सध्या खाजगीकरण आणि आंतरराष्ट्रीयीकरण यांमुळे आलेल्या पाश्चात्त्यीकरणाच्या सुनामी लाटेत या देशातील केवळ युवा पिढी आणि वाढत्या वयाचे नागरिकच नव्हे, तर लहान मुलेही भरडली जात आहेत. पाश्चात्त्य देशांप्रमाणे आता भारतातही पौंगडावस्थेचे वय लहान होत असून विशेषतः शहारातील मुले आणि दुर्दैवाने त्यांचे पालकही चंगळवादी सवयींचे बळी ठरत आहेत. चित्रपट, तसेच मॉडेलिंग आदींच्या प्रभावामुळे (तथाकथित) सुंदर दिसणे हे शहरी जीवनमानाचेे एक व्यवच्छेदक लक्षण झाले असून त्यासाठी सातत्याने नवनवीन केशरचना, वेशभूषा, रंगभूषा करत रहाणे हा शहरी जीवनाचा एक अपरिहार्य भाग झाला आहे ! या टूममध्ये (फॅशनमध्ये) आता ६ ते १४ या वयोगटातील कोवळी बालकेही कशी भरडली जात आहेत, हे लक्षात येण्यासाठी २००७ च्या इंडिया टुडे या आंग्लभाषिक मासिकात आलेल्या काही लेखांतील काही सूत्रे येथे उद्धृत करत आहोत. आज २०१६ मध्ये ही स्थिती अधिक गंभीर झाली आहे, हे अध्याहृत आहेच !
१. लहान मुलांची आधुनिक केशकर्तनालये,
व्यायामशाळा, सौंदर्यवर्धनालये आणि स्पा सेंटर !
अ. मुंबईसारख्या औद्योगिक शहरांतून आता या लहान मुलांसाठी व्यायामशाळा, सौंदर्यवर्धनालय, कपड्यांची दुकाने, छोटे उद्यान, ग्रंथालय आदी समाविष्ट असणारी विशेष प्रकारची केशकर्तनालये उघडली गेली आहेत. या ठिकाणी मुलांना आवडतील अशा आकर्षक रंगीबेरंगी भिंती, गुबगुबीत प्राण्यांची खेळणी, मोठ्यांप्रमाणे व्यायाम करण्याची साधने, गोष्टींची पुस्तके (आता कदाचित व्हिडीओ गेम) आदी सारे असते.
आ. या ठिकाणी पाश्चात्त्य देशांतील मुलांचे विविध पोशाख, केशरचना आणि वेशभूषा यांची मोठी छायाचित्रे लावलेली असतात. मोठ्यांप्रमाणे लहान मुलांच्या या नवरूढींसाठीही (फॅशनसाठी) पॅरिस हेच ठिकाण आदर्श मानले जाते. (जे जे पाश्चात्त्य, ते ते आदर्श असा कुसंस्कार त्यामुळे मुलांवर लहानपणापासूनच होतो. – संकलक)
इ. शारीरिक हानी होऊ शकणार्या कृती
१. ४ ते ११ या वयोगटातील मुलांसाठी विविध व्यायामप्रकारांच्या पाश्चात्त्य साधनांनी (उपकरणांनी) युक्त अशी जीम उघडली जात आहेत. (प्रत्यक्षात अशा व्यायाम-साधनांनी केलेल्या व्यायामप्रकारांमुळे होणार्या परिणामांना लहान मुलांचे शरीर स्वीकारत नाही, असे आधुनिक तज्ञ वैद्यांचे म्हणणे आहे. – संकलक)
२. हाता-पायांची नखे स्वच्छ करण्याच्या सौंदर्यवर्धनालयातील कृती लहान वयांतील मुलीही सर्रास करून घेत आहेत. त्यामुळे त्यांच्या नाजूक आणि वाढत्या वयातील हाता-पायांच्या नखांच्या आकारावर विपरित परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. (एवढी साधी गोष्टही लक्षात येऊ न शकणारे पालक आपल्या मुलांवर संस्कार काय करत असतील ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
ई. बौद्धिक, मानसिक आणि आध्यात्मिक दुष्परिणाम
चित्र-विचित्र केस कापणे, बारीक केस कापून त्यात रेषा किंवा आकृत्या दिसतील असे केस कापणे, मध्यभागी उभे रहातील, असे केस कापणे, अजागळ आणि अव्यवस्थित दिसतील, असे केस कापणे या पद्धतीच्या टूम युवांप्रमाणे लहान मुलांमध्येही रूढ झाल्या आहेत. (यांमुळे मुलांच्या चेहर्यावरची निरागसता तर लोप पावतेच, शिवाय चित्र-विचित्र केशरचनांमुळे मुलांना आध्यात्मिक स्वरूपाचे त्रास होऊन त्यांची बुद्धी, मन, शरीर यांवर विकसित होण्यापूर्वीच विपरित परिणाम होऊ शकतो. – संकलक, दैनिक सनातन प्रभात)
उ. पालक उत्तरदायी !
६ ते १४ वर्षांपर्यंतच्या मुलांना त्यांचे पालकच सुटीच्या दिवशी अशा बहुपयोगी केशकर्तनालयात घेऊन जात आहेत आहेत आणि एका भेटीत ४ ते ५ सहस्र रुपये सहज व्यय (खर्च) करीत आहेत. मुलांना चांगले आणि स्मार्ट दिसण्यासाठी आणि त्यांना चांगले दिसत आहे, असे वाटण्यासाठी हे पैसे व्यय होणे योग्य आहे, अशी पालकांची विचारसरणी आहे. (पालकांचीच वैचारिक अधोगती झाली आहे. देश संकटात असतांना पालकांना आपल्या घरात शिवाजी किंवा रामदासस्वामी निर्माण व्हावेत, असे वाटत नाही, तर आपल्या पाल्यांनी मॉडेल किंवा चित्रपट अभिनेते बनून प्रसिद्धी मिळवावी, असे वाटत आहे.)
ऊ. स्पा सेंटर आणि केशकर्तनालये हे गर्दीमुळे असणारे अतिताणाचे व्यवसाय झाले आहेत. या स्पा सेंटरमधील १५ ते २० टक्के ग्राहक हे युवा आणि युवांपेक्षा अल्प वयोगटातील आहेत. (वर्ष २००७ चे हे प्रमाण आता साहजिकच वाढलेलेे आहे. – संकलक)
ए. युवा आणि युवांपेक्षा अल्प वयातील काही मुले-मुली सौंदर्यवर्धनालये आणि त्याला संलग्न स्पा सेंटर यांमध्ये मासातून २ ते ३ वेळा जातात. देहलीसारख्या शहरांत ते यासाठी प्रत्येक भेटीत सहस्रावधींच्या पटीत रक्कम व्यय करतात. त्यांचे केस कापणे, केशभूषा, केस रंगवणे, रंगभूषा (मेक-अप), टॅटू आणि सौंदर्यवर्धनालयात केल्या जाणार्या विविध शरीरस्वच्छतेशी निगडित, तसेच विविध सौंदर्यवर्धन कृतींची प्रत्येकाची वेगवेगळी पॅकेजेस असतात. आरंभी विनामूल्य प्रवेश देऊन पालकांना आकर्षित केले जाते.
ऐे. मुलांसाठी आकर्षक पार्टी पॅकेजही घोषित केलेली असतात. केशकर्तनालयातील वाढदिवस मेजवान्या लोकप्रिय होत असून केशकर्तनालयातील सेवेकरीही त्यात मुलांना शुभेच्छा देतात. या वेळी सौंदर्यवर्धनालयाच्या वतीने त्यांना विविध सौंदर्यप्रसाधने असलेल्या डब्याही भेट दिल्या जातात. अर्थात् या वेळी त्या मुलांना मोठ्यांप्रमाणे सौंदर्यप्रसाधनांनी सजवण्याचे काम ही सौंदर्यवर्धनालयेच करतात, हे वेगळे सांगायला नको.
ओ. या सर्वांतून मोठ्या प्रमाणात कशी व्यावसायिक उलाढाल चालू आहे, हे सहज लक्षात येते. (सौंदर्यप्रसाधनांच्या आंतरराष्ट्रीय आस्थापनांच्या सहभागानेच हे होत आहे, असे म्हणण्यास निश्चितच वाव आहे. – संकलक)
२. शरीर सुंदर करण्यासाठी शस्त्रकर्म !
अ. शहरातील पौंगडावस्थेतील किंवा पौंगडावस्थाही न आलेली युवक-युवती सुंदर दिसण्यासाठी केस, त्वचा, चेहरा, नाक, चरबी आदींच्या संदर्भातील लेझर शस्त्रकर्म, तसेच प्लास्टिक सर्जरी आता मोठ्या प्रमाणावर करत आहेत. या शस्त्रकर्मांमुळे आपल्या वागण्या-बोलण्यावर पुष्कळ सकारात्मक परिणाम होतो, असे युवकांचे मत आहे.
आ. राजधान्यांच्या शहरातील युवा मुलींमध्ये शरीराचे विशिष्ट अवयव विशिष्ट आकारात करण्यासाठी आणि ते सुंदर दिसण्यासाठी शस्त्रकर्म करण्याची पद्धत मोठ्या प्रमाणात रूढ होत आहे. १५ व्या वर्षापासून मुली अशा प्रकारची विविध शस्त्रकर्म करून तथाकथित सुंदर होत आहेत; किंबहुना ही शस्त्रकर्म केल्याने आपण सुंदर झालो, असे त्यांना वाटत आहे ! अशा शस्त्रकर्मांमुळे अल्प वस्त्रांमध्ये आणि पोहोण्याच्या पोषाखामध्ये आपण सुंदर दिसतो, असे त्यांचे मत आहे. (युवा मुलींनी वरील प्रकारची शस्त्रकर्म करणे, हा भोगवादी पाश्चात्त्य कुसंस्कृतीच्या अतिरेकाचा परिपाक आहे. अशा वर्तणुकीने मुलींनी स्वतःलाच एक उपभोग्य वस्तू करण्याप्रमाणे आहे. मुलीला पुढे जाऊन पत्नी आणि आई व्हायचे आहे, हे संस्कार करण्यास पालक न्यून पडत आहेत, तसेच मुलींच्या हातात हवा तेवढा पैसा आणि त्यांना अनिर्बंध स्वातंत्र्यही देत आहेत, त्याचे हे दुष्परिणाम आहेत. – संकलक, दैनिक सनातन प्रभात)
इ. विशेष म्हणजे असे करण्यासाठी सुचवणारे या मुलींचे प्रियकर (बॉयफ्रेंड) असतात.
ई. मुला-मुलींना सुंदर दिसायचे असते; त्यामुळे त्यांना शस्त्रकर्माची कोणतीही भीती वाटत नाही. नाकाचे शस्त्रकर्म करायला येतांना बहुधा एखाद्या अभिनेत्याचे छायाचित्र आणतात आणि आम्हाला यांच्याप्रमाणे नाक हवे आहे, असे सांगतात.
उ. सध्या मुलांचा कल आधुनिक वैद्य किंवा अभियंता होण्यापेक्षा अभिनेता किंवा मॉडेल होण्याकडे अधिक आहे आणि या दिखाऊ अन् वलयांकित करिअरसाठी अशा प्रकारच्या शस्त्रकर्मांवर पैसे व्यय करण्यास मध्यमवर्गीय मुला-मुलींनाही काहीच वाटत नाही.
ऊ. मुलांच्या मनाप्रमाणे करण्याची समाजाची पालटलेली मानसिकता
शस्त्रकर्म करणारे आधुनिक वैद्य सांगतात की, मुले त्यांच्या पालकांसमवेतच शस्त्रकर्म करण्यासाठी येतात. शस्त्रकर्म करण्याचा निर्णय बहुधा मुलांनी स्वतःहून घेतलेला असतो. हल्ली मुलांच्या म्हणण्याप्रमाणे वागण्याचा पालकांचा कल असतो.
ए. सौंदर्यवर्धनाच्या शस्त्रकर्मांचे शारीरिक दुष्परिणाम
१. वरील प्रकारच्या शस्त्रकर्मांमुळे या वयात होणारी नैसर्गिक वाढ थांबवली जात आहे, तसेच या शस्त्रकर्मांचा हार्मोन्सवर परिणाम होत आहे, असा काही आधुनिक वैद्यांचा दाखला आहे. चरबी काढण्याचे शस्त्रकर्म वजन कमी करण्याचा पर्याय नसून ती किडनी किंवा रक्तात जाऊन दुष्परिणाम होण्याची शक्यताही दाट असते.
२. लहान वयात मुले मोठ्यांप्रमाणे वागून त्यांची प्रतिमा पालटण्याचा प्रयत्न करतात. अकाली मोठी झालेली ही मुले त्यांची भावनिक वाढ आणि त्यांचे बाल्य हरवून बसतात आणि जेव्हा अशी मुले ४०-४५ वर्षांची होतात, तेव्हा त्यांना परत लहान मुलांप्रमाणे वर्तन करावेसे वाटते आणि त्यांचे वागणे अप्रगल्भ माणसांप्रमाणे होते. – डॉ. राजेंद्र बर्वे, समुपदेशक आणि अध्यक्ष, बॉम्बे सायकॅट्रिक सोसायटी
३. सौंदर्यवर्धनासाठी केलेल्या सर्व शस्त्रक्रियांमध्ये काही ना काही दुष्परिणाम होणे, हे नाकारता येत नाही, असे आधुनिक वैद्य सांगतात.
आज पाश्चात्त्य देशांत भारतीय त्यांच्या तल्लख बुद्धीमुळे प्रसिद्ध आहेत आणि मोठमोठी पदे भूषवत आहेत. भारतातील सात्त्विक आहार-विहार, साधे राहणीमान, नैसर्गिक दिनचर्या, मुलांवरील आध्यात्मिक संस्कार आदींची ती फळे आहेत. तेथील स्थानिकांमध्ये याविषयी चर्चा आहे. भारताची भावी पिढी नियोजनबद्धरीत्या अधःपतीत करून तिचे तेज आणि ओज नष्ट केले जात आहे. हे एक आंतराष्ट्रीय षड्यंत्र आहे. भारताच्या राजधान्यांच्या शहरांतील पालटत असलेल्या कुसंस्कृतीची टूम ग्रामीण भागांत पसरण्यास काहीच वेळ लागणार नाही. हे असेच चालू राहिले, तर पर्वचा म्हणणारी आणि सूर्यनमस्कार घालणारी भारतातील बालके इतिहासजमा होऊन भेसळयुक्त दुधात उंची वाढणारी पूड मिसळून ते पिणारी भारताची उद्याची पिढी ही मंदबुद्धी, दुर्गुणी, निस्तेज आणि ध्येयहीन निपजली, तर त्यात आश्चर्य वाटायला नको ! हे सर्व टाळण्यासाठी स्वधर्म आणि संस्कृती यांचे महत्त्व जाणून घेणे आणि त्यांचे आचरण करणे अपरिहार्य आहे !
– सौ. रूपाली वर्तक, सनातन आश्रम, देवद, पनवेल.