गणेशोत्सव जवळ आला आहे. आता नेहमीप्रमाणे स्वत:ला पर्यावरणप्रेमी म्हणवणारे स्वयंघोषित सुधारक आणि त्यांच्या संघटनांचे कार्यकर्ते सक्रीय होतील. गणेशोत्सवात गणेशमूर्ती विसर्जित केल्यामुळे जलप्रदूषण होते, अशी टूम या लोकांनी काही वर्षांपूर्वी काढली होती. धर्मशिक्षणाचा अभाव आणि कथित पुढारलेपण यांमुळे अनेक जण त्यांच्या नादालाही लागले; पण आता या स्वयंघोषित समाजसुधारक आणि समाजसेवक यांचे पितळ उघडे पडत आहे. गणपतीच्या मूर्तीला लावण्यात येणार्या रंगांमुळे जलप्रदूषण होते. त्यामुळे अशा मूर्ती तलाव, नद्या, खाड्या, समुद्र यांत विसर्जित न करता, कृत्रिम तलावांत विसर्जित करण्याची किंवा त्या स्वयंघोषित संघटनांना दान देण्याची फॅशन चालू झाली. असे असतांना धर्मद्रोही प्रदूषणाचे खापर आज केवळ गणेशमूर्ती विसर्जनावर का फोडत आहेत ? आणि प्रत्यक्षात होणार्या अतीभयानक प्रदूषणाविषयी गांधीजींच्या तीन माकडांसारखे ते का गप्प बसले आहेत ? असे प्रश्न आपण त्यांना विचारायला नकोत का ?
सहस्रो वर्षे चालणार्या गणेशोत्सवामुळे कधी पर्यावरणाची हानी झाली नाही; पण विज्ञानाने केवळ १०० वर्षांत पर्यावरण नष्ट करत आणले आहे. जेव्हा हिंदुत्वनिष्ठ धर्मद्रोह्यांना गणेशमूर्ती विसर्जन बंद करायचे आहे; म्हणून ते त्याद्वारे होणार्या तथाकथित प्रदूषणाचा बाऊ करत आहेत, असे म्हणतात, तेव्हा धर्मद्रोही प्रतिवाद करतात की, हा हिंदुत्वनिष्ठांचा कांगावा आहे आणि आम्ही खरोखरच प्रदूषणाच्या विरोधात प्रयत्न करतो. होळी लहान करा-पोळी दान करा मोहीम असो किंवा गणेशमूर्ती दान घेण्याची मोहीम असो ! अंनिसवाल्यांना पुढे दिलेल्या प्रदूषणाच्या वेळी ते काय करत होते ? हे विचारले जावे, यासाठी हा लेखप्रपंच !
या लेखात कोल्हापूर येथे होणार्या प्रदूषणाच्या संदर्भात दिलेली माहिती कोल्हापूर महानगरपालिकेच्या वर्ष २०१३-१४ च्या पर्यावरण सद्यस्थिती अहवालातून घेतलेली आहे. ती वाचल्यानंतर प्रदूषणाला केवळ गणेशमूर्ती विसर्जन उत्तरदायी आहे, असा भाबडा समज झाला असल्यास तो दूर होईल.
१. तथाकथित पर्यावरणप्रेमींनो, हे प्रदूषण तुम्हाला दिसले नाही का ?
अ. नाल्यांद्वारे नदीपात्रात प्लास्टिक पिशव्या, घनकचरा, सांडपाणी इत्यादी सोडले जाते. हे तातडीने बंद व्हायला हवे. त्यामुळे होणार्या जलप्रदूषणाने नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे.
आ. एका ठिकाणी असा स्पष्ट उल्लेख आहे की, नदीकाठी कपडे किंवा जनावरे धुणे, नदीकाठावरील वीटभट्ट्या बंद करणे, मातीचा उपसा बंद करणे, हे सर्व आवश्यक आहे; मात्र यांपैकी काहीही बंद न करता केवळ गणेशमूर्तींच्या विसर्जनाला प्रतिबंध करून हिंदूंच्या भावना जाणूनबुजून पायदळी तुडवल्या जात आहेत.
इ. दुधाळी नाल्याविषयी या अहवालात स्पष्ट म्हटले आहे की, हा नाला ज्या भागातून जातो, त्या भागात सोन्या-चांदीच्या दागिन्यांचे व्यवसाय, दुरुस्ती व्यवसाय, तसेच म्हशीपालनाचा व्यवसाय आणि टिंबर मार्ट असल्याने नाल्यात आम्ल पदार्थ, तसेच रासायनिक द्रव्ये आणि प्राण्यांचे मलमूत्र थेट सोडले जाते अन् त्यावर कोणतीही प्रक्रिया न करता ते तसेच पंचगंगा नदीत सोडण्यात येते.
ई. जमादार क्लब नाला ज्या भागातून जातो, तेथे तांबट व्यवसाय आणि भट्ट्या असल्याने घनकचरा मोठ्या प्रमाणात नाल्यात सोडला जातो. तो पुढे पंचगंगेला मिळतो. तांबटांचा व्यवसाय म्हणजे विशेषत: तांबे आणि पितळ या धातूंच्या भांड्यांचा व्यवसाय. यामुळे नाल्यात निश्चितच या धातूंचा सूक्ष्म चुराही मिसळला जातो.
उ. जुना बुधवारपेठ नाला पंचगंगा नदीपासून केवळ ३०० मीटर अंतरावर असून त्यात प्लास्टिकच्या पिशव्या इत्यादी घातक घनकचरा आढळून आला आहे आणि तो कचरा तसाच पुढे पंचगंगेत जातो.
ऊ. सी.पी.आर्. नाल्यात सी.पी.आर्. रुग्णालयातील जैव कचरा, तसेच प्लास्टिक कचराही टाकला जातो. त्यातील काही सांडपाण्यावर प्रक्रिया होते; मात्र तीही गुणवत्तापूर्ण नसते. उर्वरित सांडपाणी तसेच पुढे जयंती नाल्याद्वारे पंचगंगेत सोडले जाते. त्यात प्लास्टिकच्या पिशव्या आणि वस्तूही आढळून आल्या आहेत.
ए. न्यू पॅलेस नाल्यात नवीन राजवाड्याच्या मागून रमण मळ्याच्या भोवतीच्या वस्तीचे सांडपाणी सोडण्यात येते. ते पुढे पंचगंगेस मिळते. त्या नाल्यावर डोह निर्माण करण्यात आला असून तो अत्यंत चुकीचा आहे, अशी अहवालात नोंद आहे.
ऐ. लाईन बाजार नाला हा एस्.पी. बंगला, पोलीस लाईन, लाईन बाजार या परिसरातील सांडपाणी घेऊन थेट नदीला मिळतो. या नाल्यातील दूषित पाण्यातील सर्वांत मोठा घटक म्हणजे गोकूळ दूध संघातील दूषित सांडपाणी हा आहे.
ओ. उचगाव नाला, छत्रपती कॉलनी, कसबा-बावडा, कदमवाडी आणि बापट कॅम्प हे नालेही आजूबाजूच्या नागरी वस्तीतील सांडपाणी घेऊन थेट नदीला मिळतात.
औ. वीटभट्टी नाला हा प्रामुख्याने बापट कॅम्प, मार्केट यार्ड, गुड्स यार्ड या भागातील सांडपाणी वाहून नेतो. यातील प्रमुख दूषित घटक म्हणजे पशूवधगृहाच्या परिसरातील सांडपाणी या नाल्यात मिसळते आणि ते पुढे नदीला मिळते.
वरील सर्व नाल्यांच्या पाण्याचे प्रत्येकी आठ दिवसांनी नमुने घेऊन पृथःकरण करण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे. त्यानुसार निकेल, क्रोमियम, लोह, जस्त, कॅल्शियम, तेल (ऑईल), ग्रीस (वंगण) असे पर्यावरणाला आणि मानवी आरोग्यालाही अत्यंत घातक घटक सर्व नाल्यांतील सांडपाण्यात दिसून आलेले आहेत. याचा अर्थ हे सर्व घटक या नाल्यांद्वारे पुढे पंचगंगा नदीत जाऊन मिळतात. त्यामुळे पंचगंगेच्या पाण्यावर अवलंबून असणार्या लाखो नागरिकांचे आयुष्य धोक्यात आले आहे.
२. कचरा आणि सांडपाणी यांद्वारे होणारे भीषण प्रदूषण
अ. सांडपाणी उपसापंप आणि सयंत्र यांवर प्रतीवर्षी १ कोटी २२ सहस्र ३२० रुपये इतका व्यय होतो; मात्र प्रतिदिन ५ कोटी लिटर सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट नदीत सोडले जाते.
आ. शहरातील मैला आणि सांडपाणी वाहून नेणारी जवळपास ७५३ कि.मी. लांबीची गटारे उघडीच आहेत, तसेच या गटारांत शहरांतील १६ ठिकाणी मैला आणि सांडपाणी साठून रहाते. त्यातून साथीच्या रोगांचा प्रसार होतो.
इ. कपडे धुणे, कचरा टाकणे
एकेकाळी तलावांचे शहर म्हणून ओळखल्या जाणार्या सर्वच तलावांतील पाणी दूषित होण्याच्या कारणांमध्ये मूर्ती आणि निर्माल्य विसर्जन, सांडपाणी मिसळणे, जनावरे धुणे, वाहने धुणे, कपडे धुणे, कचरा टाकणे या कारणांचा उल्लेख आहे; मात्र केवळ मूर्ती विसर्जनच यास कारणीभूत असल्याचे भासवले जात आहे. या कारणांतील अन्य गोष्टी थांबवण्यासाठी मात्र स्वयंघोषित सुधारक काही करतांना दिसत नाहीत.
ई. पशूवधगृहातील मांस, हाडे, तसेच बांधकामाशी संबंधित साहित्य
शहरात प्रतिदिन १७५ मेट्रिक टन घनकचरा सिद्ध होतो. ज्यामध्ये सडलेला भाजीपाला; बांधकाम क्षेत्राशी संबंधित वस्तू; पशूवधगृह परिसरातील प्राण्यांचे रक्त, हाडे आणि मांस; रुग्णालयांत वापरलेले बँडेज, रक्तमिश्रीत वस्तू, सलाईनच्या प्लास्टिक बाटल्या, सुया इतकेच नव्हे, तर नको असलेले अवयव यांचाही समावेश आहे. या सर्व गोष्टीचे योग्य प्रकारे व्यवस्थापन करण्याची कोणतीही यंत्रणा शासनाकडे नाही. या सर्व घनकचर्यामुळे होणारी पर्यावरणाची हानी किती मोठ्या प्रमाणातील आहे, याकडे दुर्लक्ष करणारे स्वयंघोषित सुधारक अशा अविर्भावात बोलत असतात की, पर्यावरण आणि मानवी आयुष्याला सर्वांत घातक असे प्रदूषण केवळ गणेशोत्सवामुळे होते.
उ. विद्युतघट (बॅटर्या)
विजेरी, भ्रमणभाष, वाहने इत्यादींसाठी वापरले जाणारे सर्वच प्रकारचे खराब झालेले विद्युतघट (बॅटर्या) हे सर्वांत घातक कचरा या सदरात गणले जातात. असे विद्युतघट कचर्यात टाकले जातात. त्यामुळे गंभीर स्वरूपाचे प्रदूषण होते. ते मानवी जीवन आणि पर्यावरण यांनाही हानीकारक असते. त्याचे एकत्रीकरण, वर्गीकरण आणि विल्हेवाट ही अत्यंत किचकट अन् अवघड गोष्ट मानली जाते; मात्र त्या विद्युतघटातील वस्तूंमुळे पर्यावरणावर होणारे परिणाम अत्यंत घातक आहेत. त्या दृष्टीने कोणी सुधारक कधी आंदोलने करतांना दिसत नाही. आज गुणवत्ता असणार्या आस्थापनांनी उत्पादिलेल्या विद्युतघटांपेक्षा चिनी बनावटीच्या निकृष्ट दर्जाच्या विद्युतघटांचा सर्रास वापर होतांना दिसतो; मात्र तो पुढे पर्यावरणास अधिक घातक ठरणारा आहे. स्वत:चे खोटे पुरोगामित्व जगाला दाखवण्याच्या नादात हे स्वयंघोषित सुधारक केवळ गणेशमूर्ती आणि कुजल्यानंतर मातीत मिसळून जाणार्या निर्माल्याच्या विरोधात आरडाओरड करतांना दिसतात.
३. वैद्यकीय सेवेतील टाकाऊ वस्तूंचा कचर्यात समावेश !
वर आलेल्या सूत्रात जैव वैद्यकीय कचर्याचा उल्लेख होता. सी.पी.आर्. नाल्यात अशा प्रकारचा कचरा आढळला असल्याचे या अहवालात नमूद केले आहे. हा कचरा म्हणजे नेमके काय ? तर वैद्यकीय सेवेशी संबंधित टाकाऊ वस्तू ! ज्यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो.
अ. शस्त्रकर्माद्वारे काढून टाकण्यात आलेले मानवी अवयव, ग्रंथी, अर्भके, रक्त
आ. कापूस, बँडेज, पट्टी, पॅड, प्लास्टर इत्यादी टाकाऊ वस्तू ज्यांचा संबंध शरिरातील स्राव, पू, रक्त, लाळ, लघवी, जठरातील द्राव, पोटातील द्राव, फुफ्फुसातील द्राव, रक्त यांच्याशी आला आहे.
इ. सलाईनचा सेट, रक्ताची पिशवी, नाकात घालायच्या नळ्या, रबरी नळ्या, हातमोजे, कॅथेटर, लघवीची पिशवी, प्लास्टिक इंजेक्शनच्या बाटल्या, अॅम्प्युल्स इत्यादी वस्तू
ई. सुया, फुटलेल्या काचेच्या बाटल्या, धारदार सुरे, इंजेक्शनच्या काचेच्या बाटल्या
४. श्री गणेशमूर्तींच्या विसर्जनामुळे प्रदूषण होत
असल्याचा कांगावा करणारे कचर्यामुळे होणार्या
गंभीर परिणामांविषयी संवेदनशील का नाहीत ?
अशा प्रकारच्या कचर्याच्या विल्हेवाटीसाठी काही नियम शासनानेच सिद्ध केलेले आहेत. त्यातील एक नियम असाही आहे की, काही प्रकारचा कचरा हा भूमीत २ मीटर खोल खड्डा करून तो अर्धा भरून त्यात चुनखडीचा थर टाकून त्यात हा कचरा पुरावा. हा खड्डा नागरी वस्ती, पाण्याच्या टाक्या, तलाव, विहिरी, नद्या, नाले यांच्यापासून फार लांब असावा. असा नियम असतांनाही हा अत्यंत घातक मानला जाणारा कचरा नाल्यांद्वारे थेट नदीतच पोचत आहे. कथित समाजसुधारक आणि पर्यावरणप्रेमी यांच्या टोळीला या कचर्यामुळे होणारे गंभीर परिणाम कधीही दिसले नाहीत; मात्र गणेशमूर्तींच्या विसर्जनामुळे इतके प्रदूषण झाले की, जगाचा अंत झाला कि काय, अशा आविर्भावात हे सुधारक स्वत:चे पुरोगामित्व सिद्ध करण्याच्या प्रयत्नात दिसतात.
५. भस्मीकरण न करता नाल्यात टाकलेला वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित कचरा, तसेच नवजात किंवा मृत अर्भके यांच्याविषयी समाजसुधारकांची टोळी गप्प का ?
कापूस, बँडेज, पट्टी, पॅड, प्लास्टर इत्यादी टाकाऊ वस्तू, ज्यांचा संबंध शरिरातील स्राव, पू, रक्त, लाळ, लघवी, जठरातील द्राव, पोटातील द्राव, फुफ्फुसातील द्राव, रक्त यांच्याशी आला आहे, अशा प्रकारचा कचरा विल्हेवाटीच्या जागी भस्मीकरण करण्यासाठी पाठवायचा आहे, असा त्यासंबंधी स्पष्ट नियम आहे. तरीही अशा प्रकारचा कचरा नाल्यात सापडल्याची उदाहरणे आहेत. इतकेच काय कित्येकदा नवजात किंवा मृत अर्भकेही नागरी वस्तीतील कचर्यात किंवा नाल्यांत आढळून येतात. त्यामुळे होणारे गंभीर परिणाम या भोंदू समाजसुधारकांच्या टोळीला कधीच दिसले नाहीत; मात्र यांचा आव असा असतो की, हा कचरा कसाही आणि कुठेही टाकला गेला, तरी चालेल; मात्र गणेशमूर्ती विसर्जनामुळे पर्यावरणाची हानी होत आहे.
६. विजेच्या वस्तूंच्या कचर्याकडेही
कानाडोळा करणारे स्वयंघोषित सुधारक !
विजेच्या वस्तूंच्या वापरानंतर निर्माण होणारा कचरा म्हणजे ई-कचरा ! यात सर्व प्रकारचे उद्योग समूह (इंडस्ट्री), शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, आस्थापने इत्यादींत निर्माण होणारा ई-कचरा येतो. यात संगणकांचे सुटे भाग, दूरदर्शन, शीतकपाट (रेफ्रिजरेटर), भ्रमणभाष, ध्वनीचित्र-चकती, मेमरी कार्ड, सीमकार्ड, रेडिओ, टेपरेकॉर्डर, ट्यूब, बल्ब, वायर इत्यादी सर्व प्रकारच्या गोष्टी येतात. यांपैकी फार थोड्या कचर्यावर प्रक्रिया करून पुनर्वापर केला जातो. उर्वरित सर्व ई-कचरा हा जसाच्या तसा उघड्या मैदानात किंवा पाण्यात म्हणजे नाल्याद्वारे नदीत सोडला जातो. इतक्या गंभीर प्रकाराकडे लक्ष देणे स्वयंघोषित सुधारकांच्या टोळीला शक्य नाही; कारण केवळ गणेशमूर्तींच्या विसर्जनामुळेच ही पृथ्वी धोक्यात आली आहे, असे त्यांना वाटते. केवळ हिंदूंच्या धार्मिक गोष्टी म्हणजे या सुधारकांच्या टोळीला वारश्यात मिळालेली संपत्ती वाटते का की, वाटेल तेव्हा, वाटेल त्या प्रकारे केवळ हिंदूंच्याच धार्मिक गोष्टींत यांनी ढवळाढवळ करावी ?
७. ई-कचर्यातील घातक घटक आणि
त्यांचे मानवी आरोग्यावरील दुष्परिणाम
अ. लेड (शिसे)
सेंट्रल पेरीफेरल नर्व्हस सिस्टमला हानी पोेचवते, मूत्रपिंडावर, तसेच लहान मुलांच्या मेंदूवर परिणाम करते.
आ. कॅडमियम
कधीच न पालटता येणारे घातक परिणाम शरिरावर होतात. मूत्रपिंड आणि यकृत यांवर घातक परिणाम होतात.
इ. मर्क्युरी (पारा)
मेंदूला कायमस्वरूपी हानीकारक, तसेच श्वसनाच्या आणि त्वचेच्या तक्रारी निर्माण होतात.
ई. व्हेस्कॅलव्हॅनल्ट क्रोमियम
दमा, तसेच गुणसूत्रांना हानी
उ. प्लास्टिक, पी.व्ही.सी.
प्लास्टिक जाळल्यामुळे डाय-ऑक्सिजन निर्माण होतो. त्यामुळे प्रजननाच्या आणि वाढीच्या तक्रारी निर्माण होतात. प्रतिकारशक्ती न्यून होऊन हार्मोन्सच्या चक्रात पालट होतो.
ऊ. बेरीयम
स्नायू दुर्बळ होतात. हृदय, यकृत, प्लीहा यांना हानी पोचते, तसेच फुफ्फुसांचा कर्करोग आणि त्वचारोग होतात.
८. उद्योगांमुळे होणारे वायूप्रदूषणही जाणूनबुजून दुर्लक्षित !
उद्योगांमुळे निर्माण होणारा धूर आणि उष्णता यांमुळे वातावरणावर होणारे दुष्परिणाम यांचाही उल्लेख या अहवालात आहे. शहरांतील उद्योग, वाहने, जनरेटर, वीटभट्ट्या, तांबट उद्योग, चुनाभट्ट्या आदींमुळे होणारे वायूप्रदूषण गंभीर असून नागरिकांच्या जीवितास धोकादायकही आहे. ई-कचरा किंवा प्लास्टिकसारखा कचरा उघड्यावर जाळणे या गोष्टी सर्रास केल्या जातात, असे अहवालात नोंदवले आहे. या गोष्टी सुधारकांच्या टोळीला दिसत नाहीत; मात्र होळीला शेण्या न जाळता त्या स्मशानात दान करा, अशा आरोळ्या हे सुधारक ठोकतात. ही जाणूनबुजून हिंदूंच्या भावनांची प्रतारणाच नव्हे का ?
– अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद