हिंदु संस्कृतीचे महत्त्व पाश्चात्त्यांच्या लक्षात येते; मात्र देशातील जन्महिंदूंच्या लक्षात येत नाही, हे दुर्दैवी ! हिंदूंना हिंदु संस्कृतीची महती लक्षात येण्यासाठी त्यांना धर्मशिक्षण देण्याला पर्याय नाही ! पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करणारे भारतीय हिंदु संस्कृतीची महती जाणून त्याप्रमाणे आचरण करतील तो सुदिन !
१. सर्व जगाच्या संस्कृतीत हिंदु संस्कृतीचे
स्थान अत्यंत वरच्या (उच्च) दर्जाचे ! – मॅक्सम्युलर
हिंदुस्थानपासून आपण काय शिकावे ? या त्याच्या ग्रंथात मॅक्सम्युलर म्हणतो, संपत्ती, शक्ती आणि निसर्गसौंदर्याची विपुलता असलेला, पृथ्वीवरील स्वर्ग असलेला असा जर एखादा देश मला कोणी शोधून काढावयास सांगेल, तर मी हिंदुस्थानकडेच अंगुलीनिर्देश करीन. सर्व जगात बुद्धीचा विकास कोठे झालेला आहे, असे जर मला कोणी विचारले, तरीसुद्धा मला हिंदुस्थानचेच नाव घ्यावे लागेल. सर्व जगाच्या संस्कृतीत हिंदु संस्कृतीचे स्थान अत्यंत वरच्या (उच्च) दर्जाचे आहे, यात शंका नाही. युरोप खंडाला हिंदुस्थानपासून बर्याच गोष्टी शिकल्या पाहिजेत. विश्वाच्या उषःकालात जेव्हा सर्व विश्व रानटी स्थितीत होते, तेव्हा हिंदुस्थान अभ्युदयाच्या, संस्कृतीच्या, सामाजिक सुस्थितीच्या, पूर्णावस्थेच्या उत्तुंग शिखरावर होता.
२. सुसंस्कृत समाजाच्या लक्षणांमध्ये हिंदुस्थान
युरोपातील देशांपेक्षा न्यून नाही ! – इंग्रजांचा गव्हर्नर थॉमस मनरो
इंग्रजांचा गव्हर्नर थॉमस मनरो याने वर्ष १८१३ मध्ये हनसर्ण डिबेटच्या (वाद-विवादाच्या) वेळी उद्गार काढले, सुसंस्कृत लोकांची लक्षणे; शेतीची चांगली पद्धत; अतुलनीय उत्पादन कौशल्य; जे जे उपयोगी, विलासपूर्ण असेल, ते ते निर्माण करण्याची क्षमता; प्रत्येक खेड्यात शाळा स्थापन होणे, त्यात वाचन, लेखन आणि अंकगणित शिकवले जाणे; स्त्रियांना आत्मविश्वास, आदर, पावित्र्य यांनी युक्त अशी वागणूक देणे, हीच जर सुसंस्कृत समाजाची लक्षणे असतील, तर हिंदुस्थान युरोपातील देशांपेक्षा न्यून (कमी) नाही. जर संस्कृती ही व्यापाराची वस्तू झाली, तर माझी निश्चिती आहे की, भारतीय संस्कृतीच्या आयातीने इंग्लंडचा लाभच होईल.
३. भारतीय जनता जीवनातील
सर्व कलांनी सुसंस्कृत आहे ! – एडमंड बर्क
एडमंड बर्क म्हणतो, भारतीय जनता अनादी काळापासून जीवनातील सर्व कलांनी सुसंस्कृत, योग्य तर्हेने शिक्षित झाली आहे; पण आम्ही जंगलात रहात आहोत, म्हणजे इंग्रज लोक जेव्हा जंगलात रहात होते, तेव्हा भारताची सर्व बाजूंनी उन्नती होत होती.
४. इंग्रज भारतात येण्यापूर्वी भारत श्रीमंत, उच्चशिक्षित
आणि सुसंस्कृत लोकांचा एक संग्रह होता ! – अमेरिकी लेखक एच्.एम्. हिंडमन
अमेरिकी लेखक एच्.एम्. हिंडमन त्याच्या टथ्स अबाऊट इंडिया या ग्रंथात म्हणतो, इंग्रज भारतात येण्यापूर्वी शेकडो वर्षे आधी भारत हे राष्ट्र श्रीमंत, उच्चशिक्षित, सुसंस्कृत लोकांचा एक संग्रह होता. त्याची महान भाषा, विस्तृत कायद्याच्या संहिता, सामाजिक नियम, शिल्पशास्त्रातील आणि सुशोभीकरणातील त्याची कलात्मक अभिरूची, त्यातून निर्माण होणारी सौंदर्यपूर्ण सर्व प्रकारची उत्पादने, त्याच्या धार्मिक, तात्त्विक, शास्त्रीय कल्पना यांचा पश्चिमेकडील प्रगतीपर अशा बहुतेक प्रगत राष्ट्रांवर पुष्कळ प्रभाव पडला आहे. ख्रिश्चन काळाच्या पूर्वी असलेले मनूचे नियम आजही न्यायाधीश अभ्यासत असतात.
वेदकाळापासून इंग्रज हिंदुस्थानात येईपर्यंत हिंदुस्थानची सर्व बाजूंनी भरभराट होत होती. याचे सुंदर विवेचन विल्यम डुग्बी यांच्या भारताची भरभराट या सुंदर ग्रंथात केले आहे.
५. हिंदुस्थानने आपल्या व्यापार
कौशल्याने जागतिक बाजारपेठ काबीज केली होती !
डॉ. साईस यांनी त्यांच्या ग्रंथात असे म्हटले आहे, इसवी सनापूर्वी ३ सहस्त्र वर्षे हिंदुस्थान आणि असिरीया या दोन देशांत व्यापारी संबंध होते. हिंदुस्थानातील कच्चा आणि पक्का माल परदेशात जात असे अन् त्याच्या ऐवजी सोने आणि चांदी हिंदुस्थानात येत असे. परदेशातून आयात अत्यल्प होती आणि निर्यात भरपूर होती.
प्रा. डे यांनी व्यापाराचा इतिहास या ग्रंथात असे लिहिले आहे, इसवी सनापूर्वी बरीच वर्षे चीन आणि हिंदुस्थान या देशात व्यापार चालत होता.
प्रा. विल्किन्सन त्याच्या इतिहासात लिहितो, भारताचा रोमशी व्यापार चालत होता. अद्यापही रोम शहरात भारतीय रत्ने आणि नाणी सापडतात. यावरून हिंदुस्थानने आपल्या व्यापार कौशल्याने जागतिक बाजारपेठ काबीज केली होती, हे कळते.
६. हिंदुस्थान हाच साहित्य, कला आणि
संस्कृती यांना जन्म देणारा सर्व जगाचा पिता !
२०.२.१८८४ च्या डेली ट्रिब्यून नावाच्या नियतकालिकात ब्राऊन नावाच्या लेखकाने भारताविषयी एक सुंदर लेख लिहिला. त्यात तो लिहितो, आपण पूर्वग्रहविरहित मनाने विचार केला, तर आपणास असे म्हणावे लागेल की, हिंदुस्थान हाच साहित्य, कला आणि संस्कृती यांना जन्म देणारा सर्व जगाचा पिता आहे.
हिंदूंचेे वैभव या ग्रंथात कोट जॉन्स जेर्नी लिहितो, हिंदुस्थान हा केवळ हिंदु धर्माला जन्म देणारा देश नसून सर्व जगाला संस्कृती देणारा गुरु आहे. धर्म, तत्त्वज्ञान, संस्कृती यांचे शिक्षण इतर देशांनी हिंदुस्थानपासूनच घेतले आहे.
७. जगातील व्यापाराचे भरतखंड हे केंद्रस्थान होते !
थॉन्स्टन नावाचा इतिहासकार लिहितो, ग्रीस, रोम ज्या वेळी रानटी अवस्थेत होते, त्या वेळी हिंदुस्थान हा देश अत्यंत वैभवसंपन्न आणि सुसंपन्न होता. जगातील व्यापाराचे भरतखंड हे केंद्रस्थान होते. उद्योगधंंद्याची येथे अत्यंत भरभराट होती.
लॉर्ड यलाइव्हने मुर्शिदाबादचे वर्णन केले आहे, मुर्शिदाबाद लंडनप्रमाणे सुसंपन्न आहे. तेथे धनधान्याची समृद्धी आहे. ते नुसते वैभवाने चांगले आहे असे नाही, तर नीतीवान आणि चारित्र्यवानही आहे.
८. जगातील कोणताही देश
हिंदुस्थानशी तुलना (बरोबरी) करू शकणार नाही !
बिल ड्युरांट म्हणतो, हिंदुस्थान ही आपल्या वंशाची मातृभूमी आणि संस्कृत ही युरोपीय भाषांची जननी आहे. ती आपल्या तत्त्वज्ञानाची जननी आहे. ग्रामपंचायत या संस्थेतर्फे स्वराज्य आणि लोकशाही यांचे उगमस्थान आहे. नानाविध मार्गाद्वारे भारतमाता ही आपणा सर्वांचीच जननी आहे.
हिंदुस्थान हा सगळ्या पृथ्वीचाच एक नमुना आहे, असे चेम्बर्स एन्सायक्लोपिडिया म्हणतो.
मरे नावाचा इतिहासकार म्हणतो, हिंदुस्थानातील सृष्टीशोभेची भव्यता, विशालत्व, विविधता, त्यात उत्पन्न होणारी विविध प्रकारची बहुमोल धान्यसंपत्ती याविषयी जगातील कोणताही देश हिंदुस्थानशी तुलना (बरोबरी) करू शकणार नाही.
९. हिंदुस्थानातील सृष्टीची विलक्षणता, भव्यता,
चमत्कृती यांचा कायमचा परिणाम झाल्यावाचून रहात नाही !
कौंट जॉर्स्टजनी लिहितो, या हिंदुस्थानातील सृष्टीदेवतेने अनेकरंगी बहुमोल वस्त्र पांघरले आहे, असे वाटते. या देशात उन्हाळ्यात एकदम वर येणारी वनस्पती संपत्ती आणि पावसाळ्यात होणारी भयंकर वादळे, त्याच्या हिमाच्छादित हिमालयाची भव्यता आणि वालुकामय रखरखीतपणा, उत्तर हिंदुस्थानातील अती विस्तीर्ण मैदाने आणि गगनचुंबी पर्वतावरील सृष्टीशोभा ही पहाणा-याच्या मनावर तेथील सृष्टीची विलक्षणता, भव्यता, चमत्कृती यांचा कायमचा परिणाम झाल्यावाचून रहात नाही.
इतिहासकार एल्फिन्स्टन् लिहितो, प्रवासी कितीही साधाभोळा किंवा गंभीर किंवा काटेकोर लिहिणारा असला, तरी हिमालयाच्या सृष्टीशोभेत इतके अपूर्व सामर्थ्य भरलेले आहे की, ती एकदा त्याच्या दृष्टीस पडली की, त्याचे मन आणि लेखणी उत्साहाने भरारी मारावयास लागते. त्या सृष्टीशोभेची स्मृती त्याच्या मनातून आमरण नष्ट होत नाही. तसली शोभा जगात अन्यत्र पहावयासही सापडत नाही. जॉर्नस्टननी हा ग्रंथकार लिहितो, नखशिखांत लोखंडी चिलखत घातलेला राजपुतान्यातील अश्वारूढ योद्धा, काशीच्या देवालयातील ईश्वर धर्मनिष्ठ ब्राह्मण पहा. आपल्या लढाऊ जहाजातून किंवा चपळ घोड्यावरून त्वरेने हालचाली करणारा कडवा मराठा आणि हत्तीवरून मंद गतीने चालणारा नबाब यांच्याकडे दृष्टी फेका किंवा जंगलात वाघाची शिकार करणारी वीरस्त्री आणि आपली कामवासना देवालाच अर्पण करणारी देवदासी मुरळी यांच्याकडे दृष्टी फेका, तुम्हाला हिंदुस्थानात विलक्षणता, भव्यपणा आणि चमत्कार आढळल्यावाचून रहाणार नाहीत.
१०. तत्त्वज्ञान दर्शने निर्माण करणारे
ऋषि हिंदुस्थानखेरीज अन्यत्र कोठे सापडणार ?
कर्नल टॉड हा राजस्थानच्या इतिहासात लिहितो, ग्रीक तत्त्वज्ञानाच्या तोडीचे किंवा प्लेटो, थेम्स, पायथागोरस वगैरे तत्त्ववेत्त्यांना गुरुस्थानी असलेली तत्त्वज्ञान दर्शने निर्माण करणारे ऋषि हिंदुस्थानाखेरीज अन्यत्र कोठे सापडणार ? ज्यांचे ज्योतिषज्ञान पाहून सांप्रत युरोपियन पंडितांना आश्चर्य वाटते, श्रोत्यांचे अंतःकरण आनंदातून दुःखात आणि दुःखातून आनंदात नेणारे गायक हिंदुस्थानवाचून दुसर्या कोणात्याच देशात कुठे सापडणार ?
११. संस्कृती आणि सुधारणा या विषयांत
आजतागायत कोणत्याही राष्ट्राला हिंदु राष्ट्रास मागे टाकता आलेले नाही !
कलकत्ता रिव्ह्यू मासिकाच्या डिसेंबर १८६१ च्या अंकात एक आंग्ल लेखक म्हणतो, हिंदु राष्ट्र सांप्रत असे हीन-दीन झाले असले, तरी प्राचीन काळी या राष्ट्रात श्रेष्ठ कलाकौशल्य, युद्धविद्या, सुखकारक राज्यपद्धत, शहाणपणाचे कायदे, उच्च प्रकारचे ज्ञान, हे सर्व नांदत होते, यात शंका नाही.