अंगण गायीच्या शेणाने सारवून त्यावर रांगोळी काढल्याने वायूमंडलावर होणारा परिणाम !

परिणाम अभ्यासण्यासाठी यू.टी.एस्. (युनीव्हर्सल थर्मो स्कॅनर) या
उपकरणाद्वारे महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेली वैज्ञानिक चाचणी !
sattvik_rangoli_clr

‘रांगोळी ही ६४ कलांपैकी एक कला आहे. ही कला घरोघरी पोचली आहे. सणा-समारंभांत, देवळांत आणि घरोघरी रांगोळी काढली जाते. सौंदर्याचा साक्षात्कार आणि मांगल्याची सिद्धी हे रांगोळीचे दोन उद्देश आहेत. ज्या ठिकाणी सात्त्विक रांगोळी काढली जाते, त्या ठिकाणी आपोआपच मंगलदायी वातावरणाची निर्मिती होते. हिंदूंमध्ये अंगण गायीच्या शेणाने सारवून रांगोळी काढण्याची परंपरा आहे. अंगण गायीच्या शेणाने सारवणे आणि त्यावर रांगोळी काढणे, यांचा वैज्ञानिकदृष्ट्या तुलनात्मक अभ्यास करण्याच्या उद्देशाने ‘यू.टी.एस्. (युनीव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाच्या साहाय्याने चाचणी घेण्यात आली. या चाचणीची निरीक्षणे आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

१. वैज्ञानिक चाचणी करण्याचा उद्देश

एखाद्या घटकात (वस्तू, वास्तू, प्राणी आणि व्यक्ती यांत) किती टक्के सकारात्मक स्पंदने आहेत, तो घटक सात्त्विक आहे कि नाही किंवा तो घटक आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक आहे कि नाही, हे सांगण्यासाठी सूक्ष्मातील कळणे आवश्यक असते. संत सूक्ष्मातील जाणू शकत असल्याने ते प्रत्येक घटकातील स्पंदनांचे अचूक निदान करू शकतात. भाविक आणि साधक संतांनी सांगितलेले शब्द ‘प्रमाण’ मानून त्यावर श्रद्धा ठेवतात; परंतु बुद्धीप्रामाण्यवाद्यांना मात्र ‘शब्दप्रमाण’ नाही, तर ‘प्रत्यक्ष प्रमाण’ हवे असते. त्यांना प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक चाचणीद्वारे, म्हणजेच यंत्राने सिद्ध करून दाखवली असेल, तरच ती खरी वाटते.

२. चाचणीचे स्वरूप

या चाचणीत अंगण गायीच्या शेणाने सारवण्यापूर्वी, सारवल्यानंतर आणि सारवून त्यावर रांगोळी काढल्यानंतर अशा तीन टप्प्यांमध्ये केलेल्या परीक्षणांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला.

३. वैज्ञानिक चाचणीतील घटकांविषयी माहिती

३ अ. अंगण

हे अंगण श्री. आत्माराम जोशी यांच्या घरासमोरील आहे. जोशी कुटुंबीय गेल्या अनेक वर्षांपासून साधना करत आहेत.

३ आ. अंगण गायीच्या शेणाने सारवणे

भूमी सारवण्यासाठी धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे देशी गायीचे शेण वापरले आहे. पंचगव्याचा घटक असलेले देशी गायीचे शेण अत्यंत सात्त्विक आहे. हे अंगण सनातनच्या साधिकेने अत्यंत सेवाभावाने सारवले. शास्त्रानुसार कृती करतांना ती जेवढी भावपूर्ण करू, तेवढा व्यक्तीला अधिक आध्यात्मिक लाभ होतो.

३ इ. सात्त्विक (सनातन-निर्मित) रांगोळी

या रांगोळीमध्ये सरस्वतीदेवतेचे तत्त्व अधिक प्रमाणात आकृष्ट होते. ही रांगोळी सनातनच्या कलाकार साधिकेने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली काढली आहे. (सात्त्विक रांगोळ्यांचे काही नमुने सनातनच्या ‘सात्त्विक रांगोळी’ या लघुग्रंथात दिले आहेत.)

४. ‘यू.टी.एस्. (युनीव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ उपकरणाद्वारे प्रभावळ मोजणे

४ अ. ‘यू.टी.एस्’ उपकरणाची ओळख

या उपकरणाला ‘ऑरा स्कॅनर’ असेही म्हणतात. या उपकरणाद्वारे घटकाची (वस्तू, वास्तू, प्राणी आणि व्यक्ती यांची) ऊर्जा आणि त्याची प्रभावळ मोजता येते. हे उपकरण भाग्यनगर, तेलंगणा येथील भूतपूर्व परमाणू वैज्ञानिक डॉ. मन्नम मूर्ती यांनी वर्ष २००३ मध्ये विकसित केले. ‘वास्तू, वैद्यकशास्त्र, पशूवैद्यक शास्त्र, तसेच वैदिक शास्त्र यांमध्ये येणार्‍या अडचणींचे निदान करण्यासाठी या उपकरणाचा वापर करता येतोे’, असे ते सांगतात.

४ आ. उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण

४ आ १. नकारात्मक ऊर्जा : ही ऊर्जा हानीकारक असते. याअंतर्गत पुढील २ प्रकार येतात.

अ. अवरक्त ऊर्जा (इन्फ्रारेड) : यात घटकापासून प्रक्षेपित होणारी ‘इन्फ्रारेड’ ऊर्जा मोजतात.

आ. जंबुपार ऊर्जा (अल्ट्राव्हायोलेट) : यात घटकापासून प्रक्षेपित होणारी ‘अल्ट्राव्हायोलेट’ ऊर्जा मोजतात.

४ आ २. सकारात्मक ऊर्जा : ही ऊर्जा लाभदायी असून ती मोजण्यासाठी स्कॅनरमध्ये सकारात्मक ऊर्जा दर्शवणारा +Ve हा नमुना ठेवतात.

४ आ ३. ‘यू.टी.एस्’ उपकरणाद्वारे घटकाची प्रभावळ मोजणे : प्रभावळ मोजण्यासाठी त्या घटकाची सर्वाधिक स्पंदने असणारा नमुना वापरतात, उदा. व्यक्तीच्या संदर्भात तिची लाळ किंवा तिचे छायाचित्र, वस्तूच्या संदर्भात त्याचे छायाचित्र, वनस्पतीच्या संदर्भात तिचे पान, प्राण्याच्या संदर्भात त्याचे केस, वास्तूच्या संदर्भात तेथील माती किंवा धूळ आणि देवतेच्या मूर्तीच्या संदर्भात मूर्तीला लावलेले चंदन, गंध, शेंदूर आदी.

४ इ. ‘यू.टी.एस्’ उपकरणाद्वारे करायच्या परीक्षणाची पद्धत

‘यू.टी.एस्’ या स्कॅनरमध्ये प्रथम ‘इन्फ्रारेड’ प्रक्षेपित करणारी वस्तू ठेवतात. त्यानंतर परीक्षण करणारी व्यक्ती स्कॅनर विशिष्ट पद्धतीने हातात घेऊन ज्या वस्तूचे परीक्षण करायचे आहे, त्या वस्तूच्या समोर साधारण एक फुटावर उभी रहाते. त्या वेळी स्कॅनरच्या दोन भुजांमध्ये होणारा कोन त्या वस्तूतील ‘इन्फ्रारेड’ ऊर्जेचे प्रमाण दर्शवतो, उदा. स्कॅनरच्या भुजा १८० अंशाच्या कोनात उघडल्यास त्या वस्तूत ‘इन्फ्रारेड’ ऊर्जा पूर्णपणे आहे आणि स्कॅनरच्या भुजा मुळीच न उघडल्यास (म्हणजेच ० अंशाचा कोन) त्या वस्तूत ‘इन्फ्रारेड’ ऊर्जा मुळीच नाही, हे कळते. स्कॅनरच्या भुजा १८० अंशाच्या कोनात उघडल्यास ‘भुजांनी केलेला हा कोन त्या वस्तूपासून किती दूरपर्यंत टिकून रहातो ?’, हे मोजतात. मोजलेले हे अंतर, म्हणजेच त्या वस्तूतील ‘इन्फ्रारेड’ ऊर्जेची प्रभावळ होय. स्कॅनरच्या भुजा १८० अंशापेक्षा अल्प अंशाच्या कोनात उघडल्यास त्याचा अर्थ ‘त्या वस्तूभोवती ‘इन्फ्रारेड’ ऊर्जेची प्रभावळ नाही’, असा होतो. अशाच प्रकारे अनुक्रमे अल्ट्राव्हायोलेट, सकारात्मक ऊर्जा आणि त्या वस्तूतील विशिष्ट स्पंदने यांची प्रभावळ मोजतात.

५. चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता

अ. उपकरण हाताळणारी व्यक्ती आध्यात्मिक त्रास (नकारात्मक स्पंदने) नसलेली होती.

आ. उपकरण हाताळणार्‍या व्यक्तीने परिधान केलेल्या वस्त्रांच्या रंगाचा परिणाम चाचणीवर होऊ नये, यासाठी त्या व्यक्तीने पांढरी वस्त्रे परिधान केली होती.

६. यू.टी.एस्. (युनीव्हर्सल थर्मो स्कॅनर)
उपकरणाद्वारे केलेली निरीक्षणे, त्यांचे विवेचन आणि निष्कर्ष

table_pg5

टीप : स्कॅनर १८० अंशाच्या कोनात उघडल्यासच त्या घटकाची प्रभावळ मोजता येते. त्यापेक्षा अल्प अंशाच्या कोनात स्कॅनर उघडला, तर त्याचा अर्थ ‘त्या घटकाभोवती प्रभावळ नाही, असा होतो.

६ अ. सारणीतील नकारात्मक ऊर्जेसंदर्भातील निरीक्षणांचे विवेचन

नकारात्मक ऊर्जा न आढळणे : सर्वसाधारण वास्तू किंवा व्यक्ती यांच्या चाचणीमध्ये नकारात्मक ऊर्जा असू शकते; पण सनातनचे साधक श्री. आत्माराम जोशी हे स्वतः आणि त्यांच्या घरातील सर्वच जण साधना करत असल्याने त्यांच्या घराच्या अंगणात नकारात्मकता आढळली नाही.

६ आ. सारणीतील सकारात्मक ऊर्जेसंदर्भातील निरीक्षणांचे विवेचन

अंगण गायीच्या शेणाने सारवल्यानंतर अंगणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होणे आणि अंगणात सात्त्विक रांगोळी काढल्यानंतर सकारात्मक ऊर्जेचे प्रमाण पुष्कळ वाढणे : अंगण सारवण्यापूर्वी तेथे सकारात्मक ऊर्जा आढळली नाही; पण अंगण सारवल्यानंतर तेथे पूर्णपणे सकारात्मक ऊर्जा आढळली आणि त्याची प्रभावळ ४.११ मीटर होती. अंगणात सात्त्विक रांगोळी काढल्यानंतर सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ ५.४३ मीटर झाली, म्हणजेच १.१६ मीटरने वाढली.

६ इ. सारणीतील वस्तूच्या प्रभावळीसंदर्भातील निरीक्षणांचे
विवेचन न सारवलेल्या अंगणापेक्षा सारवलेल्या अंगणाची प्रभावळ
अधिक असणे आणि ती प्रभावळ सात्त्विक रांगोळी काढल्यानंतर पुष्कळ वाढणे

अंगण सारवण्यापूर्वी अंगणाची प्रभावळ २.१४ मीटर होती. अंगण सारवल्यानंतर ती प्रभावळ ५.२७ मीटर झाली, म्हणजे ३.१३ मीटरने वाढली आणि त्या अंगणात सात्त्विक रांगोळी काढल्यानंतर ती आणखी २.२७ मीटर वाढून ७.५४ मीटर झाली.

गायीचे शेण सात्त्विक असल्याने ते अंगणात सारवल्यानंतर अंगणाची सात्त्विकता पुष्कळ वाढली. त्यानंतर अंगणात सात्त्विक रांगोळी काढल्यानंतर तर अंगणाची सात्त्विकता आणखी वाढली. या वाढलेल्या सात्त्विकतेचा लाभ सारवणे आणि रांगोळी काढणे, या कृती करणार्‍यांना, तसेच तेथे वावरणार्‍या अन्य व्यक्तींनाही होतो. हिंदु धर्मात सांगितलेल्या गायीच्या शेणाने सारवणे, रांगोळी काढणे आदी सोप्या कृतींमुळेही व्यक्तीला आध्यात्मिक स्तरावरील लाभ मिळतो, हे या वैज्ञानिक चाचणीतून लक्षात येते.

– आधुनिक वैद्या (डॉ.) कु. आरती तिवारी, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (५.९.२०१६)

ई-मेल : [email protected]

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात