काही देवींच्या उपासनेची वैशिष्ट्ये

Article also available in :

durga_pooja

 

१. कुमारी

हिच्या पूजेत फुले, फुलांच्या माळा, गवत, पाने, झाडांच्या साली, कापसाचे धागे, भंडारा (हळद), शेंदूर, कुंकू इत्यादींना महत्त्व असते. लहान मुलींना आवडतात अशा गोष्टी या देवीला अर्पण करतात.

 

२. रेणुका, अंबाबाई आणि तुळजाभवानी

विवाहासारख्या एखाद्या विधीनंतर या कुलदेवता असलेल्यांच्या घरी देवीचा गोंधळ घालतात. काही जणांच्या घरी विवाहादी कार्य नीटपणे पार पडले म्हणून सत्यनारायणाची पूजा करतात किंवा कोकणस्थ ब्राह्मणांत देवीचे बोडण भरतात, तसेच हे आहे.

 

३. अंबाजी

गुजरातमधील अंबाजीच्या (अंबामातेच्या) देवळात दिव्यासाठी तेल वापरीत नाहीत. तेथे तुपाचा नंदादीप (अखंड) तेवत असतो.

 

४. त्रिपुरसुंदरी

ही एक तांत्रिक देवता आहे. हिच्या नावावर एक पंथ प्रचलित आहे. त्या पंथाची दीक्षा घेतल्यावरच हिची उपासना करता येते, असे त्या पंथाचे मत आहे.

 

५. त्रिपुरभैरवी

एक तांत्रिक देवता. धर्म, अर्थ आणि काम या तीन पुरुषार्थांची प्राप्ती करून देणारी ही देवता आहे, असे मानले जाते. ही शिवलिंग भेदून बाहेर आली आहे. कालिकापुराणात हिचे ध्यान (वर्णन) दिले आहे. सर्व रूपांत भैरवी हे त्रिपुरेचे प्रभावी रूप समजले जाते. तिची पूजा डाव्या हाताने करतात. तिला लाल रंगाच्या (रक्तवर्ण) मदिरा, लाल फुले, लाल वस्त्रे आणि शेंदूर या वस्तू प्रिय आहेत. (५)

 

६. महिषासुरमर्दिनी

देवीची शक्ती सहन करण्याची क्षमता नसल्यास प्रथम शांतादुर्गेचे आवाहन करतात, नंतर दुर्गेचे आणि शेवटी महिषासुरमर्दिनीचे करतात. यामुळे देवीची शक्ती सहन करण्याची शक्ती टप्प्याटप्प्याने वाढल्याने महिषासुरमर्दिनीची शक्ती सहन करता येते.

 

७. काली

बंगालमध्ये कालीची उपासना प्राचीन कालापासून प्रचलित आहे. पूर्णानंदांचा श्यामारहस्य आणि कृष्णानंदांचा तंत्रसार हे दोन ग्रंथ सुप्रसिद्ध आहेत. या पूजेत सुरा (मद्य) ही अत्यावश्यक वस्तू मानली आहे. मंत्राने शुद्ध करून तिचे सेवन केले जाते. कालीपूजेसाठी वापरले जाणारे कालीयंत्र त्रिकोण, पंचकोन किंवा नवकोन करावे, असे कालिकोपनिषदात सांगितले आहे. काही वेळा ते पंधरा कोनांचेही करतात. कालीपूजा कार्तिक कृष्णपक्षात, विशेष करून रात्रीच्या वेळी फलप्रद सांगितली आहे. या पूजेत कालीस्तोत्र, कवच, शतनाम आणि सहस्रनाम यांचा पाठ विहित आहे.

 

८. चामुंडा

आठ गुप्ततर योगिनी मुख्य देवतेच्या नियंत्रणाखाली चक्रात विश्‍वाचे संचलन, वस्तूंचे उत्सर्जन, परिणाम इत्यादी कार्ये करतात. संधीपूजा नावाची एक विशेष पूजा अष्टमी आणि नवमी या तिथींच्या संधीकाली करतात. ही पूजा दुर्गेच्या चामुंडा या रूपाची असते. त्या रात्री गायन-वादन आणि खेळ यांच्या योगाने जागरण करतात.

 

९. दुर्गा

श्री दुर्गामहायंत्र हे श्री भगवतीदेवीचे (दुर्गेचे) आसन आहे. नवरात्रात दुर्गेच्या नऊ रूपांची उपासना करतात.

 

१०. उत्तानपादा

ही मातृत्व, सर्जन तथा विश्‍वनिर्मिती या त्रिगुणांनी युक्त आहे. छिन्नमस्ता किंवा लज्जागौरी या देवीची मूर्ती भूमीवर पाठ टेकून ठेवून, उताण्या स्थितीत दुमडलेले पाय पूजकाकडे ठेवून पुजण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालत आलेली दिसते. शिवपिंडीखालच्या शाळुंकेची जी रचना असते, तशाच अवस्थेत ती पुजली गेलेली दिसते. तिला जलधारांचा अभिषेक केल्यानंतर ते पाणी वाहून जाण्यासाठी एक मार्गही दिलेला दिसतो. शिवपिंडीच्या या मार्गास महाशिवाच्या महाभगेचा महामार्ग, असे म्हणतात.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘शक्ति भाग – २’