जगात संतांनी जेवढे कार्य केले, तेवढे
एकातरी राजकारण्यांनी केले आहे का ?
बेंगळुरू : कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष जूआन मॅन्युअल सॅन्टोस यांना शांततेचे नोबेल पारितोषिक घोषित झाले आहे. ते मिळण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग या आध्यात्मिक संस्थेचे संस्थापक आणि प्रख्यात आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांचा मोलाचा वाटा आहे, असे समोर येत आहे. कोलंबियातील एका बंडखोर गटाशी शांतता प्रक्रिया आरंभण्यात श्री श्री रविशंकर यांचा मोलाचा वाटा होता, हे पुढे आले आहे.
शांतता करार होण्यासाठी श्री श्री रविशंकर यांचे योगदान !
कोलंबिया हा दक्षिण अमेरिकेतील एक देश असून तो गेली ५२ वर्षे गृहयुद्धाने त्रस्थ आहे. २६ सप्टेंबर या दिवशी कोलंबियाचे शासन आणि बंडखोर संघटना एफ्.ए.आर्.सी. यांच्यात शांतता करार झाला. या समारंभाला श्री श्री रविशंकर यांनाही निमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमात कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष जूआन सॅन्टोस श्री श्री रविशंकर यांच्याविषयी गौरवोद्गार काढतांना म्हणाले, या शांतता करारासाठी आपण जे कष्ट घेतले त्याविषयी आम्ही तुमचे अत्यंत आभारी आहोत. या घटनेला तुमचे समर्थन आणि मैत्रीच कारणीभूत आहे. तुमचे साहाय्य आणि अध्यात्मिक मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे आणि त्यासाठी कोटी कोटी कृतज्ञता.
कोलंबिया शासन आणि बंडखोर गट यांच्यात
मध्यस्थी करण्यास श्री श्री रविशंकर यांचा पुढाकार !
यापूर्वी सप्टेंबरमध्ये एफ्.ए.आर्.सी. या बंडखोर संघटनेने कोलंबियातील १२ नागरिकांचे अपहरण करून त्यांतील ११ जणांची हत्या केली होती. या ठार झालेल्या नागरिकांचे पीडित कुटुंबीय आणि एफ्.ए.आर्.सी.चे नेतृत्व यांची भेट घालून देण्यात श्री श्री रविशंकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या बैठकीत पीडित कुटुंबियांनी त्यांची व्यथा बंडखोर संघटनेच्या कानावर घातली. त्यामुळे उपरती झालेल्या नेतृत्वाने श्री श्री रविशंकर यांची मध्यस्थी मान्य करून शासनाशी बोलणी करण्यास मान्यता दिली. शेवटी समेट आणि क्षमा या दोन तत्त्वाच्या आधारावर २ ऑक्टोबरला देशात शांतता करार करायचा कि नाही, यावर सार्वमत घेण्यात आले. त्याचा कौल हाती येताच शांतता करारावर स्वाक्षर्या करण्यात आल्या. या सर्वाची परिणती कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष जूआन मॅन्युअल सॅन्टोस यांना शांततेचे नोबेल पारितोषिक मिळण्यात झाली.