हिंदूंनो, कृपा करून ‘सर्व धर्म सारखे’, असे म्हणू नका ! – मारिया वर्थ

मारिया वर्थ यांचा परिचय

mariya_varthमारिया वर्थ या मूळच्या जर्मनी येथील असून त्यांनी हॅम्बर्ग विश्‍वविद्यालयातून मानसशास्राचा अभ्यास केला आहे. पुढे ऑस्ट्रेलियाला जाण्याच्या नियोजनाने त्यांनी जर्मनी सोडले. मार्गात असलेल्या भारतात काही दिवसांसाठी भेट देण्याच्या हेतूने त्या भारतात उतरल्या. वर्ष १९८० च्या हरिद्वार येथील अर्ध कुंभमेळ्यात सहभागी झाल्या. त्या वेळी त्यांना तेथे उच्चकोटीचे संत भेटले. त्यांच्या आशीर्वादाने मारिया भारतातच राहिल्या आणि ऑस्ट्रेलियात पुढे कधीच गेल्या नाहीत. भारताच्या दिव्य आध्यात्मिक परंपरेचा त्यांनी अभ्यास केला आणि त्यांना झालेल्या ज्ञानाचा लाभ सर्व जर्मन लोकांना व्हावा, यासाठी विविध पुस्तके आणि लेख लिहिले.

पुढे त्यांना हे लक्षात आले की, हिंदु धर्मातील नीतीमूल्ये आणि शिकवणीच्या विरोधात पद्धतशीररित्या षड्यंत्रे आखली जात आहेत. याचा विरोध करण्यासाठी आणि जगाला हिंदु धर्माचे महत्त्व कळावे म्हणून मारिया यांनी इंग्रजी भाषेतही लिखाणास आरंभ केला. भारत आणि विदेशातील मुख्य प्रवाहातील प्रसिद्धीमाध्यमांच्या (‘मेनस्ट्रीम मीडिया’च्या) हिंदुद्वेषामुळे ते मारिया यांच्या लिखाणास प्रसिद्धी देत नसल्याने मारिया त्यांच्या ‘ब्लॉग’द्वारे हिंदु धर्माचा प्रचार-प्रसार आणि धर्मावरील आघात यांविषयी लिखाण करत असतात.


ख्रिस्ती धर्माच्या अतिशय कर्मठ, दुराग्रही आणि घुसमटून टाकणार्‍या वातावरणात वाढलेल्या मारीया वर्थ यांनी काही निरीक्षणे केलेली आहेत. मारिया वर्थ ख्रिस्ती धर्मात जन्मल्या आणि वाढल्या असल्या, तरी त्या हिंदु धर्मातील स्वातंत्र्य आणि मोकळेपणा या गोष्टींच्या नेहमीच प्रशंसक राहिल्या आहेत. हिंदु धर्म हा एक परिपूर्ण आयुष्य जगण्यासाठी सर्वोत्कृष्ट पर्याय असतांना काही हिंदू आपल्या हिंदु असण्याची जवळ जवळ लाज वाटल्यासारखे वागतात. ही गोष्ट मारिया वर्थ यांच्यासाठी नेहमीच कोड्यात टाकणारी राहिली आहे. मारिया वर्थ यांची हिंदूंविषयीची निरीक्षणे काय आहेत, ते येथे पाहूया.

१. हिंदू आधी म्हणायचे, ‘सर्व धर्म सारखे’. दुर्दैवाने हिंदूंना एक तर हे दिसत नव्हतं किंवा दिसत असलं तरी मान्य करायचं नव्हतं की, जगातले सर्वांत मोठे दोन धर्म ही समानता मान्य करायला कधीच सिद्ध नव्हते. हे दोन्ही धर्म म्हणतात, ‘आमचाच धर्म खरा. आमचा देव हाच एकमेव सर्वशक्तीमान आणि खरा परमेश्‍वर !’

२. ‘सर्व धर्म सारखे’ या गोष्टीवर विश्‍वास ठेवून हिंदु धर्मीय त्यांच्या धर्माला ख्रिस्ती आणि इस्लाम धर्मांच्या पातळीपर्यंत आणू इच्छितात. हा ख्रिस्ती आणि इस्लाम धर्मियांच्या दृष्टीने चेष्टेचा अन् दया दाखवण्याचा विषय होता. अर्थातच ‘ख्रिश्‍चॅनिटी’ आणि इस्लाम अशा समानतेला कधीच मान्यता देणार नाहीत, हे उघड होतं.

३. आता हिंदूंची वृत्ती असते, ‘आम्ही सर्व धर्मांचा आदर करतो. आम्ही हे आमच्या मुलांना शिकवतो.’ ख्रिश्‍चॅनिटी आणि इस्लाम यांविषयी हिंदूंच्या मुलांच्या कानावर येतं असतं की, हे दोन्ही धर्म किती छान आहेत.

४. आम्हाला कुणाला दुखवायचं नसल्याने आम्ही मुलांना हिंदु धर्माविषयी फारच अल्प शिकवतो आणि जे शिकवतो ते फारच वरवरचं असतं, म्हणजे उत्सव अन् काही प्रथा वगैरे. आम्ही खोलात जाऊन हिंदु तत्त्वज्ञान आणि आपल्या धर्माला असलेलं वैज्ञानिक अधिष्ठान याविषयी काहीच सांगत नाहीत; कारण एक तर मुळात आम्हाला त्याविषयी काही ठाऊक नसतं अन् असलं तरी ‘न सांगितलेलंच बर’; कारण उगाच हिंदु धर्म सगळ्यात चांगला हे त्यातून स्पष्ट झालं, तर इतर धर्मियांच्या भावना दुखावल्या जातील ना ?

५. लक्षात घ्या, हिंदु धर्मियांना मुळातून हे समजूनच घ्यायचं नसतं की, ख्रिश्‍चॅनिटी आणि इस्लाम हे हिंदु धर्माचा आदर करत नाहीत. त्या धर्मांचे मौलवी आणि पाद्री हे हिंदूंना उघडपणे सांगत नसले, तरी स्वधर्मियांना सतत सांगत असतात, ‘आपल्या धर्मात आले नाहीत, आपल्या देवाचं अस्तित्व मान्य केलं नाही, तर हिंदू नरकात जातील. आपण त्यांना अनुक्रमे जीझस आणि आकाशातला बाप अन् महंमद आणि अल्लाह यांच्याविषयी सांगूनही ते इतके जिद्दी आणि मूर्ख आहेत की, त्यांच्या खोट्या देवतांना ते अजूनही चिकटून आहेत. ही त्यांची घोडचूक आहे. गॉड/अल्लाह महान आहे. तो त्यांना त्यांच्या या चुकीची शिक्षा म्हणून असह्य नरकयातना देईल.’

६. हिंदूंच्या ‘आम्ही सर्व धर्मांचा आदर करतो’, या मताचं एक प्रतिरूप म्हणजे ‘सगळे धर्म एक उत्तम आणि चारित्र्यवान माणूस कसं व्हावं हे शिकवतात आणि माणसाला त्याच्या निर्मात्याकडे नेण्याचा, म्हणजेच परमेश्‍वराची भेट घडवून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतात.’ म्हणून मग हिंदू सर्वधर्मीय चर्चासत्रांमध्ये भाग घेतात आणि सगळ्या धर्मांमधल्या समान गोष्टी शोधण्याचा प्रयत्न करतात. अर्थात्च काही समान गोष्टी आहेतच; पण त्या सापडल्या रे सापडल्या की, हे हिंदू त्यावर समानतेचे ईमले बांधत सुटतात.

७. ‘हो, सगळ्या धर्मात चांगल्या गोष्टी आहेत’, ‘हो, सगळ्या धर्मात चांगले लोक असतात’, ‘सगळे धर्म चांगल्या गोष्टी शिकवतात’, ही पोपटपंची हिंदूंकडून इतक्या वेळा केली जाते, जणू काही ही गोष्ट ते स्वत:लाच समजावत असावेत; पण खरं सांगायचं झालं तर हिंदूंना कुठेतरी मनाच्या एका कोपर्‍यात हे ठाऊक असतं की, यात काहीही तथ्य नाही.

८. हिंदूंना हे ठाऊक असतं की, ख्रिश्‍चॅनिटी आणि इस्लाम हे केव्हाचे पथभ्रष्ट होऊन वेगळेपणाचा पुरस्कार आणि हिंदूंचा द्वेष करू लागले आहेत. या दोन्ही धर्मांनी नेहमी इतर धर्मियांचा छळ केला आहे आणि असंख्य हुशार अन् चांगल्या व्यक्तींचा बुद्धीभेद करून त्यांना अशा एका काल्पनिक परमेश्‍वरासाठी लढायला प्रवृत्त केलं आहे की, जो त्याच्यावर विश्‍वास न ठेवणार्‍यांचा आत्यंतिक द्वेष करतो.

९. ख्रिश्‍चॅनिटी आणि इस्लाम या दोन्ही धर्मांचा इतिहास हा रक्तलांच्छित आहे; पण हिंदूंनी आजवर याकडे दुर्लक्ष करणेच पसंत केलेलं आहे. जवळ जवळ एक सहस्र वर्षांच्या दमनचक्रातून जाऊनही ‘उगाच का डिवचायचं कुणाला’, ही घात करणारी भावनाच हिंदू अजूनही जोपासत आहेत.

१०. तुम्हाला असं वाटत नाही का की, आता हिंदूंनी नग्न व्यक्तीला नग्न म्हणायला प्रारंभ केला पाहिजे ?

११. स्वामी विवेकानंद म्हणून गेले आहेत की, ‘एका हिंदूने त्याच्या धर्माचा त्याग करणे म्हणजे केवळ ‘हिंदु धर्मात एक व्यक्ती अल्प होणे’ इतकाच त्याचा अर्थ होत नाही, तर हिंदूंच्या शत्रूमध्ये एकाची भर असा त्याचा अर्थ होतो.’

१२. स्वामीजींच्या मते ब्रिटीश राज्यात ख्रिस्ती आणि मुसलमान जनतेस श्रेष्ठत्वाची भावना जोपासण्यास सर्वतोपरी प्रोत्साहन दिले जायचे. हिंदूंना या विरोधात काहीही करता येईना, कारण त्यांची बाजू घेऊन ब्रिटीश सरकारशी भांडायच्या ऐवजी त्यांचे अनेक आंग्लाळलेले नेते ब्रिटिशांच्या घातक शैक्षणिक धोरणामुळे जाणतेपणे किंवा अजाणतेपणाने हिंदुत्वाचा सातत्याने अपमान करण्यात गुंतलेले होते. दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतरही हेच नेते सत्तेवर आल्याने तेच धोरण पुढे राबवले गेले.

१३. आता स्वातंत्र्याला ६९ वर्षे झाल्यावर मात्र हिंदु धर्म म्हणजे काय हे जगाला उच्चरवाने आणि निर्भीडपणे सांगण्याची वेळ आलेली आहे.

१४. हिंदुत्वाचा अर्थ जगावर राज्य करणे नव्हे ! हिंदुत्व म्हणजे कुठलाही पुरावा न देता पुढे रेटलेल्या एखाद्या अतार्किक समजुतीवर आंधळेपणाने विश्‍वास ठेवणे नाही.

१५. हिंदुत्व म्हणजे ‘स्वतःचा तो बाळ्या आणि इतरांचं ते कार्ट’ हेसुद्धा नव्हे.

१६. हिंदुत्व म्हणजे शरीर आणि मन यांच्या पलीकडे जाऊन सातत्याने ‘आपण (आत्मा) कोण आहोत’, याचा घेतलेला शोध होय !

१७. या भूमीतल्या प्राचीन काळच्या ॠषीमुनींना विविधतेमध्ये एकता म्हणजे काय ? याचा अर्थ केव्हाच कळला होता. अगदी पाश्‍चात्त्य समाजशास्त्रज्ञांच्या खूप आधी ! आनंद तत्त्वाचा शोध कुठेही बाहेर घेणे उपयोगाचे नसते, तर हे तत्त्व आपल्या सगळ्यांच्यात (इतकेच नव्हे तर चराचरात) भिनलेले असल्याने त्याचा शोध प्रत्येकाने स्वतःमध्येच घ्यायचा असतो.

१८. याचाच अर्थ आपण सारे एकाच ईश्‍वरी तत्त्वाचा अंश आहोत. आपण सगळे एका विशाल कुटुंबाचा भाग आहोत. ‘वसुधैव कुटुम्बकम् ।’- सगळ्या विश्‍वाला एक कुटुंब मानणारी ही धारणा सर्वसमावेशक आणि म्हणूनच अधिक स्वीकारार्ह नव्हे काय ?

– मारिया वर्थ

मूळ इंग्रजी लेख – PLEASE HINDUS, DON’T SAY : ‘‘ALL RELIGIONS ARE THE SAME – Maria Wirth

(संदर्भ : mariawirthblog.wordpress.com/2013/05/07/about-calling-a-spade-a-spade/)

पु.ल.देशपांडे यांच्या ‘म्हैस’ या कथेतील बगुनाना ही व्यक्तीरेखा !

बगुनाना हे उस्मान शेठ या मुसलमान व्यक्तीरेखेच्या डब्यातले आमलेट खातांना, ‘‘तुम्ही काहीऽऽऽऽ म्हणाऽऽऽऽ उस्मानशेऽऽऽऽठ, सर्व धर्म सारखे.’’ यावर कथाकथन ऐकत असलेल्या प्रेक्षकांत हशा उसळतो; पण यातल्या कळीच्या शब्दांकडे सगळ्यांचंच दुर्लक्ष होतं. ते म्हणजे, ‘तुम्ही काही म्हणा…’ उस्मानशेठ म्हणोत कि न म्हणोत, आम्ही मात्र सर्व धर्म सारखे म्हणत त्यांच्या डब्यातलं आमलेट जिभल्या चाटत हाणणार; पण उज्जैनमधले मदरसे इस्कॉन मंदिरातून पुरवल्या जाणार्‍या दुपारच्या जेवणाला ‘इस्लाम खतरे में हैं’ ची आरोळी देत झिडकारतात. त्याकडे मात्र आम्ही दुर्लक्ष करणार.

अशा हिंदूंना एकच सांगावंसं वाटतं…..

आता तरी म्हणू नका सर्व धर्म सारखे ।
म्हणणारे केव्हाच झाले जिवाला पारखे ॥

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात