वैशिष्ट्ये अभ्यासण्यासाठी ‘यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’
या उपकरणाद्वारे ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने केलेली वैज्ञानिक चाचणी !
१. वैज्ञानिक चाचणी करण्याचा उद्देश
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील सर्व अडथळे दूर व्हावेत आणि साधकांवरील संकटांचे निवारण व्हावे, यांसाठी भृगु महर्षींच्या आज्ञेने सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात ४ आणि ५.११.२०१६ या दिवशी बगलामुखी-ब्रह्मास्त्र याग करण्यात आला. तसेच सप्तर्षि जीवनाडीपट्टीतून महर्षींनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे ६.११.२०१६ या दिवशी प.पू. डॉक्टरांच्या ‘उत्तराषाढा’ या जन्मनक्षत्रावर विशेष महागणपति होम आणि ब्रह्मास्त्र याग करण्यात आला. ब्रह्मास्त्र यागाच्या वेळी श्री बगलामुखी देवी, श्री काळभैरव आणि नवग्रह देवता यांचे पूजन करण्यात आले. या पूजाविधीत देवतांना श्रीफळ (नारळ) समर्पित करण्यात आले. ‘पूजाविधीत श्रीफळ समर्पित केल्याने आध्यात्मिकदृष्ट्या काय लाभ होतो ?’, हे वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासण्याच्या उद्देशाने ‘यू.टी.एस्.’ या उपकरणाद्वारे ७.११.२०१६ या दिवशी ही चाचणी घेण्यात आली.
२. चाचणीचे स्वरूप
या चाचणीत सर्वसाधारण नारळ, पूजाविधीतील तडा गेलेला नारळ आणि पूजाविधीतील तडा न गेलेला नारळ यांची ‘यू.टी.एस्.’ उपकरणाद्वारे निरीक्षणे करण्यात आली. या सर्व निरीक्षणांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला.
३. वैज्ञानिक चाचणीतील घटकांविषयी माहिती
नारळात देवतांची स्पंदने आकृष्ट करण्याची आणि ती प्रक्षेपित करण्याची क्षमता असल्याने नारळाला सर्वांत शुभफल; म्हणजेच ‘श्रीफळ’ म्हटले जाते. त्यामुळे पूजाविधीत देवतांना श्रीफळ समर्पित करतात. (श्रीफळ आणि पूजेतील विविध घटकांची सविस्तर माहिती सनातनचा ग्रंथ ‘पूजासाहित्याचे महत्त्व’ यात दिली आहे.)
३ अ. सामान्य नारळ
हा सर्वसाधारण नारळ आहे.
३ आ. पूजाविधीतील तडा गेलेला नारळ
पूजाविधीत देवतेला समर्पित केलेल्या नारळात संबंधित देवतेची स्पंदने आकृष्ट होऊन ती वातावरणात प्रक्षेपित होत असतात. असे होऊ नये, यासाठी वाईट शक्ती त्या नारळावर आक्रमण करतात. त्यामुळे नारळाला तडे जातात. बगलामुखी-ब्रह्मास्त्र याग आणि महागणपति होम या विधींच्या वेळी देवतांना समर्पित केलेल्या ६ नारळांपैकी ४ नारळांना तडे गेले. चाचणीसाठी वापरलेला नारळ तडे गेलेल्या ४ नारळांपैकी एक आहे.
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट (त्रासदायक) शक्ती कार्यरत असतात. साधना केल्याने साधकाकडे चांगल्या शक्ती आकृष्ट होतात. साधनेमुळे वातावरणातील चांगल्या शक्तीचे आधिक्यही वाढते आणि वाईट शक्तींची शक्ती घटते. असे होऊ नये, यासाठी वाईट शक्ती साधकांच्या साधनेत विघ्ने आणतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा पुराणांत आहेत.
३ इ. पूजाविधीतील तडा न गेलेला नारळ
हा बगलामुखी-ब्रह्मास्त्र याग आणि महागणपति होम या विधींच्या वेळी देवतांना समर्पित केलेल्या नारळांपैकी एक आहे. याला तडा गेलेला नाही.
४. ‘यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ उपकरणाद्वारे प्रभावळ मोजणे
४ अ. ‘यू.टी.एस्’ उपकरणाची ओळख
या उपकरणाला ‘ऑरा स्कॅनर’ असेही म्हणतात. या उपकरणाद्वारे घटकाची (वस्तू, वास्तू, प्राणी आणि व्यक्ती यांची) ऊर्जा आणि त्याची प्रभावळ मोजता येते. हे उपकरण भाग्यनगर, तेलंगणा येथील भूतपूर्व परमाणू वैज्ञानिक डॉ. मन्नम मूर्ती यांनी वर्ष २००३ मध्ये विकसित केले. ‘वास्तू, वैद्यकशास्त्र, पशूवैद्यक शास्त्र, तसेच वैदिक शास्त्र यांमध्ये येणार्या अडचणींचे निदान करण्यासाठी या उपकरणाचा वापर करता येतोे’, असे ते सांगतात.
४ आ. उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण
४ आ १. नकारात्मक ऊर्जा : ही ऊर्जा हानीकारक असते. याअंतर्गत पुढील २ प्रकार येतात.
अ. अवरक्त ऊर्जा (इन्फ्रारेड) : यात घटकापासून प्रक्षेपित होणारी ‘इन्फ्रारेड’ ऊर्जा मोजतात.
आ. जंबुपार ऊर्जा (अल्ट्राव्हायोलेट) : यात घटकापासून प्रक्षेपित होणारी ‘अल्ट्राव्हायोलेट’ ऊर्जा मोजतात.
४ आ २. सकारात्मक ऊर्जा : ही ऊर्जा लाभदायी असून ती मोजण्यासाठी स्कॅनरमध्ये सकारात्मक ऊर्जा दर्शवणारा +Ve हा नमुना ठेवतात.
४ आ ३. ‘यू.टी.एस्’ उपकरणाद्वारे घटकाची प्रभावळ मोजणे : प्रभावळ मोजण्यासाठी त्या घटकाची सर्वाधिक स्पंदने असणारा नमुना (सॅम्पल) वापरतात, उदा. व्यक्तीच्या संदर्भात तिची लाळ किंवा तिचे छायाचित्र, वस्तूच्या संदर्भात त्याचे छायाचित्र, वनस्पतीच्या संदर्भात तिचे पान, प्राण्याच्या संदर्भात त्याचे केस, वास्तूच्या संदर्भात तेथील माती किंवा धूळ आणि देवतेच्या मूर्तीच्या संदर्भात मूर्तीला लावलेले चंदन, गंध, शेंदूर आदी.
४ इ. ‘यू.टी.एस्’ उपकरणाद्वारे करायच्या परीक्षणाची पद्धत
चाचणीत वस्तूतील अनुक्रमे इन्फ्रारेड ऊर्जा, अल्ट्राव्हायोलेट ऊर्जा आणि सकारात्मक ऊर्जा मोजतात. त्या मोजण्यासाठी लागणारे नमुने (सॅम्पल्स) ‘यू.टी.एस्’ या स्कॅनरसमवेत दिलेले असतात. वरील तीन परीक्षणांनंतर शेवटी वस्तूची प्रभावळ मोजतात आणि त्यासाठी सूत्र ‘४ आ ३’ मध्ये दिल्याप्रमाणे नमुने वापरतात.
वस्तूतील किंवा वास्तूतील ‘इन्फ्रारेड’ ऊर्जा मोजण्यासाठी ‘यू.टी.एस्’ या स्कॅनरमध्ये प्रथम ‘इन्फ्रारेड’ ऊर्जा मोजण्यासाठी लागणारा नमुना ठेवतात. त्यानंतर परीक्षण करणारी व्यक्ती स्कॅनर विशिष्ट पद्धतीने हातात घेऊन ज्या वस्तूचे परीक्षण करायचे आहे, त्या वस्तूच्या समोर साधारण एक फुटावर उभी रहाते. त्या वेळी स्कॅनरच्या दोन भुजांमध्ये होणारा कोन त्या वस्तूतील ‘इन्फ्रारेड’ ऊर्जेचे प्रमाण दर्शवतो, उदा. स्कॅनरच्या भुजा १८० अंशाच्या कोनात उघडल्यास त्या वस्तूत ‘इन्फ्रारेड’ ऊर्जा पूर्णपणे आहे आणि स्कॅनरच्या भुजा मुळीच न उघडल्यास (म्हणजेच ० अंशाचा कोन) त्या वस्तूत ‘इन्फ्रारेड’ ऊर्जा मुळीच नाही, हे कळते. स्कॅनरच्या भुजा १८० अंशाच्या कोनात उघडल्यास ‘भुजांनी केलेला हा कोन त्या वस्तूपासून किती दूरपर्यंत टिकून रहातो ?’, हे मोजतात. मोजलेले हे अंतर, म्हणजेच त्या वस्तूतील ‘इन्फ्रारेड’ ऊर्जेची प्रभावळ होय. स्कॅनरच्या भुजा १८० अंशापेक्षा अल्प अंशाच्या कोनात उघडल्यास त्याचा अर्थ ‘त्या वस्तूभोवती ‘इन्फ्रारेड’ ऊर्जेची प्रभावळ नाही’, असा होतो. अशाच प्रकारे अनुक्रमे अल्ट्राव्हायोलेट ऊर्जा, सकारात्मक ऊर्जा आणि त्या वस्तूतील विशिष्ट स्पंदनांची प्रभावळ मोजतात.
५. चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता
अ. उपकरण हाताळणारी व्यक्ती आध्यात्मिक त्रास (नकारात्मक स्पंदने) नसलेली होती.
आ. उपकरण हाताळणार्या व्यक्तीने परिधान केलेल्या वस्त्रांच्या रंगाचा परिणाम चाचणीवर होऊ नये, यासाठी त्या व्यक्तीने पांढरी वस्त्रे परिधान केली होती.
६. ‘यू.टी.एस्. (Universal Thermo Scanner)’
उपकरणाद्वारे केलेली निरीक्षणे, त्यांचे विवेचन आणि निष्कर्ष
टीप : स्कॅनर १८० अंशाच्या कोनात उघडल्यासच त्या घटकाची प्रभावळ मोजता येते. त्यापेक्षा अल्प अंशाच्या कोनात स्कॅनर उघडला, तर त्याचा अर्थ ‘त्या घटकाभोवती प्रभावळ नाही’, असा होतो.
६ अ. सारणीतील नकारात्मक ऊर्जेसंदर्भातील निरीक्षणांचे विवेचन
६ अ १. सर्वसाधारण नारळाच्या तुलनेत पूजाविधीतील तडा गेलेल्या नारळात पुष्कळ अधिक प्रमाणात नकारात्मक ऊर्जा आढळणे : सर्वसाधारण नारळाचे निरीक्षण करतांना तेथे थोड्या प्रमाणात अल्ट्राव्हायोलेट ऊर्जा (म्हणजे नकारात्मक ऊर्जा) आढळली; परंतु पूजाविधीतील तडा गेलेल्या नारळाचे निरीक्षण करतांना तेथे इन्फ्रारेड आणि अल्ट्राव्हायोलेट (नकारात्मक) ऊर्जा पुष्कळ प्रमाणात आढळली. तसेच इन्फ्रारेड आणि अल्ट्राव्हायोलेट ऊर्जा अनुक्रमे १.३३ मीटर आणि १.५७ मीटर परिसरात प्रक्षेपितही होत आहे. यावरून ‘पूजाविधीतील तडा गेलेल्या नारळावर वाईट शक्तींचे आक्रमण झाल्याने त्यातून (नारळातून) सकारात्मक ऐवजी नकारात्मक ऊर्जा प्रक्षेपित होते’, हे लक्षात येते.
