सप्तर्षि जीवनाडी

maharshi

 

वर्तमानकाळात वैश्‍विक कार्याच्या आवश्यकतेप्रमाणे सप्तर्षींचा कार्य करणारा गट वेगवेगळा असणे; पण बहुतांश वेळी वसिष्ठ आणि विश्‍वामित्र संवादात प्रधान असणे

वैश्‍विक कार्याच्या आवश्यकतेप्रमाणे वर्तमानकाळात कार्य करणारा सप्तर्षींचा गट वेगवेगळा असतो; मात्र सर्वत्र बहुतांशी आदिगुरु म्हणून वसिष्ठच मार्गदर्शन करतात आणि जनसामान्यांचे प्रतिनिधी म्हणून महर्षि विश्‍वामित्र वसिष्ठांना प्रश्‍न विचारत असतात. २-३ मासांनी (महिन्यांनी) सप्तर्षींतील महर्षी पालटतातही. कधी यांत वसिष्ठ, विश्‍वामित्र यांच्याबरोबर नंदिकेश्‍वर आणि नारदही येतात, तर कधी अंगीरस, जमदग्नी, दुर्वास, पुलस्त्य असेही महर्षि संवादात असतात, असे दिसून येते. आताच्या नाडीपट्टीत प.पू. डॉक्टरांविषयी, तसेच सनातनच्या कार्याविषयी बोलणार्‍या गटात वसिष्ठ, विश्‍वामित्र, गौतम, पराशर, पुलस्त्य, अंगीरस आणि दुर्वास हा सप्तर्षींचा गट आहे. कधीतरी मधेच येऊन नंदिकेश्‍वर किंवा नारदही तेवढ्या काळापुरता प्रश्‍न विचारून जातात. – (पू.) सौ. अंजली गाडगीळ (कोळ्ळिमलय पर्वतक्षेत्र, तमिळनाडू, ३०.६.२०१६, दुपारी ४.२०)

 

श्रीगुरूंचे महात्म्य सांगणार्‍या महर्षींच्या चरणी कृतज्ञता !

प.पू. डॉ. आठवले हे स्वयं विष्णूचा अवतार आहेत, हे महर्षींनी १०.५.२०१५ या दिवशी घोषित केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी, साधकांच्या साधनेतील, तसेच धर्मप्रसारातील अडथळे दूर होण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन करणारे, तसेच श्रीगुरूंची साधकांना खर्‍या अर्थाने ओळख करून देणारे महर्षि साधकांना त्यामुळेच परमवंदनीय आहेत. गुरुदेवांचे महात्म्य वर्णन करून साधकांनी त्यांचा कशा प्रकारे लाभ करून घ्यावा, यासाठी मार्गदर्शन करणार्‍या महर्षींच्या चरणी सनातन परिवार अनंतकोटी कृतज्ञ आहे ! – पू. (सौ.) अंजली गाडगीळ

संदर्भ : दैनिक ‘सनातन प्रभात’