गणेशमूर्तींच्या विसर्जनाने प्रदूषण होते, अशी ओरड करणार्‍यांनो, सांडपाण्याद्वारे होणार्‍या भीषण जलप्रदूषणाचा विचार करा !

adv_virendra
अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

गणेशोत्सव जवळ आला आहे. आता नेहमीप्रमाणे स्वत:ला पर्यावरणप्रेमी म्हणवणारे स्वयंघोषित सुधारक आणि त्यांच्या संघटनांचे कार्यकर्ते सक्रीय होतील. गणेशोत्सवात गणेशमूर्ती विसर्जित केल्यामुळे जलप्रदूषण होते, अशी टूम या लोकांनी काही वर्षांपूर्वी काढली होती. धर्मशिक्षणाचा अभाव आणि कथित पुढारलेपण यांमुळे अनेक जण त्यांच्या नादालाही लागले; पण आता हे स्वयंघोषित समाजसुधारक आणि समाजसेवक यांचे पितळ उघडे पडत आहे. गणपतीच्या मूर्तीला लावण्यात येणार्‍या रंगांमुळे जलप्रदूषण होते. त्यामुळे अशा मूर्ती तलाव, नद्या, खाड्या, समुद्र यांत विसर्जित न करता, कृत्रिम तलावांत विसर्जित करण्याची किंवा त्या स्वयंघोषित संघटनांना दान देण्याची फॅशन चालू झाली. प्रत्यक्षात मात्र अशा मूर्तींचे पुढे काय होते, हे जाणण्याचा प्रयत्न कोणी करते का ? कि हिंदु समाज आता गणेशोत्सवच एक फॅशन म्हणून पार पाडत आहे ? मुळात येथे प्रश्‍न असा आहे की, गणेशमूर्ती पाण्यात विसर्जित केल्याने पाण्याचे प्रदूषण होते का ? या गोष्टीची कायदेशीर आणि विज्ञानाच्या निकषांवर निश्‍चिती करून घेण्याचा खटाटोप किती हिंदूंनी केला ? सहस्रो वर्षे चालणार्‍या गणेश मूर्तीच्या विसर्जनामुळे कधी पर्यावरणाची हानी झाली नाही; पण विज्ञानाने केवळ १०० वर्षांत पर्यावरण नष्ट करत आणले आहे. इतकेच नव्हे, तर जलप्रदूषण होऊ नये; म्हणून शासनाने निर्माण केलेली व्यवस्था अस्तित्वहीन झाली आहे. ती चांगल्या रितीने चालावी, यासाठी जे शासकीय अधिकारी नेमले गेले आहेत, त्यांना कदाचित् त्यांच्या कर्तव्याविषयी माहितीही नाही. त्याची ही उदाहरणे पहा.

1

१. नगरपालिका आणि नगरपरिषद यांच्या क्षेत्रात निर्माण
होणारे सांडपाणी, त्यावरील प्रक्रिया आणि तिची विल्हेवाट !

महाराष्ट्रातील नगरपालिका आणि नगरपरिषद यांच्या क्षेत्रात प्रतिदिन निर्माण होणारे सांडपाणी, त्यावर केली जाणारी प्रक्रिया आणि तिची विल्हेवाट यांविषयीची एक सारणी शासनानेच प्रकाशित केली आहे. ही सारणी फेब्रुवारी २०१४ ची आहे. त्यावरून आपल्या लक्षात येईल की, जलप्रदूषण गणेशमूर्तींमुळे होते कि शासकीय अधिकार्‍यांच्या नाकर्तेपणामुळे ?

2

२. सांडपाण्याद्वारे होत आहे जीवितहानी !

वरील सर्व आकडेवारीची बेरीज केल्यास असे स्पष्ट दिसते की, महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपालिका आणि महानगरपालिका यांच्या क्षेत्रात प्रतिदिन ६ अब्ज २१ कोटी ३ लक्ष लिटर सांडपाण्याची निर्मिती होते. त्यापैकी केवळ ३ अब्ज ६३ कोटी ८६ लक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया केली जाते. म्हणजेच प्रतिदिन २ अब्ज ५७ कोटी १७ लाख लिटर एवढे सांडपाणी कुठलीही प्रक्रिया न करता जसेच्या तसेच नद्या किंवा खाड्या यांत सोडले जाते. ही आकडेवारी केवळ शहरी भागांतील आहे. खेडेगावांमधून अशा प्रकारे नद्या किंवा खाड्यांत सोडले जाणारे सांडपाणी मोजण्यासाठी शासनाकडे यंत्रणाच नाही. तसेच महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्रांतील कारखान्यांतून रसायनयुक्त सांडपाणी जवळच्या नद्या किंवा खाड्यांमध्ये जसेच्या तसे सोडले जाते. त्यामुळे होणारी प्राणी आणि वनस्पती यांची जीवितहानी शासनाला आणि स्वयंघोषित समाजसुधारक आणि पर्यावरणवादी यांना का दिसत नाही ?

३. माहितीच्या अधिकारातून उघडकीस आलेल्या धक्कादायक गोष्टी !

स्वयंघोषित समाजसुधारकांच्या टोळीतील एका अधिवक्ता सुधारकाने असे प्रकट विधान केले होते की, कुणाला फाशी देतांनाही ती गुपचूप दिली जाऊ नये. त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना त्याची कल्पना देण्यात यावी, हे माणुसकीला धरून आहे. मग गणेशमूर्ती विसर्जनासारख्या सूत्राविषयी हा नियम का नाही ? लोकांकडून दान म्हणून घेतलेल्या मूर्तींचे पुढे काय केले जाणार आहे, हे या स्वयंघोषित सुधारकांनी लोकांना आधी सांगायला नको का ? माहितीच्या अधिकारात काही कार्यकर्त्यांनी विविध ठिकाणची माहिती मागितली. त्यातून बर्‍याच धक्कादायक गोष्टी उघडकीस आल्या.

अ. मुंबई महापालिकेच्या एका सभेतील वृत्तांताची प्रत मिळाली. त्यात एका नगरसेवकाने प्रश्‍न उपस्थित केला होता की, कृत्रिम हौदात विसर्जित केलेल्या गणेशमूर्ती आणि त्यांची झालेली माती जर नंतर खोल समुद्रातच नेऊन विसर्जित केली जाणार असेल, तर हा खटाटोप कशासाठी ?

आ. कोल्हापूर येथून माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार, तेथील कृत्रिम हौदात विसर्जित केलेल्या २ सहस्र ७८७ मूर्ती नंतर इराणी क्रशर खाण नावाच्या एका खाणीत नेऊन टाकण्यात आल्या. म्हणजे गणेशमूर्तींचा वापर भरावासाठीची माती म्हणून केला जातो का ?

इ. पुणे महानगरपालिकेच्या टिळक रोड विभागातून माहितीच्या अधिकारात भयंकर गोष्ट समोर आली. ही गोष्ट वास्तवाचे आणखी स्पष्टपणे भान करून देणारी आहे. गणेशमूर्ती कुठे विसर्जित कराव्यात, याविषयी पालिकेच्या सभेत ठरावच झालेला नसून त्यासंबंधीचे कोणते आदेशही निर्गमित करण्यात आलेले नव्हते. त्यामुळे कृत्रिम हौदात विसर्जित केलेल्या मूर्तींचे पुढे काय केले ?, या प्रश्‍नाला माहिती अधिकार्‍यांनी असे स्पष्ट उत्तर दिले आहे की, काही स्वयंसेवी संस्था मूर्तीदान स्वीकारून मूर्तींचे नियोजन स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून करतात, तसेच पुणे मनपाने बांधलेल्या हौदामध्ये विसर्जित केलेल्या मूर्तींची झालेली माती ही पालिकेच्या विविध उद्यानांमध्ये उपयोगात आणली जाते.

पालिकेच्या उद्यानांच्या स्थितीविषयी वेगळे सांगायला नको. उद्यानांत थुंकणे आणि प्रातर्विधी करणे इत्यादी गोष्टीही सर्रास चालतात. अशा ठिकाणी गणपतीच्या मूर्तीची माती टाकून हिंदूंच्या भावनांशी जाणूनबुजून खेळण्याचा प्रकार शासन करत आहे का ?

ई. पुणे महानगरपालिकेच्या कोंढवा वानवडी येथील साहाय्यक पालिका आयुक्त कार्यालयाकडून माहितीच्या अधिकारात उपलब्ध झालेली माहिती अशी की, गणेशमूर्ती कुठे विसर्जित कराव्यात ? याविषयी पालिकेच्या सभेत झालेल्या ठरावाची प्रत अभिलेखात उपलब्ध नाही, तसेच पालिका आयुक्त किंवा उपायुक्त यांनी त्यासंबंधीचे कोणतेही आदेशही दिलेले नाहीत. इतकेच नव्हे, तर पुढे असेही म्हटले आहे की, हौदात विसर्जन करण्यासाठी आलेल्या मूर्तींची कुठलीही नोंदच ठेवण्यात आलेली नाही.

उ. पुणे, कोल्हापूर या ठिकाणी कृत्रिम हौदातील मूर्ती नंतर कचर्‍याच्या गाडीतून नेऊन खाणींमध्ये किंवा अन्य ठिकाणी टाकून देण्यात आल्या आहेत.

४. धर्मद्वेषी वस्तूस्थिती समोर ठेवून समाजाचे प्रबोधन करणे आवश्यक !

याचा स्पष्ट अर्थ हाच होतो की, अशा प्रकारे हिंदूंना पूर्णपणे अंधारात ठेवून त्यांच्या भावना पायदळी तुडवण्याचे हे स्वयंघोषित समाजसुधारकांचे षड्यंत्र आहे. ते हाणून पाडण्यासाठी वस्तूस्थिती लोकांसमोर मांडायला हवी. त्यासाठी प्रत्येक हिंदूने आपले कर्तव्य म्हणून प्रयत्न करायला हवेत. त्यासाठी विविध गणेशमंडळांना भेटी देणे, त्यांना वस्तूस्थितीची जाणीव करून देणे, मंडळाच्या मंडपातील मूर्ती मोठी असल्याने ती समुद्रातच विसर्जित होईल; पण मंडळाचे कार्यकर्ते आणि आजूबाजूचा परिसर यांतील लोकांचे प्रबोधन करावे आणि धर्मकर्तव्य बजावावे, असे आवाहन करू शकतो. मंदिरे, गणेशोत्सवाचे मंडप यांत, तसेच सार्वजनिक ठिकाणी फलक लावून इत्यादी प्रकारे वरील वस्तूस्थिती लोकांसमोर मांडायला हवी आणि स्वयंघोषित सुधारकांनी आजवर हिंदूंना कसे फसवले, हे लोकांसमोर मांडायला हवे. भित्तीपत्रके, हस्तपत्रके, व्हॉट्स अ‍ॅप, फेसबूक या माध्यमांतून जनजागृती करू शकतो.

– अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद