२०.९.२०१५ या दिवशी नवीन राज्यघटनेनुसार नेपाळला धर्मनिरपेक्ष राष्ट्र घोषित करण्यात आले. नवीन राज्यघटना स्वीकारल्यानंतर राजकीय स्तरावर पुष्कळ चढउतार झाले आणि अजूनही होत आहेत. अन्नधान्य आणि औषधे यांपासून औद्योगिक साहित्यापर्यंत नेपाळ भारतावरच अवलंबून आहे. भारत आणि नेपाळ यांच्यामधे असलेल्या ५ सीमारेषा ५ मास बंद करण्यात आल्या होत्या. यामुळे नेपाळमधील जनजीवन संपूर्णपणे विस्कळीत झाले.
१. नेपाळमध्ये पुढीलप्रमाणे जनजीवन विस्कळीत झाले
१ अ. घरगुती गॅसच्या तुटवड्यामुळे जनतेवर ओढवलेले कठिण प्रसंग
१ अ १. गॅस सिलिंडरच्या अभावी लोकांनी लाकडासाठी शोधलेला पर्याय आणि शासनाने लाकूड पुरवठा करण्यासाठी घेतलेला निर्णय : नेपाळमध्ये लोकांना ७ मास गॅस सिलिंडरच मिळत नव्हते. त्यामुळे तेथील लोकांनी भूकंपात कोसळलेल्या घरांतील लाकडांचा जळण म्हणून वापर करण्यास आरंभ केला. गॅसचा तुटवडा होऊन काही मास उलटल्यानंतर तेथील शासनाने पशुपतिनाथ येथील अंतीम संस्कारासाठी वापरले जाणारे लाकूड लोकांना जळण म्हणून उपलब्ध करून दिले. या लाकडांचे मूल्य २० रुपये प्रती किलो असे होते. यानंतर १ मासाच्या आत सर्वत्र जळाऊ लाकडाचा तुटवडा भासू लागला.
१ अ २. जळणासाठी लाकडांचा वापर करतांना आलेल्या समस्या : लाकूडविक्रेते अधिक पैसे मिळवण्याच्या लोभापोटी लाकडे ओली करून विकत. ओले लाकूड जळत नसल्यामुळे लोकांना लाकडे पुनःपुन्हा विकत घ्यावी लागत. पुष्कळ लोकांकडे लाकडे फोडण्यासाठी कुर्हाड नसल्याने आणि काहींना लाकडे फोडून त्यांचे लहान ढलपेे कसे करायचे ? हे ठाऊक नसल्याने त्यांना ती इतरांकडून फोडून घेण्यासाठीही पैसे द्यावे लागत.
१ अ ३. भाड्याच्या घरांत रहाणार्या लोकांना घरमालक घरात चुलीवर स्वयंपाक करू देत नसत.
१ अ ४. वाहनाच्या अभावी अनेक आठवड्यांच्या प्रतीक्षेनंतर मिळालेला गॅसचा सिलिंडर घरापर्यंत नेणे अशक्य होणे : अनेक आठवड्यांच्या प्रतीक्षेनंतर गॅसच्या काही सिलिंडरचे वितरण होत असे. नशिबाने काही लोकांना गॅसचा अर्धा सिलिंडर मिळायचा; पण इंधनाच्या तुटवड्यामुळे वाहने उपलब्ध नसल्याने तो घरापर्यंत घेऊन जाणे कठीण व्हायचे. एरव्ही १ सहस्र ५०० रुपये किंमतीच्या गॅसच्या एका सिलिंडरसाठी काळ्या बाजारात ८ सहस्र रुपये द्यावे लागत होते.
१ आ. पेट्रोल आणि डिझेल यांचा
तुटवडा असल्याने काळा बाजार करणार्यांचे फोफावले !
पेट्रोल आणि डिझेल यांच्या तुटवड्यामुळे रस्त्यावर वाहने नव्हती. शाळा आणि उद्योग बंद होते. रस्त्यावर सायकल चालवणार्यांची संख्या मात्र वाढली होती. या काळात अगदी स्वस्त अशा सायकलची किंमतही १० सहस्र रुपये इतकी होती ! काही वेळा सरकारकडून इंधनाचे वितरण केले जायचेे; परंतु त्यासाठी ४ ते ५ घंटे रांगेत थांबावे लागायचे. अनेकांचा क्रमांक येईपर्यंतच इंधन संपून जात असल्यामुळे त्यांना अनेक आठवडे पुन्हा प्रतीक्षा करावी लागायची. सरकारकडून इंधनाचे पुढचे वितरण कधी होणार ?, याविषयी काहीच माहिती मिळत नसल्यामुळे कित्येक आठवडे लोक आपली वाहने रस्त्यावरच रांगेत ठेवून जात. एरव्ही १०० ते १३० रुपये प्रती लिटर असणारे पेट्रोल काळ्या बाजारात ५०० रुपये प्रती लिटरने मिळत होते आणि ८० ते १०० रुपये प्रती लिटर असलेले डिझेल २५० ते ३०० रुपये प्रती लिटरने विकले जायचे.
१ इ. विजेच्या कमतरतेमुळे उद्भवलेल्या समस्या
काठमांडू शहरात अधिकृतरित्या दिवसाचेे १४ घंटे वीजपुरवठा बंद होता. दिवसभरात केवळ २ घंटे, तर कधीकधी ३ घंटेच वीज असायची. वीजपुरवठा चालू असतांना घरोघरी लोक पाण्याचा पंप चालू करणे, विजेच्या उपकरणांवर स्वयंपाक करणे इत्यादी करत. यामुळे विजेचा अती वापर झाल्याने ट्रान्सफॉर्मर जळून जायचेे. हे ट्रान्सफॉर्मर दुरुस्त करायला शासकीय कर्मचारी ४ ते ५ दिवस लावत. ट्रान्सफॉर्मर वारंवार जळणे, ही नित्याचीच गोष्ट बनली होती.
१ ई. इंटरनेट बंद असणे
एरवी वीजपुरवठा बंद असतांना व्यावसायिकांचे, तसेच कार्यालयांतील इंटरनेटवरील कामकाज पेट्रोल अन् डिझेलवर चालणार्या जनित्रांच्या साहाय्याने केले जायचे; मात्र या काळात इंधनांचाच तुटवडा असल्याने इंटरनेटही पूर्णपणे बंद होते.
१ उ. औषधांच्या अभावी अल्पशा आजारानेही रुग्णांचा मृत्यू
रुग्णालयांमधे औषधेच उपलब्ध नसल्याने काही लोक अल्पशा आजारांनीही मृत्यूमुखी पडले.
१ ऊ. किराणा साहित्याची वानवा
या काळात किराणा सामानाच्या दुकानांमधे बरेचसे सामान उपलब्ध नव्हतेे. उपलब्ध असलेले सामानही नेहमीपेक्षा चारपट मूल्याने विकत घ्यावे लागायचे. स्वयंपाकासाठी लागणार्या गोडेतेलाची एरवी १०० ते १८० रुपये प्रती लिटर असलेली किंमत या काळात ५०० रुपये प्रती लिटर अशी झाली होती.
१ ए. शाळा बंद !
एप्रिल २०१५ मध्ये झालेल्या भूकंपाच्या काळात पुष्कळ शाळांच्या इमारतींची पडझड झाल्याने त्या बंद होत्या. आता इंधनाच्या तुटवड्यामुळे शाळांना जाण्यासाठी वाहने उपलब्ध नसल्यानेही शाळा बंद होत्या.
१ ऐ. विमानतळावरील कामकाज ठप्प !
बाहेरच्या देशातून काही विमाने नेपाळमध्ये येत. नेपाळच्या विमान प्राधिकरण अधिकार्यांनी इतर देशांच्या विमानांना नेपाळमध्ये येण्यापूर्वी इंधन भरून यावे, अशी सूचना दिली होती.
१ ओ. २ सहस्र उद्योगधंदे बंद !
या काळात २ सहस्र उद्योगधंदे बंद पडले आणि अनुमाने १ लाख लोकांना त्यांच्या नोकर्या गमवाव्या लागल्या.
२. सीमारेषा मोकळ्या करण्यात
आल्यानंतरही राजकीय उदासीनतेमुळे परिस्थिती जैसे थे !
२ अ. नेपाळमधे इंधनसाठा भरपूर आहे, असेे दाखवले गेले, तरी काठमांडू
परिसरातील ५ ते ६ शासकीय इंधन वितरण केंद्रे आठवड्यातील काही दिवसच कार्यरत असणे
५ मासांनंतर बंद असलेल्या सीमारेषा पुन्हा चालू करण्यात आल्या; पण स्थिती पूर्ववत् झाली नाही. बातम्यांमध्ये इंधन साठ्याच्या टाक्या इंधनाने भरलेल्या असल्याने त्यात बाहेरून आलेले इंधन ओतून घेता येत नाही, असे दाखवले जात आहे; परंतु काठमांडू परिसरातील ५ ते ६ शासकीय इंधन वितरण केंद्रे आठवड्यातील मोजके दिवसच कार्यरत असतात.
२ आ. आणीबाणीच्या परिस्थितीत
उच्चपदस्थ शासकीय अधिकार्यांचे बेपर्वाईचे वागणे
येथे अजूनही सगळीकडे काळा बाजार फोफावलेला आहे. नवीन शासन परिस्थिती पूर्ववत् करण्यासाठी कोणतेही प्रयत्न करतांना दिसत नाही. अशा आणीबाणीच्या परिस्थितीत सगळे उच्चपदस्थ शासकीय अधिकारी आपल्या अनेक चारचाकी गाड्यांतून फिरतांना आढळतात. त्यांना गॅस सिलिंडरचा तुटवडा नसल्याने केवळ त्यांच्या घरी गॅसवर स्वयंपाक होतो आणि उर्वरित जनता मात्र चुलीवर स्वयंपाक करते.
३. देवाने प्रतिकूल परिस्थिती उद्भवण्यापूर्वीच करून घेतलेली
पूर्वसिद्धता आणि आलेल्या परिस्थितीला तोंड देतांना काढलेले काही उपाय !
३ अ. घरीही अन्नधान्याचा साठा करून ठेवण्याचा विचार आल्यावर आईने
प्रथम त्याला नकार देणे आणि नंतर स्वतःहूनच आवश्यक वस्तूंचा साठा करण्यास सिद्ध होणे
वर्ष २०१४ मध्ये मी नेपाळला माझ्या घरी गेल्यावर आईला ३ मासांचा अन्नधान्याचा साठा करून ठेवूया, असे सांगितले; परंतु तिने नकार दिला. साधारण १ वर्षानंतर ती स्वतःहून अन्नधान्याचा साठा करून ठेवूया, असे म्हणू लागली. त्यामुळे आम्ही डाळ, मीठ, गोडे तेल, साबण, कपडे धुण्याचा साबण इत्यादींचा साठा करून ठेवला. नंतर काही दिवसांतच सगळीकडे जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासू लागला.
३ आ. आईने घराच्या मागच्या बाजूला अनेक भाज्या लावल्या
असल्याने भाजी विकत आणण्याची आवश्यकता न भासणे
ईश्वराच्या कृपेने माझ्या आईने घराच्या मागच्या बाजूला अनेक भाज्या लावल्या आहेत. त्यामुळे घरच्या स्वयंपाकासाठी लागणारी भाजी घरातल्या बागेतच पिकते. बागेतील भाजी अपूर्ण वाटली, तरच आम्ही बाहेरून भाजी विकत आणतो.
३ इ. मोबाईलचा मोजका वापर
सलग काही दिवसांसाठी वीजपुरवठा होत नव्हता. त्या वेळी मी माझा मोबाईल बंद ठेवत असे आणि आवश्यकतेनुसार दिवसातून २ ते ३ वेळाच तो चालू करत असे.
३ ई. सर्वसामान्य रोगांवरील घरगुती उपचारांची
माहिती पूर्वी लिहून ठेवली असल्याने त्याचा उपयोग करता येणे
सर्वसामान्य रोगांवरील घरगुती उपचारांची माहिती लिहून मी पूर्वीच त्यांच्या प्रती काढल्या होत्या. त्यात सर्दी, खोकला, ताप, अतिसार, दातांचे दुखणे, अॅलर्जी, डोकेदुखी, अर्धशिशी, उलट्या, थकवा इत्यादींवर करावयाच्या घरगुती उपायांचा समावेश होता. त्यामुळे आवश्यकता वाटल्यास मी यातीलच घरगुती उपाय करत असे.
३ उ. बाहेरील कामासाठी सायकलचा उपयोग करणे
सेवेअंतर्गत धर्माभिमान्यांना भेटण्यासाठी किंवा घरातील काही कामांसाठी बाहेर जातांना मी सायकलचा उपयोग करत असे.
– कु. सानू थापा, नेपाळ (२४.४.२०१६)
आतापर्यंत अनेक द्रष्ट्या साधू-संतांनी वर्तवलेल्या भविष्यवाणीनुसार पृथ्वीवर लवकरच आपत्काळाला आरंभ होणार आहे. त्सुनामी, जलप्रलय, भूकंप आदी अनेक आपत्तींनाही आपल्याला वरचेवर तोंड द्यावे लागते. आपत्काळ असा तोंडावर येऊन ठेपला असतांना सर्वसामान्य जनता मात्र मौजमजा करणे, पैसे मिळवणे आणि ते उधळणे, यातच मश्गुल आहे. नेपाळमधील आपत्कालीन परिस्थितीचा अभ्यास केल्यास मनुष्याला पुढे कोणकोणत्या संकटांना तोंड द्यावे लागणार आहे, याची थोडी तरी कल्पना येईल. मानसिक संतुलन ढळू न देता अशा परिस्थितीला तोंड देता येण्यासाठी ईश्वरावर श्रद्धा असणे नितांत आवश्यक आहे. ईश्वरावर श्रद्धा असल्यास भाव तेथे देव आणि देव तारी, त्याला कोण मारी या न्यायांनुसार देव आपत्काळातही आपले रक्षण करणार आहे. यासाठी साधनेला उद्या नको, तर आजच आरंभ करा आणि सश्रद्ध होऊन ईश्वराचे साहाय्य अनुभवा ! – संकलक, दैनिक सनातन प्रभात
पुढे येणारा आपत्काळ किती कठीण असेल आणि त्या काळातील एकेक दिवस जगण्यासाठी व्यावहारिक, मानसिक आणि आध्यात्मिक सिद्धता काय करावी लागणार आहे, याची थोडी कल्पना या लेखावरून येईल; म्हणून हा लेख संग्रही ठेवा. – संपादक, दैनिक सनातन प्रभात