साधनेसाठी आसन कसे असावे ?

साधनेसाठी लाकूड वर्ज्य असण्याची कारणे

1392307954_deepak-joshiसाधनेसाठी चिंच, जांभूळ आदी काही झाडांच्या लाकडांची आसने वर्ज्य म्हणून सांगितली आहेत. अशा नावांची सूची देण्यापेक्षा काही ग्रंथांमध्ये सरसकट सर्वच लाकडी आसने वर्ज्य असे, सांगितले जाते. ती ग्रंथलेखनाची एक पद्धत आहे; कारण अन्य ग्रंथांमध्ये पळस, बकुळ आदी झाडांचे लाकूड आसनासाठी चांगले आहे, असाही उल्लेख आढळतो. लाकडाचे आसन साधनेसाठी वापरू नये, असे सांगण्यामागे वृक्षांचा र्‍हास होऊ नये, हेही एक कारण आहे.

– पू. गणेशनाथजी उपाख्य डॉ. दीपक जोशी, पुणे यांनी सांगितलेली माहिती. (१३.८.२०१६)

 

१. साधना करतांना निर्माण झालेली ऊर्जा
भूमीत प्रवाहित न होता संग्रही राहील, असे आसन हवे !

साधना करतांना आपल्या आतून उच्च दिव्य तरंग निघतात. साधकाचे आसन लादीचे असेल, तर ती सर्व ऊर्जा त्या आसनातून भूमीत प्रवेश करते. अशा प्रकारे अर्जित केलेल्या ऊर्जेचा पुष्कळ मोठा भाग आपण व्यय करतो. लाकडामध्ये साधनेतील ऊर्जा प्रवाहित होऊ शकत नाही, तसेच संग्रहीतही राहू शकत नाही. यासाठी लाकूडही वर्ज्य सांगितले आहे.

 

२. सैल वस्त्र, दगड किंवा खडकाळ जागा,
केवळ भूमी आणि लाकूड यांवर बसून साधना करू नये !

या संदर्भात भगवान शिव माता उमेला गुरुगीतेत स्पष्टपणे सांगतात,

वस्त्रासने च दारिद्य्रं पाषाणे रोगसम्भवः ।
मेदिन्यां दुःखमाप्नोति काष्ठे भवति निष्फलम् ॥ – गुरुगीता, श्‍लोक २२०

अर्थ : सैल वस्त्रासनावर बसल्याने दरिद्रता येते, तसेच ध्यान चांगल्या प्रकारे लागत नाही. दगड किंवा खडकाळ जागी साधना केल्याने रोग होऊ शकतात. केवळ भूमीवर बसून केलेली साधना दुःख देते. लाकडाच्या आसनावर केलेली साधना तर निष्फळ होते.

 

३. साधनेला एका ठराविक स्थानी कुशासनावर
किंवा एका स्वच्छ गोधडीच्या तीन-चार घड्या घालून त्यावर बसावे !

प्रभु, साधकाने कोणत्या प्रकारच्या आसनावर बसून ध्यान-धारणा केली पाहिजे ?, असे माता उमा प्रश्‍न विचारते. त्यावर उत्तर देतांना महादेव म्हणाले, एका ठराविक स्थानी कुशासनावर किंवा एका स्वच्छ गोधडीच्या तीन-चार घड्या घालून बसावे.

कुशासने ज्ञानसिद्धिः सर्वसिद्धिस्तु कम्बले । कुशैर्वा दूर्वया देवि आसने शुभकम्बले ।
उपविश्य ततो देवि जपेदेकाग्रमानसः ॥ – गुरुगीता, श्‍लोक २२१ आणि २२२

अर्थ : कुशासनावर (दर्भाच्या आसनावर) बसून साधना केल्याने ज्ञानसिद्धी होते. कांबळे अंथरून त्यावर बसून साधना केल्यास सर्व सिद्धी प्राप्त होतात. त्यामुळे हे देवी (पार्वती), दर्भ, दूर्वा किंवा चांगले कांबळे यांपैकी कोणत्याही एकापासून बनवलेल्या आसनावर बसून एकाग्रतेने जप करावा.

वरील प्रकारच्या आसनावर बसून साधना केल्यास साधनेतून निर्माण होणारी ऊर्जा काही प्रमाणात आसनात संग्रहीत होऊन रहाते. ही ऊर्जा अन्य आसनांप्रमाणे भूमीत प्रवाहित होत नाही. या संग्रहीत ऊर्जेचा साधकाला लाभ होतो. यासाठी प्रत्येकाचे स्वतंत्र आसन असावे. एकाचे आसन दुसर्‍याने वापरू नये, असेही सांगितले जाते.

– वेदमूर्ति केतन शहाणे, अध्यापक, सनातन साधक-पुरोहित पाठशाळा, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.८.२०१६)

 

साधकामध्ये शुचिता आणि
भाव असल्यास आसनाचे महत्त्व गौण असणे

साधनेमध्ये साधकाची शुचिता आणि त्याच्यामधील भाव यांना सर्वांत जास्त महत्त्व आहे. हे घटक साधकामध्ये परिपूर्ण असतील, तर कोणत्याही आसनावर बसून साधना केली, तरी ती सारखीच फलदायी होते; परंतु हे मूलभूत घटक साधकात नसतील, तर कितीही चांगले आसन घेऊनही काही लाभ होणार नाही.

– डॉ. मोहन केशव फडके, मंत्र-उपचार तज्ञ, पुणे यांनी सांगितलेली माहिती. (१३.८.२०१६)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात