१. भारतभर अध्यात्मिक, सामाजिक आणि
राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज !
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे आधुनिक काळातील महान संत होऊन गेले. अडकोजी महाराज हे त्यांचे गुरू. विदर्भात त्यांचा विशेष संचार असला तरी महाराष्ट्रभरच नव्हे तर देशभर हिंडून त्यांनी अध्यात्मिक, सामाजिक आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन केले. एवढेच नव्हे तर जपानसारख्या देशात जाऊन त्यांनी सर्वांना विश्वबंधुत्वाचा संदेशही दिला.
२. ग्रामोन्नती आणि ग्रामकल्याण होण्यासाठी ग्रामगीतेचे लेखन करणे
भारत हा खेड्यांचा देश आहे, हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल, अशी त्यांची श्रद्धा आणि विचारसरणी होती. ग्रामोन्नती आणि ग्रामकल्याण हा त्यांच्या विचारसरणीचा जणू केंद्रबिंदूच होता. ं ग्रामगीतेचं लेखन हा त्यांच्या जीवनकार्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा ! खेडेगाव स्वयंपूर्ण कसं होईल, याविषयी त्यांनी जी उपाययोजना सुचविली, ती अतिशय परिणामकारक ठरली. ग्राम हे सुशिक्षित व्हावं, सुसंस्कृत व्हावं, ग्रामोद्योग संपन्न व्हावं, गावानेच देशाच्या गरजा भागवाव्यात अशीही त्यांची निष्ठा होती. तिचे प्रतिबिंब ग्रामगीतेत उमटले आहे.
३. समाज आणि राष्ट्ररक्षणासाठी नीतीमान, सुसंस्कृत
आणि बलोपासक तरुण निर्माण होण्यासाठी प्रबोधन करणे
स्वातंत्र्याच्या चळवळीसाठी योग्य अशी पार्श्वभूमी निर्माण व्हावी, यासाठी त्यांना कारावासही भोगावा लागला. अखिल भारतीय पातळीवर त्यांनी साधूसंघटनेची स्थापना केली. देशातले तरूण हे बलोपासक असावेत म्हणजे ते समाजाचं आणि राष्ट्राचं संरक्षण करु शकतील. ते नीतिमान आणि सुसंस्कृतयुक्त कसे होतील, याविषयीचं उपदेशपर अन् मार्गदर्शनपर लेखन त्यांनी केलं. राष्ट्रपती भवनात त्यांचे खंजिरी भजन ऐकून तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांनी तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत म्हणून संबोधिलं होतं.