रामनाथी आश्रम परिसरात शुभसंकेत देणारे प्राणी आणि पक्षी यांचे साधकांना झालेले दर्शन अन् त्यामागील आध्यात्मिक विश्‍लेषण

gomata_pujan
गोमातेचे पूजन करतांना सनातनच्या संत सद्गुरू (सौ.) बिंदा सिंगबाळ
priyanka_lo
कु. प्रियांका लोटलीकर

प्राण्यांच्या पंचज्ञानेंद्रियांची क्षमता मानवाच्या पंचज्ञानेंद्रियांपेक्षा अधिक असते, हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहे. त्यामुळे प्राण्यांची सूक्ष्मातील कळण्याची क्षमताही मानवाच्या क्षमतेपेक्षा अधिक असते. एखाद्या तीर्थक्षेत्री ज्या देवतेचे तत्त्व अधिक असते, तेथे त्या देवतेशी संबंधित पशू-पक्षी अथवा वनस्पती आढळून येतात.

काही जण अंधश्रद्धेच्या नावाखाली याकडे दुर्लक्ष करतात; परंतु त्यामागे वैज्ञानिक आणि आध्यात्मिक कारणेही असतात. दत्तक्षेत्री गाय अथवा कुत्रे आढळतात. शिवाच्या मंदिराजवळ आपोआप आलेला बेलाचा वृक्ष दिसतो. त्या तीर्थक्षेत्रातून प्रक्षेपित होणारे देवतेचे तत्त्व त्या जिवांसाठी पूरक असल्यामुळे ते जीव आपोआपच तेथे आकृष्ट होतात, हे यामागील कारण आहे.

प.पू. डॉक्टरांचे सगुण अस्तित्व आणि संतांचा चैतन्यदायी सत्संग यांमुळे सनातनचा रामनाथी आश्रम, हेही एक तीर्थक्षेत्रच बनले आहे. या पवित्र तीर्थक्षेत्री शुभसंकेत दर्शवणारे प्राणी आणि पक्षी यांचे दर्शन होण्याच्या साधकांना आलेल्या अनुभूती अन् त्यांचे आध्यात्मिक विश्‍लेषण पुढे देत आहे.

 

१. गरुडांचे दर्शन होणे

१ अ. अनुभूती : ६.९.२०१६ ते १२.९.२०१६ या कालावधीत काही साधकांना २ गरुडांचे दर्शन झाले.

१ आ. विश्‍लेषण : श्रीविष्णूच्या निर्गुण निराकारत्वाला गरुडाच्या माध्यमातून सगुण साकारत्व प्राप्त झाले आणि ते भूमंडलावर अवतरले. गरुड हे विष्णूचे वाहन असून गतीदर्शकही आहे, म्हणजेच प्रत्यक्ष भगवान विष्णूच्या कृपाशीर्वादाने सनातनच्या कार्याचा विश्‍वात गतीमानतेने प्रसार होण्याच्या या व्यापक संकल्पाला प्रत्यक्ष गरुडदेवाच्या रूपाने पुष्टी मिळाल्याचे लक्षात येते.

 

२. आश्रम परिसरात वानर दिसणे

२ अ. अनुभूती : ५.९.२०१६ या दिवशी दोन साधिकांना सकाळी ११ वाजता खोली क्र. ३२४ मध्ये नामजपासाठी जातांना तिसर्‍या माळ्यावरील मार्गिकेतून एक वानर शांतपणे चालत येतांना दिसले. ते साधिकांच्या १ फूट अंतरावर येऊन बसले; परंतु तरीही त्यांना त्याची भीती वाटली नाही. त्याचा तोंडवळा गुलाबी रंगाचा असून संपूर्ण शरीर पांढरे असल्याप्रमाणे वाटत होते. त्याच्याकडे पाहून आनंद वाटत होता. ते इतर वानरांपेक्षा पुष्कळ वेगळे आणि सात्त्विक दिसत होते. त्यामुळे ते ‘दैवी असावे’, असे त्यांना वाटले. ते ५ – ६ मिनिटे तिसर्‍या माळ्यावर फिरले. तेथे उपस्थित असलेल्या साधकांनाही त्याची भीती वाटत नव्हती.

२ आ. विश्‍लेषण : संकटकाळी रक्षण करण्यासाठी मारुतिराया आले आहेत’, अशी साधकांना अनुभूती आली.

 

३. आश्रमासमोरील हिरवळीमध्ये मुंगूस खेळतांना दिसणे

३ अ. अनुभूती : ८.९.२०१६ या दिवशी सकाळी ७.३० वाजता एका साधकाला आश्रमाच्या समोरील हिरवळीमध्ये ८ ते १० मुंगूस पिल्लांसह एकमेकांशी खेळतांना दिसले. त्या मुंगुसांच्या अंगावर सोनेरी छटा होती. अगदी जवळ मनुष्यवस्ती असतांनाही निर्भीडपणे खेळणारे ते मुंगूस पाहिल्यावर साधकाचे मन प्रसन्न झाले.

३ आ. विश्‍लेषण : मुंगूस हे कुबेराचे वाहन असून लक्ष्मीचा साक्षात्कार आणि मांगल्याची सिद्धी यांचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. कलियुगात जन्माला आलेल्या मनुष्यांपैकी बहुतांश मनुष्य भुवर्लोक आणि पाताळ येथून जन्माला आलेले आहेत. रज-तमप्रधान असलेल्या मनुष्याभोवतीचे वायूमंडलही रज-तमप्रधान असते; परंतु साधना करणार्‍या जिवांभोवतीचे वायूमंडल साधनेमुळे सत्त्वप्रधान झालेले असल्याने त्याकडे प्राणी-पक्षी आकृष्ट होतात.

 

४. आश्रमाच्या समोरील झाडावर भारद्वाज पक्ष्यांची जोडी दिसणे

४ अ. अनुभूती : ११.९.२०१६ या दिवशी सकाळी १०.३० वाजता एका साधिकेला आश्रमाच्या समोरील नारळाच्या झाडावर भारद्वाज पक्ष्यांची जोडी दिसली.

४ आ. विश्‍लेषण : भारद्वाज पक्षी दिसणे, हा एक शुभसंकेत आहे. पूर्वीच्या काळी अनेक पशू-पक्षी ऋषिमुनींच्या सान्निध्यातच येऊन रहायचे.

 

५. गणेशयागाच्या वेळी गोमातेने प्रत्यक्ष आश्रमात दर्शन देणे

या दिवशी आपत्काळापासून साधकांचे रक्षण व्हावे, यासाठी आश्रमात गणेशयाग करण्यात आला. त्यावेळी एक गाय अचानक आश्रमात ज्याठिकाणी गणेशयाग सुरू होता तेथे आली. त्यावेळी सनातनच्या संत सद्गुरू (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी या गोमातेचे पूजन केले.

– कु. प्रियांका लोटलीकर, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय (१२.९.२०१६)

 

वैज्ञानिकांना साहाय्यासाठी विनंती !

आश्रम परिसरात विविध प्राणी आणि पक्षी दिसण्यामागील वैज्ञानिक कारण काय ? यासंदर्भात अधिक संशोधन करण्यासाठी कोणत्या उपकरणांचा वापर करावा ?, हे समजण्यासाठी वैज्ञानिकांनी साहाय्य करावे, ही विनंती !’

– कु. प्रियांका लोटलीकर, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय (१२.९.२०१६)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात