अल्प कालावधीत सर्वांशी जवळीक साधून सर्वांवर निरपेक्ष प्रेम करणार्‍या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील पू. (सौ.) सूरजकांता मेनरायकाकू !

पू. (सौ.) सूरजकांता मेनराय

पू. (सौ.) सूरजकांता मेनराय  यांचा २२ जून या दिवशी ७५ वा वाढदिवस साजरा झाला. त्या निमित्ताने साधकांनी त्यांना दिलेल्या शुभेच्छापत्रावरील कविता आणि त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

१. निरागस आणि निर्मळ

पू. काकू या लहान मुलाप्रमाणे निरागस आणि निर्मळ आहेत. त्यांचे वावरणे, हालचाल, वागणे, बोलणे अगदी निरागस असते. त्यात पुष्कळ सहजता असते. त्यामुळे त्यांच्या छोट्या छोट्या कृतींतूनही पुष्कळ आनंद मिळतो.

२. सर्वांशी जवळीक साधणे

पू. काकूंनी अल्प कालावधीत आश्रमातील सर्व वयोगटातील सर्वांना आपलेसे केले आहे. प्रत्यक्षात त्या अल्प वेळच खोलीच्या बाहेर येतात, तरीही त्या सर्वांशी जवळीक साधतात. समोर येणार्‍यावर त्या मुक्तपणे प्रेम करतात. पू. काकूंना भेटायला जातांना मनावर कुठले दडपण रहात नाही. आपण सहजतेने त्यांना भेटू शकतो आणि त्यांच्या सत्संगातील आनंद अनुभवू शकतो.

३. या वयातही आरोग्य चांगले रहाण्यासाठी सतर्क असणे

पू. काकूंची प्रकृती नाजूक आहे; पण त्या नियमित चालणे, छोटे-छोटे व्यायाम करणे, अशा कृती करतात. सकाळी उठल्यावर त्या जलद गतीने आगाशीत चालतात. त्या स्वतःच स्वतःला उत्साह देत असतात. त्यांना निसर्गाकडे पहायला आणि त्यातील आनंद अनुभवायला आवडतो.

४. निरपेक्ष प्रेम

पू. मेनरायकाकू त्यांच्या प्रेमात आपल्याला भिजवून टाकतात. प्रत्येकच साधकाप्रती त्यांना प्रीती वाटते. साधक भेटले की, त्यांना पुष्कळ आनंद होतो. ‘‘साधकांकडून मला ऊर्जा मिळते’’, असे त्या नेहमी म्हणतात. आश्रमातील प्रत्येक वयोगटातील प्रत्येक ओळखीच्या आणि अनोळखी साधकाविषयी त्यांना जवळीक वाटते. सनातन कुटुंब असल्याचा भाव त्यांच्यात सतत जागृत असतो. परात्पर गुरु डॉक्टरांनी अशा प्रेमळ आणि चांगल्या साधकांसोबत ठेवल्याविषयी त्यांना सतत कृतज्ञता वाटत असते.

वर्ष २००५ मध्ये पू. काकूंची आणि माझी भेट होऊन जवळीक झाली होती. त्यानंतर १० – ११ वर्षांनी आम्ही भेटलो. त्या वेळी त्या येतांना माझ्यासाठी चांदीचा एक दागिना घेऊन आल्या होत्या. इतक्या वर्षांनी त्यांनी लक्षात ठेवून भेटल्यावर मला भरभरून प्रेम दिले. त्यांचे सर्वच साधकांवर निरपेक्ष प्रेम आहे. ते त्यांच्या दृष्टीतूनही अनुभवता येते. पू. काकू सतत प्रेमाने मला काहीतरी देत असतात. त्या वेळी त्या मला सांगतात, ‘‘मला हे आणखी पाहिजे’, असे हक्काने मागत जा.’’ त्यांच्याकडे गेल्यावर त्या आपल्याला एवढे आपलेसे करून घेतात की, मला ‘आपण घरीच आहोत’, असे वाटते.

५. सतत कृतज्ञताभावात असणे

पू. मेनरायकाकूंना आश्रमाविषयी, आश्रमातील सोयी-सुविधांविषयी सतत कृतज्ञता वाटते. ‘जेवणातील कुठलाही पदार्थ अथवा आश्रमातील कुठलीही वस्तू असो, ती परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांना अतिशय प्रेमाने दिली आहे. परात्पर गुरु डॉक्टर साधकांना सर्वांत चांगले असे सर्वच देतात. जे परात्पर गुरु डॉक्टर देतात, ते जगात कुणीही कधीच देऊ शकत नाही’, असे त्यांना वाटत असते. समाज आणि आश्रम अशी त्या तुलना करत असतात. आश्रमात जे काही आहे, ते परात्पर गुरु डॉक्टरांच्या प्रेमामुळे आहे, या भावात त्या सतत रहातात.

६. पू. मेनरायकाकूंची भावस्थिती

पू. काकूंकडे गेल्यावर प्रत्येक वेळी त्या मला मिठी मारतात. प्रत्येक वेळी त्यांनी मिठीत घेतल्यावर माझा भाव जागृत होतो. त्या वेळी त्यांचा ‘देवाला भेटत आहे’, असा भाव असतो, असे वाटते. त्या वेळी मला ‘त्यांच्यातील भावच अनुभवत रहावे’, असे वाटते. त्यांच्या मिठीत मलाही ‘मी देवाला भेटत आहे’, असे वाटून मन भरून येते.

६ अ. ‘आश्रम म्हणजे वृंदावन’, असा भाव असणे

पू. काकूंचा श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्याप्रती भाव आहे. ‘आश्रम म्हणजे वृंदावन, निधीवन आहे. सर्व साधक-साधिका गोप-गोपी आहेत. परात्पर गुरु डॉक्टर ईश्‍वर आहेत’, असा त्यांचा भाव आहे. आश्रमात वावरतांना आणि साधकांना भेटतांना त्यांना अशी अनुभूती येत असते आणि त्या त्याच आनंदात असतात.

६ आ. सतत भावस्थितीत असणे

पू. काकू सतत भावस्थितीत असतात. त्या सतत परात्पर गुरु डॉक्टरांचे स्मरण करत असतात. त्यांचे भावविश्‍व आनंदमय असते. परात्पर गुरु डॉक्टरांप्रती त्यांच्या मनात अपार कृतज्ञतेचा भाव आहे. त्यांना भेटल्यावर त्यांच्या भावामुळे माझी भावजागृती होत असते.

६ इ. तत्त्वनिष्ठ आणि क्षात्रभाव

पू. काकूंमध्ये प्रेमभावासोबत क्षात्रवृत्तीही आहे. ‘व्यक्तीनिष्ठ न रहाता तत्त्वनिष्ठ रहायला हवेे. चुकीची दिसत असलेली गोष्ट पुढच्या पुढच्या टप्प्याला जावे लागले, तरी तसे करून ती सोडवायला हवी. कुणाला घाबरू नये. परात्पर गुरु डॉक्टरांवर श्रद्धा ठेवून त्यांना आवडेल असेच करावे’, असे त्या सांगत असतात.

७. अनुभूती

७ अ. मानसिक स्थिती बिघडून त्रास होत असतांना

पू. काकूंनी तिथे आठवण काढणे, त्यांच्या आठवण काढण्यानेही स्थितीत सुधारणा होणे : त्या दिल्ली येथे असतांना ज्या ज्या वेळी माझी स्थिती बिघडली होती, अगदी त्याच दिवशी त्या तिकडे माझी आठवण काढून कु. संगीता यांना ‘‘मला शुभांगीची आठवण येत आहे. मला दूरभाष लावून दे’’, असे सांगायच्या. त्यांच्या आठवणीमुळे माझ्या स्थितीत पालट व्हायचा. पू. काकूंना दिल्लीला नामजप करतांना त्यांना सूक्ष्मातून ‘शुभांगी तिकडे बसली आहे’, असे वाटायचे. एके दिवशी माझी मानसिक स्थिती पुष्कळच वाईट होती. त्या दिवशी त्यांना मी त्यांच्या घरात २ – ३ वेळा स्थुलातून दिसले. त्यांना वाटले की, शुभांगी त्यांच्या दिल्लीच्या घरी आली आहे. नंतर त्यांना ‘मी बरी आहे कि नाही’, असे वाटून त्यांनी मला दूरभाष लावायला सांगितला. त्यांच्यामुळे मला बरे वाटले आणि मी पूर्ववत झाले.

पू. मेनराय काका आणि पू. काकू यांच्यात अनेक दैवी गुण आहेत. परात्पर गुरु डॉक्टरांप्रती उत्कट भाव, समष्टीप्रती प्रेमभाव, ईश्‍वरप्राप्तीची तळमळ, समष्टीच्या प्रगतीची तळमळ, शिकण्याची वृत्ती, जिज्ञासा, गुरुकार्याची तळमळ, अल्प अहं, कृतज्ञता भाव, शरणागत भाव, बालकभाव, निर्मळता, सहजता, तत्त्वनिष्ठता असे अनेक गुण त्यांच्यात जाणवतात. गंमत म्हणजे दोघांमधेही हे गुण आहेत, तरीही दोघांची व्यक्त करण्याची पद्धत निरनिराळी आहे. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळे आम्हाला हे सर्व पहायला आणि अनुभवायला मिळत आहे.

‘परात्पर गुरु डॉक्टर, आपल्या कृपेमुळेच आम्हाला असे संत लाभले आहेत. त्यांच्या माध्यमातून तुम्हीच आम्हाला भरभरून प्रेम देत आहात. ‘देवा, तुझ्या चरणी मी अनंत कोटी कृतज्ञ आहे. आम्हाला पू. काका आणि पू. काकू यांच्या अस्तित्वाचा लाभ करून घेता येऊ दे’, अशी आपल्या चरणी शरणागत भावाने प्रार्थना आहे.’

– सौ. शुभांगी अनित पिंपळे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.६.२०१७)

पू. (सौ.) मेनरायकाकू म्हणजे प्रेमाचा झुळूझुळू वहाणारा झरा !

पू. (सौ.) मेनरायकाकू यांच्या सहवासात आश्रमातील साधकांना आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.

१. लहानशा कृतीतून साधकांना आनंद देणार्‍या
आणि भरभरून प्रेम करणार्‍या पू. (सौ.) मेनरायकाकू !

‘वर्ष २०१६ मध्ये माझ्या वाढदिवसाच्या दिवशी पू. (सौ.) मेनरायकाकू यांनी मला एका सेवेसाठी खोलीत बोलावून घेतले. वास्तविक ती सेवा माझ्याशी निगडित नव्हती; पण मला वाटले, ‘त्यांच्या माध्यमातून श्रीगुरूंनीच मला बोलावून साधनेसाठी आशीर्वाद दिले.’ मी खाली बसल्यावर त्यांनी माझे केस पाहिले आणि मेंदीचे एक पाकीट मला देत म्हणाल्या, ‘‘तू मेंदी लावतेस ना ? हे घे. हे पाकीट माझ्याकडे पडूनच आहे. तू लाव.’’ अशा प्रकारे प्रत्येक भेटीत त्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रमाणे साधकांवर भरभरून प्रेम करतात आणि आनंद देतात.’ – कु. युवराज्ञी शिंदे

२. पू. (सौ.) मेनरायकाकूंचा निरपेक्ष प्रेमभाव !

‘पू. (सौ.) मेनरायकाकू आश्रमात आल्या, त्याच्या दुसर्‍या दिवशी सकाळी त्या स्वयंपाकघरात आल्या. त्या दिवशी माझी स्वयंपाकघरात सेवा होती. मी त्यांना पाहून भेटायला गेले आणि ‘‘काही हवे का ?’’ असे विचारले. तेव्हा त्यांनी मला कडकडून मिठी मारली आणी प्रेमाने माझी विचारपूस केली. यातून त्यांच्यातला निरपेक्ष प्रेमभाव शिकायला मिळाला.’ – सौ. नीलिमा माणके, पुणे

३. उत्साही आणि सहजभावात असणार्‍या पू. (सौ.) मेनरायकाकू !

‘पू. (सौ.) मेनरायकाकूंमध्येे सर्व साधकांप्रती निरपेक्ष प्रेम आहे. त्यांच्या मनात साधकांप्रती कृतज्ञताभाव आहे. आजी अतिशय उत्साही आणि सहजभावात असतात. त्या जे काही करतात, ते पुष्कळ भावपूर्ण आणि सातत्याने करतात. साधकांसाठी नामजप करण्यासाठी त्या दुसर्‍या खोलीत जातात. थोडा वेळ पू. मेनरायकाका आणि थोडा वेळ काकू असे आलटून-पालटून नामजप करतात. काकू त्यांच्या वेळेविषयी सतर्क असतात. त्या वेळेच्या आधीच तयार होऊन येतात.’ – कु. गीतांजली काणे

४. नम्रपणे चुका सांगून समष्टीला घडवणे

‘पू. मेनरायकाका आणि काकू त्यांच्या सेवेतील साधकांच्या लक्षात आलेल्या चुका नम्रपणे सांगतात. नंतर ते विचारतात, ‘‘बेटा, बुरा तो नहीं लगा न ? आपकी सेवा परिपूर्ण होनी चाहिए इसलिए बता रहे हैं ।’’ – कु. युवराज्ञी शिंदे

बालपणापासून गोपीभावात रममाण असणार्‍या आणि सर्वांवर प्रीतीचा वर्षाव करणार्‍या पू. (सौ.) सूरजकांता मेनराय !

surajkanta_menroi
पू. (सौ.) सूरजकांता मेनराय
sangita_menroi_clr
कु. संगीता मेनराय

आषाढ कृष्ण पक्ष त्रयोदशी (पौर्णिमांत पंचांग पद्धतीप्रमाणे) (२.७.२०१६) या दिवशी पू. आईचा (पू. (सौ.) सूरजकांता मेनराय यांचा) तिथीनुसार ७४ वा वाढदिवस आहे. श्री गुरुचरणी आणि पू. आईच्या श्री चरणी कृतज्ञता व्यक्त करून तिची गुणवैशिष्ट्ये लिहिण्याचा मी प्रयत्न करत आहे. माझ्याकडून हे लिखाण करवून घ्यावे आणि हे लिहिण्यासाठी तुम्हीच माझ्यामध्ये आवश्यक तो भाव निर्माण करावा, अशी मी श्री गुरुचरणी प्रार्थना करते. त्याचप्रमाणे संत माता-पिता दिल्याबद्दल मी प.पू. गुरुदेवांच्या चरणी अनंत कोटी कृतज्ञता व्यक्त करते.

पू. (सौ.) सूरजकांता मेनराय यांना
वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

१. लहानपणापासूनच गोपीभावात असणे

पू. आई सांगते, मी लहान असल्यापासूनच आपण गोपींप्रमाणे शृंगार केला आहे आणि गोपींसमवेत खेळत आहोत, असे मला वाटत असे. स्नान करतांना आपण श्रीकृष्ण आणि गोपी यांच्यासमवेत नदीत स्नान करत आहोत, असे मला वाटायचे. तिच्यामध्ये आपण नेहमीच गोपींशी बोलत आहोत, हा भाव असायचा.

२. मुलांवर लहानपणीच देशप्रेम आणि भक्ती यांचे संस्कार करणे

पू. आई लहानपणी आम्हाला ग्रंथालयातून देशभक्त, क्रांतीवीर आणि भक्त यांची माहिती असणारी पुस्तके वाचण्यासाठी आणून द्यायची. प्रत्येक सुटीत आई-बाबा आम्हाला कोणत्या ना कोणत्या तीर्थक्षेत्राचे दर्शन घडवून आणायचे.

३. पू. आई सर्व व्रते आणि सण भावपूर्णपणे साजरे करते.

४. प्रीती

४ अ. पू. आईशी बोलल्यामुळे साधकांना पुष्कळ
आनंद मिळून हलके वाटणेे आणि त्यांच्या साधनेला गती मिळणे

१०.७.२०१५ या दिवशी रामनाथी आश्रमात आल्यानंतर पू. आई आणि पू. बाबा यांना साधकांकडून पुष्कळ प्रेम मिळाले. एकदा आई काही साधिकांसमवेत भोजनकक्षात बसली होती. तेव्हा ती त्या सर्वांना म्हणाली, आमच्यासाठी तर येथे सगळ्याच संगीता (मी) आहेत. आई सगळ्या साधकांशी पुष्कळ नम्रतेने आणि प्रेमाने बोलते. त्यामुळे सर्व साधकांना तिच्याविषयी पुष्कळ आदर आणि आपलेपणा वाटतो. अनेक साधक तिच्याशी मनमोकळेपणाने बोलतात. काही साधक मला म्हणाले, आम्हाला आईशी बोलल्यामुळे पुष्कळ आनंद मिळतो, हलके वाटते आणि आमच्या साधनेला गती मिळते.

४ आ. एका साधिकेच्या हातात बांगड्या नसल्याचे
पाहून तिला स्वतःच्या हातातील सोन्याच्या बांगड्या घालायला देणे

फरिदाबाद येथील एका कार्यक्रमात पू. आईला एका साधिकेच्या हातात बांगड्या नसल्याचे दिसले. तेव्हा आईने त्या साधिकेला बोलवून मुलींनी कधीही आपले हात असे मोकळे ठेवू नयेत, असे सांगून लगेचच आपल्या हातातील सोन्याच्या बांगड्या त्या साधिकेला घालण्यासाठी दिल्या.

४ इ. मुक्या प्राण्यांवरही प्रेम करणे

पू. आई प्राण्यांवरही पुष्कळ प्रेम करते आणि ते प्राण्यांच्याही लक्षात येते. एकदा आमच्या घराच्या बाहेर पुष्कळ माकडे आली होती. त्यांच्या भीतीमुळे कुणीच घराबाहेर पडत नव्हते. त्या वेळी आईचे बाहेर काहीतरी काम होते. ती न घाबरता बाहेर आली. तेव्हा त्या माकडांमधील सर्वांत मोठे माकड घराच्या प्रवेशद्वाराच्या बाजूला येऊन शांतपणे बसले आणि आई तेथून सहजपणे निघून गेली. एकदा पू. आईने तुळशीच्या झाडाजवळ उदबत्ती लावली होते. काही वेळाने तेथे एक माकड आले आणि त्या झाडाजवळ ३ – ४ मिनिटे डोळे झाकून बसले.

५. धर्मासाठी सर्वस्व देण्याची सिद्धता असणे

१४.७.२०१५ या दिवशी पू. आईच्या वाढदिवसाच्या दिवशी एक साधक आईला दैनिक सनातन प्रभात देण्यासाठी आले होते. तेव्हा आई त्यांना म्हणाली, प.पू. गुरुदेवांनी आपल्यावर जी कृपा केली आहे, ते ऋण फेडण्याची आपल्यात क्षमता नाही. गुरुगोविंदसिंह यांनी त्यांच्या वडिलांना म्हटले होते, धर्मासाठी आपल्याहून श्रेष्ठ आणखी कोण बलीदान देऊ शकतो ? तेव्हा पुत्रप्रेमाने प्रेरित होऊन गुरुतेगबहादूर यांनी औरंगजेबाच्या अत्याचारांपासून धर्म आणि निष्पाप जनता यांच्या रक्षणासाठी स्वतः बलीदान केले होते. याच पद्धतीने आताच्या धर्म अधर्माच्या लढ्यात तुम्हा मुलांना माझी प्रार्थना आहे की, तुम्ही सर्वांत प्रथम मला पुढे करा. मी सर्वस्व देण्यास सिद्ध आहे.

६. पू. बाबांप्रमाणेच आईचा भावही तेवढाच उच्च कोटीचा आहे. तिलाही कोणत्याही परिस्थितीचा ताण येत नाही.

७. गुरुसेवेची तीव्र तळमळ

७ अ. पू. बाबांसमवेत भर दुपारी उन्हात विज्ञापने आणण्यासाठी जाणे

३ वर्षांपूर्वीपर्यंत पू. आई विज्ञापने आणणे आणि फलक लिहिणे, या सेवा करत होती. मे मासातील (महिन्यातील) भर दुपारी, जेव्हा तापमान ४५ – ४६ अंशांपर्यंत पोेचायचे, तेव्हा पू. आई आणि पू. बाबा हे दोघेही विज्ञापने आणण्यासाठी जायचे. ते सकाळीच घरातून निघून जायचे आणि संध्याकाळी घरी परत यायचे. ते दोघेही एखाद्या झाडाखाली बसून जेवायचे. पू. आई इन्सुलिनचे इंजेक्शन घेऊन पुन्हा सेवा चालू करायची.

७ आ. थंडीतही आसंदीवर उभे राहून फलकलिखाण करणे

२ वर्षांपूर्वी एक साधक २ – ३ दिवसांसाठी बाहेर जाणार होते. ते नियमितपणे ३ फलक लिहित होते. त्या वेळी आईला ही सेवा करण्यासाठी विचारले. तेव्हा तिने त्यासाठी तात्काळ होकार दिला. तो जानेवारी मास (महिना) होता आणि तेव्हा पुष्कळ थंडी होती. त्या थंडीतही तिने फलकलिखाण केले. एका दुकानावर असलेला फलक काहीसा उंचीवर होता. तेव्हा तिने त्या दुकानदाराकडून आसंदी मागून घेतली आणि आसंदीवर चढून ती फलक लिहू लागली. तेव्हा तो दुकानदार म्हणाला, आई, तुम्ही या वयात एवढ्या तळमळीने सेवा करत आहात. हा फलक मी लिहितो.

७ इ. चुकांविरहित सेवा करणे

पू. आईचे कोणतेही काम किंवा सेवा यांमध्ये चुकांचे प्रमाण पुष्कळच अल्प असते. पू. आई प्रत्येक काम किंवा सेवा पुष्कळ सुंदरपणे करते. ती इतरांनाही नेहमी चुकांरहित सेवा कशी करावी आणि ती सुंदरपणे कशी करावी ?, हे शिकवते. ती म्हणते, आपण तर सर्वकाही ईश्‍वरासाठीच करतो. त्यामुळे आपण ते परिपूर्ण आणि सुंदर करावे.

८. समाजातील लोकही प्रभावित होणे

८ अ. समाजातील लोकांनाही आईमधील दैवी शक्तीची अनुभूती येणे

वर्ष २००९ मध्ये आम्ही अमरनाथ यात्रेसाठी काश्मीरला गेलो होतो. आम्ही अमरनाथ गुहेचे दर्शन घेऊन हॉटेलमध्ये परतलो, तेव्हा तेथील एक अन्य पंथीय नोकर येऊन म्हणाला, तुम्ही सर्व जण रात्री २ वाजता दर्शनासाठी गेला होता, तेव्हा मी पुन्हा झोपलो. स्वप्नात मी असे पाहिले की, आईंना अमरनाथबाबाचे दर्शन घडवून आणण्यासाठी २ देवदूत आले होते. त्यांनी लाल रंगाचे कपडे घातले होते आणि ते आईंच्या डोक्यावर छत्र धरून चालत होते. नंतर तो नोकर आईविषयी पुष्कळ आदराने बोलत होता.

८ आ. आईच्या दोन्ही भुवयांच्या मध्ये एक उभी रेष आहेे.
ती पाहून आईची मोठी बहीण तू तर संत आहेस, असे नेहमी म्हणायची.

८ इ. मधुर वाणी आणि अध्यापन यांमुळे निरीक्षक प्रभावित होणे

आई जेव्हा शिकवायची, तेव्हा तेथील निरीक्षक तिच्या शिकवण्याविषयी मधुर वाणी असा शेरा मारून जात होते. आईच्या वाणीमुळे सर्व जण प्रभावित होत होते.

आईच्या संपर्कात जो यायचा, तो तिच्यामुळे लगेचच प्रभावित होऊन जायचा. आईने ज्या शाळेत अध्यापन केले, तेथे तिला पुष्कळ प्रेम आणि आदर मिळाला. तिच्या कामामुळे सर्व जण प्रभावित व्हायचे.

८ ई. आई कुठल्याही रांगेत उभी असली की, अन्य लोक तिलाच पुढे जायला सांगायचे. त्यामुळे तिला कोणत्याही कामासाठी कधी रांगेत उभे रहावे लागले नाही. हे पाहून मला पुष्कळ आश्‍चर्य वाटायचे.

९. निर्भयता

आईला कुठे एकटीने जायचे असेल, कठीण प्रवास असेल, अंधार असेल किंवा हवामान चांगले नसेल, तरीही तिला कोणत्याच गोष्टीची भीती वाटत नाही. तिला जे करायचे असते, ते ती कोणत्याही परिस्थितीत करते.

१०. ईश्‍वरावर अतूट श्रद्धा असल्याने कठीण प्रसंगातही स्थिर रहाणे

पू. आईने आपल्या जीवनात पुष्कळ संघर्ष केला; पण तिने कधीही धैर्य गमावले नाही आणि ती कधी विचलीतही झाली नाही. कठीणातील कठीण प्रसंगातही ईश्‍वरच पुढे सगळे काही चांगले करणार आहे, अशी तिने ईश्‍वरावर अतूट श्रद्धा ठेवली. नातेवाइकांसंदर्भात किंवा कुटुंबातील कितीही मोठा कठीण प्रसंग असला, तरीही तिला कधी विचलीत झाल्याचे मी पाहिले नाही. आई नेहमी म्हणायची, आपला जो देवाणघेवाण हिशोब आहे, तो आपल्याला पूर्ण करावाच लागणार आहे.

११. आलेल्या अनुभूती

११ अ. एका पक्ष्याचा गोड आवाज ऐकून रामायणातील काकभुशंडी (काकभूसुंडी) पक्ष्याशी संबंधित पंक्ती आठवणे आणि भावजागृती होणे

एकदा आई साधकांवर उपाय करत होती. तेव्हा तिला एका पक्ष्याचा गोड आवाज ऐकू आला. तेव्हा तिच्या मनात श्रीरामाच्या आरतीतील काकभुशंडी ही ओळ येऊ लागली. आई जेव्हा आपल्या खोलीत परत आली, तेव्हा तिने रामचरितमानस वाचण्यासाठी तो ग्रंथ उघडल्यावर त्यामध्ये काकभुशंडीशी संबंधित श्‍लोकच तिला दिसला. हे पाहून आईच्या डोळ्यांतून भावाश्रू वाहू लागले. नंतर आईने त्यातील काही पाने वाचली. संध्याकाळी तिला संत तुलसीदास यांची पुण्यतिथी असल्याचे समजले. तेव्हापासून आई रामचरितमानसमधील काही पृष्ठे वाचू लागली. तिला ही अनुभूती म्हणजे हिंदु राष्ट्र लवकरच येण्याचा संकेत वाटला.

११ आ. प्रकृती गंभीर असतांना प.पू. भक्तराज महाराज
आणि श्री दुर्गादेवी यांनी वाचवल्याची अनुभूती येणे

११ वर्षांपूर्वी आई पुष्कळ रुग्णाईत झाली होती. त्या वेळी आधुनिक वैद्यांनी हे तिच्या जिवावरचे संकट असल्याचे अप्रत्यक्षपणे सांगितले होते. त्या काळात एका रात्री आई अधिकच गंभीर होती. त्या रात्री तिला प.पू. भक्तराज महाराज तिच्या उशाशी बसून डफ वाजवत भजन म्हणत होते आणि पूर्ण रात्रभर श्री दुर्गादेवी तिच्या छातीवर बसली होती, हे दृश्य दिसले. सकाळी आईच्या प्रकृतीत आश्‍चर्यजनक चांगला पालट होऊन ती बरी झाली.

१२. संतपद घोषित होण्याआधी मिळालेल्या पूर्वसूचना

१२ अ. स्वप्नात साधकांसमवेत गोवर्धन पर्वताची परिक्रमा करत असतांना स्वतः सर्वांत पुढे चालत असल्याचे दिसणे आणि काही मासांनी (महिन्यांनी) प.पू. गुरुदेवांनी संतपदाला पोचल्याची घोषणा करणे

फरिदाबाद येथे जेव्हा एकाच दिवशी तीन वयस्कर साधकांचा ६१ प्रतिशत आध्यात्मिक स्तर घोषित झाला, तेव्हा आईला पुष्कळ आनंद झाला होता. त्या वेळी तिने श्रीकृष्णाला विचारले होते, तू मलाच का मागे ठेवलेस ? त्याच रात्री आईला स्वप्न पडले, सर्व साधक गोवर्धन पर्वताची परिक्रमा करत आहेत आणि आई त्या सर्वांच्या मागे आहे. तिने श्रीकृष्णाला म्हटले, मी तर सर्वांच्या मागे आहे. श्रीकृष्ण म्हणाला, लक्ष देऊन पहा. तेव्हा आईला ती सर्वांत पुढे चालत आहे आणि सर्व साधक तिच्या मागोमाग येत होते, असे दिसले. त्यानंतर काही मासांनी (महिन्यांनी) प.पू. गुरुदेवांनी ती संतपदाला पोचली असल्याची घोषणा केली. (या प्रसंगातून असे वाटले की, आईची भक्ती किती निर्मळ असेल ! आपल्या भक्तीविषयी तिला एवढा आत्मविश्‍वास असल्यामुळे आपण मागे राहूच शकत नाही, असे तिला वाटले आणि नंतर श्रीकृष्णानेच तिला ही प्रचीती दिली.)

१२ आ. संतपद घोषित होण्यापूर्वी सहा दिवस भावावस्थेत असणे आणि प्रत्येक साधकामध्ये गुरुदेवच दिसणे

४.३.२०१५ या दिवशी सकाळी पू. आई रामनाथी आश्रमात प.पू. गुरुदेवांच्या खोलीवरील आगाशीत बसून नामजप करत होती. काही वेळातच आई ध्यानावस्थेत गेली. तिला सकाळच्या अल्पाहारासाठी २ – ३ वेळा विचारले; पण तिला कशाचेच भान नव्हते. काही वेळाने तिच्या डोळ्यांतून भावाश्रू वाहू लागले. ती म्हणाली, मी एवढा सुंदर प्रकाश यापूर्वी कधीच पाहिला नाही. आई त्या अवस्थेतच ४ घंट्यांपर्यंत तशीच बसून राहिली. इतर वेळी तिला एकाच ठिकाणी १ – २ घंट्यांपेक्षा अधिक वेळ बसणे कठीण होते. त्यानंतर ती ५ दिवस भावावस्थेतच होती. तिला प्रत्येक साधकामध्ये गुरुदेवच दिसत होते. त्यानंतर १०.३.२०१५ या दिवशी ती संत झाल्याची घोषणा करण्यात आली. पू. आई ही एकटीच अशी साधिका होती की, तिचा आध्यात्मिक स्तर ६० टक्के झाल्याचे घोषित केले गेले नव्हते. तिचे एकदम संतपदच घोषित करण्यात आले.

प.पू. गुरुदेव, तुम्हीच माझ्याकडून हे लिहून घेतले आहे. त्यासाठी मी हे आपल्याच चरणी अर्पण करून कोटी-कोटी कृतज्ञता व्यक्त करते.

– कु. संगीता मेनराय (पू. (सौ.) सूरजकांता मेनराय यांची कन्या) (२६.६.२०१६)

सनातनच्या संत पू. (सौ.) सूरजकांता
मेनराय यांनी साधकांना सांगितलेली अनमोल सूत्रे

अनेक साधक साधनेमध्ये येणार्‍या त्यांच्या अडचणी पू. आईला (पू. मेनरायआजी यांना) सांगतात. तेव्हा आईने सांगितलेली मार्गदर्शक सूत्रे पुढे देत आहे.

१. खरे अग्निहोत्र म्हणजे साधनेच्या अग्नीमध्ये आपल्या दोषप्रवृत्तींचा होम करणे

२. साधनेने हा आत्मा आपल्या स्वरूपाला प्राप्त करतो.

३. जेव्हा निश्‍चय स्थिर असतो, तेव्हाच श्रद्धा वाढते.

४. भावाश्रूंनी पाप धुतले जाते. भावाश्रूंनी धुवून धुवून मन निर्मळ होते.

५. साधकांनी वेळ वाया घालवू नये. जेवढा वेळ आहे, तेवढा अखंड नामजप करत रहावे. त्या प्रमाणात साधनेचा विकास होईल.

६. नामजप अथवा मंत्रजप जेवढा आतमध्ये जाईल, तेवढा थकवा न्यून होतो.

७. ज्या प्रकारे बीज उलटे किंवा सरळ असो, ते तर अंकुर देतेच. त्याप्रमाणेे आपण कशाही प्रकारे नामजप केला, तरी आपल्याला अवश्य लाभ होतोच; परंतु नामजपावर श्रद्धा असणे आवश्यक आहे. यासाठी आमच्यासमोर रामचा जप करण्याऐवजी मराचा जप करणार्‍या वाल्या कोळ्याचे उदाहरण आहे. श्रद्धेने; परंतु अज्ञानामुळे उलटा नामजप करूनही त्याने ऋषिपद प्राप्त केले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात