वर्षातील मार्च आणि जून हे महिने आले की इयत्ता दहावीतील बहुतांश विद्यार्थ्यांच्या पोटात गोळा येतो. वर्षभर परीक्षेच्या ताणाचा गाडा ओढून विद्यार्थीवर्ग थकूनभागून गेलेला असतो. हातात येणार्या गुणपत्रिकेची आणि पर्यायाने स्वत:च्या भविष्यात काय वाढून ठेवले असेल, याची चिंता त्याला असते. अशा चिंतातूर विद्यार्थ्यांना दिलासा मिळावा या हेतूने शासनाने दहावी झालेल्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रकावरून नापास हा शब्द कालबाह्य करण्याचा निर्णय घेतला आहे. या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये, यासाठी लगेचच पुनर्परिक्षा घेण्यात येऊन एटीकेटीसह त्यांना विशेष सवलती देण्यात येणार आहेत, तसेच अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या गुणपत्रकावर केवळ कौशल्य विकास अभ्यासक्रमासाठी पात्र असा शेरा देण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा संधी मिळेल आणि विद्यार्थ्यांमध्ये स्वत:च्या पायावर उभे रहाण्याचा आत्मविश्वास निर्माण होईल. हे जरी शक्य असले, तरी या निर्णयातून १०० टक्के गुणवत्तापूर्ण पिढी निर्माण होण्याची शाश्वती देता येत नाही. त्यामुळे शासनाचा हा निर्णय म्हणजे गँग्रीन झाल्यावर मलमपट्टी करण्यासारखा वरवरचा आहे, असे वाटते.
आता इयत्ता आठवीपर्यंत शाळेत परीक्षाच होत नसल्याने विद्यार्थ्यांच्या मनावर अभ्यासाचे महत्त्व रुजत नाही. परीक्षा आणि गुणपद्धत बंद झाल्यामुळे विद्यार्थी स्वत:च्या कष्टांचे मूल्यमापन करू शकत नाहीत, तसेच यामुळे अभ्यासातील गांभीर्य न्यून होऊन विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात ढकलले जाते. याचे परिणाम पुढे दहावीच्या परीक्षेच्या वेळी दिसून येतात. पुनर्परीक्षेची संधी उपलब्ध असली, तरी यात पुष्कळ मनुष्यबळ आणि पैसा खर्ची पडते. संघर्षाशिवाय कोणत्याच क्षेत्रात यश मिळत नाही. दुसर्यांदा परीक्षा घेण्याच्या या निर्णयामुळे विद्यार्थी कष्ट घेण्यात सवलत घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. कौशल्य विकास अभ्यासक्रमासाठी असा शेरा मिळालेल्या विद्यार्थ्यांची आयुष्यातील १० वर्षे विनाकारण बौद्धिक क्षमतेच्या बाहेरील अभ्यासक्रम घोकण्यात वाया जातील. नापास असा शब्द वगळला, तरी समाजातील काही जणांकडून होणारी हेटाळणी, पालकांच्या अपेक्षा यांचे दडपण त्या विद्यार्थ्यांवर रहाणारच आहे.
मेकॉलेप्रणीत शिक्षणपद्धत ही सदोष असल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून होणार्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांमध्येही वाढ होणे, हे याचेच लक्षण आहे. येणार्या अपयशाला तोंड देण्याचे मनोबल निर्माण करण्यास सध्याची शिक्षणपद्धती अपयशी ठरत असल्याने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वासही डळमळीत होत आहे. त्यामुळेच पराभव वा अपमान सहन न होता टोकाचे निर्णय घेतले जातात.
प्राचीन भारतातील शिक्षणव्यवस्था ही वेदप्रमाणित आणि परिपूर्ण होती. विद्यार्थ्याचे कौशल्य पाहूनच त्याला शिक्षण दिले जाई. प्रत्येक कर्म ईश्वरप्राप्तीचे साधन असल्याचे मनावर बिंबल्यामुळे कर्मात कनिष्ठ वा उच्च असा भेद नसे. प्रत्येकाकडून शिकण्याचा प्रयत्न असल्याने स्पर्धेचा प्रश्न उद्भवत नसून मनोबलही अधिक असे. दैवदुर्विलासाने काळाच्या ओघात या महान शिक्षणपद्धतीकडे कानाडोळा करण्यात आला. आज शिक्षणपद्धतीत वाढलेल्या या समस्यांचा आवाका पहाता विद्यार्थ्यांना सर्वांगाने घडवणार्या आणि समाजाला मन, बुद्धी यांनी सक्षम असलेली पिढी देण्यासाठी गुरुकुल शिक्षणपद्धतीचे पुनरुज्जीवन करणे, हाच सयुक्तिक पर्याय आहे ! असे झाल्यास नापास आणि विद्यार्थ्यांच्या आत्महत्या हे शब्दच कालबाह्य होतील !
– कु. प्राजक्ता धोतमल, सनातन आश्रम, देवद, पनवेल.