राज्यकर्त्यांनो, जनतेला धर्मराज्य हवे आहे, हे लक्षात ठेवा !

‘धर्मनिष्ठ प्रजेलाच धर्मराज्य प्राप्त होते. तेव्हा प्रजेनेच आता स्वतःला पालटायला हवे. प्रजेच्या योग्यतेप्रमाणे तिला तिचा नेता किंवा राजा मिळतो, हे सूत्र लक्षात घेता जनतेने आता धर्मनिष्ठ व्हायची वेळ आली आहे. त्यासाठी आपण धर्मराज्य आणि निधर्मी राज्य यांची परंपरा आणि दोन्हीतील भेद पाहूया.

 

१. धर्मराज्य

१ अ. धर्मराज्याची परंपरा असलेला रघुवंश

कवी कुलगुरु कालीदास यांनी ‘रघुवंश’ नावाच्या त्यांच्या महाकाव्यात रघूच्या घराण्याचे वर्णन केले आहे. याच वंशात प्रभू श्रीराम जन्मले. त्यांचे राज्य ‘रामराज्य’ म्हणून सर्वच युगात ‘आदर्श राज्य’ ठरले. त्रेतायुगातील रघुवंशातील राजे धर्मराज्यासाठी प्रसिद्ध आहेत. यांतील रघु, दिलीप आणि राम, हे ३ राजे उदाहरण म्हणून घेऊ आणि त्यांच्या जीवनातील काही प्रसंग पाहू.

१ आ. पराक्रमी आणि त्यागी रघुराजा अन् त्याची निस्पृह प्रजा !

‘वरतंतू ऋषींचा शिष्य कौत्स त्याच्या गुरूंना गुरुदक्षिणा देण्यासाठी हव्या असलेल्या ‘१४ कोटी सुवर्णमुद्रा’ मागण्यासाठी रघुराजाकडे आला. ‘विश्‍वजीत्’ यज्ञात सर्व संपत्ती दान करून हातात पूजेसाठी मृण्मय पात्र (मातीचे भांडे) घेतलेल्या राजाकडे मागावे तरी कसे ?’ या विचारात असलेल्या कौत्साला राजाने येण्याचे प्रयोजन विचारले. तेव्हा त्याने येण्यामागील कारण सांगितले अन् ‘दुसरीकडे जातो’, असे म्हणाला. तेव्हा रघुराजाने सांगितले, ‘‘एक दिवस थांब. उद्या जा.’’ रघुराजाने कुबेरावर स्वारी करायची ठरवली. हे कुबेराला समजताच त्याने ‘रघुकडून पराजित व्हायला नको’, असा विचार करून रघूच्या कोशागाराजवळ असलेल्या आपट्याच्या झाडावर सुवर्णमुद्रांचा पाऊस पाडला. सकाळी उठून पहातात, तो आपट्याच्या झाडाखाली सुवर्णमुद्रांची रास. रघुराजाने सर्व सुवर्णमुद्रा कौत्साला दिल्या; पण कौत्साने गुरूंना द्यायला हव्या तेवढ्याच म्हणजे १४ कोटी सुवर्णमुद्रा घेतल्या. एकही मुद्रा अधिक घेण्यास त्याने नकार दिला. रघुराजानेही त्या घेतल्या नाहीत. सार्‍या सुवर्णमुद्रा प्रजाजनांना लुटायला सांगितल्या. तो दिवस दसर्‍याचा होता.

या प्रसंगावरून रघुराजा पराक्रमी, त्यागी, तात्काळ योग्य निर्णय घेणारा, प्रजेच्या अडचणी सोडवणारा होता. (त्याने प्रजेवर कर लादून कौत्सासाठी धन गोळा केले नाही.) आणि कौत्सही निस्पृह होता, हे दिसून येते.

१ इ. सेवाभावी, धार्मिक आणि गोसेवेचे व्रत घेतलेला राजा दिलीप !

राजा दिलीप आणि त्याची पत्नी सुदेष्णा यांनी पुत्रप्राप्तीसाठी नंदिनी नावाच्या गायीची सेवा केली. तेव्हा तो राजा स्वतः तिला पाणी पाजी, चारा घाली, गोठा झाडी आणि रानात चारायला नेई. एकदा वाघाने तिच्यावर झडप घातली. तेव्हा स्वतःचे प्राण धोक्यात घालून त्याने गायीचे रक्षण केले. त्यामुळे शंकर प्रसन्न झाला आणि त्याने दिलीप राजाला पुत्रप्राप्तीचा वर दिला.

