मंडपातील पावित्र्य टिकून ठेवणे महत्त्वाचे !

Nond (1)मुंबईतील प्रसिद्ध अंधेरीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने जीन्स, स्कर्ट परिधान करून येणार्‍या महिलांना, तसेच अर्धविजार घालून येणार्‍या पुरुषांना गणपतीचे दर्शन घेण्यास प्रतिबंध केला. फ्लेक्स फलकावरील छायाचित्रांद्वारे हे सांगण्यात आले. सात्त्विकता टिकवण्याच्या दृष्टीने मंडळाने निर्णय घेतला. आपण आपला देश, धर्म, संस्कृती आणि धार्मिक उत्सव यांवर परकीय प्रथांचे जाळे पसरवले आहे. हिंदु धर्मातील सण आणि उत्सव यांत कोणते कपडे घालू नयेत हे सांगावे लागणे, हे हिंदूंना धर्मशिक्षण देण्याची आवश्यकता असल्याचे दर्शवते.

भारतातील काही भागांतील हिंदू अतीपुढारलेपणा दाखवून पाश्‍चात्त्य पद्धतीने जीवन जगण्यात समाधान मानतात. पश्‍चिम मुंबईतील अंधेरीतील काही भाग असाच अतीपुढारलेल्या व्यक्तींचा विभाग मानणण्यात येतो. माणूस जेवढा विचार करू शकतो तेवढीच तो कृती करू शकतो. त्या प्रमाणे ज्यांचे कपडेच तोकडे आहेत त्यांचा देवाप्रती भोळा भाव असेल का, असा प्रश्‍न श्रद्धाळू भाविकांना पडल्यास आश्‍चर्य काय ? सदरा-पायजमा, धोतर-कुर्ता, पंजाबी सलवार-कुर्ता, सहावारी-नऊवारी साडी या आपल्या पारंपरिक पोषाखांना सोडचिठ्ठी दिल्याचे वास्तव समाजात पहाण्यास मिळत आहे. देवतेचे दर्शन घेण्यासाठी पारंपरिक वेशातच गेले पाहिजे अन्यथा त्या दर्शनाचा काहीही उपयोग नाही. हौशागौशांना मात्र ते चुकत असल्याची जाणीव करून देणे क्रमप्राप्त ठरते. अशांचा धार्मिकतेशी दुरान्वयेही संबंध नसतो. त्यामुळे तोकडे कपडे परिधान करून येऊ नका, असे सांगणे प्रत्येक गणेशोत्सव मंडळाने स्वत:चे नैतिक दायित्व समजायला हरकत नाही. तोकडे कपडे घालणार्‍यांना छायाचित्रात्मक सूचनेच्या माध्यमातून ठिकठिकाणी प्रवेश नाकारल्यास त्यांची आपसूकच हकालपट्टी होईल.

प्रसारमाध्यमांनी अंधेरीच्या राजाच्या मंडळाच्या सूचनेची तुलना फतव्याशी केली आहे. फतवा आणि सूचना यांतील भेद जाणून घेण्यात यांना रस नाही. एका साध्या आणि सरळ सूचनेची तुलना फतव्याशी का केली जाते, असा प्रश्‍न प्रसारमाध्यमांना विचारला गेला पाहिजे. हिंदु धर्म आणि फतवा यांची संगती लावण्याचा प्रसारमाध्यमांचा हा पुरो(अधो)गामी डावच म्हणावा लागेल. पुढच्या वर्षी अधिकाधिक गणेशोत्सव मंडळांनीही सदर मंडळाच्या कृतीपासून बोध घ्यायला हवा, तसेच मंडपातील पावित्र्य टिकून रहाण्यासाठी आतापासून विचार करून ठेवायला हवा. काही दिवसांनी नवरात्रोत्सवास प्रारंभ होणार आहे. तेव्हाही बहुतांश नवरात्रोत्सव मंडळांनी अशा धाटणीचे फलक लावल्यास दुर्गामातेचा कृपाशीर्वाद निश्‍चितच संपादन करता येईल !

– श्री. विलास पुंडले, पनवेल, रायगड.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात