या लेखात आपण दृष्ट काढतांना दृष्ट काढणार्याने आणि ज्याची दृष्ट काढायची या दोघांनी प्रार्थना करायचे महत्त्व; ज्याची दृष्ट काढायची, त्याने तळहात वरच्या दिशेने का ठेवावे; ओवाळण्याचे महत्त्व, दृष्ट काढणार्याने मागे वळून का पाहू नये, दृष्ट काढल्यानंतर दोघांनीही नामजप का करावा, त्यांनी हातपाय का धुवावेत, प्रत्येक घंट्याने (तासाने) दृष्ट काढण्याचे कारण आणि दृष्ट काढतांना संबंधित शब्द मराठीत म्हणतांना आलेली अनुभूती, याविषयी जाणून घेऊ.
१. दृष्ट काढण्यापूर्वी दृष्ट काढायची असलेली व्यक्ती
आणि दृष्ट काढणारी व्यक्ती यांनी प्रार्थना का करावी ?
अ. प्रार्थनेचे महत्त्व
ईश्वराला प्रार्थना करून प्रार्थनेच्या बळावर दृष्ट काढली असता दृष्ट काढणार्याला त्रास होत नाही आणि त्रास असणार्याचा त्रासही लवकर उणावतो (कमी होतो).
आ. प्रार्थनेमुळे होणारे लाभ
प्रार्थनेमुळे देवतेच्या आशीर्वादाने त्रास असलेल्या व्यक्तीच्या देहातील, तसेच देहाबाहेरील त्रासदायक स्पंदने अल्प कालावधीत कार्यरत होऊन ज्या घटकांनी दृष्ट काढली जाणार असेल, त्या घटकांत घनीभूत होतात. नंतर अग्नीच्या साहाय्याने अल्प कालावधीत ती त्रासदायक स्पंदने नष्ट केली जातात. दृष्ट काढण्याच्या काही पद्धतींत दृष्ट काढण्यासाठी वापरावयाचे घटक नंतर जाळतात.
देवतेच्या कृपेमुळे दोन्ही व्यक्तींभोवती संरक्षक-कवच निर्माण होऊन पुढे होणार्या अनिष्ट आक्रमणांपासून त्यांचे रक्षण होण्यास साहाय्य होते.
२. दृष्ट काढायची असलेल्या व्यक्तीने
दोन्ही तळहात वरच्या (आकाशाच्या) दिशेने उघडे का ठेवावेत ?
पाताळातून वाईट शक्ती त्रासदायक शक्तीचे प्रक्षेपण मोठ्या प्रमाणावर करत असतात. हाताच्या बाहेरील बाजूपेक्षा आतील बाजू असलेला तळहात शक्ती ग्रहण आणि प्रक्षेपण करणे, यांच्या संदर्भात अधिक संवेदनशील असतो. दोन्ही तळहात वरच्या (आकाशाच्या) दिशेने उघडे ठेवल्याने पाताळातून येणारी काळी शक्ती थेट हातात ग्रहण होत नाही. तसेच दोन्ही तळहात वरच्या दिशेने उघडे ठेवल्याने शरिरातील काळी शक्ती तळहाताद्वारे दृष्ट काढण्यासाठी वापरल्या जाणार्या घटकात खेचून घेतली जाण्यास साहाय्यही होते.
३. दृष्ट काढायची असलेल्या व्यक्तीभोवती
दृष्ट काढण्याचे घटक का ओवाळावेत ?
‘ओवाळणे’, या रजोगुणात्मक हालचालीतून दृष्ट काढतांना वापरण्यात येणार्या घटकातील कार्यसदृश लहरींना वेग प्राप्त करून देणे, हा ओवाळण्यामागील उद्देश आहे.
४. दृष्ट काढून झाल्यानंतर जातांना
दृष्ट काढणार्याने मागे वळून का पाहू नये ?
दृष्ट काढल्यानंतर दृष्ट काढणार्याने मागे वळून पहाणे अशुभ मानले जाते; कारण दृष्ट काढल्यानंतर दृष्ट काढण्यासाठी वापरलेल्या वस्तूंमध्ये रजतमात्मक स्पंदने खेचलेली असतात. त्यामुळे आपण जात असलेला मार्गही रजतमात्मक स्पंदनांनीच भारित होत असल्याने अनेक वाईट शक्ती आपल्या मागे येण्याची शक्यता बळावते. मागे वळून पाहिल्यास आपल्याच अशुभदर्शक स्पंदनांमध्ये आपले मन अडकल्याने आपण याच अशुभ मार्गाने येणार्या वाईट शक्तींच्या आक्रमणांना बळी पडू शकतो; म्हणून ‘दृष्ट काढल्यानंतर शक्यतो मनात नामजप करत पुढे चालत रहा’, असे सांगितले जाते.
५. दृष्ट काढल्यानंतर दृष्ट काढणारा आणि ज्याची दृष्ट काढली तो,
यांनी कोणाशीही न बोलता मनात नामजप करत पुढील कर्म का करावे ?
अ. दृष्ट काढून झाल्यानंतर होणारी प्रक्रिया आणि तिचे देहावर होणारे दुष्परिणाम
दृष्ट काढणार्या व्यक्तीचा देहसुद्धा थोड्याफार प्रमाणात रजतमात्मक स्पंदनांना बळी पडणे
दृष्ट काढून झाल्यानंतर ज्या व्यक्तीची दृष्ट काढली जाते, त्या व्यक्तीच्या रज-तमात्मक स्पंदनांचा प्रभाव दृष्ट काढणार्या व्यक्तीवरही होत असल्याने त्याचा देहसुद्धा या स्पंदनांनी थोड्याफार प्रमाणात भारित झालेला असतो.
भावनिक स्तरावरील बोलणे हे रज-तमात्मक स्पंदनांना स्वतःकडे आकृष्ट करून घेत असल्याने व्यक्तीची हानी होणे
या कालावधीत नामजपा व्यतिरिक्त कोणाशी काही बोलल्यास बहुतेक हे बोलणे भावनेच्या स्तरावर होत असल्याने त्यातील सूक्ष्म नादस्पंदनांकडे देहावर पसरलेली रज-तमात्मक स्पंदने अधिक प्रमाणात आकृष्ट होऊन तोंड, नाक, डोळे आणि कान यांच्या पोकळ्यांतून शरिरात संक्रमित होऊ शकतात.
आ. नामजपातील दैवी स्पंदनांनी देहावरील
रज-तमरूपी आवरण नष्ट होणे आणि व्यक्तीला होणारे इतर लाभ
अनावश्यक बोलून देहावर पडलेल्या रज-तमात्मक स्पंदनांच्या दाट छायेला देहात उतरवण्यापेक्षा नामजप करत पुढील कर्म केल्यास नामातील दैवी सात्त्विक स्पंदनांनी देहावर आलेले रज-तमरूपी आवरण नष्ट होते.
देहावर संरक्षक-कवच निर्माण झाल्याने बाह्य वायूमंडलातून वाईट शक्तींचे आक्रमण होण्याची शक्यताही उणावते.
भावनिक स्तरावरील मायेतील काहीतरी बोलण्यापेक्षा केव्हाही नामजप करत रज-तमात्मक स्पंदनांचे देहावर आलेले आवरण दूर करून या अशुद्धदर्शक प्रक्रियेत बळी पडलेल्या स्वतःच्या देहाची शुद्धी करणे अधिक इष्ट ठरते.
ज्याची दृष्ट काढली जाते, त्यानेही दृष्ट काढल्यानंतर नामजप करणेच अधिक इष्ट ठरते, नाहीतर त्याच्यावर लगेच वाईट स्पंदनांचे आक्रमण होण्याची शक्यता वाढते.
६. दृष्ट काढल्यानंतर दृष्ट काढणारा आणि ज्याची
दृष्ट काढली तो, यांनी हात-पाय धुऊनच पुढच्या कामांना आरंभ का करावा ?
अ. दृष्ट काढून घेणे अन् दृष्ट काढणे, या दोन्ही प्रक्रियांत
रजतमात्मक स्पंदनांची मोठ्या प्रमाणात देवाण-घेवाण होणे आणि त्याचे दुष्परिणाम
दृष्ट काढून घेणे आणि दृष्ट काढणे, या दोन्ही प्रक्रियांत रज-तमात्मक स्पंदनांची मोठ्या प्रमाणात देवाण-घेवाण होत असते.
दृष्ट काढण्यापूर्वी देवाला प्रार्थना करतांना भाव न्यून (कमी) झाला, तर लगेचच वाईट शक्तींचे आक्रमण होण्याची शक्यता वाढते.
या प्रक्रियेत दोन्ही व्यक्ती तेवढ्याच प्रमाणात या अशुभ कर्मात सहभागी असल्याने दोन्ही व्यक्तींवर तेवढ्याच प्रमाणात चिडून वाईट शक्तींनी आक्रमण करण्याची शक्यता असल्याने या प्रक्रियेत दोन्ही जिवांना तेवढ्याच प्रमाणात वाईट शक्तींनी आक्रमण करण्याचा धोका असतो.
ही प्रक्रियाच मुळात रज-तमात्मक असल्याने आणि पाय हे इतर अवयवांपेक्षा भूमीला अधिक प्रमाणात संलग्न असल्याने पायाच्या माध्यमातून देहात ऊध्र्व दिशेने पाताळातील लहरी संक्रमित होण्याची शक्यता दाट असते. या लहरींनी देह भारित झाल्यास हातांच्या माध्यमातून संपूर्ण देहात, म्हणजेच मस्तकापर्यंतही या शक्तीचा प्रादूर्भाव होऊ शकतो.
आ. पाण्याने हात-पाय धुण्याचे लाभ
दृष्ट काढून झाल्यानंतर बाह्य वायूमंडलातील रज-तमात्मक स्पंदनांना लगेचच प्रतिसाद देणारे हात-पाय हे अवयव पाण्याने धुवावेत.
पाणी हे सर्वसमावेशक स्तरावर कार्य करत असल्याने ते कोणत्याही प्रकारच्या रज-तमात्मक रूपी पापजन्य लहरींना स्वतःत सामावून घेऊन देहाला शुद्ध करते; म्हणून या प्रक्रियेनंतर हात-पाय धुण्याला पुष्कळ महत्त्व दिले आहे.
७. त्रासाच्या तीव्रतेनुसार प्रत्येक घंट्याने (तासाने) दृष्ट काढणे का आवश्यक ?
शक्य असल्यास आणि मोठ्या प्रमाणावर त्रास असल्यास प्रत्येक घंट्याने दृष्ट काढावी, नाहीतर दृष्ट काढण्याचा परिणाम टिकण्याच्या कालावधीतही व्यक्तीला परत त्रास होण्याची शक्यता असते. प्रत्येक घंट्याने दृष्ट काढल्यास परत परत साठणार्या काळ्या शक्तीचे प्रमाण थोडे उणावते.
८. दृष्ट काढतांना संबंधित शब्द
मराठीत म्हणण्याच्या संदर्भात आलेली अनुभूती
इंग्रजीच्या तुलनेत मराठीत बोलून दृष्ट काढल्यावर
वाईट शक्तींचा तीव्र त्रास असलेल्या साधिकेचा त्रास अधिक वाढणे
डिसेंबर २००७ मध्ये वाईट शक्तींचा तीव्र त्रास असलेल्या युरोपमधील एका खिस्ती साधिकेची मीठ, मोहरी आणि मिरच्या यांनी दृष्ट काढण्याच्या प्रसंगाचे ध्वनीचित्रीकरण चालू होते. दृष्ट काढणारी साधिकाही युरोपमधील आणि खिस्ती होती. दृष्ट काढतांना म्हणावयाची वाक्ये त्या साधिकेने इंग्रजीतून म्हटली. त्या वेळी ज्या साधिकेची दृष्ट काढली जात होती, ती प्रकट झाली (तिच्यातील वाईट शक्ती प्रकट झाली). त्यानंतर आम्हाला ‘दृष्ट काढणार्या साधिकेला दृष्ट काढतांना म्हणावयाची वाक्ये मराठीत म्हणता येतात’, हे समजले. त्यामुळे पुन्हा मराठीत वाक्ये म्हणून दृष्ट काढण्यात आली. त्या साधिकेने मराठीतून वाक्ये म्हणायला आरंभ करताच जिची दृष्ट काढली जात होती, ती साधिका आधीच्या तुलनेत अनेक पटींनी प्रकट झाली. यावरून उपस्थित साधकांना मराठी भाषेचे महत्त्व लक्षात आले.
( ‘काळी शक्ती’ आणि त्यासारखे शब्द : या ग्रंथात ‘काळी शक्ती, तसेच त्रासदायक/ मायावी/अनिष्ट शक्ती’ यांसारखे सर्व शब्द धर्मग्रंथांत (उदा. श्रीमद्भगवद्गीतेत) वर्णिलेल्या ‘तम’ किंवा ‘तमोगुण’ या अर्थाने, तर ‘काळे आवरण, तसेच काळ्या लहरी/स्पंदने/कण’ यांसारखे शब्द ‘तमोगुणाचे आवरण, तसेच तमोगुणी लहरी/स्पंदने/कण’ या अर्थाने वापरण्यात आले आहेत. ‘तम’ या संस्कृत शब्दाचा अर्थ ‘काळोख’ असा आहे. काळोख काळा असल्यामुळे ‘तम’ अथवा ‘तमोगुण’ काळा असल्याचे वर्णिले, तसेच चितारले आहे. – संपादक )