले जात नाही, तर त्याला धाप लागली, असे म्हणतात.
६ अ. दम्याची लक्षणे
६ अ १. पूर्वसूचना मिळणे
काही जणांना अस्वस्थता वाटणे, शिंका येणे अशांसारख्या लक्षणांमुळे दमा लागणार असल्याची पूर्वसूचना मिळते.
६ अ २. दम्याचा झटका येणे
छातीवर अचानक दाब आल्यासारखे वाटून रुग्ण उठून बसतो आणि श्वास घेण्यासाठी तडफडू लागतो. तो दारे, खिडक्या उघडायला सांगतो. त्याच्या अंगाला घाम फुटून त्याचे हात-पाय थंड पडतात.
६ अ ३. दम्याचा झटका नाहीसा होणे
शेवटी खोकला येऊन अल्पसा कफ बाहेर पडल्यावर दम्याचा झटका नाहीसा होतो.
६ अ ४. धापेचा अवधी : काही मिनिटे ते काही घंटे (तास)
जवळजवळ ६५ टक्के रुग्णांचा दमा हा मानसिक कारणांमुळे झालेला असतो. केवळ ३५ टक्के रुग्णांमध्ये अॅलर्जी किंवा फुफ्फुसाचा गंभीर विकार यांमुळे दमा लागतो. ६५ टक्के रुग्णांत मनावर ताण आला की, शरिरावरही ताण येतो. त्यामुळे छातीचे स्नायू आवळले जाऊन श्वासोच्छ्वास करायला त्रास होतो, म्हणजेच दमा लागतो.
६ आ. उपचार
६ आ १. सर्वसाधारण उपचार
अ. दमा लागण्याचे जे कारण असेल, त्यानुसार उपचार करण्यात येतात.
आ. प्रत्यक्षात दमा लागलेला असतो, त्या वेळी रुग्णाला व्यवस्थितपणे श्वासोच्छ्वास कसा करता येईल, याला प्राधान्य द्यावे लागते.
इ. श्वासनलिका प्रसरण पावण्याच्या दृष्टीने गोळ्या, औषधे, इंजेक्शन इत्यादी उपचार करण्यात येतात.
ई. दम्याचा त्रास अधिक असल्यास रुग्ण प्राणवायूअभावी गुदमरू नये; म्हणून त्याला कधीकधी प्राणवायू द्यावा लागतो.
६ आ २. संमोहनावस्थेत द्यावयाच्या सर्वसाधारण स्वयंसूचना
संमोहनशास्त्राद्वारे रुग्ण कोणत्या प्रकारच्या मानसिक ताणाला बळी पडतो ?, हे शोधून त्या ताणाच्या वेळी मन निर्विकार कसे ठेवायचे आणि शरिराचा ताण कसा अल्प करायचा, हे शिकवण्यात येते. त्यायोगे छातीचे स्नायू सैल रहातात आणि दमा लागत नाही. अशा प्रकारे बरा झालेला रुग्ण ब्राँकोडायलेटर औषधांच्या कचाट्यातून पूर्णपणे सुटतो.
ज्या गोष्टींचा रुग्णाच्या मनावर ताण येत असेल, त्या गोष्टींना तोंड द्यायला संमोहन उपचाराद्वारे रुग्णाला शिकवल्यास दम्याचा विकार बरा होतो. संमोहन उपचाराद्वारे भावनाप्रधानता, एकलकोंडेपणा यांसारखे स्वभावदोष घालवून रुग्णाचे व्यक्तीमत्त्व निरोगी केल्यास व्यक्तीचा दमा नेहमीसाठी बरा होतो. येथे लक्षात ठेवण्यासारखे महत्त्वाचे सूत्र म्हणजे प्रत्यक्ष दम्याचा झटका येईल, त्या वेळी रुग्ण स्वसंमोहन करू शकत नाही; म्हणून अशा वेळी रुग्णाने औषधेच घ्यावीत.
६ आ ३. संमोहनावस्थेत द्यावयाच्या विशिष्ट स्वयंसूचना
६ आ ३ अ. दमा लागणार असल्यास त्याची पूर्वसूचना मिळण्यासाठी मनाला सूचना देणे
पुष्कळ रुग्णांना धाप लागणे, हा विकार होणार असल्याची पूर्वसूचना मिळत नाही. पूर्वसूचना मिळाल्यास रुग्ण स्वसंमोहनाचे अभ्याससत्र करून किंवा या विकारावरील औषध घेऊन दमा लागण्याचा येणारा झटका टाळू शकतात. संमोहनावस्थेत पुढीलप्रमाणे सूचना दिल्यास रुग्णाला दमा लागणाच्या झटक्याची पूर्वसूचना मिळू शकते. मला दम्याचा झटका येणार असेल, त्या वेळी त्याची पूर्वसूचना मिळेल, अशा प्रकारच्या सूचनेमुळे झटका येण्याआधीच रुग्णाचे अंतर्मन त्याच्या बाह्यमनाला त्याची जाणीव करून देते.
६ आ ३ आ. मनावर ताण येणार्या प्रसंगात दमा लागणे
परीक्षा आणि चाकरीसाठी मुलाखत अशांसारख्या महत्त्वाच्या प्रसंगी दमा लागू नये, यासाठी प्रसंगाचा सराव मनात करणे, या संमोहन उपचार पद्धतीचा वापर करावा.
६ इ. उपचारामुळे होणारा लाभ
३३ टक्के रुग्णांत दमा हा विकार मानसिक कारणांमुळे झालेला असतो आणि तो संमोहन उपचाराने पूर्णपणे बरा होतो. दुसर्या ३३ टक्के रुग्णांना मानसिक आणि शारीरिक अशा दोन्ही कारणांमुळे धाप लागते; म्हणूनच संमोहन उपचाराने त्यांना ५० टक्के लाभ होतो. म्हणजे गोळ्या, औषधे, इंजेक्शन ५० टक्क्यांहून अल्प प्रमाणात घ्यावी लागतात. उर्वरित ३४ टक्के रुग्णांत शारीरिक कारणांमुळे दमा लागत असल्यामुळे त्यांना केवळ १० – २० टक्के एवढाच लाभ होतो; कारण दमा या विकाराचा स्वीकार करायला त्यांचे मन शिकल्यामुळे, दम्याच्या भीतीमुळे निर्माण होणारी काळजी मनात निर्माण होत नाही आणि काळजी न्यून झाल्यामुळे दम्यामध्ये घट होते. कोणत्या रुग्णाला किती टक्के लाभ होईल, हे निश्चित सांगणे कठीण असल्यामुळे श्वासरोगाच्या प्रत्येक रुग्णानेच संमोहन उपचार शिकणे आवश्यक आहे. स्वसंमोहन उपचारामुळे त्यांचा दमा पूर्ण बरा होईल किंवा न्यून होईल, हे निश्चित !
६ ई. साधना
प्रत्येक दमा लागणार्या व्यक्तीने पुढील साधनामार्गाचा अवलंब केल्यास त्याला निश्चितच लाभ होतो.
६ ई १. अखंड नामजप
यामुळे परत कधी दमा लागेल, हा विचार, तसेच स्वभावदोषांमुळे निर्माण होणारे चुकीचे विचार आणि भावना मनात येत नाहीत. त्यामुळे अंतर्मनातील काळजी न्यून होऊन दमा लागण्याचे प्रमाण न्यून व्हायला लागते.
६ ई २. प्राणायाम
प्राणायामामुळे शरिरात प्राणवायू न्यून असला, तरी सर्व प्रक्रिया सुरळीतपणे चालू ठेवण्याचा शरिरातील प्रत्येक पेशीला सराव होतो; म्हणूनच दमा लागला, तरी अधिक त्रास होत नाही.
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ शारीरिक विकारांवर स्वसंमोहन उपचार)
७. न्यूनगंड
न्यूनगंड म्हणजे स्वतःला इतरांपेक्षा न्यून लेखणे. न्यूनगंडापासून सुटका कशी करायची, हे पहाण्याआधी कोणत्या कारणांमुळे न्यूनगंड निर्माण होऊ शकतो, ते पहाणे महत्त्वाचे आहे. अल्प उंची, तरुण वयात टक्कल, दात बाहेर असणे, स्त्रियांमध्ये छाती सपाट असणे इत्यादी अनेक शारीरिक व्यंगामुळे न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. उंची किंवा रंग यांसारख्या गोष्टींत काही करणे अशक्य असते. मग न्यूनगंड घालवायचा कसा ? जाडपणा प्रयत्नांनी दूर करता येतो. दात बाहेर असणे, स्त्रियांमध्ये सपाट छाती असणे अशांसारखी व्यंगे दंतवैद्य आणि शल्यविशारद यांचे साहाय्य घेऊन दूर करता येतात; पण तरीही अशा गोष्टींमुळे वाटणारा न्यूनगंड बर्याच जणांचा शस्त्रकर्मानंतरही अल्प होत नाही.
७ अ. उपचार
७ अ १. स्वतःच्या मनावर स्वतःचे स्वभावदोष बिंबवून स्वयंसूचना देणे
न्यूनगंडापासून सुटका व्हावी, किंबहुना न्यूनगंड निर्माण होऊ नये; म्हणून स्वभावातील दोष दूर करणे आवश्यक असल्याचे लक्षात आले असेलच; पण स्वभावातील दोष घालवून न्यूनगंड नाहीसा करण्यासाठी आधी स्वतःच्या मनावर स्वतःचे स्वभावदोष कोणते आहेत, ते बिंबवणे आवश्यक असते. त्यासाठी ते वारंवार आठवावे लागतात. नंतर मनाला स्वभावातल्या दोषांमुळे मनात चुकीचे विचार किंवा चुकीच्या भावना येतील किंवा हातून एखादी चुकीची कृती घडत असेल, तेव्हा मला त्याची जाणीव होऊन ते थांबवता येईल, अशी सूचना काही आठवडे दिली की, हळूहळू तसे घडायला लागते आणि स्वभावातील दोष नाहीसे व्हायला लागतात अन् एक समृद्ध व्यक्तीमत्त्व निर्माण होते. अशा व्यक्तीच्या हातून न्यूनगंड निर्माण होण्यासारखी कृती घडत नाही किंवा लहानसहान क्षुल्लक गोष्टींचा विचार किंवा खंत ती वाटून घेत नाही. तिचा जीवनाकडे बघायचा दृष्टीकोन निरोगी आणि विशाल होतो.
यासोबत वरील विशिष्ट स्वभावदोष असल्यास त्यांसाठीही स्वयंसूचना पद्धतींनुसार सूचना देऊ शकतो.
७ अ २. चुकीचा दृष्टीकोन पालटण्यासाठी योग्य त्या सूचना देऊन त्याविषयी वाटणारी खंत अल्प करता येणे
मनाचे अपूर्ण व्यवहार (Unfinished business), उदा. भूतकाळातील घटनेविषयी अपराधीपणा वाटत असल्यास स्वतःचा चुकीचा दृष्टीकोन पालटण्यासाठी योग्य सूचना देऊन त्याविषयी वाटणारी खंत अल्प करता येते. आपल्यामुळे एका कामगाराचा मृत्यू ओढवला, अशी खंत बाळगणार्या एका अधिकार्याला पटवून दिले, जाणूनबुजून हत्या केलेल्या हत्यार्यालासुद्धा केवळ जन्मठेपेचीच शिक्षा होते आणि १० – १२ वर्षे शिक्षा भोगल्यानंतर कारागृहातून त्याची मुक्तता होऊ शकते. तुम्ही तर २५ वर्षे मनाशी खंत बाळगून आहात. स्वतःला त्रास करून घेतला, म्हणजे एक प्रकारेे २५ वर्षे शिक्षाच भोगली. तुमच्या हातून अपराध घडला, असे गृहित धरले, तरी अपराधाच्या मानाने ही शिक्षा फारच झाली. हे पटवून देत असतांनाच हळवेपणा न्यून करून जगात वावरतांना व्यवहारी दृष्टीकोन कसा ठेवायचा, हेही त्यांना शिकवल्यामुळे त्यांचा न्यूनगंड नाहीसा झाला.
७ अ ३. स्वभाव पालटण्यासाठी स्वयंसूचनांचा विचार स्वसंमोहित अवस्थेत केल्यास योग्य ते पालट घडून येणे
न्यूनगंड अती असल्यास व्यक्ती आपल्यातील त्रुटींचाच विचार करत रहाते. अशा व्यक्तीला तिच्यातील चांगले गुण, शरिराचे स्वास्थ्य, बुद्धीचा आवाका आणि क्षमता यांची जाणीव करून देणे आवश्यक असते. त्यामुळे आपण समजतो तितके न्यून नाही, असा आत्मविश्वास तिच्यात वाढीला लागतो आणि न्यूनगंडापासून तिची सुटका व्हायला साहाय्य होते. स्वभाव पालटण्याच्या, चुकीचे विचार काढून टाकण्याच्या स्वयंसूचनांचा विचार स्वसंमोहित अवस्थेत केल्यास योग्य ते पालट काही मासांतही (महिन्यांतही) घडून येतात.
७ अ ४. मनाला प्रोत्साहन देण्यासाठी गुणांचे अवलोकन करून स्वयंसूचना देणे
व्यक्तीने स्वतःच्या मनाला स्वतःची शरीरयष्टी, बुद्धीची क्षमता अशा चांगल्या गुणांची जाणीव करून दिल्यास मी समजत होतो तितका मी हीन नाही, असा आत्मविश्वास तिच्यात निर्माण होऊ लागतो आणि न्यूनगंड या स्वभावदोषापासून तिची सुटका होण्यास साहाय्य होते. यासाठी मला ही जाणीव होईल की, माझ्यात (अमुक) शारीरिक, (अमुक) मानसिक, (अमुक) बौद्धिक आणि (अमुक) आध्यात्मिक गुण आहेत; म्हणून मी या गुणांच्या आधारे स्वतःचे जीवन यशस्वी करण्याचा प्रयत्न करू शकेन, अशी स्वयंसूचनाही देऊ शकतो. अशी सूचना देण्यासाठी आपण कुटुंबीय, मित्र आणि सहयोगी व्यक्ती यांना आपल्यातील चांगल्या गुणांसंबंधी विचारू शकतो.
संदर्भ : सनातनचा ग्रंथ मनोविकारांवर स्वसंमोहन उपचार – भाग १
८. अन्य विकार
८ अ. काही मानसिक विकार
सनातनचा ग्रंथ मनोविकारांवर स्वसंमोहन उपचार (२ भाग) यात पुढील विकारांवर विवेचन केले आहे.
१. निद्रानाश
२. अंथरुणात लघवी करणे, नखे कुरतडणे, झोपेत लाळ गळणे आणि झोपेत बोलणे-चालणे इत्यादी
३. एखादी कृती करतांना भीती वाटणे
४. मंत्रचाळेपणा
५. काळजीमुळे होणारे शारीरिक रोग
६. काही स्वभावदोष :
अ. निर्णय घेता न येणारा
आ. अतीचिकित्सक
इ. एकलकोंडा
ई. दुसर्याच्या आधाराची आवश्यकता भासणारा
उ. दुसर्याचे लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न करणारा (Hysterical)
ऊ. दुसर्यांना उगाचच दोष देणारा; टीका करणारा, चिकित्सकबुद्धी नसलेला, हट्टी आणि तारतम्य भाव न्यून असलेला
ए. भांडखोर, रागीट आणि
ऐ. संशयी
७. परीक्षेत अपयश येण्याची विविध कारणे आणि त्यांवरील उपचार :
अ. अभ्यास न करणे
आ. अभ्यास करतांना मन एकाग्र न होणे
इ. स्मरणशक्ती अल्प असणे
ई. परीक्षेची भीती वाटणे आणि
उ. घरी प्रश्नांची उत्तरे देता येणे; पण शाळेत देता न येणे
८. झोपेत बोलण्याची सवय
९. भीती, उदा. परीक्षेची, गर्दीची, बसने प्रवास करण्याची, भयानक भीती
१०. व्यसनमुक्ती
११. निरर्थक विचारध्यास (Obsession) आणि कृतीविषयी अट्टाहास (Compulsion)
१२. आभास (Hallucinations)
१३. आत्महत्येचे विचार
१४. उन्माद आणि निराशा
८ आ. काही शारीरिक विकार
सनातनचा ग्रंथ शारीरिक विकारांवर स्वसंमोहन उपचार यात पुढील विकारांवर विवेचन केले आहे.
१. डोकेदुखी
२. स्थूलपणा
३. तोतरेपणा
४. मान वाकडी होणे
५. आकडी (फिट येणे)
८ इ. काही लैंगिक समस्या
सनातनचा ग्रंथ लैंगिक समस्यांवर स्वसंमोहन उपचार यात पुढील विकारांवर विवेचन केले आहे.
१. शीघ्र वीर्यपतन
२. नपुंसकत्व
३. समसंभोगीपणा
(सविस्तर विवेचनासाठी वाचा : सनातनचे ग्रंथ संमोहनशास्त्र आणि संमोहन-उपचार आणि सुखी जीवनासाठी संमोहन-उपचार)