महान हिंदु तत्त्वचिंतक पू. सीताराम गोयल यांच्या स्मृतीदिनानिमित्त…
आज प्रखर हिंदुत्वनिष्ठ आणि महान हिंदु तत्त्वचिंतक पू. सीताराम गोयल यांचा स्मृतीदिन आहे. त्यानिमित्त त्यांनी राष्ट्र आणि धर्म यांविषयी मांडलेले तेजस्वी विचारधन प्रसिद्ध करत आहोत.
‘सनातन धर्म’ म्हणजे साम्राज्यवाद्यांच्या आक्रमणातून
तावून-सुलाखून निघालेली सुधारित वैभवशाली जीवनपद्धती !
‘सनातन धर्म ज्याला आपण हिंदु धर्म म्हणून ओळखतो, हा केवळ धर्मच नाही, तर अनादी काळापासून या देशाच्या कानाकोपर्यांत पसरलेली ती एक सुधारित वैभवशाली जीवनपद्धती आहे. तसेच साम्राज्यवाद्यांच्या आक्रमणातून तावून-सुलाखून निघालेला तो धर्म आहे. अन्य पंथांना मी धर्म मुळीच मानत नाही. ‘नाझीझम्’ आणि ‘कम्युनिझम्’ यांसारख्या साम्राज्यवाद्यांचे ते कल्पनाशास्त्र आहे. देवाच्या नावाखाली एका गटाने दुसर्या गटावर आक्रमण केले आणि नंतर त्याला कायदेशीर रूप दिले गेले. हिंदूंच्या विरोधात लढा उभारण्यासाठी माणसे सिद्ध केली जात आहेत. हिंदु धर्माला अन्य पंथांच्या बरोबरीने वागणारा निधर्मीवाद माझ्या दृष्टीने काही उपयोगाचा नाही.’ – पू. सीताराम गोयल (‘हाऊ आय बीकेम अ हिंदु’ या पुस्तकातून)
पू. सीताराम गोयल अधिक काळ साम्यवादी
असणार नाहीत, याविषयी पू. रामस्वरूप गर्ग यांना असलेली निश्चिती !
भाकप अर्थात् ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया’ या राजकीय पक्षात प्रवेश करण्याच्या माझ्या निर्णयाविषयी मी माझे मित्र रामस्वरूप गर्ग यांना पत्राद्वारे कळवले. ते मला समवयस्क असलेले विद्वान मनुष्य होते. त्यांनी पत्रोत्तरात मला म्हटले, ‘तू एवढा हुशार आहेस की, तू ‘कम्युनिस्ट’ झाल्याविना रहाणार नाहीस आणि त्याचबरोबर तू एवढा हुशार आहेस की, तू तिथे अधिक काळ रहाणारही नाहीस.’
‘जेथे साम्यवाद गेला, तेथे त्याने तेथील संस्कृतीचा नाश केला. समाजाला त्याच्या मुळांपासून तोडणे, हे साम्यवादाचे वैशिष्ट्य आहे.’
– पू. सीताराम गोयल
पू. सीताराम गोयल यांचा परिचय !
पू. सीताराम गोयल यांचा जन्म १६ ऑक्टोबर १९२१ दिवशी झाला. ते एक महान हिंदु तत्त्ववेत्ते, लेखक आणि राजकीय कार्यकर्ते होते. १९४० च्या दशकापर्यंत पू. गोयल हे साम्यवादी विचारसरणीचे होते; परंतु हिंदु धर्माचे महत्त्व अनुभवल्यावर ते हिंदु राष्ट्रवादाचे प्रखर समर्थक ठरले. त्यांनी इस्लाम आणि ख्रिस्ती धर्म यांमुळे हिंदु संस्कृती अन् परंपरा यांची झालेली अपरिमित हानी यांवर प्रकाश टाकला. जगभरातील हिंदूंसमोर चालताबोलता आदर्श निर्माण करणार्या या महापुरुषाने ३ डिसेंबर २००३ या दिवशी इहलोकाचा निरोप घेतला.
हिंदु धर्माचे महत्त्व प्रतिपादित
करणारी पू. सीताराम गोयल यांची तेजस्वी ग्रंथसंपदा !
१. ‘हाऊ आय बीकेम अ हिंदु’ (मी हिंदु कसा झालो ?),
२. ‘द स्टोरी ऑफ इस्लामिक इंपिरियलिझम् इन इंडिया’ (भारतातील इस्लामी साम्राज्यवादाची कथा)
३. ‘हिस्ट्री ऑफ हिंदु-ख्रिश्चयन एनकाऊंटर्स : एडी ३०४ टू १९९६’ (हिंदु-ख्रिस्ती चकमकींचा इतिहास : ख्रिस्ताब्द वर्ष ३०४ ते १९९६)
४.‘हिंदु टेम्पल्स : व्हॉट हॅपेन्ड टू देम’ (हिंदु मंदिरांचे काय झाले ?)
पू. सीताराम गोयल यांचा ‘साम्यवाद ते हिंदु धर्माचरणी’, असा स्पृहणीय प्रवास !
कुठे साम्यवादी असूनही ध्यान लावणारे
आणि देवतेच्या अस्तित्वाची अनुभूती घेणारे पू. सीताराम
गोयल, तर कुठे हिंदु धर्मावर अज्ञानमूलक टीका करणारे इतर साम्यवादी !
‘पू. रामस्वरूप गर्ग यांच्या मार्गदर्शनानुसार मी ध्यान लावण्यास आरंभ केला. ध्यानाविषयी मला संशय होता; मात्र हळूहळू माझे ध्यान लागू लागले. मला चांगल्या अनुभूती आल्या आणि मला ध्यानामध्ये आनंद मिळू लागला. एक दिवस मी ध्यान लावले. थोड्या वेळाने मी ज्यांना शब्दांनी किंवा कृतीद्वारे दुखावले होते, त्या सर्वांची क्षमा मागितली. भूतकाळातील एकेक व्यक्ती मला आठवू लागली आणि मी प्रत्येकाची वाकून क्षमा मागितली. त्यानंतर या व्यक्तींविषयी माझ्या मनात जो कडूपणा होता, तो दूर झाला आणि मन मोकळे वाटू लागले. कोणत्याही शारीरिक आणि मानसिक यातना न होता अंगात रुतलेले सहस्रो काटे दूर झाल्याची अनुभूती मला आली. ‘हाच मार्ग माझ्यासाठी योग्य आहे’, हे सांगण्यासाठी आता आणखी कशाची आवश्यकता राहिली नाही.
मी ‘लक्ष्मी किंवा सरस्वती किंवा काली या देवी आहेत’, हे मानायला सिद्ध नव्हतो. एक दिवस पू. रामस्वरूप गर्ग यांनी मला ‘देवी’चे ध्यान लावण्यास सांगितले. मी ध्यान लावले आणि काय चमत्कार ! ‘आपल्या हरवलेल्या बाळाला (सीताराम गोयल यांना) देवीने तिच्या कुशीत घेतले आहे आणि मला सर्व भयांपासून मुक्त केले आहे’, अशी अनुभूती मला आली. ‘हिंदु धर्मग्रंथांमध्ये साधू-संतांनी सांगितलेल्या शाश्वताची अनुभूती घेण्याची हीच पद्धत खरी आहे’, यावर माझी श्रद्धा दृढ झाली.
हिंदु धर्माकडे पुन्हा वळणे, हे वडिलोपार्जित
वैभवशाली परंपरेची चेतना जागृत झाल्याचे प्रतीक !
‘अखेर मी स्वगृही परतलो. स्वतःला हरवून बसलेल्या मार्गावर भटकणारा मी, माझ्या आध्यात्मिक निवासस्थानी परतलो; मात्र हे माघारी फिरणे म्हणजे जुन्या वळणाकडे जाणे नव्हे, तर ते आमच्या वडिलोपार्जित वैभवशाली परंपरेची चेतना जागृत झाल्याचे प्रतीक होते. साधूसंतांनी सिद्ध केलेली सर्व मानवजातीची ती परंपरा आहे. ‘हिंदूंचे अध्यात्म आणि हिंदु संस्कृती सर्वश्रेष्ठ आहे’, याची अनुभूती मला आली. अध्यात्माने मला दिलेली हाक मी नाकारू शकलो नाही. मी हिंदु झालो.’ – पू. सीताराम गोयल
इतिहासाचा प्रवाह पालटून टाकणारे महापराक्रमी छत्रपती शिवाजी महाराज !
‘छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्थान आमच्या इतिहासात तेच आहे, जे चंद्रगुप्त मौर्य, सेनापती पुष्यमित्र शुंग, सम्राट विक्रमादित्य आणि सम्राट स्कंदगुप्त यांचे आहे. या अत्यंत महापराक्रमी महाराजांसारखेच छत्रपती शिवाजी महाराज यांनीसुद्धा स्वजातीच्या आत्म-रक्षक संग्रामाला विजयोन्मुख करून इतिहासाचा प्रवाह पालटून टाकला होता.’ – पू. सीताराम गोयल (संदर्भ : ‘शक्तीपुत्र शिवाजी’ या पुस्तकातील)
भारत जगवायचा असेल, तर भारतावर झालेल्या
ख्रिस्ती आणि इस्लाम यांच्या आक्रमणाचा प्रभाव असलेला नेहरूवाद संपलाच पाहिजे !
‘नेहरू म्हणजे फुगवलेले ‘ब्राऊनसाहेब’ (भारतीय साहेब) होते. नेहरूवाद म्हणजे साम्राज्यवादी विचारसरणीचे एकत्रित रूप आहे. भारतावर झालेल्या ख्रिस्ती आणि इस्लाम यांच्या आक्रमणाचा प्रभाव त्यांच्या विचारसरणीवर पडला आहे. भारत जगवायचा असल्यास नेहरूवादाला विरोध केलाच पाहिजे, यात तीळमात्र शंका नाही. भारतीय नागरिक, भारत देश आणि भारतीय संस्कृती यांच्या विरोधात नेहरूवादाने केलेल्या स्वतःच्याच पापाच्या ओझ्याखाली चिरडून तो नष्ट व्हायला आरंभ झालाच आहे. नेहरूवाद समूळपणे फेटाळल्यास तो लवकर नष्ट होईल आणि भारत अधोगतीपासून वाचेल. तो पुढे चालू ठेवल्यास त्याचा अधिक त्रास होऊ शकतो.’ – पू. सीताराम गोयल
पू. सीताराम गोयल यांनी ‘हिंदुत्वाचे वैचारिक आघाडीवरील संरक्षण’
या संदर्भात वर्ष १९८३ मध्ये लिहिलेल्या एका टिपणातील सूत्रे
१. ‘वैचारिक आक्रमण वेळेवर न रोखल्यास स्थूल (शारीरिक स्तरावरील) आक्रमण त्या पाठोपाठ नक्कीच होते.
२. शारीरिक संरक्षणापेक्षा वैचारिक संरक्षण अधिक महत्त्वाचे कारण त्यामुळे…
अ. शारीरिक आक्रमण केल्यास विरोध होणारच, अशी आक्रमणकर्त्याला आधीच निश्चिती पटल्याने बहुतांश वेळा ते होणे प्रतिबंधित होते.
आ. किंवा निदान पूर्वसिद्धतेमुळे हानी अल्प होते.
इ. दुसरी बाजू समजल्यामुळे म्हणा किंवा आक्रमणाचे डावपेच उघड झाल्यामुळे म्हणा शत्रू आक्रमणाचा विचार सोडून देतो.
३. इतिहासात हिंदूंनी आक्रमकांना वैचारिक विरोध न करता त्यांना आपल्या आध्यात्मिक शुचितेच्या आधारे दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिसून येते.
४. आपल्या अंगभूत सामर्थ्याच्या जोरावर हिंदु समाज तग धरून राहिलेला असला, तरी तो वैचारिक आणि त्या पाठोपाठ होणारी शारीरिक आक्रमणे थांबवू शकलेला नाही. यामुळे हिंदूंचे संख्याबळ, भौगोलिक अधिसत्ता आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे नीतीधैर्य यांची अपरिमित हानी झालेली आहे.
५. आता तर हिंदूंची इतकी पीछेहाट झालेली आहे की, जर त्यांनी आक्रमणाचा साधा निषेध जरी केला, तर त्यांना असहिष्णू, धर्मांध यांसारखी विशेषणे बहाल केली जातात.’