सनातनचे ५६ वे संत पू. शंकर गुंजेकर यांचा खडतर जीवनप्रवास आणि त्यांना आलेल्या अलौकिक अनुभूती

पू. गुंजेकरमामा

बेळगाव जिल्ह्यातील रामनगर हे गाव. या गावामध्ये दिसणारी साधी भोळी माणसे, त्यांचे साधे राहणीमान आणि त्यांच्या डोळ्यातील निरागस भाव हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. याच गावात रहातात सनातनचे ५६ वे संत पू. शंकर गुंजेकरमामा ! आज आपण त्यांच्या खडतर जीवनप्रवासातही त्यांनी कशा प्रकारे साधना केली, ते पहाणार आहोत. पू. मामांनी सहन केलेला हा खडतर जीवनप्रवास सर्वांसाठीच आदर्श आहे. त्यांचा हा जीवनप्रवास वाचून आपण आपली दुःखे विसरून जाऊ.

 

१. खडतर बालपण

१ अ. लहानपणापसूनच देवाची आवड असणे

पू. गुंजेकरमामा यांना लहानपणापासूनच देवाची आवड होती. घरात, बाहेर किंवा शेतामध्ये दिसणारे दगड-माती यांच्यामध्ये ते देव पहात असत. मातीपासून शिवपिंड बनवणेे, त्याची पूजा करणे, हेच त्यांचे आवडते छंद होते.

१ आ. घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे शिक्षण न घेता शेतीची कामे करणे

पू. मामांच्या घरची आर्थिक स्थिती पुष्कळ हलाखीची होती. या हलाखीच्या स्थितीमध्ये आठ भावंडे आणि आई-वडील असे १० जण एका झोपडीमध्ये रहात असत. स्वतःच्या अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत आवश्यकताही ते पूर्ण करू शकत नव्हते. या आवश्यकतांची पूर्ती होण्यासाठी पू. मामांनी आपल्या अन्य भावंडांना थोडेफार शालेय शिक्षण घेण्यास सांगितले. ते स्वतः मात्र शेतीची कामे करत असत.

१ इ. पंधरा वर्षे केवळ पेजेच्या पाण्यावर जगणे

पू. मामा आणि त्यांची भावंडे यांना जेवण्यासाठी पुरेसे अन्न उपलब्ध होत नसे. शेतीतून उत्पन्न होणार्‍या तांदूळाचा भात करून आई-वडिलांना देत असत. आई-वडिलांनी त्यांच्या जेवणाविषयी विचारले असता आतमध्ये चुलीवर भात ठेवला आहे. आम्ही नंतर घेतो, असे ते नेहमी सांगायचे. प्रत्यक्षात १५ वर्षे ते केवळ भाताच्या पेजेवर जगले !

1
पू. मामा अत्यंत आजारी असतांना पू. मामांच्या झोपडीमध्ये प्रत्यक्ष शिवाने दर्शन दिले आहे. झोपडीमध्ये प्रत्यक्ष शिवाचे अस्तित्त्व असल्यामुळे या झोपडीमध्ये खूप थंडावा जाणवतो. तसेच या झोपडीच्या बाजूला आपोआप उगवलेले बेलाचे झाड हे झोपडीत कार्यरत असलेल्या शिवतत्त्वाची साक्ष देते.
2
घरची आर्थिक स्थिती पुष्कळ हलाखीची असतांनाही साधनेच्या चैतन्यामुळे आनंदी असणारे पू. शंकर गुंजेकर मामा !
3
पू. मामांच्या घरी रोज सकाळी ही गोमाता येते आणि पू. मामांच्या हातून भाकरी खाल्ल्याशिवाय ती जात नाही.

१ ई. मोठ्या भावाने फसवल्यामुळे लहान वयातच कर्जबाजारी होऊन घराचे सर्व दायित्व येणे

पू. मामा लहान असतांना त्यांच्या मोठ्या भावाने वडिलांना फसवून एका कागदावर सही घेऊन ८५ सहस्र रुपयांचे कर्ज काढले आणि ते कर्ज न फेडताच तो निघून गेला. त्यामुळे साहजिकच ते कर्ज फेडण्याचे पूर्ण दायित्व पू. मामा आणि त्यांची भावंडे यांच्यावर आले. घरामध्ये अन्नाचा कण नसतांनाही ८५ सहस्र रुपयांचे कर्ज कसे फेडायचे ?, अशी सर्वांना चिंता लागली; परंतु पू. मामांनी सर्वांना आधार दिला. आपण काहीतरी करून हे कर्ज फेडूया. हे कर्ज फेडल्याविना कोणत्याही भावंडाने लग्न करायचे नाही, असे त्यांनी ठरवले. यासाठी ते दिवस-रात्र कष्ट करत असत; परंतु कुणीही वाईट मार्गाने जाऊन पैसे मिळवू नये, असा पू. मामांचा आग्रह होता. त्याप्रमाणे सर्व भावंडांनी शेतीची किंवा अन्य कामे करून पैसे मिळवण्यास प्रारंभ केला.

 

२. लहानपणीच कुटुंबाचे दायित्व येणे

२ अ. लपून शेती करायला शिकणे

पू. मामांना शेती करता येत नव्हती आणि शिकवणारेही कुणी नव्हते. त्यामुळे पू. मामा लपून अन्य शेतकर्‍यांना शेती करतांना पहायचे आणि शेती कशी करायची ? कापणी कशी करायची ?, हे शिकायचे.

२ आ. सर्व देणेकर्‍यांनी घरी येऊन पैसे मागणे

८५ सहस्र रुपयांचे कर्ज असल्यामुळे देणेकरी प्रतिदिन दारात येऊन पैशांची मागणी करत असत. त्या वेळी पू. मामा फाटलेले कपडे आणि घराच्या कौलांना पडलेली छिद्रे दाखवून सांगत असत, आमच्याकडे द्यायला काहीच नाही; पण तुमचे कर्ज फेडल्याविना आम्ही कुठेही जाणार नाही. माझ्यावर विश्‍वास ठेवा.

२ इ. कर्ज फेडण्यासाठी दिवस-रात्र मेहनत घेणे

कर्ज फेडण्यासाठी सर्व भावंडे प्रयत्न करत होती. पू. मामा शेती करण्यासाठी कामानुसार आठवड्यातून एकदा रामनगरहून मोले (गोवा) येथे सुमारे ६६ कि.मी. अंतर चालत येऊन शेतीची कामे करत. पुष्कळ चालल्याने त्यांच्या पायांना भेगा पडल्या होत्या, तरीही त्यांनी शेती करणे सोडले नाही.

२ ई. अंगावर घालण्यासाठी कपडे नसल्यामुळे बुजगावण्याला घातलेले कपडे काढून ते स्वतः घालणे

शेतीला जातांना अंगावर घालण्यासाठी कपडे नसल्यावर पू. मामा घरातून पहाटे ३ वाजताच निघायचे, जेणेकरून काळोखात कुणी पहायला नको. रस्त्यात शेतामध्ये असलेल्या बुजगावण्याला घातलेले कपडे काढून ते स्वतः घालत. पायात घालण्यासाठी त्यांच्याकडे चप्पलही नव्हती. रस्त्यात पडलेल्या तुटलेल्या चपला घेऊन त्या शिवून ते वापरत असत.

२ उ. कर्ज फेडणे कठीण असल्यामुळे आई-वडिलांनी सर्वांना आत्महत्येचा
पर्याय सुचवणे आणि पू. मामांनी सर्वांना धीर देऊन आत्महत्या करण्यापासून परावृत्त करणे

८५ सहस्र रुपये कर्ज फेडणे सर्वांच्या तुटपुंज्या कमाईतून शक्य नाही, हे आई-वडिलांच्या लक्षात आल्यामुळे एके दिवशी त्यांच्या वडिलांनी विष विकत आणले. त्या वेळी पू. मामा शेतावर होते. पू. मामा आल्यानंतर त्यांना आई-वडिलांनी सांगितले, आपण सर्वांनी जेवून झाल्यानंतर विष घेऊन झोपून जाऊया, म्हणजे सकाळी उठण्याचा प्रश्‍नच नाही. त्या वेळी पू. मामांनी घरच्यांची समजूत घातली. ते म्हणाले, कर्ज न फेडल्यास शासन आपल्याला फाशीची शिक्षा देईल. आपण आत्महत्या करून मरण्यापेक्षा तसे मरणे अधिक चांगले ! देवाने आपल्याला जन्म दिला आहे. त्यामागे काहीतरी कारण नक्कीच असेल. त्यामुळे आपण आत्महत्या करायला नको. असे सांगून त्यांनी ती विषाची बाटली बाहेर नेऊन टाकून दिली.

 

३. शेती करतांना पू. मामांना आलेल्या अलौकिक अनुभूती

पू. मामांनी शेतीसाठी जी भूमी विकत घेतली, ती त्यांच्या घरापासून ६ कि.मी. अंतरावर आहे. घरापासून पू. मामा प्रतिदिन चालत किंवा सायकलने जातात. शेतीसाठी घनदाट जंगलातून जावे लागते. या जंगलामध्ये हिंस्र प्राणी, साप आणि नागही असतात; परंतु ज्याचा रक्षणकर्ता प्रत्यक्ष भगवंत आहे, त्याला या हिंस्र प्राण्यांची काय भीती वाटणार ? पू. मामांनी साधना म्हणून शेती केल्यामुळे त्यांना शेती करतांना आलेल्या अनुभूती वैशिष्ट्यपूर्ण आणि अलौकिक आहेत.

३ अ. पुरेसे खत नसल्याने आणि दुष्काळ असल्यामुळे पाणी
नसतांनाही चौपट पीक येणे (यासंदर्भात विज्ञाननिष्ठांना काय म्हणायचे आहे ?)

पू. मामांनी शेतीसाठी जी भूमी विकत घेतली आहे, त्या भूमीमध्ये पूर्वी १ – २ माणसांची हत्या झाली आहे. त्यामुळे तेथे यापूर्वी ज्या व्यक्तींनी शेती केली, त्यांना अनेक अडचणी आल्या. त्यामुळे अनेक जणांनी पू. मामांना ही शेती विकत घेऊ नका, असे सुचवले होते; परंतु शेती स्वस्त दरात मिळत असल्यामुळे पुढे देवच पाहून घेईल, या विचाराने त्यांनी ती भूमी विकत घेतली. प्रारंभी या भूमीमध्ये शेती केल्यावर ८ – ९ पोती एवढाच तांदूळ पिकत असे. शेती करण्यासाठी पुरेसे खत नसल्याने आणि दुष्काळ असल्यामुळे पाणी नसतांनाही वर्ष २०१५ मध्ये ३७ पोती तांदूळ पिकला, म्हणजेच चौपट पीक आले.

३ आ. झोपडीच्या बाहेर जाऊ नकोस, असा आवाज येणे, आज्ञापालन
म्हणून झोपडीबाहेर न जाता ६ घंटे नामजप आणि मंडल करत झोपडीतच थांबणे

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये ३ – ४ मास (महिने) पू. मामा एकटेच शेतावर त्यांच्या झोपडीत रहायचे. आजूबाजूला घनदाट जंगल असल्यामुळे अशा ठिकाणी रात्री एकटे रहाणे पुष्कळ कठीण आहे. एके दिवशी पू. मामा सायंकाळी ६ वाजता शेती करून झोपडीमध्ये रहाण्यासाठी आले. त्या वेळी लघवी लागल्यामुळे पू. मामा बाहेर जाणार, एवढ्यात झोपडीमध्ये आवाज आला, तू आता बाहेर जायचे नाही. पू. मामांनी शोधाशोध केली असता झोपडीमध्ये कुणीच नव्हते. पू. मामांना थोडा राग आला. त्या आवाजाला प्रतिसाद म्हणून चिडूनच मामा म्हणाले, मी बाहेर जाणार. मला कसली भीती ? मामांच्या या वाक्याला पुन्हा प्रतिसाद आला, मी सांगतो; म्हणून आता बाहेर जायचे नाही. ऐकू आलेल्या ध्वनीचे आज्ञापालन म्हणून पू. मामा झोपडीतच बसून राहिले आणि त्यांनी स्वतःभोवती, झोपडीभोवती आणि शेताभोवती मंडल घालण्यास प्रारंभ केला. सायंकाळी ७ ते रात्री १ वाजेपर्यंत पू. मामा मंडलच करत होते. पू. मामांनी प्रार्थना करून परत विचारले, आता तरी मी जाऊ का लघवीला ? त्यावर परत आवाज आला, आता जाऊ शकतोस. नंतर हा प्रसंग पू. मामांनी पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांना सांगितला असता त्यांनी सांगितले, आतून येणारा ध्वनी हा चांगल्या शक्तीमुळे होता. बाहेर गेल्यास त्रास झाला असता. त्यामुळे चांगल्या शक्तीने बाहेर जाऊ नकोस, असे सांगितले.

३ इ. प्रत्यक्ष क्षेत्रपालदेव शेताचे रक्षण करत असल्याचे पू. मामांनी सांगणे

एकदा पू. मामा शेताची कामे करून सायंकाळी घरी परतले; परंतु रात्रीच्या वेळी शेतामध्ये असलेल्या माडीवर कुणीतरी झोपलेले आहे, असे गावकर्‍यांना दिसले. गावकर्‍यांपैकी एकाने पू. मामांना उद्देशून हाक मारली; परंतु कुणीच प्रतिसाद दिला नाही. त्यांना वाटले, गाढ झोप लागली आहे. त्यामुळे ते तेथून निघून गेले. दुसर्‍या दिवशी शेतामध्ये पू. मामा भेटल्यानंतर त्यांनी मामांना विचारले, काल रात्री तू माझ्या हाकेला प्रतिसाद का दिला नाहीस ? त्या वेळी पू. मामा म्हणाले, नाही रे, उद्या नक्की देईन. परत दुसर्‍या दिवशी गावकर्‍यांना त्याच माडीवर कुणीतरी झोपल्याचे आणि शेकोटी पेटत असल्याचे दिसले. पहाटेच्या वेळी गावकर्‍यांपैकी एकाने बघितले असता त्या ठिकाणी कुणीच नव्हते; परंतु शेकोटी मात्र पेटत होती. त्या गावकर्‍याने पू. मामांना विचारले असता पू. मामांनी सांगितले, मी रात्री शेतावर नसतोच. माझ्या शेताचे रक्षण क्षेत्रपाल देवता करत असते. त्यामुळे तुमच्या हाकेला कदाचित तिने प्रतिसाद दिला नाही.

३ ई. चिखलातून ट्रॅक्टरने तांदूळ घेऊन येणे अशक्य असतांनाही देवाच्या कृपेने तसे करता येणे,
ट्रॅक्टरला बांधलेली दोरी सुटलेली असूनही एकही पोते खाली न पडणे आणि त्या वेळी क्षेत्रपालदेवाने दर्शन देणे

एकदा शेतामध्ये पाणी साचले असतांना पू. मामांना तांदूळ शेताच्या एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत न्यायचे होते. साचलेल्या पाण्यातून ट्रॅक्टर जाणे शक्य नव्हते; परंतु दुसरा कोणताच पर्याय नसल्याने पू. मामांनी तांदुळाची पोती ट्रॅक्टरवर लादून देवाला प्रार्थना केली आणि साचलेल्या पाण्यातून ट्रॅक्टर नेण्यास सांगितला. त्यावर ट्रॅक्टरचालकाने नकार दिला. कुटुंबातील अन्य सदस्यांनी पू. मामांना वेड्यात काढले. ते म्हणाले, ट्रॅक्टर एवढ्या पाण्यातून जाणे शक्य नाही. ट्रॅक्टरची हानी झाल्यास भरपाई कोण करून देणार ? त्यावर पू. मामांनी सांगितले, देेवच माझी काळजी घेईल. माझ्याकडे दुसरा काही पर्याय नाही. तुझ्या ट्रॅक्टरची काही हानी झाल्यास मी भरून देईन; परंतु हा ट्रॅक्टर तू पाण्यातून घेऊन जा. ट्रॅक्टरच्या मालकाने पू. मामांचे ऐकून ट्रॅक्टर पाण्यामधून नेण्यास प्रारंभ केला आणि चमत्कार झाला. ट्रॅक्टर जणू वरच्या वरच आहे, अशा प्रकारे पाण्यातून एका टोकाकडून दुसर्‍या टोकाकडे गेला. ट्रॅक्टर अर्ध्यावर गेल्यानंतर ट्रॅक्टरच्या मागून आवाज आला, मागे वळून पहा. त्या वेळी पू. मामांनी पाहिले असता ट्रॅक्टरला बांधलेली दोरी सुटली होती; परंतु एकही पोते पाण्यात पडले नव्हते. पू. मामांनी विचारले, आपण कोण ? त्या वेळी पू. मामांना प्रथमच क्षेत्रपालदेवाचे दर्शन झाले आणि त्यांनी क्षेत्रपालदेवाला नमस्कार केला.

३ उ. प.पू. डॉक्टरांसारखे गुरु लाभणे, हे परम भाग्य
असून त्यांनी सांगितल्याप्रमाणे करण्यास क्षेत्रपालदेवतेने सांगणे

त्यानंतर पू. मामांना क्षेत्रपालदेवाचे शेतामध्ये असेच कधी कधी दर्शन होऊ लागले. एकदा शेतीची कामे करून पू. मामा त्यांच्या झोपडीमध्ये बसले असता त्यांना क्षेत्रपालदेवाचे दर्शन झाले. त्या वेळी त्यांनी क्षेत्रपालदेवाला नमस्कार केला. त्यांचा देवतेशी पुढील संवाद झाला.

पू. मामा : आपण प.पू. डॉक्टरांना ओळखता का ?

क्षेत्रपालदेवता : हो. त्यांच्यासारखे गुरु लाभणे, हे तुझे परम भाग्य आहे. ते जे सांगतील, त्याचप्रमाणे करत जा. त्यातच तुझे भले होईल.

पू. मामा : तुम्ही माझ्या कुलदेवतेचे दर्शन घेतले आहे का ?

क्षेत्रपालदेवता : तिनेच तुझ्या रक्षणासाठी मला येथे पाठवले आहे.

३ ऊ. पू. मामांनी देवाला प्रार्थना केल्यावर बेशुद्ध झालेला बैल शुद्धीवर होणे

एकदा शेतीसाठी नांगराला लावण्यासाठी असलेल्या बैलांपैकी एका बैलाला साप चावला. पू. मामांना पुष्कळ वाईट वाटले. आता शेती कशी करायची ?, असा मोठा प्रश्‍न त्यांच्यासमोर उभा राहिला. त्यामुळे त्यांना रडूही येत होते. बराच वेळ अस्वस्थ होऊन त्यांना झोपही लागली नाही.

पू. मामांनी एका भांड्यात पाणी घेऊन त्यात विभूती घातली आणि ते पाणी बेशुद्ध झालेल्या बैलावर शिंपडले. पू. मामांनी प्रार्थना केली, बैलाचे सर्व विष यामध्ये खेचले जाऊ दे. त्यानंतर ते परत झोपले. थोड्या वेळाने बैलाच्या हंबरण्याचा आवाज आला. पू. मामांना दचकून जाग आली. त्यांनी जाऊन पाहिले, तर बैल शुद्धीवर आला होता.

३ ए . शेतात काम करतांना प्रार्थना, नामजप, सत्संग, तसेच आध्यात्मिक उपाय आणि भावपूर्ण कृती करणे !

पू. शंकर गुंजेकरमामा शेतातील प्रत्येक काम सेवा म्हणून करतात. स्थानदेवता आणि ग्रामदेवता यांना प्रार्थना करत. प्रत्येक कृती देवाला प्रार्थना करून आणि त्याचे साहाय्य घेऊन करतात. शेतातील भूमी नांगरतांना प्रार्थना करतात. त्यामुळे शेतातील कामे नियोजनाप्रमाणे आणि अल्प दिवसांत होतात. पू. मामा घरातून निघतांना देवाला प्रार्थना करतात, ‘तू दिलेली सेवा तुला अपेक्षित अशी होऊ दे. त्यातून माझी साधना करून घे. काही चुकत असेल, तर ते माझ्या लगेच लक्षात येऊ दे.’ पू. मामा शेतात लागणारी प्रत्येक वस्तू कृतज्ञता भावाने हाताळतात. शेती करतांना वापरली जाणारी अवजारे आणि अन्य वस्तू यांची हाताळणी चांगली करतात. पू. मामा शेतात पेरणी करतांना नामजप करत बी पेरतात. प्रत्येक रोप लावतांना पू. मामा नामजप करत ते लावतात. लावणी करतांना व्यवहारातील न बोलता पू. मामा अन्य शेतकर्‍यांशी सतत देवाविषयी काही ना काही सांगत असतात. त्यामुळे त्यांचे बोलणे इतरांना ऐकावेसे वाटते. शेतात आध्यात्मिक उपाय करून प्रत्येक कृती भावपूर्ण करतात. पू. गुंजेकरमामा वायूदेवतेला प्रार्थना करतात. त्यामुळे पीक पाखडण्यासाठी आवश्यक तेवढा वारा त्यांच्याकडे येतो आणि त्यांचे पीक घरी नेण्यास लवकर सिद्ध होते. अन्य शेतकर्‍यांची शेती त्यांच्या शेतालाच लागून असूनही त्यांच्याकडे त्या वेळी वारा येत नाही. त्या वेळी इतर शेतकरी आश्‍चर्य व्यक्त करतात, तर काही वेळा त्यांना रागही येतो. पीक (भात) खळ्यावर (मैदानात) असते, तेव्हा पू. मामा त्याच्याभोवती नामजप करत मंडल काढतात. तेथे तिन्हीसांजेला उदबत्ती दाखवतात. तसेच पिकाला लक्ष्मी मानून ते आदर भावाने तिथे सेवा करतात. घरी नेण्यासाठी पीक गोणीत भरतांना ‘मी धनलक्ष्मीला माझ्या घरी घेऊन जात आहे’, या भावाने ते धान्य भरण्याची सेवा करतात. या सर्व गोष्टींमुळे त्यांच्या पिकात वाढ होते. पू. मामांची भूमी अल्प आहे; पण त्या भूमीत अधिक पीक येते. पू. मामांनी लोकांना लावणीसाठी बोलावले नसले, तरी लोक स्वतःहूनच त्यांच्याकडे साहाय्यासाठी येतात.

३ ऐ . मालकापेक्षा बैलांना पू. मामांचा आधार वाटल्याने ते पू. मामांकडे पळून येणे

पू. गुंजेकरमामा बैलांना कधीच मारत नाहीत. ते बैलांशी बोलतात आणि सांगतात, ‘तुम्हाला शेतीच्या सेवेसाठी आणले आहे. तुम्ही कृष्णाचे भक्त आहात ना ! त्यामुळे मी तुम्हाला कधीच त्रास देणार नाही.’ त्यामुळे बैलांमध्येही पालट होतो. कितीही मारका बैल असला, तरी तो मामांकडे आल्यावर शांत होतो. बैलांची सेवा करतांना मामा ‘तोही एक साधकच आहे’, असा भाव ठेवतात. बैलांची शेतातील कामे झाल्यावर मामा त्यांना त्यांच्या घरी पोहोचवतात. एके दिवशी नांगरणीची कामे संपल्यावर पू. मामांनी बैलांना त्यांच्या मालकाकडे पोहोचवले. ते बैल मालकाच्या घरी न रहाता सारखे पू. मामांच्या शेतात पळून यायचे. त्यांचे मालक त्या बैलांना शोधून हैराण व्हायचे. पू. मामा त्यांना प्रेमाने हाताळत. त्यामुळे बैलांनाही त्यांचा लळा लागला. पू. मामा कधीच राखणीला जात नसूनही त्यांच्या शेतात रात्रीचे एकही जनावर येत नाही. तेव्हा लक्षात येते की, पू. मामांच्या शेताची राखण देवच करतो. त्यामुळे त्यांच्या शेतातील पीक खायला जनावरे येत नाहीत.

पू. गुंजेकरमामांच्या अनुभूती अलौकिक आहेत. पू. मामांच्या देवावरील असणार्‍या दृढ श्रद्धेतूनच त्यांना अशा अनुभूती येतात.

– कु. प्रियांका लोटलीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

 

भावपूर्ण शेती करून संतपद प्राप्त केलेले सनातनचे पू. शंकर गुंजेकर
यांनी आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त होणार्‍या शेतकर्‍यांना दिलेला संदेश !

शेतकरी बंधूंनो, साधना म्हणून
शेती केल्यासच तुम्हाला परमेश्‍वराचे साहाय्य लाभेल !

सध्या भारतातील शेतकर्‍यांची स्थिती पुष्कळ दयनीय आहे. त्यांच्या अन्न, वस्त्र, निवारा यांसारख्या मूलभूत गरजाही पूर्ण होत नाहीत. त्यामुळे अशा जीवनाला कंटाळून शेतकरी आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त होतो. मला असे वाटते, शेतकरी त्यांच्या स्वार्थासाठी शेती करत असल्यामुळे शेतीमधून त्यांना काहीच साध्य होणार नाही. याउलट शेती ही साधना म्हणून केल्यास त्यांना देवाचे साहाय्य लाभेल. त्याचप्रमाणे आपल्या गरजांची पूर्तता होण्यासाठी त्यांनी शासनावर अवलंबून रहाण्यापेक्षा सर्वेसर्वा असलेल्या परमेश्‍वरावर अवलंबून राहिले, तरच त्यांची सर्वांगीण प्रगती होऊ शकते.

– पू. शंकर गुंजेकर, रामनगर, बेळगाव. (७.४.२०१६)

 

गुरुपौर्णिमेच्या संदर्भात सनातन संस्थेची वैशिष्ट्ये

१. सनातन संस्थेत अनेक संत असूनही सनातन संस्थेचे प्रेरणास्थान प.पू. भक्तराज महाराज यांची गुरुपौर्णिमा साजरी करण्यात येते.

२. विविध संत आणि संप्रदाय यांत एक प्रमुख असतात; म्हणून त्यांची गुरुपौर्णिमा साजरी करण्यात येते आणि त्यांच्या विषयीची माहिती स्मरणिकेत किंवा पत्रकात असते. सनातनमध्ये अनेक साधक संत झाले असल्यामुळे त्यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती आणि त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे सनातन प्रभात नियतकालिकांत प्रकाशित करण्यात येतात.

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले