‘पूर्वीच्या काळी मासिक धर्माच्या वेळी मुली आणि स्त्रिया आवश्यक ते आचारधर्म पाळत, उदा. देव-धर्माशी संबंधित ठिकाणी वावर टाळणे, वर्षभराच्या साठवणीतील वस्तूंना स्पर्श न करणे, विश्रांती घेणे इत्यादी. सध्याच्या मुली आणि स्त्रिया यांनी आधुनिकतेच्या आहारी जाऊन मासिक धर्माच्या वेळी न्यूनतम पाळावयाचे आचारही सोडून दिलेले आढळतात. ‘मासिक धर्माचा संबंधित स्त्री आणि वातावरण यांवर काय परिणाम होतो ?’, याचा वैज्ञानिक दृष्टीकोनातून अभ्यास करण्यासाठी ‘यू.टी.एस्. (युनीव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाच्या साहाय्याने चाचणी घेण्यात आली. या चाचणीची निरीक्षणे आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.
१. वैज्ञानिक चाचणी करण्याचा उद्देश
एखाद्या घटकात (वस्तू, वास्तू, प्राणी आणि व्यक्ती यांत) किती टक्के सकारात्मक स्पंदने आहेत, तो घटक सात्त्विक आहे कि नाही किंवा तो घटक आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक आहे कि नाही, हे सांगण्यासाठी सूक्ष्मातील कळणे आवश्यक असते. संत सूक्ष्मातील जाणू शकत असल्याने ते प्रत्येक घटकातील स्पंदनांचे अचूक निदान करू शकतात. भाविक आणि साधक संतांनी सांगितलेले शब्द ‘प्रमाण’ मानून त्यावर श्रद्धा ठेवतात; परंतु बुद्धीप्रामाण्यवाद्यांना मात्र ‘शब्दप्रमाण’ नाही, तर ‘प्रत्यक्ष प्रमाण’ हवे असते. त्यांना प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक चाचणीद्वारे, म्हणजेच यंत्राने सिद्ध करून दाखवली असेल, तरच ती खरी वाटते.
२. चाचणीचे स्वरूप
आध्यात्मिक त्रास असलेली साधिका, आध्यात्मिक त्रास नसलेली साधिका आणि संतपद प्राप्त केलेली साधिका यांचा मासिक धर्म चालू असतांना अन् नसतांना परीक्षण करण्यात आले. या सर्व परीक्षणांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला.
आध्यात्मिक त्रास : अतृप्त पूर्वज, वाईट शक्ती यांमुळे व्यक्तीला होणार्या शारीरिक आणि मानसिक त्रासांना ‘आध्यात्मिक त्रास’ असे म्हणतात. वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. साधना केल्याने साधकाकडे चांगल्या शक्ती आकृष्ट होतात. साधनेमुळे वातावरणातील चांगल्या शक्तीचे आधिक्यही वाढते आणि वाईट शक्तींची शक्ती घटते. असे होऊ नये, यासाठी वाईट शक्ती साधकांच्या साधनेत विघ्ने आणतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा पुराणांत आहेत.
३. ‘यू.टी.एस्. (युनीव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ उपकरणाद्वारे प्रभावळ मोजणे
३ अ. ‘यू.टी.एस्’ उपकरणाची ओळख
या उपकरणाला ‘ऑरा स्कॅनर’ असेही म्हणतात. या उपकरणाद्वारे घटकाची (वस्तू, वास्तू, प्राणी आणि व्यक्ती यांची) ऊर्जा आणि त्याची प्रभावळ मोजता येते. हे उपकरण भाग्यनगर, तेलंगण येथील भूतपूर्व परमाणू वैज्ञानिक डॉ. मन्नम मूर्ती यांनी वर्ष २००३ मध्ये विकसित केले. ‘वास्तू, वैद्यकशास्त्र, पशूवैद्यक शास्त्र, तसेच वैदिक शास्त्र यांमध्ये येणार्या अडचणींचे निदान करण्यासाठी या उपकरणाचा वापर करता येतोे’, असे ते सांगतात.
३ आ. उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण
३ आ १. नकारात्मक ऊर्जा : ही ऊर्जा हानीकारक असते. याअंतर्गत पुढील २ प्रकार येतात.
अ. अवरक्त ऊर्जा (इन्फ्रारेड) : यात घटकापासून प्रक्षेपित होणारी ‘इन्फ्रारेड’ ऊर्जा मोजतात.
आ. जंबुपार ऊर्जा (अल्ट्राव्हायोलेट) : यात घटकापासून प्रक्षेपित होणारी ‘अल्ट्राव्हायोलेट’ ऊर्जा मोजतात.
३ आ २. सकारात्मक ऊर्जा : ही ऊर्जा लाभदायी असून ती मोजण्यासाठी स्कॅनरमध्ये सकारात्मक ऊर्जा दर्शवणारा +Ve हा नमुना ठेवतात.
३ इ. ‘यू.टी.एस्’ उपकरणाद्वारे घटकाची प्रभावळ मोजणे
प्रभावळ मोजण्यासाठी त्या घटकाची सर्वाधिक स्पंदने असणारा नमुना वापरतात, उदा. व्यक्तीच्या संदर्भात तिची लाळ किंवा तिचे छायाचित्र, वनस्पतीच्या संदर्भात तिचे पान, प्राण्याच्या संदर्भात त्याचे केस, वास्तूच्या संदर्भात तेथील माती किंवा धूळ आणि देवतेच्या मूर्तीच्या संदर्भात मूर्तीला लावलेले चंदन, गंध, शेंदूर आदी.
४. चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली काळजी
अ. उपकरण हाताळणारी व्यक्ती आध्यात्मिक त्रास (नकारात्मक स्पंदने) नसलेली होती.
आ. उपकरण हाताळणार्या व्यक्तीने परिधान केलेल्या वस्त्रांच्या रंगाचा परिणाम चाचणीवर होऊ नये, यासाठी त्या व्यक्तीने पांढरी वस्त्रे परिधान केली होती.
५. निरीक्षणे आणि त्यांचे विवेचन
टीप : स्कॅनर १८० अंशाच्या कोनात उघडल्यासच त्या घटकाची प्रभावळ मोजता येते. त्यापेक्षा अल्प अंशाच्या कोनात स्कॅनर उघडला, तर त्याचा अर्थ ‘त्या घटकाभोवती प्रभावळ नाही’, असा होतो.
५ अ. निरीक्षणांचे विवेचन
५ अ १. आध्यात्मिक त्रास असलेल्या आणि मासिक धर्म चालू असलेल्या साधिकेचे परीक्षण केले असता तेथे नकारात्मक ऊर्जा आढळणे : आध्यात्मिक त्रास असलेल्या साधिकेचा मासिक धर्म चालू असतांना परीक्षण केले असता इन्फ्रारेड स्कॅनरने केलेला कोन ३० अंश आणि अल्ट्राव्हायोलेट स्कॅनरने केलेला कोन ९० अंश होता, म्हणजेच तेथे काही प्रमाणात नकारात्मक स्पंदने आढळली. मासिक धर्म चालू असतांना स्त्रियांतील रजोगुण वाढलेला असतो. (हा अध्यात्मशास्त्रीय सिद्धांत आहे.) त्यामुळे रजोगुणात वाढ झाल्याचा परिणाम साधिकेच्या प्रभावळीवर स्पष्टपणे दिसून आला. मासिक धर्म चालू असतांना प्रभावळ २.५६ मीटर होती, तर मासिक धर्म चालू नसतांना ती ३.८८ मीटर झाली. वाढलेल्या रजोगुणाचा परिणाम स्त्रियांच्या मनावरही होतो. त्यामुळे बहुतांश स्त्रियांना त्या काळात चिडचिड वाढणे, मन अस्वस्थ असणे, असे अनुभव येतात.
५ अ २. आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधिकेचा मासिक धर्म चालू असतांना प्रभावळ पुष्कळ घटणे : आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधिकेचा मासिक धर्म चालू असतांना परीक्षण केले असता तिची प्रभावळ २.४५ मीटर होती. मासिक धर्म चालू नसतांना परीक्षण केले असता प्रभावळ ६.०६ मीटर एवढी, म्हणजे पुष्कळ वाढली. यावरून स्त्रियांतील वाढलेल्या रजोगुणाचा परिणाम तिच्यावर आणि सभोवतालच्या वातावरणावर निश्चित होतो, असे दिसून येते.
५ अ ३. संतपदावर आरूढ असलेला जीव पुष्कळ
सात्त्विक असणे आणि त्यावर बाह्य गोष्टींचा परिणाम न होणे
संतपद प्राप्त केलेल्या साधिकेचा मासिक धर्म चालू असतांना आणि नसतांना परीक्षण केले असता प्रभावळीत नगण्य फरक आढळला. यावरून ‘आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत जिवांवर बाह्य गोष्टींचा परिणाम होत नाही’, असे लक्षात येते, तरीही इतरांवर योग्य संस्कार होण्याच्या दृष्टीने उन्नत जीवसुद्धा आचारधर्माचे पूर्णपणे पालन करतात.
६. निष्कर्ष
हिंदु धर्मातील प्रत्येक गोष्टीचा शास्त्रीय आणि सूक्ष्म अभ्यास करून आपल्या ऋषी-मुनींनी आचारधर्म सांगितले आहेत. मुली आणि स्त्रिया यांनी मासिक धर्म चालू असतांनाच्या वेळी आवश्यक आचारधर्माचे पालन केल्यास त्यांचे कल्याणच आहे, हे सहज लक्षात येईल.
रज-तमाचे प्राबल्य असलेल्या कलियुगात आचारधर्मपालनाच्या जोडीला साधना केली, तर रज-तमापासून सर्वंकष रक्षण होईल आणि आनंद मिळेल. कलियुगातील सहज-सुलभ साधना म्हणजे नामजप करणे. नामजप केल्याने ५ प्रतिशत सात्त्विकता वाढते. नामजप हा मनाने करायचा असतो. त्यामुळे त्याला स्थळ, काळ आणि शुचिता यांची कोणतीही बंधने नाहीत. मासिक धर्म काळात जर स्त्रियांनी अधिकाधिक नामजप केला, तर त्यांना सात्त्विकतेचा लाभ होईल.’
– सौ. मधुरा कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय (२७.८.२०१६)
ई-मेल : [email protected]