श्री गणेश हे महर्षि वेदव्यासांच्या काव्यांचे लेखनिक म्हणून कार्यरत होते. श्री गणेशाने शेवटच्या दिवशी भोजपत्रावर इति असे लिहून लेखनकार्याला विराम दिला. काव्य पूर्ण झाले होते. त्यामुळे दोघांच्याही मुखकमलावर समाधानाचे तेज झळकत होते.
१. महर्षि वेदव्यासांनी श्री गणेशाच्या
वाक्-संयमाची (मौनाची) प्रशंसा करणे
या प्रसंगी महर्षि वेदव्यासांनी श्री गणेशाला (लंबोदराला) साष्टांग नमस्कार करून त्यांच्या परिश्रमाची वाहवा केली आणि म्हणाले, तुझ्या बळावरच माझ्या चिंतनाला मूर्त रूप प्राप्त होऊ शकले. हे सर्व संभाषण चालू असतांनाही श्री गणेश काहीच बोलत नव्हते; म्हणून व्यासांनी त्याच्या वाक्-संयमाची (मौनाची) प्रशंसा करून पुन्हा गणेशाला वंदन केले.
२. श्री गणेशाने मौनाची शक्ती जोपर्यंत शरिरात साठून
असते, तोपर्यंतच शरीर सतत कार्यरत राहू शकत असल्याचे सांगणे
व्यासांनी श्री गणेशाला विचारले, लेखन कार्य चालू असतांनाही मी एकटाच (व्यास) बोलत होेतो आणि तू (श्री गणेश) मौनातूनच सर्व कार्य करत होेतास. त्यावर श्री गणेश मौन पाळण्याचे महत्त्व (अध्यात्म) महर्षींना कथन करत म्हणाले, दिव्याच्या वातीला तेलाचा आधार असतो. त्यामुळे ज्योत प्रज्वलीत रहाते, तसेच मौनाची शक्ती जोपर्यंत शरिरात साठून असते, तोपर्यंतच शरीर सतत कार्यरत राहू शकते. या मौनरूपी शक्तीमुळेच मी अखंड लेखनकार्य करू शकलो. हे (मौन) मनाच्या सामर्थ्याचे अध्यात्म होय.
मौनाचा लाभ
दिव्याच्या वातीला तेलाचा आधार असतो. त्यामुळे ज्योत प्रज्वलीत रहाते, तसेच मौनाची शक्ती जोपर्यंत शरिरात साठून असते, तोपर्यंतच शरीर सतत कार्यरत राहू शकते.
३. मनाची शक्ती साठवून ठेवता
आल्यावर संकल्पाचे सामर्थ्य प्राप्त होत असणे
प्रत्येकाच्या (दानव आणि मानव यांच्या) मनाची शक्ती वेगवेगळी असते. प्राणशक्ती, विचार आणि मन यांचा परस्पर संबंध आहे. पुष्कळ विचार करणे, अनावश्यक बोलणे आणि अनावश्यक हालचाली (क्रिया करणे) यांमुळे मनाची सर्व शक्ती वापरात येऊन मानवी शरिराची प्राणशक्ती अत्यंत अल्प होते; म्हणून मौन पाळणे, तसेच वाक्-संयम ही साधनेची महत्त्वाची अंगे आहेत. साधकाला मनाची शक्ती साठवून ठेवता आल्यावर संकल्पाचे सामर्थ्य प्राप्त होऊन वाणीला संयमातच ठेवता येते. श्री गणेशाने हे मार्गदर्शन साधकांना केले, ही श्री गणेशाची कृपाच आहे. मला हे लेखन प्रस्तृत करता आले, यासाठी श्री गणेशाच्या या आध्यात्मिक मार्गदर्शनाविषयी त्याच्या चरणी कृतज्ञतापूर्वक वंदन !
– प्रा. श्रीकांत भट, अकोला (२८.५.२०१६)