या प्रसंगातून दिलीप राजाचा सेवाभाव, गोपूजनाचे व्रत निष्ठेने करण्याची धार्मिक वृत्ती, श्रद्धा अन् प्रजापालकत्व (गोरक्षण करणे) हे गुण दिसून येतात.

१ ई. प्रजेच्या आराधनेसाठी श्रीरामाने केलेला सीतात्याग !

एका रजकाने (धोब्याने) सीतेच्या चारित्र्यावर संशय घेतल्यानंतर निष्पाप सीतेचा (पत्नीचा) त्याग करणे, ही श्रीरामाच्या न्यायाची (म्हणजे प्रजानुरंजनाची) परमावधी आहे. त्याची पार्श्‍वभूमी आपण पाहूया. भवभूतीच्या ‘उत्तररामचरित’ नावाच्या नाटकात ‘जामातृयज्ञेन वयं निरुद्धाः…।’ या श्‍लोकात हा संदर्भ आढळतो.

दशरथाचे जावई ऋष्यशृंगऋषि यांच्याकडे पुत्रकामेष्टी यज्ञ होता. हा यज्ञ काही मास चालला होता. अयोध्येतील सर्व वडीलधारी माणसे तिकडे गेली होती. राजगुरु ब्रह्मर्षि वसिष्ठ अष्टावक्र ऋषींच्या माध्यमातून श्रीरामाला पुढील संदेश पाठवतात,

जामातृयज्ञेन वयं निरुद्धास्त्वं बाल एवासि नवं च राज्यम् ।
युक्तः प्रजानामनुरञ्जने स्यास्तस्माद्यशो यत्परमं धनं वः ॥ – उत्तररामचरित, अंक १, श्‍लोक ११

अर्थ : आम्ही (वसिष्ठादी ऋषि) दशरथाचे जावई ऋष्यशृंग यांच्या यज्ञामध्ये व्यग्र आहोत. तू (राम) अजून लहान आहेस आणि तुझ्यासाठी राज्यकारभारही नवीन आहे. त्यामुळे तू नेहमी प्रजेच्या हिताचा विचार करून प्रजेला आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्न कर; कारण ‘यश’ हेच तुमच्या वंशाचे परम धन आहे.

त्यावर श्रीराम उत्तरले, ‘‘तुम्ही काही काळजी करू नका. प्रजेसाठी कोणताही त्याग मी करीन. अगदी जानकीचा त्याग करावा लागला, तरी तोही करीन. मागे-पुढे पहाणार नाही.’’ त्याने तसे केले आणि सीतेनेही त्याला साथ दिली. राजाला अनेक पत्नी करायचा अधिकार असतांना त्याने दुसरा विवाह केला नाही. तेव्हा त्याने सीतेचा सोन्याचा पुतळा पत्नीच्या स्थानी ठेवून अश्‍वमेध (राजसूय) यज्ञ केला. सीतेनेही श्रीरामाला न्यायालयात खेचले नाही कि जनक राजाकडे हे प्रकरण नेले नाही. यातून दोघांचे एकमेकांवरील प्रेमच दिसून येते.

१ उ. धर्मनिष्ठ राजांची लक्षणे

१ उ १. गुण : हे राजे सात्त्विक, धर्मनिष्ठ, प्रजापालक, सदगुणी, त्यागी (सर्वस्वाचे समर्पण करणारे) आणि स्वतःचे दायित्व निभावणारे होते. ते प्रजेला आपली लेकरे मानून त्यांची काळजी घेत असत. या प्रजाहितदक्ष राजांची राजवट म्हणजे ‘पितृृशाही’ होती.

१ उ २. कर्तव्ये : ‘धर्मरक्षण आणि प्रजारक्षण करणे, हे क्षत्रियांचे धर्मकर्तव्य आहे’, असा भाव ठेवून हे राजे राज्य करत असत. गृहस्थाश्रम संपला की, राजपुत्राकडे राज्य सोपवून हे वानप्रस्थाश्रम स्वीकारत असत. प्रजेला न्याय देणे, अपराध्याला दंड देणे, प्रजेचे पुत्रवत् पालन करणे आणि शत्रूंचा नाश करणे, ही त्यांची कर्तव्ये होती.

१ उ ३. राजा आणि प्रजा यांचा एकमेकांकडे पहाण्याचा दृष्टीकोन : ब्राह्मण धर्मगुरूंच्या (उदा. वसिष्ठ ब्रह्मऋषींच्या) आज्ञेप्रमाणे राज्य चालवले जाई. राजे प्रजेला ईश्‍वर समजून ‘प्रजेची आराधना, म्हणजे पूजा करत आहोत’, या भावाने राज्य चालवत असत. त्यामुळे प्रजाजनांच्या मतांचा ते आदर करत असत. त्यांचे राज्यकारभार हे साधन, तर प्रजेला संतुष्ट (प्रसन्न) ठेवणे, हे साध्य होते. प्रजाही त्यांना पिता, पृथ्वीपती, रक्षणकर्ता, आणि ईश्‍वर, अशा आदराने अन् प्रीतीने हृदयात स्थान देत असे, तसेच प्रजा राजाज्ञा शीरोधार्य मानत असे.

१ उ ४. राजे स्वतःला पालटण्यासाठी हेरगिरी करीत ! : राजे दूतांकरवी अन्वेषण किंवा हेरगिरी करत, ती स्वतःविषयी लोकमत जाणून घेऊन स्वतःला पालटणे म्हणजे चांगला राजा बनणे यासाठी आणि शत्रूची कपट कारस्थाने जाणून घेऊन राज्यरक्षण म्हणजे देशरक्षण करण्यासाठी हेरगिरी करत असत.

 

२. निधर्मी राज्य

२ अ. स्वतंत्र भारतातील निधर्मी राज्य

निधर्मी राज्य हे धर्म राज्याच्या नेमके उलट असते. निधर्मी राज्यात धर्म आणि मोक्ष या दोन पुरुषार्थांना स्थान नसते. त्यामुळे धर्माचा (सत्त्वगुणाचा) र्‍हास होत जातो, तर अर्थ आणि काम हेच जीवनातील प्रधान हेतू बनतात. राजे विलासी आणि भोगवादी वृत्तीचे असतात. त्यांच्यातील रज-तम गुणांच्या प्राबल्यामुळे स्वत:ची कर्तव्ये करण्यात आणि निर्णयक्षमतेत ते अल्प पडतात. जनताही त्यांचे अनुकरण करते. त्याग, नीतीमत्ता आणि न्याय या गोष्टी दुय्यम दर्जाच्या असतात. तत्त्वनिष्ठेच्या ठिकाणी व्यक्तीनिष्ठा येते. फसवेगिरीला ऊत येतो. सदाचार जाऊन भ्रष्टाचार येतो. ईश्‍वराला म्हणजे धर्माला स्थान नसल्यामुळे सगळ्या क्षेत्रात सुंद-उपसुंद वृत्ती बळावते. त्यामुळे स्पर्धा, अहंकार, लाचारी, भ्रष्टाचार आणि सुखासीनता यांना उधाण येते. त्यामुळे जनता दुःख, दारिद्य्र अन् दैन्य यांनी जेरीस येते. बलात्कार, आत्महत्या नित्याच्याच होऊन बसतात. सध्या निधर्मी राज्य आपण अनुभवत आहोत. त्यामुळे त्याचे अधिक वर्णन करायची आवश्यकता नाही.

२ आ. स्वतंत्र भारतांतील निधर्मी राज्याची परंपरा असलेले नेहरू घराणे

२ आ १. शत्रू राष्ट्रात शांतीची कबुतरे उडवण्यात धन्यता मानणारे पंडित नेहरू ! : १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी फाळणी होऊन भारताला स्वातंत्र्य मिळाले. तेव्हा पाकिस्तान आणि सीमाभागातील हिंदूचे जीवन पूर्ण उद्ध्वस्त झाले. हिंदूंचा अनन्वित छळ झाला. लक्षावधी हिंदूंची हत्या झाली. हिंदू स्त्रियांवर अमानुष बलात्कार झाले. त्यांचे धर्मांतर केले गेले. त्यांची घरे-दारे लुटली गेली; पण तेव्हाच्या राजकर्त्यांना त्याचे काहीच वाटले नाही. तेव्हाही राजकर्त्याची वृत्ती पाकिस्तान धार्जिणीच होती. हिंदूंच्या संदर्भात हिंदु नेते सततच असंवेदनशील राहिले आहेत. मग तो विस्थापित काश्मिरी हिंदूंचा प्रश्‍न असो कि हिंदू नेत्यांच्या हत्येचा प्रश्‍न असो. हिंसेला बळी पडलेल्या हिंदु जनतेलाच अहिंसेचे ‘डोस’ पाजण्यात आणि शत्रू राष्ट्रात शांतीची कबुतरे उडवण्यात यांना धन्यता वाटत आली आहे. अशाप्रकारे स्वतंत्र भारतातील निधर्मी राज्यात हिंदू आणि त्यांची संस्कृती देशोधडीला लागली.

२ आ २. सात्त्विक संस्कृत भाषेला डावलून तमोगुणी इंग्रजीचा उदोउदो करणे आणि तिचा राज्यकारभारात वापर चालू ठेवणे : नेहरू ‘मी हिंदु असणे हा अपघात आहे’, असे म्हणायचे. त्यांच्यावर पाश्‍चात्त्य संस्कृतीचा पगडा होता. त्यांच्या बोलण्यात कधी हिंदु धर्माचा अभिमान आढळत नव्हता. भारतात संस्कृत भाषा ‘देव वाणी’ म्हणून ओळखली जाते. आजही हिंदूंचे सर्व धार्मिक विधी संस्कृतमधूनच केले जातात. संस्कृत भाषेत सर्व वेद वाङ्मय अन् दर्जेदार विपुल ग्रंथसंपदा आहे. या देवभाषेला उत्तेजन न देता त्यांनी सात्त्विक संस्कृत भाषा मृत म्हणून घोषित केली आणि तमोगुणी इंग्रजीचा उदोउदो करून तिचा राज्यकारभारात वापर चालू ठेवला.

२ आ ३. हिंदूंच्या धार्मिक गोष्टीत ते सहभागी नसणे : ‘सोरटी सोमनाथ’ मंदिराच्या जीर्णोद्धारात तेव्हाचे राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांचा सहभाग होता. ही गोष्ट त्यांना मुळीच आवडली नव्हती. हिंदु असूनही हिंदूंच्या धार्मिक गोष्टीत ते सहभाग घेत नसत.

२ आ ४. हिंदु जनतेची दिशाभूल करणे : ‘विदेशात जाऊन इंदिरा-फिरोज यांनी निकाह लावल्यानंतर मुसलमान झालेल्या त्यांचा भारतात आल्यानंतर (त्यांचे हिंदु धर्मात धर्मांतर न करताच) पुन्हा हिंदु पद्धतीने विवाह लावून राजकीय हेतूने त्यांना गांधी हे आडनाव बहाल करण्यात आले’, असे मी विद्यार्थीदशेत असतांना लोक बोलत असल्याचे ऐकले आहे. ते सत्य असेल, तर ‘एरव्ही धर्म न मानणार्‍या राजकर्त्यांनी हिंदु जनतेची दिशाभूल करण्याचा तो एक प्रयत्न होता’, असेच म्हणावे लागेल.

२ आ ५. राजीव गांधीच्या काळात ‘बोफोर्स घोटाळा’ झाला. त्यानंतर भारतात इतके घोटाळे झाले की, त्यांच्या सूचीचा एक ग्रंथच होईल.

 

३. जनतेनेच आता धर्मनिष्ठ बनण्याची आणि धर्माचरण करण्याची वेळ आली आहे !

जनतेला घोटाळेग्रस्त, आत्महत्यांचे वाढते प्रमाण असलेला, शत्रूंच्या आतंकवादी कारवायांनी जेरीस आलेला, निधर्मी भारत आवडेल कि घोटाळेमुक्त, सुखी-समृद्ध जीवन असलेला, आतंकवाद आणि परचक्र यांपासून मुक्त, असा धर्मनिष्ठ भारत आवडेल ? यासंदर्भात राजकर्त्यांनी ‘ऑन लाइन’ मतदान घेतल्यास ‘९० टक्के जनता धर्मनिष्ठ भारताच्या बाजूने कौल देईल’, असा विचार देवाने दिला; पण ‘धर्मराज्य’ केवळ मागून मिळत नसते, त्यासाठी अंगी पात्रता यावी लागते; म्हणून जनतेनेच आता धर्मनिष्ठ बनायची आणि धर्माचरण करायची वेळ आली आहे.’

देवा, तू सुचवलेस आणि लिहून घेतलेस, ते तुझ्याच चरणी अर्पण करते !’

– सौ. शालिनी मराठे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.(११.११.२०१६)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात