श्री नवनाथ संप्रदायातील महान योगी प.पू. सद्गुरु श्री देवेंद्रनाथ महाराज यांचे नगर येथील शिष्य पू. प्रा. अशोक नेवासकर यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट !

रामनाथी (गोवा) – श्री नवनाथ संप्रदायातील महान योगी प.पू. सद्गुरु श्री देवेंद्रनाथ महाराज यांचे नगर येथील शिष्य तथा जीवनगौरव या पुरस्काराने सन्मानित पू. प्रा. अशोक नेवासकर यांनी त्यांची धर्मपत्नी सौ. हेमलता नेवासकर यांच्यासह रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली. या वेळी सनातनच्या साधिका डॉ. (सौ.) नंदिनी सामंत यांनी त्यांना आश्रमात चालणारे राष्ट्र आणि धर्म यांविषयक कार्य, तसेच आध्यात्मिक संशोधन याची माहिती दिली. या वेळी त्यांच्यासमवेत नगर येथील सनातनचे साधक श्री. कृष्णा बाळासाहेब केंगे आणि सौ. अरुंधती केंगे होते.

डावीकडून सौ. हेमलता नेवासकर, श्री. कृष्णा बाळासाहेब केंगे, पू. प्रा. अशोक नेवासकर, सौ. अरुंधती केंगे आणि सनातन प्रभात नियतकालिकांची माहिती देतांना सनातनच्या डॉ. (सौ.) नंदिनी सामंत
डावीकडून सौ. हेमलता नेवासकर, श्री. कृष्णा बाळासाहेब केंगे, पू. प्रा. अशोक नेवासकर, सौ. अरुंधती केंगे आणि सनातन प्रभात नियतकालिकांची माहिती देतांना सनातनच्या डॉ. (सौ.) नंदिनी सामंत

आश्रमात ऋषिमुनींचे अस्तित्व जाणवते ! – पू. प्रा. अशोक नेवासकर

        आश्रम पहातांना पू. प्रा. अशोक नेवासकर म्हणाले, आश्रमात पुष्कळ चैतन्य असून इथे अनेक ऋषिमुनींचे अस्तित्व जाणवते. आगामी काळात आध्यात्मिकदृष्ट्या सिद्ध असलेले अनेक साधक तुमच्या कार्याला जोडले जातील आणि कार्याचा विस्तार वाढून ते अधिकाधिक व्यापक होईल. हे सर्वकाही आपोआपच होईल.

        आश्रमातील श्री दुर्गादेवीच्या मूर्तीची निर्मिती पहातांना पू. प्रा. नेवासकर यांनी, ही मूर्ती पूर्ण होऊन प.पू.डॉक्टरांच्या (परात्परगुरु डॉ. जयंत आठवले यांच्या) हस्ते तिची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर हिंदु राष्ट्र स्थापनेच्या दृष्टीने कार्याची गती वाढेल, असे उद्गार काढले. संतांनी सांगितल्याप्रमाणे आश्रमात प्रतिदिन दत्तमाला मंत्राचे पठण होते. या पठणाला प्रारंभ झाल्यापासून आश्रमातील आवारात औदुंबराची रोपे आपोआप उगवली आहेत. ही रोपे पाहून पू. प्रा. नेवासकर उत्स्फूर्तपणे म्हणाले, औदुंबराच्या रूपातून प्रत्यक्ष दत्ततत्त्वच आश्रमात अवतरले आहे.

आश्रमामध्ये पू. प्रा. अशोक नेवासकर यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

१. आश्रम पहातांना स्वागतकक्षातील श्रीकृष्णाचे चित्र पाहिल्यावर पू. प्रा. नेवासकर यांनी सांगितले, या चित्रात श्रीकृष्णाचे जसे रूप आहे, त्याच रूपात मला थोड्या वेळापूर्वी आश्रमातील एका खोलीमध्ये (पूर्वी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले रहात असलेल्या खोलीमध्ये) श्रीकृष्णाचे सूक्ष्मातून दर्शन झाले. आरंभी श्रीकृष्णाचे डोळे दिसले आणि त्यानंतर संपूर्ण रूप दिसले. याच खोलीत पू. नेवासकर यांच्या पत्नी सौ. नेवासकर आणि त्यांच्या समवेत आलेले श्री. कृष्णा केंगे यांना सूक्ष्म सुगंध जाणवला.

२. आश्रमातील ध्यानमंदिरात भृगु महर्षींचे चित्र ठेवले आहे, तेथे पू. प्रा. नेवासकर यांना महर्षींचे प्रत्यक्ष अस्तित्व जाणवले.

३. आश्रमदर्शनाच्या वेळी पू. प्रा. नेवासकर यांच्या तोंडवळ्यावर सोनेरी रंगाचा दैवी कण उमटला होता.

पू. प्रा. अशोक नेवासकर यांचा सनातनच्या वतीने सन्मान !

सनातनच्या आश्रमात माझा सन्मान होणे, ही माझ्यावर सद्गुरुकृपाच ! – पू. प्रा. अशोक नेवासकर

पू. प्रा. अशोक नेवासकर यांचा सन्मान करतांना पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ (डावीकडे). सोबत सौ. हेमलता नेवासकर
पू. प्रा. अशोक नेवासकर यांचा सन्मान करतांना पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ (डावीकडे). सोबत सौ. हेमलता नेवासकर

        आश्रमाला भेट दिली असता पू. प्रा. अशोक नेवासकर यांचा सनातनचे पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. या वेळी सौ. हेमलता नेवासकर यांचाही सनातनच्या ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. देवी कपाडिया यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

सौ. हेमलता नेवासकर यांचा सत्कार करतांना सौ. देवी कपाडिया (डावीकडे). मध्यभागी पू. प्रा. अशोक नेवासकर
सौ. हेमलता नेवासकर यांचा सत्कार करतांना सौ. देवी कपाडिया (डावीकडे). मध्यभागी पू. प्रा. अशोक नेवासकर

        आजचा भाग्यशाली दिवस सद्गुरुकृपेने लाभला आहे. आज परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या आश्रमात हा सन्मान झाला, हा महान सुवर्णयोग या ठिकाणी जुळून आला, ही माझ्यावर सद्गुरूंची झालेली कृपाच आहे. गुरूंच्या आदेशाने मी येथे आलो आहे.

        मानवी जीवन अल्प असून ईश्‍वरच शाश्‍वत आहे. आपण असलो किंवा नसलो, तरी हे कार्य चालूच रहाणार आहे. तो कोणाच्या तरी माध्यमातून हे कार्य करून घेणारच आहे.

सनातनच्या आश्रमात सर्व ठिकाणी चांगली स्पंदने जाणवणे

        आश्रमात ईश्‍वरी शक्तीचा वास आहे. येथे मला प्रसन्नता, शुचिर्भूतता जाणवली. येथे कुठल्याही दालनात जा, सर्व ठिकाणी अतिशय चांगली स्पंदने जाणवली. सनातनचे कार्य अतिशय मोठे आहे. हे कार्य असेच चालू राहिले पाहिजे. आश्रमातील साधक अतिशय संयमाने आणि संपूर्ण झोकून देऊन सेवा करत आहेत. त्यामुळे येथे ईश्‍वरी शक्ती कार्यरत आहे. या कार्याला प.पू. डॉक्टर (परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले) आणि भगवान श्रीकृष्ण यांचे आशीर्वाद आहेत.