स्थूलपणा (लठ्ठपणा) न्यून करण्यासाठी प्रतिदिन व्यायाम करावा, औषधांनी मर्दन (मालिश) करावे, योग्य आहार घ्यावा, तसेच औषधेही घ्यावीत. या सर्व स्तरांवर प्रयत्न केल्यास शरिरात साठलेला अनावश्यक मेद (चरबी) न्यून होतो. यांसंबंधीचे विवेचन पुढे दिले आहे.
१. व्यायाम
१ अ. अंथरुणात किंवा भूमीवर लोळणे
सकाळी अंथरुणात पडल्या पडल्या पुढीलप्रमाणे व्यायाम करावा. उताणे (पाठीवर) झोपून दोन्ही दंड कानांजवळ आणि हात सरळ वर घ्यावेत. दोन्ही हातांची बोटे एकमेकांत गुंतवावीत. या स्थितीत कुशीवर वळत अंथरुणाच्या एका कडेपासून दुसर्या कडेपर्यंत आणि दुसर्या कडेपासून पुन्हा पहिल्या कडेपर्यंत १ – २ मिनिटे लोळावे. अंथरुण लहान असल्यास भूमीवर पडून हा व्यायाम करावा. हा व्यायाम उठल्या उठल्या करणे शक्य नसल्यास अन्य व्यायाम करतांना करावा.
सकाळी शौचाला जाऊन आल्यावर पुढीलपैकी शक्य तेवढे व्यायाम शरिराच्या अर्ध्या शक्तीने करावेत. व्यायाम करत असतांना तोंडाने श्वास चालू झाला, म्हणजे अर्धी शक्ती वापरली गेली, असे समजावे. आणखी व्यायाम करायचा असल्यास थोडा वेळ थांबून श्वास पुन्हा नाकावाटे सुरळीत चालू झाल्यावर करावा. व्यायाम ५ मिनिटांपासून आरंभ करून टप्प्याटप्याने वाढवावा. व्यायामाची सवय झाल्यावर प्रतिदिन न्यूनतम २० मिनिटे व्यायाम करावा.
१ आ. पोट आत बाहेर करणे
उभ्याने किंवा बसून १५ ते २० वेळा ही कृती करावी.
१ इ. सूर्यनमस्कार
सूर्यदेवाला प्रार्थना करून सूर्यनमस्कार घालावेत. एका नमस्कारापासून आरंभ करून प्रतिदिन एकेक नमस्कार वाढवत जावे. याप्रमाणे नियमितपणे न्यूनतम १२ सूर्यनमस्कार घालावेत. सूर्यनमस्कारांविषयीचे विवेचन सनातनचा ग्रंथ आदर्श दिनचर्या (भाग २) – स्नान व स्नानोत्तर आचार अन् त्यांमागील शास्त्र यात केले आहे.
१ ई. भुजंग दंड
या दंडामुळे सुटलेले पोट पूर्ववत् होण्यास, तसेच भूक न लागणे, पोट साफ न होणे हे पोटाचे विकार दूर होण्यास साहाय्य होते.
१ ई १. भुजंग दंड काढण्याची कृती
अ. भूमीवर गुडघे टेकवून बसावे. पावले जुळवून ठेवावीत.
आ. टेकलेल्या गुडघ्यांपासून पुढे एक हात आणि १ वीत अंतरावर तळहाताचा मनगटाकडील भाग टेकवावा. (कोपरापासून हाताच्या मधल्या बोटाच्या टोकापर्यंतचे अंतर म्हणजे १ हात अंतर. हाताचा अंगठा आणि करंगळी एकमेकांपासून जास्तीत जास्त दूर नेल्यावर दोन्ही बोटांच्या टोकांमधील अंतर म्हणजे १ वीत अंतर.)
इ. दोन्ही तळहातांमध्ये १ हात अंतर असावे.
ई. मूळस्थिती : तळपाय भूमीला पूर्णपणे टेकवावेत. कटी (कंबर) शक्य तेवढी उंच करून हात आणि पाय अनुक्रमे कोपर आणि गुडघे यांत न वाकवता सरळ ठेवावेत आणि डोके आणि पाठ हातांच्या रेषेत घ्यावी. या स्थितीत शरीर पर्वताप्रमाणे दिसेल. (आकृती १ पहा.)
उ. आता हात कोपरातून वाकवून प्रथम डोके आणि छाती खाली नेऊन नंतर सर्व शरीर खाली न्यावे आणि डोके पुढून वर आणि मागे घेऊन करून शक्य तेवढे मागे घेऊन आकाशाकडे पहावे आणि छाती पुढे घ्यावी. या स्थितीत शरीर फणा काढलेल्या नागाप्रमाणे दिसते, म्हणून या दंडाला भुजंग दंड असे म्हणतात. (आकृती २ पहा.)
ऊ. पुन्हा कटी पूर्वीप्रमाणे वर उचलून मूळ स्थितीत यावे. मूळ स्थितीपासून येथपर्यंत १ दंड पूर्ण होतो. हे दंड शीघ्रतेने ५ ते १० संख्येने काढावेत. एका दंडापासून आरंभ करून स्वतःच्या क्षमतेनुसार दंडांची संख्या वाढवावी.
२. मर्दन (मालिश)
प्रतिदिन अंघोळीपूर्वी मर्दन करावे. मर्दन करण्यासाठी वापरता येऊ शकणार्या औषधांची सूची पुढे दिली आहे. यांतील कोणतेही एक औषध, जे शक्य आणि सोईचे असेल, ते वापरावे. मर्दन केल्याने शरिरातील मेद पातळ होऊन न्यून होऊ लागतो. ज्या भागात मेद जास्त साठला आहे, अशा भागांवर जास्त वेळ, म्हणजे न्यूनतम ५ मिनिटे मर्दन करावे. मर्दन प्रतिदिन न चुकता करावे. हे मर्दन न्यूनतम १०० दिवस करावे लागते. मर्दन केल्यावर अंघोळीच्या वेळी शक्यतो साबण लावू नये. अंग पुसायचा पंचा आणि कपडे तेलकट होऊ नये यासाठी पुढील चूर्णे वापरावीत.
२ अ. मर्दन करण्यासाठी वापरता येऊ शकणारी चूर्णे
पुढीलपैकी काही औषधे ही कोरड्या चूर्णांच्या स्वरूपात आहेत. ती अंगावर चोळण्यापूर्वी अंगाला तिळाच्या तेलाने किंवा खोबरेल तेलाने मर्दन करावे. त्यानंतर ही कोरडी चूर्णे शरिरावर चोळावीत. रस किंवा तेल या स्वरूपातील औषधांनी मर्दन करण्यापूर्वी तिळाचे किंवा खोबरेल तेल लावण्याची आवश्यकता नाही; मात्र अंगाला लावलेले जास्तीचे तेल निघून जावे, यासाठी तेल लावल्यावर पुढीलपैकी कोरडी चूर्णे शरिरावर चोळावीत.
१. लिंबू, संत्रे किंवा मोसंबी यांच्या सालींची पूड : सालींचे लहान तुकडे करून ते उन्हात वाळवावेत. वाळल्यावर मिक्सरमध्ये वाटून त्यांची बारीक पूड करावी. एका वेळी १ – २ चमचे पूड वापरावी.
२. वाळवलेल्या चहाच्या चोथ्याची पूड : चहा गाळल्यावर शिल्लक रहाणारा चहाचा चोथा घ्यावा. यामध्ये साखर मिसळलेली असते. त्यामुळे चोथ्यामध्ये पाणी घालून ढवळून तो पुन्हा गाळून घ्यावा. यामुळे साखरेचा अंश निघून जातो. चहा बनवतांना त्यात आधी साखर न घालता ती चहा गाळल्यावर घातल्यास चहापुडीमध्ये साखर मिसळत नाही. हा चोथा उन्हात वाळवून त्याची बारीक पूड करावी. एका वेळी १ – २ चमचे पूड वापरावी.
३. ४ चमचे हरभर्याच्या डाळीचे पीठ, अर्धा चमचा हळदपूड अन् पाव चमचा कापूरपूड यांचे मिश्रण
४. ४ चमचे तूरडाळीचे किंवा कुळथाचे पीठ आणि १ चमचा लिंबाचा रस यांचे मिश्रण
५. मुळा, माका, टाकळ्याची पाने, डाळिंबाची पाने किंवा संत्र्याची फुले यांचा अर्धी वाटी ताजा रस
६. करडईचा रस आटवून बनवलेले तेल : अर्धी वाटी करडईच्या तेलात अर्धी वाटी करडईच्या भाजीचा वाटून काढलेला रस मिसळून हे मिश्रण केवळ तेल शिल्लक राहीपर्यंत आटवावे. हे तेल थंड झाल्यावर गाळून बाटलीत भरून ठेवावे. या तेलाने सर्वांगाला मर्दन करून लगेच स्नान करावे. हे तेल लावल्यावर खाज येत असल्यास हा उपचार करू नये. हे तेल डोळ्यांमध्ये जाऊ देऊ नये अन्यथा डोळ्यांना खाज येणे, आग होणे, दुखणे, पाणी वहाणे आदी समस्या निर्माण होऊ शकतात. तेलाचे दुष्परिणाम न झाल्यास वरील पद्धतीने पुरेशा प्रमाणात तेल बनवून वापरावे.
७. टाकळ्याचे तेल : १ तांब्या (१ लिटर) तिळाच्या तेलात टाकळ्याच्या भाजीचा पुरेसे पाणी घालून वाटून काढलेला १ तांब्या रस मिसळून हे मिश्रण केवळ तेल शिल्लक राहीपर्यंत आटवावे. हे तेल थंड झाल्यावर गाळून बाटलीत भरून ठेवावे.
३. औषधे
प्रतिदिन सकाळी रिकाम्या पोटी पुढीलपैकी कोणतेही एक औषध घ्यावे. मधुमेह असलेल्या व्यक्तींनी मधाऐवजी कोमट पाणी वापरावे. सलग १ मास १ औषध वापरून गुण न आल्यास या सूचीतील दुसरे औषध १ मास वापरावे. – वैद्य मेघराज माधव पराडकर, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२०.५.२०१६) (संदर्भ : आपत्काळाविषयीची सनातनची आगामी ग्रंथमालिका)
१. मेथी, ओवा आणि बडिशेप यांचे समभाग असलेले १ चमचा चूर्ण १ कप गरम पाण्यातून घ्यावे.
२. नवक गुग्गुळ किंवा कांचनार गुग्गुळ या औषधाच्या ४ गोळ्या अर्धा कप गोमूत्र किंवा गरम पाणी यांसह घ्याव्या.
४. आहार
जेवणातून भात, भाकरी आदी पदार्थ पूर्णपणे बंद करून केवळ भाज्यांवर रहाणे चुकीचे आहे. आहारामध्ये गोड, आंबट, खारट, तिखट, कडू आणि तुरट या सहाही रसांचा समावेश असावा. यांपैकी गोड, आंबट आणि खारट पदार्थ तुलनेने न्यून खावेत. ते पूर्णपणे बंद करू नयेत.
४ अ. पथ्य (हे खावे)
आहारातील जव (सातू), मूग, कुळिथ (हुलगे), ताक, टाकळ्याची भाजी, शेवग्याच्या शेंगा, पडवळ, घोसाळे, भोपळी मिरची, हे पदार्थ अनावश्यक मेद न्यून करतात. यासाठी यांचा आहारात अधिकाधिक समावेश करावा.
मेदस्वी व्यक्तींना भूक जास्त लागते. अशा वेळी मेद न वाढवणारे आणि भूक भागवणारे पदार्थ पुढे दिले आहेत. या सूचीतील स्वतःच्या आवडीनुसार एका वेळी १ – २ पदार्थ निवडावेत. प्रतिदिन एकच पदार्थ खाऊन कंटाळा येतो. एखाद्या पदार्थाचा कंटाळा आल्यावर सूचीतील अन्य पदार्थ निवडावा.
१. पिकलेले टोमॅटो
२. घोसाळ्याची भाजी
३. चांगले भाजलेले पांढरट रंगाचे शेंगदाणे (तांबड्या रंगाच्या शेंगदाण्यांत स्निग्धांश जास्त, तर पांढरट शेंगदाण्यांत स्निग्धांश न्यून असतो; म्हणून पांढरट रंगाचे शेंगदाणे खावेत.)
४. सफरचंदे
५. शिजवलेले मूग किंवा मुगाची उसळ
६. कुळिथाची उसळ आणि कुळिथाचे सार
७. कुळीथ आणि पडवळ यांचे सूप : १ भाग कुळीथ आणि १० भाग पडवळ कुकरमध्ये शिजवून ते मिक्सरमध्ये वाटावे. त्यात १ चमचा जिरे, पाव चमचा दालचिनी, अर्धा चमचा ओवा आणि चवीपुरते सैंधव मीठ घालावे.
८. टाकळ्याची कोवळी पाने उकडून केलेली भाजी आणि वरीचा भात किंवा भाजणीची भाकरी
९. बाजरीची भाकरी, कांदा आणि लसूण
४ आ. अपथ्य (हे करू नये)
पोटभर जेवणे, एकसारखे खाणे, तेलकट पदार्थ खाणे, मांसाहार, जास्त पाणी पिणे, फ्रीजमधील थंड पाणी पिणे, जेवण झाल्यावर पाणी पिणे, दुपारी झोपणे आणि आरामदायी आसंदीत बसणे.
– वैद्य मेघराज माधव पराडकर, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२०.५.२०१६)