‘भारतामध्ये येणार्या आपत्काळाला तोंड देण्यासाठी प्रशासनावर अवलंबून न रहाता नागरिकांनी स्वतःच्या स्तरावर सिद्धता करायला हवी; कारण येथील प्रशासनाचा कारभार किती गलथान पद्धतीने चालतो, हे आपण संपत्काळात अनुभवत आहोत. येणार्या काळात नैसर्गिक आपत्तींना सामोरे जाणे, युद्धजन्य परिस्थितीला तोंड द्यावे लागणे आणि दंगली, जाळपोळ यांसारख्या मानवी आपत्ती कोसळणे, यांना भारतातील हिंदूंना मोठ्या प्रमाणावर तोंड द्यावे लागणार आहे. त्यासाठी सामान्य व्यक्तींप्रमाणे साधकांनीही पुढील सिद्धता करायला हवी.
१. विस्थापित जीवन जगण्याची सिद्धता करणे
‘विस्थापित हिंदू छावण्यांमध्ये कशा प्रकारचे जीवन व्यतीत करत आहेत ? तेथे कोणत्या समस्यांना हिंदूंना तोंड द्यावे लागत आहे ? त्यांना कोणत्या गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे ?’, याचा अनुभव येण्यासाठी साधकांच्या गटांनी विस्थापित हिंदूंच्या छावण्यांना भेटी देऊन त्यांच्या परिस्थितीचा अभ्यास करायला हवा. यामुळे हिंदूंची, तसेच साधकांची विस्थापित जीवन जगण्याची प्रथम मानसिक सिद्धता आणि नंतर स्थूल स्तरावर शारीरिक सिद्धता होईल, उदा. तंबू कसा उभारायचा ? तेथे रहाण्यासाठी कोणकोणत्या साहित्याची आवश्यकता भासते ? तेथे रहात असतांना कोणत्या गोष्टींची दक्षता घ्यायला हवी ? तेथे व्यक्ती आणि साहित्य यांची कशा प्रकारची काळजी घ्यायला हवी ? खाण्या-पिण्याच्या संदर्भात कोणत्या गोष्टी टाळाव्यात आणि कोणत्या गोष्टी कराव्यात ? इत्यादी.
२. विविध आपत्तींमध्ये सरकारकडून
साहाय्य मिळेपर्यंत स्वतःच्या स्तरावर प्रयत्न करणे
कोणत्याही प्रकारच्या आपत्तीमध्ये सरकारकडून साहाय्य मिळण्यास दिरंगाई झाली, तरी आपण सिद्ध रहायला हवे. त्यामुळे सरकारी साहाय्य मिळेपर्यंत औषधोपचार, प्रथमोपचार, सुरक्षिततेची उपाययोजना, संरक्षण, पाणी आणि खाद्य यांचा पुरवठा उपलब्ध करणे, यांसारख्या अनेक गोष्टींत हिंदूंना स्वतःचे हात-पाय हलवून सिद्धता करावी लागणार आहे. यासाठी हिंदुत्वनिष्ठ आणि साधक यांनी ‘आपत्कालीन विभाग’ स्थापन करून या विभागात अधिकाधिक तरुण आणि होतकरू व्यक्तींना नेमावे, तसेच राष्ट्रात विविध ठिकाणी येणार्या नैसर्गिक आणि मानवी आपत्तींमध्ये पीडितांना साहाय्य करण्यासाठी आपत्कालीन विभागातील अधिकाधिक तरुणांना साहाय्यासाठी पाठवावे. त्यामुळे आपत्तीजन्य परिस्थितीला सामोरे जाण्याचा प्रत्यक्ष सराव या गटाला होईल. या गटाने त्यांच्या अनुभवांचा अभ्यास करून इतरत्र रहाणारे साधक आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्यासाठी प्रशिक्षणाच्या शिबिरांचे आयोजन करून प्रायोगिक स्तरावर प्रशिक्षण देऊन सिद्ध करावे.
३. आपत्काळात संरक्षणासाठी दल सिद्ध करणे
आपत्कालीन साहित्याची चोरी होणे, आपत्ती आल्यानंतर संभाव्य परिस्थितीचा अपलाभ उठवण्यासाठी गुंडांनी पीडितांवर आक्रमणे करून लूटमार करणे, साहित्य पळवणे, तसेच मारझोड करणे, यांसारखे प्रकार भारतामध्ये घडण्याचा संभव अधिक आहे. दारिद्र्य आणि प्रशासनाचे अपयश या कारणांमुळे स्थानिक लोक वाममार्गाने स्वत:चा उदरनिर्वाह चालवण्याची संभावना अधिक असल्यामुळे अशा प्रकारच्या आक्रमणांचा संभव उद्भवू शकतो. त्यामुळे आलेल्या आपत्तीत नवीन आपत्तीची भर पडून समस्या अधिक जटील होऊन जाते. अशा जटील समस्येला समर्थपणे तोंड देता यावे, यासाठी आपत्काळात गुंडांपासून संरक्षण करण्यासाठी विशेष ‘संरक्षक दला’ची सिद्धताही आधीपासूनच करायला हवी. संरक्षण दल हा आपत्कालीन विभागाचाच एक अविभाज्य अंग असेल. संरक्षक दलाला स्वसंरक्षणासह आपत्कालीन साहाय्य असे दोन्ही प्रकारचे साहाय्य करावे लागेल.
४. आपत्काळात विशेष साहाय्य करावे लागणे
त्याचप्रमाणे महिलांनी पीडित हिंदूंपैकी एखाद्या गर्भवती स्त्रीची प्रसूती कोणतेही वैद्यकीय साहाय्य उपलब्ध नसतांना करण्यासाठी सिद्धता ठेवायला हवी.
५. टेहळणी पथकाची सिद्धता करणे
पीडितांचा देशातील अन्य भागाशी शीघ्रतेने संपर्क स्थापित करून साहाय्य मिळवणे, तसेच कोणत्या दिशेने आपत्तीचे नवीन संकट येऊ शकते, याकडे लक्ष ठेवणे, यासाठी टेहळणी पथकाची सिद्धताही आपत्कालीन विभागांतर्गत करायला हवी.’
– कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.१०.२०१६, रात्री १०.२६)