१. स्वप्नात एक मनुष्य मृत्यू जवळ आलेल्या
पांढर्या रंगाच्या एका प्राण्याला उन्हात घेऊन येतांना दिसणे
१५.९.२०१६ या दिवशी सकाळी मला एक स्वप्न पडले. त्यात एक मनुष्य मृत्यू जवळ आलेल्या पांढर्या रंगाच्या एका प्राण्याला उन्हात घेऊन येतांनाचे दृश्य दिसले. त्यानंतर मला हे दृश्य दिसणे बंद झाले. सकाळी उठल्यावर मला मरणासन्न प्राणी किंवा पक्षी यांना गती मिळण्यासाठी त्यांचे पालन करणार्या व्यक्तीने कुठले आध्यात्मिक उपाय करावेत, यासंदर्भात पुढील ज्ञान मिळून मला स्वप्नात दिसलेल्या दृष्याचा उलगडा झाला.
२. मरणासन्न प्राणी किंवा पक्षी
शक्य असल्यास उन्हात आणून विशिष्ट मंत्र म्हणणे
आणि ते ज्ञात नसल्यास गंगा नदीचे अथवा देवपूजेतील तीर्थाचे
दोन थेंब किंवा चिमूटभर विभूती संबंधित जिवाच्या तोंडात घालणे
पालन करणार्या व्यक्तीने मरणासन्न प्राणी किंवा पक्षी शक्य असल्यास उन्हात आणून त्या वेळी विशिष्ट मंत्र म्हणावेत. विशिष्ट मंत्रांचे ज्ञान नसल्यास संबंधिताने गंगा नदीचे अथवा देवपूजेतील तीर्थाचे दोन थेंब किंवा चिमूटभर विभूती संबंधित जिवाच्या तोंडात घालावी आणि त्या जिवाला गती मिळण्यासाठी दत्तगुरूंना प्रार्थना करावी.
३. मरणासन्न विशिष्ट प्राणी किंवा पक्षी यांना चांगली गती
मिळण्यासंदर्भातील मंत्र पूर्वीच्या ऋषींना ज्ञात असल्याने ते मंत्र
म्हणताच त्या जिवांना गती मिळण्याविषयीचे फळ लगेच प्राप्त होणे
प्राचीन काळी ऋषींना विशिष्ट प्राणी किंवा पक्षी यांसाठी कोणता मंत्र म्हटल्यास त्यांना गती प्राप्त होणार आहे, यांविषयीचे ज्ञान होते. ऋषींनी २ ओळींचा श्लोक संबंधित जिवासांठी म्हटला, तरी त्या जिवांना गती मिळण्याविषयीचे फळ लगेच प्राप्त होत असे. ऋषींमुळे संबंधित जिवांना लवकर गती प्राप्त व्हायची; म्हणून त्या काळी ऋषींच्या आश्रम परिसरात प्राणी आणि पक्षी यांचा वावर अधिक प्रमाणात असे.
४. सूर्यापासून मिळणार्या शक्तीने प्राणी
अथवा पक्षी यांच्यातील सूक्ष्मदेहाला शक्ती प्राप्त होणे
आणि या शक्तीने त्यांना पुढील मार्गक्रमण करण्यास गती मिळणे
सूर्य हा नैसर्गिक ऊर्जास्त्रोत असल्याने त्यातून मिळणार्या शक्तीने प्राणी अथवा पक्षी यांच्यातील सूक्ष्मदेहाला शक्ती प्राप्त होते. या शक्तीने त्यांना पुढील मार्गक्रमण करण्यास गती मिळते. प्राणी आणि पक्षी यांचे पालन-पोषण निसर्गातच होत असल्याने त्यांच्यासाठी हा उपाय प्रधान ठरला आहे. प्राचीन ऋषि सूर्याद्वारे संबंधित जिवांना गती मिळण्यासाठी करत असलेल्या उपायांना तेजोप्रभा किंवा सूर्यप्रभा म्हणत होते. सूर्यलहरींद्वारे वन्य जिवांचा उद्धार करण्याच्या प्रेरणेने सूर्यप्रभा या संकल्पनेची निर्मिती झाली.
५. प्राणी किंवा पक्षी यांवर मृत्यूसमयी आध्यात्मिक उपाय केल्याने होणारे लाभ
५ अ. पाळीव प्राणी किंवा पक्षी यांच्या मृत्यूसमयी पालनकर्त्याने
दत्तगुरूंना भावपूर्ण प्रार्थना केल्याने त्यांना पुढील योनीत जन्म घेण्याची प्रेरणा मिळणे
घरात अनेक वर्षे पाळलेला प्राणी किंवा पक्षी यांना संबंधित घरात आश्रय घेण्याचा संस्कार झालेला असतो. या जिवांना बुद्धी नसली, तरी मनुष्याने इतके वर्षे त्याच्यावर केलेल्या प्रेमाच्या संवेदनांची जाणीव त्या त्या जिवाला झालेली असते. त्यामुळे हे प्रेम परत मिळावे, यासाठी असे जीव मृत्यूनंतर त्याच घरात वास्तव्य करत असतात. संबंधित व्यक्तींनी अशांसाठी दत्तगुरूंना भावपूर्ण प्रार्थना केल्याने पाळीव प्राणी किंवा पक्षी यांना पुढील योनीत जन्म घेण्याची प्रेरणा मिळते.
५ आ. मृत्यूसमयी प्राणी अथवा पक्षी यांवर केलेल्या आध्यात्मिक
उपायांमुळे प्राणी किंवा पक्षी यांचा पुढील जन्म सात्त्विक वातावरणात झाल्याने
त्यांच्यात सत्त्वगुणाची वृद्धी होऊन मनुष्य योनीत प्रवेश मिळण्याचा मार्ग लवकर मोकळा होणे
मृत्यूसमयी प्राणी अथवा पक्षी यांवर केलेल्या आध्यात्मिक उपायांमुळे त्यांना सात्त्विक ठिकाणी जन्म घेण्याची इच्छा निर्माण होते, यालाच संबंधित जिवाला गती प्राप्त होणे, असे म्हणतात. पुढील जन्मात अशा जिवांना सात्त्विक वातावरण, म्हणजे मंदिर, गुरूंचा आश्रम किंवा साधकाचे घर या ठिकाणी प्रवेश मिळतो. त्यामुळे अशा जिवांची हळूहळू सत्त्वगुणवृद्धी होते. त्यामुळे त्यांना मनुष्ययोनीत प्रवेश मिळण्याचा मार्ग लवकर मोकळा होतो.
५ इ. पुढील चार जन्म सोडून थेट पाचव्या जन्मात प्रवेश मिळणे
प्राणी किंवा पक्षी यांना पुढील गती मिळण्यासाठी दत्तगुरूंना केलेल्या भावपूर्ण प्रार्थनेने संबंधित जिवाला त्याच्या पुढील चार जन्म सोडून थेट पाचव्या जन्मात प्रवेश मिळतो.
प्राणी किंवा पक्षी यांच्यावर आध्यात्मिक उपाय करणार्याची साधना आणि भाव यांवर संबंधित जिवाला वरीलपैकी गती मिळण्यासंदर्भातील कुठला लाभ होणार आहे, हे अवलंबून असते.
६. मनुष्याने प्राणी किंवा पक्षी यांसाठी आध्यात्मिक उपाय करण्याची कारणे
६ अ. हिंदु धर्मातील शिकवणीनुसार कृती केल्यास
व्यापकत्व आणि निरपेक्ष प्रेम वृद्धींगत होेण्यास साहाय्य होणे
हिंदु धर्म मनुष्यासमवेत अन्य प्राणी आणि पक्षी यांचा विचार करायला शिकवतो. त्याप्रमाणे मनुष्यानेही कृती केल्यास त्याच्यात परमेश्वरातील व्यापकत्व आणि निरपेक्ष प्रेम वृद्धींगत होेण्यास साहाय्य होते.
६. आ. निष्काम कर्म, तसेच निष्काम साधनाही होणे
प्राणी आणि पक्षी यांना आध्यात्मिकदृष्ट्या साहाय्य केल्याने निष्काम कर्म, तसेच निष्काम साधनाही होते.
७. वरील ज्ञान मिळाल्यानंतर साधकाची झालेली विचारप्रक्रिया
७ अ. पितृपक्षकाळासाठी उपयुक्त ज्ञान मिळणे
सकाळी झोपेतून उठल्यावर स्वप्नात प्राण्यासंदर्भात दिसलेले दृश्य आठवून त्यासंबंधीचे ज्ञान मिळाले. त्यानंतर एखाद्या जिवाला गती मिळण्याविषयीचे स्वप्न आज का पडले असेल ?, असा प्रश्न मला पडला. थोड्या वेळाने लक्षात आले की, १७.९.२०१६ या दिवसापासून पितृपक्ष चालू होत असून त्यासंबंधीचे हे स्वप्न आहे.
७ आ. मृत्यूसमयी संबंधित व्यक्तीने प्राणी किंवा पक्षी यांसाठी
काही धार्मिक उपाय केल्यास त्याचा त्यांना पुढील जीवनासाठी उपयोग होणे
काही घरांमध्ये एखादा प्राणी अथवा पक्षी याचे दीर्घकाळ संगोपन केले जाते. घरातील व्यक्ती आयुष्यभर त्याचा प्रेमाने सांभाळ करते. मृत्यूसमयी वर दिल्याप्रमाणे संबंधित व्यक्तीने त्यांच्यासाठी काही धार्मिक उपाय केल्यास त्याचा त्यांना पुढील जीवनासाठी उपयोग होईल.
– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.९.२०१६)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.