स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या संदर्भात पू. उमेश शेणै यांनी केलेले अमूल्य मार्गदर्शन !

पू. उमेश शेणै
पू. उमेश शेणै

साधकांच्या मनात सातत्याने काही ना कारणाने विकल्प येत असतात. त्यामुळे त्यांच्या मनाची स्थिती खाली-वर होत असते. भूतकाळातील विचार, साधक आणि सेवा, मुले, संसार, तसेच स्वतःच्या संदर्भातील नकारात्मक विचार इत्यादींमुळे अनेक साधकांच्या केवळ वेळेचीच नव्हे, तर व्यष्टी आणि समष्टी साधनेचीसुद्धा हानी होते. नकारात्मक विचार येताच ते आपलेच आहेत, असे वाटत असल्याने त्यातून बाहेर पडणे कठीण होते. अशा स्थितीत असतांना मी माझ्या मनाच्या स्थितीविषयी पू. उमेशअण्णांशी दूरभाषवर बोलले. याच संदर्भात पू. उमेशअण्णांना सांगत असतांना मी मला येत असलेले नकारात्मक विचार माझ्यातून नाहिसे होणारच नाहीत का ?, असे विचारताच त्यांनी पुढील गोष्टी सांगितल्या. त्या वेळी दोष निवारणासाठी संत किती सखोलतेने विचार करतात आणि साधकांना समजावून सांगतात, हे गुरुकृपेने शिकायला मिळाले. ते शब्दांत मांडण्याचा प्रयत्न करत आहे. 

 

१. नकारात्मक विचार येण्याची कारणे
आणि ते दूर करण्यासाठी करावयाचे उपाय

१ अ. नकारात्मक विचारांचे प्रकार

यात मुख्यत्वे अपेक्षा, पूर्वग्रह, मी सांगितलेले योग्य आहे, मला कुणी विचारत नाही, कुणी माझ्याकडे लक्ष देत नाही, मला काहीच नीट करता येत नाही, माझ्याकडून योग्य रितीने साधना, सेवा, व्यष्टी साधनेचे प्रयत्न होत नाहीत, इत्यादी विचार अधिक असतात.

१ आ. नकारात्मक विचार केल्याने मनाच्या शक्तीचा
अनावश्यक व्यय होणे आणि साधक प्रतिक्षणी मिळणार्‍या आनंदापासून दूर जाणे

वेगवेगळ्या प्रसंगांना (नकारात्मक विचारांच्या) वेगवेगळ्या रितीने सूचना आणि दृष्टीकोन देत रहावे. वरचेवर त्या सूचना आणि दृष्टीकोन पालटत रहावे, उदा. नकारात्मक विचार केल्याने मनाच्या शक्तीचा अनावश्यक व्यय होतो. देवापासून दूर जातो. प्रतीक्षणी मिळणार्‍या आनंदापासून दूर जातो इत्यादी. आनंदापासून दूर गेल्यास मन चंचल होते आणि ते निर्मळ करण्यास शक्तीचा व्यय होतो. आनंद आपल्या हृदयद्वारापाशी येऊन थांबतो; परंतु आपल्या दोष आणि अहं यांची भिंत उभारून आपण त्याला आत प्रवेश करू देत नाही; म्हणून ते लगेचच दूर करून आनंदाला आत प्रवेश करण्यासाठी मार्ग करून दिला पाहिजे इत्यादी.

१ इ. नकारात्मक विचार साधनेनेच दूर करणे आवश्यक !

सर्वांत आधी नकारात्मक विचार येऊच नयेत; म्हणून ते थांबवणे अधिक महत्त्वाचे आहे. साधनेनेच ते दूर करावेत. हे विचार म्हणजे आपली बुद्धी अजून कार्यरत असल्याचे द्योतक आहे. बुद्धीचा लय झाला पाहिजे. त्यासाठी सतत वेगवेगळे दृष्टीकोन दिल्याने १ – २ मासांत (महिन्यांत) नकारात्मक विचार न्यून होऊन मन शुद्ध होईल.

१ ई. नकारात्मक विचार दूर करण्यासाठी करावयाचे उपाय

१ ई १. अनन्य शरणागत भावाने प्रार्थना करणे

मुख्यत्वे निरपेक्ष भावात जाण्याची जाणीव मनाला करून द्यावी. दिवसातून अनेक वेळा भगवंताकडे अनन्य शरणागत भावाने पुढीलप्रमाणे प्रार्थना करावी – हे श्रीकृष्णा, हे गुरुदेवा, माझ्यात असलेल्या नकारात्मक विचारांमुळे माझी साधना योग्य रितीने होत नाही. मी हे दूर करण्यास असमर्थ आहे. त्यासाठी अपार करुणा करून तुम्हीच हे नकारात्मक विचार दूर करा. तुम्हीच हे विचार दूर करण्यास समर्थ आहात आणि मला योग्य रितीने समजून घेत आहात; म्हणून तुम्हीच यातून पार करा. याचा परिणाम होऊन अनुसंधान वाढते, नकारात्मक विचार दूर झाल्याची अनुभूती येते आणि बुद्धीचा उपयोगही न्यून होऊ लागतो. अशी अनुभूती आल्यास प्रत्येक क्षणी कृतज्ञता व्यक्त करावी. त्यामुळे पुढील टप्प्याचा शरणागत भाव आपल्यात वृद्धींगत होतो.

शुद्ध चित्त, मन आणि बुद्धी म्हणजे आध्यात्मिक शुद्धीकरण; म्हणून शुद्ध विचार येण्यासाठी, शुद्ध ज्ञान मिळण्यासाठी, शुद्ध भक्ती आणि बुद्धी यांनी कृती करण्यासाठी, आत्मसाक्षात्कार होण्यासाठी प्रार्थना केल्यास नकारात्मक विचार येण्यास संधीच नाही.

१ ई २. आजपर्यंत प.पू. गुरुदेवांनी आपल्यासाठी काय काय केले ?, ते आठवत रहावे.

१ ई ३. आध्यात्मिक उपाय काटेकोरपणे करणे

आध्यात्मिक उपाय होत आहेत ना ?, याकडे लक्ष द्यावे. होत नसल्यास काटेकोरपणे त्याचे पालन करण्याकडे लक्ष द्यावे, म्हणजे व्यष्टी साधना नीट करावी.

१ ई ४. समाजाच्या आणि स्वतःच्या जीवनाची तुलना करून स्वतः किती आनंदी आहोत, याचा विचार करणे

समाजाच्या आणि आपल्या जीवनाची तुलना केल्यास आपण किती आनंदात आहोत, याविषयी विचार केला पाहिजे. प्रत्येकाला त्याच्या जीवनात कुणाचातरी आधार लागतो, जो शाश्‍वत नसतो. आपण साधना करत असल्याने प्रत्येक क्षणी प.पू. गुरुदेवांचा शाश्‍वत आधार मिळाल्याने मनसुद्धा आनंदी असते; म्हणून कोणत्याही सांसारिक आधाराच्या विचाराने मन नकारात्मक होत नाही.

१ ई ५. मन आणि बुद्धी यांचा लय होण्यासाठी बुद्धीचा उपयोग न्यून करणे

बुद्धीचा उपयोग न्यून केला पाहिजे. बुद्धीचा उपयोग जितका अल्प करू, तितक्या लवकर आपले मन आणि बुद्धी यांचा लय होऊ शकतो. बुद्धीलय झाल्यावर मनाचाही लय होतो. मन आणि बुद्धी यांचा लय झाल्यावर निर्विचार स्थितीत राहिल्याने आपले भगवंताशी सतत अनुसंधान रहाते. त्याचा आनंद अनुभवणे साध्य होते; म्हणून अधिकाधिक अनुसंधानात रहाण्याचाही प्रयत्न केला पहिजे.

 

२. अपेक्षा करणे या अहंच्या पैलूवर करावयाचे प्रयत्न

२ अ. अयोग्य विचार

सेवा मिळाली नाही अथवा अल्प आहे किंवा साधक माझ्याशी अपेक्षित रितीने वागत नाहीत इत्यादी.

योग्य दृष्टीकोन

ईश्‍वराची हीच इच्छा आहे. मला सेवा द्यायची असल्यास तो कसेही करून देईलच. मला कोणत्या वेळी कोणती सेवा द्यायची ?, हे माझ्यापेक्षा अधिक ईश्‍वराला ठाऊक आहे. आता सेवा नसल्यास मी इतर विभागात जाऊन साधकांना सेवेत साहाय्य करीन किंवा ग्रंथवाचन, लिखाण आणि उपाय करीन, असे विचार करून मनाला नकारात्मक स्थितीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करावा.

२ आ. अयोग्य विचार

कार्यशाळा, धर्मजागृती सभा, बैठक इत्यादींना मलाच बोलावले नाही.

योग्य दृष्टीकोन

मला प.पू. डॉक्टरांच्या कृपेमुळे इतक्या वर्षांत अनेक सभा आणि बैठका यांना जाण्याची संधी मिळाली होती. आता काही नवीन साधक आले आहेत. त्यांना शिकण्याची संधी मिळाली पाहिजे. ते लहान वयात शिकल्यास लवकरच ईश्‍वरी कार्याला वेग येईल आणि धर्मप्रसाराचे कार्यही उत्तम होईल. आतापर्यंत केलेल्या सेवेतून शिकायला मिळालेल्या अनुभवातून मी इतरांना साहाय्य करीन. माझे स्वभावदोष आणि अहं दूर करणार्‍या पुढील टप्प्याच्या सेवा मला दिल्या आहेतच. उत्तरदायी साधकांचा कुणाला कोणती सेवा द्यायची, याचा अभ्यास असतो.

सेवा निरपेक्षतेने करवून घेण्यासाठी भगवंताला प्रार्थना करत रहावे. त्यामुळे प्रत्येक अपेक्षेच्या प्रसंगात निरपेक्ष रहाणे साध्य होते.

 

३. कर्तृत्वाचा त्याग करण्यासाठी करावयाचे प्रयत्न

३ अ. प्रार्थना वाढवणे

कर्तृत्वामुळे अपेक्षेचे विचार येतात. मुखाने आपण देवानेच केले, असे म्हणत असलो, तरी मनाला त्यामुळे सुख होत असते. अशा संदर्भातही कृती, विचार, परिणाम, फलितांश सर्व विषयांत कर्तृत्वाचा त्याग करण्याचे विचार यावेत; म्हणून प.पू. गुरुदेव, कृतीही तुमचीच, विचारही तुमचेच, करणारे, करविणारे आणि केलेले तुम्हीच आहात, याचा प्रत्यय मला निरंतर येऊ दे, अशी निरपेक्ष प्रार्थना वाढवली पाहिजे.

३ आ. कृतज्ञताभाव वाढवण्याचा प्रयत्न करणे

कर्तेपणा हेच नकारात्मक विचारांचे उगमस्थान आहे. कर्तृत्वाचा त्याग करता आला पाहिजे. त्यासाठी सदैव प्रत्येक कृती, सजीव-निर्जीव वस्तू, साधक, व्यक्ती, समाज आणि जीवन या सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यास प्रारंभ करावा, उदा. जेवतांना अन्न मिळाल्याबद्दल; त्यानंतर ते ज्यांनी सिद्ध केले त्यांच्याबद्दल; ते अन्न उगवण्यासाठी ज्यांनी अपार कष्ट घेतले त्या शेतकर्‍यांबद्दल; ज्यांनी विकत आणले त्या सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त झाली पाहिजे. दैनिक सनातन प्रभातमध्ये अनेक वेळा लेखणी, पेन्सिल अशा प्रत्येक वस्तूविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यास सांगण्यात आले होते. त्याचा अर्थ कृतज्ञता अधिक होताच कर्तृत्व न्यून होत जाते. कर्तृत्व न्यून झाले की, अहंचा लय होतो. त्याचबरोबर मनोलय आणि बुद्धीलय होऊन सतत ईश्‍वराच्या अनुसंधानात मन आनंदी होते. देवाला प्रत्येक गोष्ट तुझ्यामुळे झाली, तूच केलीस, करवून घेतलीस, असे सांगत गेल्यास मी, माझे, माझ्यामुळे झाले, हे सर्व न्यून होते. कर्तृत्वाचा नाश होण्यासाठी कृतज्ञता हे महत्त्वाचे शस्त्र आहे. प्रत्येक कृती, वस्तू, साहित्य, व्यवस्था, जीवनासाठी आवश्यक सर्व गोष्टी सुलभ देणार्‍या गुरुदेवांप्रती कृतज्ञता व्यक्त केल्यास कर्तेपणा आपोआपच नाश पावतो.

 

४. गुरुदेवांशी एकरूप होण्यासाठी
अष्टांग साधना सातत्याने आणि निरंतर केली पाहिजे !

प.पू. गुरुदेवांच्या अपार कृपेने आपल्याला अष्टांग साधना योग मिळाला आहे आणि त्यांच्या अनुसंधानात सतत राहण्याची संधी मिळाली आहे. प्रार्थना, कृतज्ञता आणि भक्ती कशी वाढवायची ?, हे शिकायला मिळाले; म्हणून आपली असमर्थता स्वीकारून ती जितकी व्यक्त करू, तितका आपला बुद्धीलय होत जाईल. शिकण्याच्या स्थितीत राहिल्यास भगवंत सतत शिकवत रहातो. आपण जितका त्याग करत जातो, तितके देव देत जातो. लहान लहान प्रार्थनांमुळे मोठमोठ्या अनुभूती येतात, प्रारब्ध नष्ट होत जाते, तसेच स्वभावदोष आणि अहं नष्ट होतात. आपल्याला हिंदु राष्ट्र स्थापनेच्या सेवेत भाग घेण्याची संधी मिळाली आहे. तसेच चैतन्यमय आश्रमात रहाण्याची संधी मिळाली आहे. सेवा योग्य रीतीने करणेच आता गुरुदेवांना अपेक्षित आहे. साधनेत अडथळा आणणारी बुद्धी आणि मन यांना अष्टांग साधनेने दूर करून गुरुदेवांशी एकरूप होण्यासाठी अष्टांग साधना सातत्याने आणि निरंतर केली पाहिजे.

 

५. देवाच्या चरणी केलेली प्रार्थना !

देवा, संतांकडून जे शिकायला मिळाले, त्याचा साधनेत उपयोग करून त्वरित तुझ्या चरणी एकरूप होता येऊ दे. हे भगवंता, नकारात्मक विचार दूर करण्यासाठी मला सतत तुझ्या अनुसंधानात ठेव. त्यासाठी निरंतर प्रार्थना, कृतज्ञता, भाव आणि भक्ती कशी करायची ?, हे तूच शिकव. तू शिकवलेले सर्व शिकल्याने माझी असमर्थता प्रकट होऊन बुद्धीलय होऊ दे. मनात आणि बुद्धीत तुझे अस्तित्व प्रस्थापित होऊन कर्तेपणा दूर कर. आनंद देणारी निरपेक्ष सेवा माझ्याकडून करवून घे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत निरंतर हीच प्रार्थना होऊ दे.
– श्रीमती अश्‍विनी प्रभु, मंगळुरू (१३.११.२०१५)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात