घरातील लादीवर डाग पडल्यास लादीची स्वच्छता कशी कराल ?

Article also available in :

१. तेलकट पदार्थ पडल्यास

‘लादीवर तेलकट पदार्थ पडला असेल, तर तो सर्वप्रथम कोरड्या कापडाने टिपून घ्या, म्हणजे लादीवर पडलेले तेल किंवा तूप अन्यत्र पसरणार नाही. त्यानंतर छोट्याशा भांड्यात थोडेसे पाणी घेऊन त्यात ‘डिटर्जण्ट पावडर’ टाका. हे पाणी उकळवा. त्यानंतर त्यात कापड भिजवून त्याने लादी पुसा. सर्व तेलकट आणि तूपकट डाग सहज निघून जातील. त्यानंतर स्वच्छ पाण्याने पुन्हा एकदा लादी पुसा. लादी पूर्वीसारखी स्वच्छ आणि चकाकू लागेल.

 

२. चहाच्या डागावर उपाय

२ अ. एका भांड्यात पाणी घ्या. त्यात थोडे मीठ टाका आणि त्या पाण्याने लादी पुसा. डाग निघून जातील आणि लादी स्वच्छ होईल.

 

२ आ. डाग सुकला असता काय कराल ?

स्वयंपाक खोलीतल्या लादीवर अनेकदा डाग आढळतात. भाजी चिरतांना भाजीचा रस लादीवर पडतो आणि तो डाग तसाच राहून जातो. तो डाग सुकल्यानंतर पाण्याने पुसला, तरीही निघत नाही. अशा वेळी ज्या भागावर डाग असेल, त्या भागावर थोडेसे स्पिरीट टाका आणि कापसाच्या बोळ्याने पुसा. डाग गेल्यावर तेवढा भाग पुन्हा पाण्याने पुसून घ्या.

 

३. पेनमध्ये शाई भरतांना सांडली असता

पेनमध्ये शाई भरतांना, लादीवर शाई पडली, तर तो भाग प्रथम पाण्याने पुसून घ्या. त्यातूनही डाग राहिला, तर थोडेसे कच्चे दूध त्यावर पसरवा आणि तो भाग घासणीने (ब्रशने) घासा. त्यानंतर पुन्हा पाण्याने धुऊन घ्या. शाईचा डाग निघून गेलेला असेल.

 

४. रंगाचे डाग असे घालवा !

आपण घरात रंग लावतो. रंगाने घराला शोभा येते. रंगकाम करणार्‍या रंगार्‍याने कितीही काळजी घेतली, तरी रंगाचे लहान-लहान ठिपके कुठे न कुठे तरी लादीवर पडतातच. रंंगपंचमीच्या दिवशी, तर एकमेकावर रंग उडवतांना रंगांचे डाग लादीवर पडतात. अशा वेळी जो उपाय शाईचे डाग काढतांना करावयाचा आहे, तोच उपाय रंगाचे डाग काढण्यासाठी करावा.

४ अ. रिठ्याचा उपयोग करा !

लाद्यांवर (टाईल्सवर) डाग पडला असता स्वच्छ करण्याचा सोपा उपाय म्हणजे रिठ्याचा उपयोग करणे. चांदीचे दागिने स्वच्छ करण्यासाठी रिठ्याच्या पाण्याचा उपयोग करतात. लादी स्वच्छ करण्यासाठी हे पाणी उपयोगी पडते. रिठ्याची पावडर पाण्यात टाकून ते पाणी उकळवा, त्या पाण्याने लादी पुसा. लादी स्वच्छही होईल आणि चकाकूही लागेल.

 

५. लादी बुळबुळीत झाली असता

काही वेळा असे आढळून येते की, लादी बुळबुळीत झाली आहे. पाणी किंवा पाण्याचा अंश जास्त राहिल्यामुळे लादी बुळबुळीत होते. अशा बुळबुळीत लादीवर पाय पडला, तर पाय घसरून अपघात होण्याची शक्यता असते. अशा वेळी बुळबुळीत लादीवर चण्याचे पीठ पसरवा आणि काही घंट्यांनंतर लादी घासणीने (ब्रशने) घासा. लादीचा चिकटपणा निघून लादी स्वच्छ झालेली असेल.’

– तनया साठे (संदर्भ : मासिक ‘आध्यात्मिक ॐ चैतन्य’, जून २००१)