६ अ २. पूजाविधीतील तडा न गेलेल्या नारळामध्ये नकारात्मक ऊर्जा मुळीच न आढळणे : सर्वसाधारण वास्तू किंवा वस्तू यांच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा असू शकते; पण पूजाविधीतील तडा न गेलेल्या नारळाचे निरीक्षण करतांना तेथे नकारात्मक ऊर्जा अजिबात आढळली नाही.
६ आ. सारणीतील सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षणांचे विवेचन
६ आ १. सर्वसाधारण नारळ आणि तडा गेलेला नारळ यांच्या तुलनेत तडा न गेलेल्या नारळामध्ये अधिक प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आढळणे : सर्वच वास्तू किंवा वस्तू यांमध्ये सकारात्मक ऊर्जा असतेच, असे नाही; पण चाचणीतील सर्वसाधारण नारळ आणि तडा गेलेला नारळ यांमध्ये काही प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आढळली; कारण नारळ हे मुळात सात्त्विक फळ आहे. पूजाविधीतील तडा न गेलेल्या नारळात सर्वाधिक सकारात्मक ऊर्जा आढळली; कारण त्यात देवतांची स्पंदने ग्रहण झाली होती.
६ इ. सारणीतील वस्तूच्या प्रभावळीच्या संदर्भातील निरीक्षणांचे विवेचन
६ इ १. सर्वसाधारण नारळ आणि तडा गेलेला नारळ यांच्या तुलनेत तडा न गेलेल्या नारळाची प्रभावळ पुष्कळ अधिक असणे : सामान्य व्यक्तीची प्रभावळ साधारण १ मीटर असते. सर्वसाधारण नारळाची प्रभावळ १.१९ मीटर, तर तडा गेलेल्या नारळाची प्रभावळ १.८५ मीटर आहे; म्हणजे सर्वसाधारण व्यक्तीच्या प्रभावळीच्या तुलनेत अधिक आहे. तडा न गेलेल्या नारळाची प्रभावळ ५.४५ मीटर; म्हणजे चाचणीतील अन्य दोन्ही नारळांच्या तुलनेत पुष्कळ अधिक आहे. याचे कारण नारळाला तडा न गेल्याने त्यात आकृष्ट झालेली दैवी स्पंदने अखंड टिकून राहिली.
७. निष्कर्ष
‘पूजाविधीत देवतांना समर्पित केलेल्या नारळात देवतांची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्याची क्षमता असते अन् त्याचा समष्टीला आध्यात्मिक स्तरावर लाभ होतो’, हे या वैज्ञानिक चाचणीतून सिद्ध झाले. तसेच ‘वाईट शक्ती पूजाविधीतील चैतन्याचा लाभ आपल्याला मिळू नये म्हणून कशा प्रकारे अडथळे आणतात’, हेही लक्षात आले.
हिंदु धर्मातील पूजाविधी आणि त्यात वापरण्यात येणार्या विविध घटकांची (उदा. हळद-कुंकू, अक्षता, सुपारी, पुष्प-पत्री, फळे) आपल्या ऋषिमुनींनी विचारपूर्वक योजना करून ठेवली आहे. हिंदु धर्मातील प्रत्येक धार्मिक विधी हा शास्त्रशुद्ध ‘अध्यात्मशास्त्रीय प्रयोग’च आहे. धन्य ते ऋषिमुनी आणि धन्य तो महान हिंदु धर्म ज्यांनी जगाला हा अमूल्य ठेवा दिला !
– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय (१४.११.२०१६)
ई-मेल : [email protected]