काश्यां हि मरणान्मुक्तिः स्मरणादरुणाचलम् ।
श्रीशैलशिखरं दृष्ट्वा पुनर्जन्म न विद्यते ॥
वरील श्लोकाचा बाह्यार्थ पाहिला, तर काशीक्षेत्रात मृत्यू आल्यास मुक्ती मिळते, अरुणाचलाच्या स्मरणाने मुक्ती मिळते आणि श्रीशैल्यशिखराचे दर्शन घेतल्यास पुनर्जन्म होत नाही, असा आहे; परंतु प्रचीती मात्र उलट येते, असा अनुभव प.पू. काणे महाराज यांनी काशीयात्रेच्या वेळी घेतला.
तेथील एक वैदिक ब्राह्मण पंडित पटकीच्या (कॉलर्याच्या) साथीत कालवश झाले. त्यांचे और्ध्वदेहिक संस्कारही (अंत्यसंस्कार) होऊ शकले नाहीत. पुढे ते एकाच योनीत अनुमाने १० वर्षे राहिले. प.पू. काणे महाराज जेव्हा काशीयात्रेसाठी गेले, तेव्हा अडकलेल्या पंडितांनी त्यांना विनंती केली, आम्हाला या योनीतून मुक्त करा. त्याप्रमाणे प.पू. काणे महाराजांनी शिष्याकरवी संस्कार करवून त्यांना त्या योनीतून मुक्त केले.
त्यानंतर काशीमध्ये मरण येऊनही मुक्ती मिळाली नाही, हे कसे ? हा प्रश्न उभा राहिला. त्यावर प.पू. काणे महाराज यांनी आंतरिक गूढार्थ देऊन खुलासा केला, काश्यां मरणात् याचा अर्थ देहभावाचा अंत झाला की, जिवाला मुक्ती मिळते. देहाचा अंत नसून देहभावाचा अंत झाला पाहिजे. देह हीच काशी आहे. त्याचप्रमाणे अरुणाचलाचे स्मरण म्हणजे काय ? सूर्याचा सारथी अरुण हा पांगळा आहे. त्याप्रमाणे नामस्मरणाने मन पांगळे झाल्याविना ते अचल, स्थिर होत नाही. स्मरणात् अरुणाचलम् म्हणजे नामस्मरणाने मन अरुण, म्हणजे पांगळे आणि अचल झाले पाहिजे. श्रीशैल्यशिखरदृष्ट्वा म्हणजेच ब्रह्मरंध्राला प्राणज्योत मिळवली पाहिजे की, पुन्हा जन्म नाही. हे सर्व नामस्मरणाने साध्य होते. तेव्हा नामस्मरण करा, हा त्याचा गूढ अर्थ आहे.
संदर्भ : सदाचार आणि संस्कृती, जुलै २०१५